Home » मराठवाडा » माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा!

माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवा!

=गोपीनाथ मुंडेंनी दिले अजित पवारांना आव्हान=
मुंबई, (७ जानेवारी) – हिंमत असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमधून माझ्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवूनच दाखवावी, असे जाहीर आव्हान भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांनी आज येथे दिले. खरेच मला आव्हान द्यायचे असेल तर दुसर्‍या फळीतील मंत्र्यांना कशाला उभे करता थेट अजित पवारांनीच मैदानात उतरावे, मी मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे, असेही ते म्हणाले.
भाजपा प्रदेश कार्यालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंडे म्हणाले, भाजपाच्या महायुतीच्या झंझावातामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंगे्रस अस्वस्थ झाली असून बीडमध्ये माझ्याविरोधात सर्व ताकद पणाला लावण्याचा त्यांचा इरादा आहे. त्यामुळे मला राष्ट्रवादी कॉंगे्रसला सांगायचे की, त्यांनी आपली सर्व ताकद तर लावावीच, पण आपले सर्वात ताकदवान नेते अजित पवार यांना माझ्याविरोधात उभे करावे.
सध्या राष्ट्रवादी अधूनमधून माझ्याविरोधात नवनवे उमेदवार उभे करण्याची घोषणा करीत आहे. कधी जयदत्त क्षीरसागर तर कधी सुरेश धस. मला पराभूत केल्यास महायुती बॅकफुटवर जाईल, असा समज त्यांनी केलेला दिसतो. मला वाटते त्यांनी माझ्याविरोधात दुसर्‍या फळीतील नेते उभे करण्यापेक्षा थेट अजित पवारांनाच उभे करावे. कारण त्यांच्याकडे ताकद, सत्ता, पैसा, कार्यकर्ते सर्व काही आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाही एक प्रचंड मोठा मुकाबला बघायला मिळेल, असेही मुंडे म्हणाले.
* मंत्र्यांना पाडण्यासारखी दुसरी सोपी गोष्ट नाही
आघाडी सरकारमधील मंत्री तुमच्याविरोधात उभे राहिल्यास ते आपली सारी ताकद पणाला लावून तुम्हाला लोकसभा निवडणुकीत पाडण्यासाठी प्रयत्न करणार, यावर मुंडे म्हणाले, उलट मंत्री उभे राहिल्यास माझे काम सोपे होईल. मंत्र्यांना पाडण्याइतकी दुसरी सोपी गोष्ट नाही. याआधी मी मंत्रिमहोदय पंडितराव दौंड यांना हरवले होते. मंत्री व त्यांच्या सहकार्‍यांचा भ्रष्टाचार लोकांसमोर मांडला की काम सोपे होते.
* आपबाबत आताच निष्कर्षावर पोहचणे चुकीचे
दिल्लीतील यशामुळे आपची देशभर चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये आपचा महाराष्ट्रात कितपत प्रभाव पडेल. त्याचा फटका कॉंगे्रस राष्ट्रवादीऐवजी महायुतीला बसेल का, यावर मुंडे म्हणाले, आपबाबत आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही. दिल्ली म्हणजे सारा देश नाही. प्रत्येक राज्यांचे प्रश्‍न वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास शहरांपेक्षा ग्रामीण भागांमध्ये मोठी ताकद आहे. तेथे नव्याने आलेल्या आपचा कितपत प्रभाव पडतो, हे लवकरच सर्वांना कळेल, असेही मुंडे यांनी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=9910

Posted by on Jan 8 2014. Filed under मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google