Home » युवा भरारी » चार दिवस, चार किल्ले

चार दिवस, चार किल्ले

शनिवारी ८ डिसेंबरला सकाळी ७ वाजता आम्ही त्यांना हॉटेलमधून पिकअप केलं. त्या दोघी आणि आम्ही चौघं. अरुण सर, प्रकाश सर, शंतनू सर व मी. त्यांना पाहिल्यावर ‘एवढे कठीण किल्ले त्यांना सर करायला जमेल का,’ हा प्रश्न पडला. दुपारी दोन वाजता इगतपुरीला गेलो. मग घोटीमार्गेआंबेवाडीला पोहोचलो. तिथून जवळच होते अलंग, कुलंग, मदन किल्ले.
‘डिसेंबर (२०१२) महिन्याच्या ८ ते ११ या तारखांना बिझी राहू नकोस. आपल्याला दोन परदेशी महिलांना घेऊन कुलंगगड, मदनगड, अलंगगड व रतनगड असे चार किल्ले करायचे आहेत’, अरुण सरांचा महिन्याभरापूर्वी मला फोन आला. ‘पण सर, चार दिवसांत हे चार किल्ले सर करणं अवघड वाटतं. हे चार अवघड किल्ले सर करणं आणि तेही एकेका दिवसात आव्हानच आहे. इतर गिर्यारोहकांना पाच दिवस लागतात. भल्याभल्यांची दमछाक होते. त्यात या परदेशी महिलांना भारतीय हवामानाशी जुळवून घेणं थोडं कठीण जाईल.’ मी सरांना एका झटक्यात शंका विचारून घेतल्या.
‘काळजी करू नकोस. दिसायला नाजूक असल्या तरी दोघी चांगल्याच काटक आहेत. त्या कशा सर करतात, ते तुला प्रत्यक्षस्थळी आल्यावर पाहाता येईल,’ सर म्हणाले. आणि सरांनी त्या दोघींवर दाखवलेला विश्वास खरा ठरला. अवघ्या तीन दिवसांत त्यांनी चार किल्ले सर केले. ट्रुई वय वर्षे ५४ आणि क्रिस्टी आहे ४६ वर्षांच्या. दोघींची मुलं मोठी होऊन स्थिर-स्थावर झालेली. त्यामुळे या आया आता जगात फिरायला मोकळ्या. ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग स्पर्धेत नियमित भाग घेणार्‍या हौशी स्पर्धक.ट्रुई ही मूळची नेदरलंडची तर क्रिस्टी मलेशियाची. दिसायला शिडशिडीत बांधा, पण दोघींचा स्टॅमिना मात्र जबरदस्त होता.
शनिवारी ८ डिसेंबरला सकाळी ७ वाजता आम्ही त्यांना हॉटेलमधून पिकअप केलं. त्या दोघी आणि आम्ही चौघं. अरुण सर, प्रकाश सर, शंतनू सर व मी. त्यांना पाहिल्यावर ‘एवढे कठीण किल्ले त्यांना सर करायला जमेल का,’ हा प्रश्न पडला. दुपारी दोन वाजता इगतपुरीला गेलो. मग घोटीमार्गे आंबेवाडीला पोहोचलो. तिथून जवळच होते अलंग, कुलंग, मदन किल्ले.
दुपारी साधारण १ ते ३ च्या भर उन्हात चढाई टाळण्याकडे अरुण सरांचा प्रयत्न असतो.म्हणून आम्ही तीननंतर चढाईला सुरुवात केली. अवघ्या सव्वा दोन तासातच आम्ही कुलंगगडाचा माथा गाठला. वाटेत फक्त एका ठिकाणीच विश्रांतीसाठी थांबलो. गड चढाई करताना आजूबाजूचा परिसर बघताना ट्रुई आणि क्रिस्टी अक्षरश:हरखून गेल्या. त्यांनी भरपूर फोटो काढले. ‘‘आमच्या नेदरलँडची जमीन सपाट आहे.एकही डोंगर नाही त्यामुळे आम्ही तर खूपच खूश झालो आहोत. एवढ्या उंचावरून दिसणारा खालचा परिसर, इवलीशी घरं, दूरवरील डोंगररांगा आणि कुलंगगडावरून मोहून टाकणारा सूर्यास्त पाहून तर आमच्या डोळ्यांचं पारणंच फिटलं. तुमच्या सह्याद्रीने तर आम्हाला अक्षरश: भुरळ पाडली आहे. आम्ही तर दरवर्षी इथे यायचं ठरवलं आहे. खरोखर तुम्ही किती नशीबवान आहात! तुमच्या देशात निसर्गाने भरपूर उधळण केली आहे,’’ट्रुई उत्साहाने आमच्याशी बोलत होती.‘पण गिर्यारोहकांनी टाकलेला वाटेत पडलेला हा प्लास्टिकचा कचरा मात्र मनाला खटकतो!’’ट्रुईच्या या म्हणण्याने आम्हाला मेल्याहून मेल्यासारखं झालं.
‘‘पुण्याचा पंचवीस जणांचा ग्रुप आधीच कुलंगगडावर आला होता. या गडावर एकमेव गुहा आहे. त्यामुळे आम्हाला ३२ जणांना ती गुहा कमी पडणार होती. म्हणून सोबत आणलेला तंबू मोकळ्या जागेवर उभारला. त्यात या दोघी जणी विश्रांती करायच्या. आम्ही तंबूबाहेर उघड्यावर झोपायचो. या ट्रेकमध्ये माझी तंबू उभारण्याची पहिलीच वेळ होती. माझे मार्गदर्शक होते अरुण सर. त्यादिवशी चूल पेटवायला शिकलो. माझी शिकण्याची वृत्ती पाहून ट्रुई आणि क्रिस्टीला कौतुक वाटलं. कामाची आवराअवार झाल्यावर रात्री मस्त आमच्या गप्पा रंगल्या.त्या दोघींनी आपल्या भाषेतील छान छान गाणी म्हटली. डोक्यावरील अथांग आभाळातील असंख्य चांदण्यांची रोषणाई बघून त्या दोघीही हरखून गेल्या. ट्रेकची सुरुवात तर खरोखर छान झाली होती…!
दुसर्‍या दिवशी रविवारी (९ डिसेंबर २०१२) ला पहाटे सहा वाजताच अरुण सरांनी सर्वांना उठवलं.
शंतनू सरांनी ट्रेकचं वेळापत्र सांगितलं. आवरून ट्रेकसाठी सज्ज झालो. वाटेत भरपूर फोटो काढता यावेत आणि वेळही फुकट जाऊ नये म्हणून अरुण सर त्या दोघींना घेऊन पुढे निघाले. एरवी कुलंगगडावरून मदनगडाला जायला सहा ते सात तास लागतात. पण अरुण सरांनी मार्च २०१२ ला शोधून काढलेल्या नवीन अनोख्या वाटेने अवघ्या दोन तासातच मदनगडाच्या पायर्‍यांना जाऊन भिडता येतं. त्यामुळेच गिर्यारोहकांना आता एका दिवसात दोन किल्ले करणं सहज शक्य झालं आहे. कुलंगगडाच्या पायर्‍या उतरल्यावर लगेच उजव्या बगलेतून कातळाखालून वळसा घेऊन एक वाट लागते. ती तडक मदन आणि अलंगगडामधील बेचक्याला जाऊन मिळते. ‘‘आम्ही उशिरा निघूनही दोन तासांत सहज या महिलांना गाठू शकू,’’ असं मला वाटलं होतं. मात्र त्या दोघी अरुण सरांच्या मदतीने आमच्याआधीच मदनगडाच्या कोलमध्ये जाऊन पोहोचल्या होत्या. इथेही माझा अंदाज चुकला!
पुढच्या वाटचालीला जास्त उशीर नको, म्हणून अरुण सरांनी आम्हा सात जणांचं विभाजन दोन ग्रुपमध्ये केलं. एका तुकडीत अरुण सर, ट्रुई आणि क्रिस्टी मदनगडाच्या चढाईसाठी निघाले. तर दुसर्‍या तुकडीत मी, प्रकाश सर, शंतनू सर आणि भोरू (आमचा मदतनीस) अलंगगडाची भिंत चढण्यासाठी रवाना झालो. मदनगडाची तीस फुटांची कातळ भिंत अरुण सर सहज चढून गेले. त्यांनी ट्रुई आणि क्रिस्टीला हार्नेस घालून वर घेतलं. ते तिघेही अल्पावधीतच मदनच्या टोकावर जाऊन पोहोचले. त्यावेळी दुपारचे दोन वाजले होते. मदनच्या माथ्यावरून दिसणारं विहंगम दृश्य कॅमेर्‍यात बंदिस्त करून त्यांनी मदनच्या उभार पायर्‍या उतरायला सुरुवात केली.
ते तिघं अलंगगडाच्या तुटलेल्या कड्याखाली येईपर्यंत मी ती ४५ फुटांची कठीण भिंत चढून गेलो.माझा सुरक्षादोर प्रकाश सरांनी त्यांच्या हार्नेसमधून ओवला होता.त्यामुळे मला कशाची चिंता नव्हती. प्रकाश सरांचा वॉल क्लाययम्बिंगचा अनुभव दांडगा आहे. ते स्वत: वॉल क्लायम्बिंग स्पर्धेचे पंच आहेत. इतक्या अनुभवी माणसाबरोबर काम करताना भीती कशाला बाळगायची? माझ्यानंतर प्रकाश सर व शंतनू सर वर चढले. इतक्यात पहिली तुकडीही मदन गडावरून परत आली. त्यांनाही आम्ही वर खेचून घेतलं. सर्वांच्या सॅक वर खेचून घेतल्या. भोरूला माघारी जेवण आणण्यासाठी पाठवलं. मोहिमेच्या दुसर्‍या दिवशी अलंगगडावर आम्हा सहा जणांव्यतिरिक्त कोणीच नव्हतं. त्यामुळे आम्ही राजे होतो. तंबू न लावता सर्वांनी उघड्यावर विश्रांती घ्यायचं ठरवलं.
चढाईच्या तिसर्‍या दिवशी (१० डिसेंबर २०१२) आम्ही आम्ही सामान आवरेपर्यंत अरुण सर, ट्रुई आणि क्रिस्टी आधीच खाली उतरून गेले. अलंगगडाच्या पायर्‍या उतरणं हे तसं अवघड काम.खूप काळजी घ्यावी लागते. त्यानंतर ४५ फुटांचं रॅपलिंग. आदल्या दिवशी ट्रुईने अरुण सरांचं कमांडो रॅपलिंग बघितलं होतं. अलंगचं रॅपलिंग कमांडो पद्धतीने करण्याचा तिने हट्ट धरला. तिच्या हट्टापुढे आम्हाला माघार घ्यावी लागली. प्रकाश सरांच्या मार्गदर्शनाखाली ट्रुईने रॅपलिंग केलं. अलंगगडावरून खाली उतरताना चांगलेच हाल झाले. त्यामुळे अलंगगडाच्या खाली असलेल्या गावात विश्रांती घेणं गरजेचं होतं.
११ डिसेंबरची सकाळ. सूर्योदयाचं अप्रतिम दृश्य बघायला मिळालं. डोळ्यांचं पारणं फिटलं. आम्ही पुढे रतनगडाच्या चढाईसाठी गेलो. रतनगडाचा परिसर फिरून घेतला. आजोबाचा अजस्त्र डोंगर, बाण सुळका आणि सांधणची दरी बघितली. उजव्या अंगाला आम्ही केलेले रतनगड, मदनगड, अलंगगड दिसले. महाराष्ट्राचं सर्वात उंच कळसूबाईचं शिखरही छान दिसत होतं. तिथलं दृश्य पाहून ट्रुई आणि क्रिस्टीही जाम खूश झाल्या.एवढं सुंदर दृश्य त्या प्रथमच बघत होत्या.
सुरज मालुसर

Short URL: https://vrittabharati.in/?p=2004

Posted by on Jan 21 2013. Filed under युवा भरारी. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in युवा भरारी (16 of 28 articles)


कुठल्याही कार्यक्रमाचा होणारा शेवट म्हणजे आभारप्रदर्शन. नुकतीच एका कविसंमेलनाला हजेरी लावली. तसा कार्यक्रम धोक्याचाच. पण, जीवनात धोक्याशिवाय मजाही नाही.रिस्क फॅक्टर ...

×