Home » अग्रलेख, संपादकीय » दिल्लीतील नौटंकी…

दिल्लीतील नौटंकी…

दिल्लीत सत्तास्थापनेच्या निमित्ताने जे नाटक चालले आहे, त्यामध्ये आम आदमी पार्टी ही नवखेपणाचा आव आणत सर्वांत पुढे आहे, असे आता अनुभवाला येऊ लागले आहे. कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापनेची तयारी चालू असतानाच, तोंडाने कॉंग्रेसच्या नावाने शिव्याशाप चालूच आहेत. त्याचा परिणाम म्हणून कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा संयम संपून ते रस्त्यावर उतरले आहेत. केजरीवाल यांचा पुतळा जाळू लागले आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधीच, समर्थन देणार्‍या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पुतळा जाळल्याचे पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. प्रचलित राजकीय व्यवस्थेच्या नावाने खडे फोडत, राजकारणातील सर्वांना शिव्या देत, आम आदमी पार्टीने लोकांना आकर्षित केले. भरमसाट आणि तोंड फाटेपर्यंत आश्‍वासने देऊन लोकांची मते मिळविली. सत्ता मिळणारच नाही, तर मग ‘वचने किं दरिद्रता’ असा विचार करून मोफत पाणी, वीजबिलात पन्नास टक्के कपात, पाचशे शाळा सुरू करणार, दोन लाख सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधणार, सर्व भ्रष्टाचार्‍यांना तुरुंगात डांबणार… अशा प्रकारे यांनी लोकांना आश्‍वासनांची खैरात केली. ‘अल्लाउद्दीनचा दिवा मिळाला तर…’ या विषयावर शाळकरी मुलानेही कदाचित आपल्या कल्पना इतक्या रंगतदार केल्या नसत्या! मात्र झाले भलतेच. लोकांना या नव्या प्रयोगाची आणि स्वप्नाळू पक्षाची चांगलीच भुरळ पडली. त्यांनी धडाधड आम आदमी पक्षाचे उमेदवार विजयी केले. भारतीय लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही असे का म्हटले जाते, ते दिल्लीच्या विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर प्रकर्षाने लक्षात आले. आश्‍वासनांचा गण म्हटला, पाठिंबा आणि अटी टाकणार्‍या चिठ्ठ्यांतून तसेच गल्लोगल्ली आमसभा घेऊन गवळणी झाल्या, बतावणी तर रोजच टीव्ही वाहिन्यांवर चालू आहे. सत्तेचे वगनाट्य मात्र अजून काही सुरू होत नाही, अशी केजरीवाल यांच्या पक्षाची दिल्लीत अवस्था झाली आहे.
दिल्लीत विधानसभेला आम आदमी पक्षाच्या आश्‍वासनांना भुलून मते देताना लोकांनी विवेक जागा ठेवला आणि या पक्षाचा अहंकार पहिल्या पावलावरच जळून खाक होईल, अशा पद्धतीने त्यांना केवळ २८ जागाच दिल्या. त्यांना स्वबळावर सत्ता स्थापन करता येऊ नये, सत्तेचा मोह झाल्यावाचून राहू नये, मोह झाला म्हणून मग ज्यांना शिव्या दिल्या त्यांचा पाठिंबा घेण्याची कसरत केल्याशिवाय राहू नये, अशी स्थितीच दिल्लीच्या मतदारांनी आणून ठेवली. निवडणुकीचे निकाल जाहीर होताच, केजरीवाल अजून ट्रेड युनियनचे लीडर असल्यासारखी विधाने करू लागले होते. ‘‘आम्ही ना कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊ ना भाजपाचा घेऊ’’, ‘‘कुणाचा पाठिंबा घेणार नाही, कुणाला पाठिंबा देणार नाही,’’ अशी विधाने त्यांनी केली. त्याचबरोबर त्यासाठी मुलांची शपथही घेतली. मात्र, केजरीवाल यांनी दिलेल्या भरमसाट आश्‍वासनांचा कस लागू दे, दिलेली आश्‍वासने आपल्यासाठीच कसा टाईमबॉम्ब बनतात ते केजरीवाल यांना कळू दे, भरमसाट आश्‍वासने देणारे प्रत्यक्ष सत्तेत आल्यावर कसे वागतात, ते दिल्लीतील जनतेलाही कळू दे, अशा प्रकारचा विचार करत, कॉंग्रेसने केजरीवाल यांच्या पक्षाला बाहेरून पाठिंबा देत असल्याचे पत्र उपराज्यपालांना देऊन टाकले. सत्तेच्या बोहल्यावर चढण्याची वेळ येताच केजरीवाल यांना कापरे भरले. ही भानगड जी मागे लागली आहे ती टाळावी, यासाठी केजरीवाल यांनी एक नवीनच टूम काढली. त्यांनी न मागता पाठिंबा देणारी कॉंग्रेस आणि दुरून गंमत बघणारी भारतीय जनता पार्टी यांना, पाठिंबा द्यायचा असेल तर आमच्या अटी ‘या’ असतील, असे पत्र दिले. आपण केवळ कॉंग्रेसशी बोलणी करून कॉंग्रेसबरोबर आघाडी करत असल्याचे चित्र लोकांना दिसू नये, म्हणून केजरीवाल यांनी कॉंग्रेसबरोबर भाजपालाही पत्र दिले. भाजपाने अत्यंत योग्य चाल खेळत, या पत्राला उत्तरही देण्याचे टाळले. केजरीवाल यांच्या या पत्रातील भाषा सभ्य नसल्याने या पत्राला आम्ही उत्तर देऊ इच्छित नाही, असे जाहीर करत, भाजपानेच केजरीवाल यांना १४ उलटे प्रश्‍न विचारणारे पत्र पाठविले. आता राजकारण करणे म्हणजे जंतरमंतरवर उपोषण करत रोज कुणाला तरी शिव्या देणे नव्हे, याचा अनुभव त्यांना आला असेल.
भरमसाट आश्‍वासने देऊन लोकांची अपेक्षा वाढविणार्‍या केजरीवाल यांची परीक्षा होऊनच जाऊ दे, अशा भूमिकेतून कॉंग्रेसने आम आदमी पक्षाच्या अटींची चिरफाड करत, त्यांना बाहेरून पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले. अठरा अटींपैकी सोळा मुद्यांवर विधानसभेत मत आजमावयाची गरजच पडणार नसल्याने, या मुद्यांवर पाठिंबा दिला काय आणि नाही दिला काय आणि उर्वरित दोन मुद्यांचे निर्णय केंद्र सरकारच्या हातात असल्याने त्यासाठी पाठिंब्याची गरजच काय? अशी चिरफाड करत, केजरीवाल अजून फारच कच्चे असल्याचे कॉंग्रेसने त्यांना पाठिंबा देतानाच उघड करण्याची चाल खेळली. कॉंग्रेसने पाठिंबा दिलेला असताना आणि तोही लेखी स्वरूपात उपराज्यपालांकडे दिलेला असताना, आम आदमी पार्टीने पुन्हा एकदा लोकांमध्ये जाऊन मत आजमाविण्याची नौटंकी सुरू केली. एकदम भन्नाट चाल- अशा आविर्भावात खेळलेली ही चाल- आम आदमी पक्षावरच उलटत असलेली प्रत्येक सभेगणिक दिसू लागले. आम आदमी हा आम आदमी पार्टीपेक्षा निश्‍चितच शहाणा असल्याचे जाणवू लागले. लोक, केजरीवाल यांच्या पक्षाने केवळ कॉंगे्रसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करावे असे सांगून गप्प बसेनात. पुढे एक वाक्य प्रत्येकाचे ठरलेलेच होते की, सरकार स्थापन करून केजरीवाल यांनी जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण करावीत. त्यातल्या त्यात लोकांचा भर ‘मोफत पाणी आणि अर्ध्या किमतीत वीज’ या आश्‍वासनांच्या पूर्ततेवर होता. लोकांची मते आजमावण्याचे नाटक या आश्‍वासनपूर्तीच्या अपेक्षेच्या उद्घोषासह आम आदमी पार्टीच्याच गळ्यात पडत असल्याचे चित्र दिसले.
त्यातच आम आदमी पक्षाच्या लोकांनी कॉंग्रेसला भडकविण्याचाही एक अश्‍लाघ्य आणि अशिष्ट खेळ करून पाहिला. सरकार स्थापनेपासून पळ काढण्यासाठी सकाळ-संध्याकाळ बोलताना, कॉंगे्रसची निर्भर्त्सना करण्याची खेळी केली. जनतेकडे जाऊन आम्ही कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार करावे की नाही, याचा सल्ला घेत आहोत, असे सरळ वाक्य टीव्ही वाहिन्यांवर न म्हणता, धोकेबाज कॉंग्रेसचा पाठिंबा घ्यायचा की नाही ते आम्ही जनतेला विचारत आहोत, अशा प्रकारे मुद्दाम तिरपी चाल खेळण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर कॉंग्रेसला ‘दोन तोंडांचा साप’ म्हणून शिव्या देण्यालाही यांच्या एका आमदाराने कमी केले नाही! मग कॉंग्रेसनेही धूर्त चाल खेळली आहे. त्यांनी पाठिंबा देतो असे जाहीर करताना, आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी अभद्र भाषा वापरू नये, असा सल्ला दिला. केजरीवाल राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा करेपर्यंत आणि शपथविधी ठरेपर्यंत ते गप्प बसले. शपथविधी ठरून मंत्र्यांची नावे निश्‍चित करण्याची खलबते चालू असतानाच, रस्त्यारस्त्यांवर कॉंग्रेसचे कार्यकर्ते उतरले आणि केजरीवाल यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या अभद्र भाषेचा धिक्कार करत, केजरीवाल यांचा पुतळा जाळण्यास सुरुवात केली. केजरीवाल, कॉंग्रेसचा पाठिंबा तर घ्यायचा, मात्र त्यांच्याशी केलेल्या आघाडीची जबाबदारी घ्यायची नाही, या दुहेरी नाटकात फसले. भाजपाने सातत्याने केजरीवाल यांच्यावर, कुणाचाही पाठिंबा न घेण्याची शपथ मोडल्याचा आरोप करणे सुरू केले. आम आदमी पार्टीला कॉंग्रेसची ‘बी टीम’ असे संबोधणे सुरू झाले. सरकार स्थापन करण्याच्या आधीच केजरीवाल यांचा पक्ष टीकेचा, अस्थिरतेचा धनी झाला आहे. राजकारण म्हणजे ‘दुरून डोंगर साजरे’च असते. त्यात पडल्यावर त्यातील खाचाखोचा कळू लागतात. तोपर्यंत रक्तबंबाळ व्हायची वेळ येत असते. लोकहिताच्या मुद्यावर कॉंग्रेस आपल्या सरकारचा पाठिंबा काढू शकणार नाही, असा केजरीवाल यांचा अंदाज असेल. मात्र, राजकारण इतके सरळ नसते. आज युवक कॉंगे्रसच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टीला दिलेल्या पाठिंब्याचा विरोध करत, आत्मसन्मानाच्या मुद्यावरही काडीमोड होऊ शकतो, याची चुणूक दाखविली आहे. न मागता दिलेला, घेता घेता अटी घातलेला, दोघांच्याही मनात नसलेला हा पाठिंबा किती दिवस टिकतो आणि कोणत्या मुद्यांवर तोडला जातो, याची नौटंकी आता भलतीच रोचक आणि रंगतदार होणार, असे दिसते आहे…

Short URL: https://vrittabharati.in/?p=9289

Posted by on Dec 29 2013. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (10 of 13 articles)


न खोखले दावे, न झुटे वादे सच की राजनीती, स्वराज का संकल्प अशी घोषणा करत निवडणुकीपूर्वी आपले वचनपत्र जनतेला सादर ...

×