Home » चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक » सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच!

सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच!

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

तरुणाई – भाग : ३
new students-stressशाळा सुरु झाल्या, मस्त पहिला पाऊस सुद्धा झाला आणि वातावरण उल्हासित झालं. मुलीच्या पुस्तकांना कवर्स घालताना लहानपणीची आठवण झाली. कॉलेजमध्ये ऍडमिशनसाठी रांगा लागू लागल्या आहेत. पुस्तकाच्या दुकानांमध्ये गर्दी होऊ लागली आहे, हळू हळू. नव्याने कॉलेजला जाणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी गुलाबी मूडमध्ये आहेत. नव्या वातावरणाची, नव्या मित्र-मैत्रिणींची आणि नव्या अभ्यासाची, सगळीच उत्सुकता मनामध्ये भरून राहिली आहे. या सगळ्यात एडजस्ट होण्यात सुरुवातीचे २-३ महिने निघून जातात आणि मग एकदम अभ्यासाची जाणीव होते, तोपर्यंत परीक्षा तोंडावर आलेल्या असतात.
आजकाल बहुतांशी मुलं-मुली इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेत आहेत. शाळेमध्ये देखील संगणकाची ओळख आणि प्राथमिक शिक्षण होते आहे. त्यामुळे कॉलेजमध्ये या गोष्टींचा ताण फारसा येत नाही. तरीही, अनेक विद्यार्थ्यांना विशेषतः ११ वी चे वर्ष, अथवा, १२ वी नंतरच्या विविध कोर्सेसचे पहिले वर्ष अवघड जाते. विशेषतः इंजीनिअरिंगमधील अनेक मुलांना १२ वी ला अत्यंत चांगले गुण असून सुद्धा वर्ष मागे राहण्याचा अनुभव येतो. याला अनेक कारणे आहेत. महत्वाचे कारण म्हणजे अनेकदा महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुले आई वडिलांपासून, घरापासून दूर जातात, नव्या वातावरणात, होस्टेल जीवनाला सरावण्यामध्ये त्यांची धांदल उडून जाते. त्यात वेगळा आणि अवघड अभ्यास याचं टेन्शन; आतापर्यंत घरी कोणी न कोणी अभ्यासाकडे लक्ष दिलेले असते, पण आता सर्वच आपले आपण करायचे, याच्या तणावामुळे अभ्यासावर त्याचा परिणाम दिसून येतो. काहीवेळा, वेगळे अभ्यासक्रम निवडणाऱ्या मुलांना पुस्तके, नोट्स आदी सहज उपलब्ध होत नाही, त्यामुळे देखील त्यांना टेन्शन येते आणि मार्क्सवर परिणाम होतो.
मग, या सगळ्यावर मात कशी करायची? काही सोप्या, अनुभवाने आलेल्या गोष्टी जर मुलांनी लक्षात घेतल्या तर हा नवीन अभ्यास सोपा होऊ शकतो.
⦁    प्रथम मनामध्ये हा अभ्यासक्रम मला शक्य आहे, जमणार आहे असा पॉझीटीव्ह विचार करा!! कोणत्याही यशाची पहिली पायरी ही आपले सकारात्मक विचार असतात!!!
⦁    कॉलेज लाईफची मजा घेणे याबरोबरीने आपण अमुक एक कोर्स का निवडला आहे याचे सतत भान ठेवा. याचा आपले तारू भरकटू न देण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो.
⦁    आपल्या नवीन शिक्षकांची ओळख करून घ्या. अडचणी सोडवण्यासाठी (काही वेळा अगदी वैयाक्तिक अडचणी देखील) शिक्षकांची नेहमीच मदत होते.
⦁    आपल्या अभ्यासासाठी योग्य पुस्तकांची पुस्तक सूचीनुसार निवड करा. सर्वच पुस्तके खरेदी करण्याची आवश्यकता नसते. कॉलेज अभ्यासिकेमध्ये / वाचनालयामध्ये अनेक पुस्तके उपलब्ध असतात. त्यांचा देखील योग्य वापर करता येईल.
⦁    वर्षाच्या सुरुवातीपासून रोजचा थोडा वेळ आपल्या अभ्यासाला दिला तर परीक्षेच्या आधी ताण येत नाही. जसा १०-१२ वी चा अभ्यास सुरुवातीपासून करतो, तसाच इतर अभ्यासक्रमांचा देखील केला, तर १०-१२ वी चे मार्क्स पुढेदेखील टिकवून ठेवता येतात. (मी अशी अनेक उदाहरणे पहिली आहेत, की १०- १२ वी ला ९०% च्या घरात मार्क्स असलेल्या मुलांना नंतर पुढच्या वर्षी अगदी ६५-७०% मार्क्स मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. याला कारण एकच असते, की जे सातत्य १०-१२ वी मध्ये होते, ते पुढे उरत नाही!) म्हणून अभ्यासामध्ये सुरुवातीपासून सातत्य ठेवा.
⦁    आपल्याला वर्गात शिकवताना आलेल्या शंकांचे निरसन वेळीच करून घ्या. सुरुवातीला वर्गात सगळ्यांदेखत काही विचारायला संकोच, अथवा भीती वाटते, अशावेळी, एका कागदावर आपली शंका लिहून शिक्षकांना दाखवावी आणि त्याचे निरसन करून घ्यावे.
⦁    अवघड विषयांसाठी ग्रुपमध्ये केलेला अभ्यास देखील फायदेशीर ठरतो. त्यासाठी आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये चर्चा करून देखील शंकानिरसन करता येऊ शकेल.
⦁    ज्या विषयांचे पाठांतर करणे आवश्यक आहे तिथे आळस करू नका. विषय समजण्याइतकाच, तो व्यवस्थित लिहिता येणे देखील आवश्यक असते. त्यासाठी, प्रयत्न करणे हा एकमेव उपाय आहे.
⦁    आपल्या पाठ्य अभ्यासाव्यतिरिक्त आपल्या कोर्सशी संबंधित अवांतर वाचन देखील सुरु करा. त्याचा पुढे व्यवसायामध्ये खूप उपयोग होतो. उदा. विधी अभ्यासक्रमाला असणाऱ्या विद्यार्थ्यांनी विधीविषयक बातम्या, लेख ऐकले आणि वाचले पाहिजेत. यामुळे, आपल्या अभ्यासाला फायदाच होतो.
⦁    व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये पाठ्यज्ञानाइतकेच त्याचे प्रत्यक्षात उपयोगीकरण देखील तितकेच महत्वाचे असते. त्यासाठी, त्यासंबधी वाचन आणि स्पर्धा यामध्ये देखील सहभाग घ्या.
या खरतर ढोबळ पण अतिशय उपयुक्त सूचना आहेत, ज्यांचा नक्कीच अनेक मुलांना फायदा झालेला आहे. आपली आजची मेहनत ही आपल्या उज्ज्वल भविष्याची गुंतवणूक असते. सातत्य, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास या तिघांशी मैत्री कधी सोडू नका, मग पहा ताण विरहित अभ्यास आणि यश तुमचेच आहे.

ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=22774

Posted by on Jun 9 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

1 Comment for “सातत्य ठेवा, आत्मविश्वास बाळगा; यश तुमचंच!”

  1. उसेफुल इन्फो.

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक (69 of 125 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• कॉंग्रेसच्या आणि राहुल गांधींच्या कोल्हेकुईचं खरं कारण हे आहे की, कॉंग्रेसला जे जमलं नाही ते पंतप्रधान ...

×