Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » ५० हजार तरुणांना मिळणार रोजगार

५० हजार तरुणांना मिळणार रोजगार

  • महाराष्ट्राचा ब्लॅकस्टोन उद्योगसमूहाशी सामंजस्य करार
  • साडेचार हजार कोटींची गुंतवणूक
  • देशभरात आजपासून ‘डिजिटल इंडिया वीक’

devendra-fadanvis-in usaमुंबई, [३० जून] – महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या माहिती तंत्रज्ञानविषयक नवीन धोरणाचा परिणाम म्हणून या क्षेत्रात साडेचार हजार कोटींची गुंतवणूक जाहीर झाली असून, यामुळे राज्यात तब्बल ५० हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. अमेरिकेच्या दौर्‍यावर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंगळवारी ब्लॅकस्टोन उद्योगसमूहाशी याबाबतच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. देशभरात बुधवार, १ जुलैसून ‘डिजिटल इंडिया वीक’ या अभियानास प्रारंभ होत असतानाच महाराष्ट्राने हा सामंजस्य करार करून, या अभियानाचा जोरदार शुभारंभ केला आहे.
ब्लॅकस्टोन उद्योगसमूहापाठोपाठ कोकाकोला उद्योगसमूह देखील राज्यात ५०० कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. न्यूयॉर्क येथे पोहचलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विविध आघाडीच्या उद्योगसमूहांच्या प्रतिनिधींशी यशस्वी चर्चा केली. त्याचे फलित लगेचच दिसून आले. अमेरिकेतील प्रसिद्ध ब्लॅकस्टोन उद्योगसमूहाने राज्यात ४५०० कोटी रुपयांची घसघशीत गुंतवणूक करणार असल्याचे यावेळी जाहीर केले. त्यात हिंजेवाडी (पुणे) येथे १२०० कोटी, मध्य मुंबईतील आयटी पार्कमध्ये १५०० कोटी, मुंबईतीलच इतर आयटी पार्कमध्ये १०५० कोटी आणि ईऑन फ्री झोन सेझमध्ये ७५० कोटी याप्रमाणे ही गुंतवणूक होणार आहे. याबाबत राज्य सरकारसह ब्लॅकस्टोन आणि पंचशील यांच्यासमवेतच्या सामंजस्य करारावार स्वाक्षर्‍याही करण्यात आल्या. ब्लॅकस्टोन ही वित्तीय सल्लागार आणि गुंतवणूक व्यवस्थापन विषयक जागतिक पातळीवरील आघाडीची संस्था आहे, हे विशेष.
कोकाकोला कंपनीने महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच्या लोटे परशुराम येथे ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. तसेच जगातील आघाडीची बँक असलेल्या सिटी बँकेचे प्रबंध संचालक (ऑपरेशन्स) जगदीश राव यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. सिटी बँकेचे भारतात सध्या ११ हजार कर्मचारी कार्यरत असून, या बँकेच्या महाराष्ट्रातही शाखा आहेत. मुंबई आणि पुण्यात बँक आपला कार्यविस्तार करणार असून, नव्याने ४ हजार रोजगार निर्माण करण्याच्या योजनेची माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
अमेरिका आणि भारत उद्योग परिषदेच्या निमित्ताने (युएसआयबीसी) अमेरिकेच्या उद्योग जगतातील अनेक दिग्गजांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अमेरिका व भारत सरकारच्या संयुक्त प्रयत्नातून १९७५ मध्ये स्थापन झालेली ही परिषद दोन्ही देशातील उद्योग व्यापारविषयक संस्थांना व्यवसाय वृद्धीसाठी सहाय्य करते. यावेळी उपस्थित उद्योजकांना मुख्यमंत्र्यांनी संबोधित केले. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचे असलेले वेगळेपण, जाचक अटींमधून उद्योगांची करण्यात येत असलेली मुक्तता, ‘इजी ऑफ डुईंग बिझनेस’ या मोहिमे अंतर्गत सरकारने घेतलेला पुढाकार आदींची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना माहिती दिली.
‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’साठी आमचे सरकार कटिबद्ध असून महाराष्ट्र गुंतवणुकीच्या दृष्टीने एक मोठे केंद्र असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याच्या औद्योगिक क्षेत्रातील परमीटराज आम्ही संपुष्टात आणले आहे. उद्योगाच्या उभारणीसाठी लागणार्‍या परवानग्यांची संख्या आम्ही ७६ वरून ३७ वर आणली आहे. ही संख्या भविष्यात २५ इतकी कमी करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच या परवानग्यांसाठी एकच प्लॅटफॉर्म तयार करण्यात येईल. हॉटेल उभारणीसाठी यापूर्वी १४८ प्रकारच्या परवानग्या घ्याव्या लागत असत व त्यासाठी तब्बल दोन वर्षे वाया जात होती. ही संख्याही केवळ २० इतकी कमी करण्यासाठी आम्ही लवकरच धोरण जाहीर करणार आहोत. त्यामुळे या परवानग्यांसाठी लागणारा कालावधी दोन महिन्यांपेक्षाही कमी असेल. दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोर, स्मार्ट सिटी, उत्पादनक्षम उद्योग, कृषी, नागरी उड्डयण, अभियांत्रिकी आणि आयटी क्षेत्रात भरीव गुंतवणुकीची प्रतीक्षा आहे, असे सांगून महाराष्ट्राच्या यशात भागीदार होण्याचे आवाहनही त्यांनी उद्योजकांना केले.
उद्योग परिषदेचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर होऊ शकण्याची क्षमता महाराष्ट्रात असल्याचे सांगतानाच मुख्यमंत्र्यांच्या उद्योगविषयक भूमिकेची प्रशंसा केली. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढीसाठी परिषदेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. या परिषदेला ताज हॉटेल, एचएसबीसी, कॅटरपिलर, कारगिल, जॉन्सन अँड जॉन्सन, केपीएमजी, बेकर अँड मॅकेन्झी, सिटी, न्यू सिल्क रूट, मोन्सॅटो आणि फायझर आदी उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दरम्यान, आठवड्याभराच्या अमेरिका दौर्‍यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्याच्या शिष्टमंडळाचे अमेरिकी प्रमाण वेळेनुसार सोमवारी (२९ जून) सकाळी न्यूयॉर्कमध्ये आगमन झाले. त्यानंतर सकाळच्या सत्रात मुख्यमंत्र्यांनी न्यू जर्सीचे गव्हर्नर ख्रिस क्रिस्टी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. त्यात राज्यात ‘इजी ऑफ डुईंग बिझनेस’ अंतर्गत करण्यात आलेल्या उपाययोजना, सोशल मीडिया, सौर ऊर्जा आदी विषयांचा समावेश होता. क्रिस्टी यांनी महाराष्ट्र सरकारने केलेल्या विविध उपाययोजनांची प्रशंसा केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्रात येण्याचे निमंत्रण दिले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23209

Posted by on Jul 1 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1583 of 2451 articles)


नवी दिल्ली, [३० जून] - सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोलच्या प्रति लिटर दरात ३१ पैशांची आणि डिझेलच्या दरात ...

×