Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » ९१ मुख्य जलाशयांमध्ये केवळ २२ टक्केच पाणी

९१ मुख्य जलाशयांमध्ये केवळ २२ टक्केच पाणी

=देशभरातच जलसंकट=water-scarcity
नवी दिल्ली, [२३ एप्रिल] – पाण्याचे भीषण दुर्भिक्ष्य केवळ महाराष्ट्र व कर्नाटकातच नसून, देशाच्या सर्वच भागांमध्ये पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. जबरदस्त दुष्काळ आणि उन्हाचा वाढता पारा यामुळे देशातील ९१ प्रमुख जलाशयांमधील जलसाठा आता केवळ २२ टक्क्यांवर आला आहे. मान्सूनचे आगमन होण्यास अजूनही एक ते सव्वा महिना असल्याने इतक्याच जलसाठ्यावर भारतीयांना आपली तहान भागवावी लागणार आहे.
केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने या जलसाठ्यांमधील पाण्याच्या पातळीची ताजी माहिती नुकतीच प्रसिद्ध केली आहे. २१ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात देशातील या ९१ जलशयांमध्ये केवळ ३४.०८२ अब्ज घनमीटर इतकाच जलसाठा शिल्लक होता. या सर्वच जलाशयांची पाणी साठविण्याची क्षमता १५७.७९९ अब्ज घनमीटर इतकी आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी हिमाचल प्रदेश, तेलंगणा, पंजाब, ओडिशा, राजस्थान, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळातील मुख्य जलाशयांमधील जलसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला असल्याचे मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे. केवळ आंध्रप्रदेश आणि त्रिपुरातील जलाशयांमध्येच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक जलसाठा उपलब्ध आहे. तर, पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या वर्षी जितका जलसाठा होता, तितकाच आताही कायम आहे.
विशेष म्हणजे, १३ एप्रिल रोजी संपलेल्या आठवड्यात ९१ जलाशयांमध्ये ३५.८३९ अब्ज घनमीटर इतका जलसाठा होता. त्यानंतर अवघ्या एकाच आठवड्यात तो ३४.०८२ अब्ज घनमीटरपर्यंत कमी झाला आहे, असेही यात नमूद आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27975

Posted by on Apr 24 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (444 of 2453 articles)


=भारतीय वेधशाळेचा इशारा= नवी दिल्ली, [२३ एप्रिल] - यावर्षीचा पावसाळा सरासरीपेक्षा जास्त राहणार, अशी आनंदाची बातमी देणार्‍या भारतीय वेधशाळेने आज ...

×