Home » विदर्भ » शेतकरी संघर्ष यात्रा महत्त्वाची : गडकरी

शेतकरी संघर्ष यात्रा महत्त्वाची : गडकरी

=शिशुपाल पटलेंच्या संघर्ष यात्रेला प्रारंभ=
तुमसर, (६ जानेवारी) – शासनाच्या जनविरोधी धोरणांमुळे शेतकरी नेहमीच नागवला गेला आहे. परिणामी आत्महत्या कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. शेतकर्‍यांना त्यांचे हक्क व अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी व वर्तमान कॉंग्रेस आघाडीची सत्ता उलथवून करण्यासाठी शेतकरी संघर्ष यात्रा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी केले. शिशुपाल पटले यांच्या नेतृत्वात मांढळ ते पालोरा अशा तुमसर विधानसभा क्षेत्रात काढण्यात आलेल्या शेतकरी संघर्ष यात्रेचा शुभारंभ नितीन गडकरी यांच्या हस्ते ५ रोजी करण्यात आला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करीत होते.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, या देशातील सर्वसामान्य माणूस, शेतकरी यांना सुखाचे दिवस पहायचे असतील तर सत्तापालट होणे गरजेचे आहे. गावागावातील, गल्लीबोळातील जनतेपासून दिल्लीपर्यंतच्या जनतेला जागृत करूनच हे शक्य होणार आहे. एकीकडे गरीब शेतकर्‍यांना त्यांचा हक्क देताना शासन एक-एक रुपयाचा हिशोब करते. मात्र, याच शासनातील मंत्री आणि नेते भ्रष्टाचार करून गब्बर झाले आहेत, याची साधी खंतही त्यांना वाटत नाही. आजही ८० टक्के जनतेचे गरिबी आणि भुकेमुळे हाल होत आहेत. परंतु, राज्यकर्त्यांना पाझर फुटत नाही, हे आमचे दुर्दैव आहे. भंगारात निघालेला साखर कारखाना पूर्ती समूहाने घेऊन शेतकर्‍यांना नवसंजीवनी दिली. आम्हाला राजकारण करायचे नाही. मात्र, शेतकर्‍यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली राजकीय पोळी शेकणार्‍यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय मागेही हटणार नाही, असेही गडकरी यांनी निर्धारपूर्वक बजावले. शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेत, त्यांना अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी ही यात्रा फलदायी ठरेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
आमदार नाना पटोले यांनी मार्गदर्शन करताना मंत्र्यांच्या दौर्‍यावर अतोनात खर्च होत असलेल्या निधीचा समाचार घेतला. एकीकडे दौर्‍यासाठी शासनाकडे पैसे आहेत, मात्र शेतकर्‍यांना देण्यासाठी नाहीत, असा टोलाही त्यांनी मारला. या कार्यक्रमात अनेकांनी भाजपात प्रवेश केला. नितीन गडकरींच्या हस्ते दुपट्टे घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिप अध्यक्षा वंदना वंजारी, माजी आमदार मधुकर कुकडे, गोंदियाचे अध्यक्ष विनोद अग्रवाल, मनोहर सिंगनजुडे, अभियंता प्रदीप पडोळे, गिरीश व्यास, रमेश पारधी, गीता कोंडेवार, कुंदा वैद्य, वीणा झंझाड, उपेश बांते, डॉ. उल्हास बुराडे, चरण वाघमारे उपस्थित होते. संचालन कलाम शेख, तर आभारप्रदर्शन मनोहर सिंगनजुडे यांनी केले. ही संघर्ष यात्रा १६५ गावांमधून भ्रमण करणार असून समारोप ११ जानेवारी रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पालोरा येथे होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=9933

Posted by on Jan 9 2014. Filed under विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google