Home » विज्ञान भारती » मध्य प्रदेशात आढळले डायनॉसोरचे अवशेष

मध्य प्रदेशात आढळले डायनॉसोरचे अवशेष

इंदूर, [१४ जुलै] – डायनॉसोरचे दुर्मिळ अवशेष मध्य प्रदेशातील नर्मदेच्या खोर्‍यात आढळून आले आहेत. या ठिकाणी साधारण सहा कोटी वर्षांपूर्वी हे अजस्त्र प्राणी वास्तव्य करीत असावेत, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. या अवशेषांमध्ये या महाकाय आणि नामशेष प्राण्याच्या विष्ठेचे अंश जीवाश्म स्वरूपात आढळून आले आहेत. या अवशेषांच्या सविस्तर अभ्यासातून डायनॉसोरच्या खाण्याच्या सवयींविषयीची आणि पर्यायाने त्यांच्या नामशेष होण्यामागच्या नेमक्या कारणांचा तपास करता येणार आहे.
धार जिल्ह्यातील जगविख्यात मंडू या पर्यटन स्थळानजिक उंबरण येथे करण्यात आलेल्या उत्खननात विष्ठा आणि हाडांचे अवशेष सापडले असून ते सहा-साडे सहा कोटी वर्ष पुरातन असावेत, असा अंदाज अभ्यासक विशाल वर्मा यांनी व्यक्त केला आहे. वर्मा गेल्या दोन दशकांपासून नर्मदेच्या खोर्‍यात उत्खनन आणि अभ्यास करीत आहेत. ‘तसे पाहता याआधीही नर्मदेच्या खोर्‍यात डायनॉसोरची हाडे आणि अंडी सापडली आहेत. पण या भूभागात प्रथमच त्यांच्या जीवाश्म स्वरूपातील विष्ठेचे अंश आढळून आले आहेत. वैज्ञानिक भाषेत त्यांना ‘कोप्रोलाईट’ असे म्हटले जाते. आमच्या अंदाजाप्रमाणे भारताच्या भौगोलिक क्षेत्रात राहात असलेल्या डायनॉसोरची ही शेवटची पिढी असावी. बदलत्या नैसर्गिक स्थितीला तोंड देण्याच्या प्रयत्नात त्यांनी बराच काळ तग धरला. पण, भारतात त्यावेळी झालेल्या जबरदस्त ज्वालामुखी स्फोटांमध्ये मात्र ते टिकाव धरू शकले नाहीत आणि नामशेष झाले,’ असा एक तर्क असल्याचे वर्मा यांनी सांगितले.
धार जिल्ह्यातील बाघ असलेल्या राष्ट्रीय डायनासॉर जीवाश्म संग्रहालयात हे अवशेष जतन केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. हे संग्रहालय उभारणीसाठी मध्य प्रदेश सरकारची मदत करीत असलेल्या अशोक साहनी या अभ्यासकाने हा शोध पुरातत्त्वविज्ञानाच्या अभ्यासात जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ‘या जीवाश्मांचा अभ्यास केल्यास डायनासॉरच्या खाण्याच्या सवयी आणि त्यांच्या पचनसंस्थेवर बराच प्रकाश पडणार आहे,’ असेही साहनी म्हणाले.
महाराष्ट्रातील पिसदुरा गावाकडे आता जागतिक पुरातत्त्वविज्ञान अभ्यासकांचे लक्ष वळले असून त्या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर अजस्त्र डायनासॉरचे अवशेष आढळून आले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=14158

Posted by on Jul 15 2014. Filed under विज्ञान भारती. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in विज्ञान भारती (33 of 48 articles)


मुंबई, [२४ जून] - भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून लोकप्रियता मिळविणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशात सोशल नेटवर्किंग साईट्‌सचेही ...

×