|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:08 | सूर्यास्त : 18:42
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 28.46° C

कमाल तापमान : 28.99° C

तापमान विवरण : clear sky

आद्रता : 70 %

वायू वेग : 3.79 Mps

स्थळ : Mumbai, IN

28.99° C

Weather Forecast for
Saturday, 20 Apr

28.23°C - 31.22°C

few clouds
Weather Forecast for
Sunday, 21 Apr

27.91°C - 30.32°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 22 Apr

27.33°C - 30.31°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 23 Apr

27.26°C - 30.1°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

26.95°C - 30.15°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.31°C - 30.25°C

sky is clear
Home » संवाद » अनादि मी, अनंत मी

अनादि मी, अनंत मी

अनादि मी, अनंत मी –
वेध एक
स्वातंत्र्यवीर सावरकर! गुलामी भेदू इच्छिणार्‍या यच्चयावत मानवांच्या मुक्तीचा महामंत्र!
युरोपातील वसंत आता मावळतीला आलेला. त्याच्याही आयुष्यातला तो वसंतऋतू. वेगळेपणा इतकाच की, हा वसंत सुखाची रंगपंचमी खेळणारा नव्हे, आयुष्याची होळी करणारा! त्यात अनुरागाचा लालिमा नव्हे, क्रांतीचा रक्तिमा होता. आराधनेचे आर्जव नव्हे, स्वाभिमानाने गर्जन होते. त्याच्या आयुष्यातला हा वसंत फुलला होता, दाहक अग्निपुष्पांनी! वयाच्या सोळाव्या वर्षी मातृभूला परदास्याच्या शृंखलांतून मुक्तीचा केलेला संकल्प! ‘मारीता मारीता मरेतो झुंजेन’ हे त्या वसंताचे अधिष्ठान. ही भीष्मप्रतिज्ञा साकारण्यासाठी, राष्ट्रवेदांवर सर्वस्वाचा होम! देशासाठी सर्वस्वार्पण करणार्‍या या नरपुंगवाचे उभे जीवनच स्वातंत्र्यसूक्त! लक्ष्मीचे महनमधुरी स्तोत्र रचणार्‍या या लोकोत्तर प्रज्ञापुरुषाच्या आयुष्यातल्या कोणकोणत्या क्षणांची स्मृती साजरी करायची आपण? अवघ्या सोळाव्या वर्षी अष्टभुजेसमोर घेतलेली शपथ, की अभिनव भारत क्रांतिकार्य अठराशे सत्तावनच्या निमित्ताने आत्मविस्मृत भारतात जागविलेली चेतना, की मार्सेलिसची सागरउडी, अंदमानच्या काळकोठडीत भोगलेल्या यमयातना, की जातिनिर्मूलनाचे समरसता पर्व…?
मार्सेलिसची उडी फसली आहे. जागतिक राजकारणात वादळ उठवून भारतीय स्वातंत्र्याचा प्रश्‍न तर ऐरणीवर आलाय्, पण सिंह सापळ्यात अडकलाय्. चवताळलेल्या ब्रिटिश साम्राज्याचा क्रोध, क्रूर पहारेकर्‍यांच्या डोळ्यांतून ठिणगीसारखा चमकतोय्. भवितव्य स्पष्ट आहे. या जीवघेण्या अपमानाचा दाह शासन प्राण हरण करूनच शमविणार. आता सुटकेची सुतराम शक्यता नाही. दुसरा कुणी असता तर कोलमडून गेला असता. भावविव्हळ होताच तो, मातृभूमीच्या स्मरणमात्रानं आसवांमध्ये भिजून ब्रायटनच्या समुद्रकिनार्‍यावर ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, प्राण तळमळला’ अशी आर्त साद घातली नव्हती का त्यानं? पण, त्या विकल मनाचा पोत आता वज्राहूनही कठोर बनलाय्. काळाच्या कराल दाढेत सापडल्यानंतरही त्याच्या अभंग मनातून दुर्दम्य ध्येयासक्ती आणि अदम्य अशा शब्दास होते. झेपावणार्‍या मृत्यूच्या छाताडावर रौद्र तांडव करताना आत्म्याच्या अमरत्वाचं तत्त्वज्ञान मानवी इच्छाशक्तीचं गर्वगीत बनून बाहेर पडतं.
अनादि मी अनंत मी अवध्य मी मला,
मारील रिपू जगती असा कवण जन्मला
अग्नी जाळी मजसी ना खड्‌ग छेदितो,
भिवूनी मला भ्याड मृत्यू पळत सुटतो
वेध दोन
देवापुढे सांजवात लावताना यमुनाबाईंचा, माईंचा डोळा फडफडला. अशुभाची काजळी मनावर फेर धरू लागली. त्या हसल्या. अजून अशुभ घडायचं काय बाकी राहिलं होतं? साक्षात विस्तवाशी संसार! करंड्यातलं कुंकू लावताना हात थरथरला. या कुंकवाचा आधार या जन्मात पुन्हा भेटेल याची सुतराम शक्यता नाही. पण, या तेजस्वी सौभाग्याची धगधगीत ज्वालाच तर ऊर्जा पुरवतेय आपल्या आयुष्यांना. माईंना आठवलं, तात्यांच्या क्रांतिकार्याचं लोण हिंदुस्थानात आलं अन् सावरकर या नावावरच काळाची कृतांत दृष्टी पडली. सगळेच भाऊ तुरुंगात. मध्यरात्री भरपावसात नेसल्या वस्त्रानिशी रस्त्यावर आलो आपण… तात्यांची बायको एवढाच अपराध आपला… असहाय अवस्थेत गाठलेलं नाशिक, करुणेचा कटाक्ष तेवढा टाळणारा कृतघ्न समाज… काळाराम मंदिरासमोरच्या पडक्या वाड्यात भिकार्‍यासारखा आश्रय आणि कीर्तन-प्रवचनानंतर शिल्लक राहणार्‍या शिधेवर जाळलेलं पोट… कसे दिवस काढले आपण येसूवहिनीसह… विद्ध होऊन वहिनींनी पाठविलेल्या पत्राला आलेलं तात्यारावांचं उत्तर…
अनेक फुले फुलती, फुलोनिया सुकोनी जाती
कोणी त्यांची महती गणती ठेवली असे…
देशाकरिता निर्वंश होणार्‍या अमर वंशलतेचे पाईक आपण. अंदमानात जाताना समजावलं होतं त्यांनी- ‘‘चिमण्या-कावळ्यांचा संचार नाही आपला. येणार्‍या पिढ्यांना दिवाळी साजरी करता यावी म्हणून होळी करून घ्यावीच लागणार. काही संसारांना.’’ असा जीवनसाथी लाभला की पदरातल्या निखार्‍यांचीपण फुले होतात.
दारावरच्या थापेनं माईची भावसमाधी भंगली. शेजारच्या भाऊरावांच्या हातात राष्ट्रीय वृत्तपत्र होते. तात्यांच्या अंदमानातील अनन्वित अत्याचारांची गाथा होती त्यात. बरीच क्रौर्य… जेवणात येणारे पालीचे तुकडे… तासन्‌तास बेड्यांमध्ये बद्ध झाल्याने निकामी होणारे हातपाय… आत्महत्या करणारे राजबंदी… अतिश्रमाने भोवळ येऊन पडल्यानंतरही त्यांना पुन्हा उठवून गुडघ्यांवर रांगून त्यांच्याकडून फटके मारीत फिरवलेला कोलू…
माईंनी वाचन बंद केले. तुळशीवृंदावनाजवळचा दिवा अन् प्रदक्षिणा राहिलीच आज. पणती घेऊन त्या तुळशीजवळ आल्या. हात जोडले. रोज गप्पा व्हायच्या या जिवाभावाच्या मैत्रिणीशी. आज शब्दच फुटेना, रोखलेला बांध मात्र फुटला. टपोर्‍या पाण्याच्या थेंबानं ज्योत… ‘नाही. तात्यांना नाही आवडणार, भर सांजेला ज्योत विझलेली.’ अश्रू पुसून त्यांनी प्रदक्षिणा सुरू केली. पण, क्षणातच त्या थबकल्या. रोज एकशेआठ प्रदक्षिणांचा नेम होता त्यांचा. कसल्याशा निग्रहानं त्यांनी आवंढा गिळला. खाली वाकून गुडघ्यावर बसल्या त्या आणि गुडघ्यावर रांगत रांगत प्रदक्षिणेला सुरुवात झाली. अगदी तशीच थेट. तात्या कोलू फिरवताना गुडघ्यांवर रांगायचे तशीच. आतापर्यंत मौन असणारी तुळसही शहारली. जागच्या जागी सळसळू लागली. तात्या अंदमानातून परत येतपर्यंत पातिव्रत्याच्या या अनोख्या वर्तनाच्या दिव्य दर्शनाची कथा जगाला सांगायची होती तिला.
वेध तीन
रत्नागिरीतल्या सावरकर सदनातल्या मूक भिंतीना आज वारंवार उचंबळून येत होतं. दसरा-दिवाळीसारखे सारे घर आज सजविण्यात आले होते. सार्‍या व्यवस्थेकडे स्वत: तात्या जातीने लक्ष ठेवून होते. एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य त्या वास्तूला आज लाभणार होतं. या क्षणामध्ये रोमांच होता. थरार होता. भारतीय राजकारणातील दोन ध्रुव आज एकमेकांना भेटणार होते. दोघेही एकमेकांचे प्रखर टीकाकार. तीव्र वैचारिक मतभेद. एक, ‘रणाविण स्वातंत्र्य कोणाला मिळाले’ अशी गर्जना करून सशस्त्र क्रांतीचा वणवा पेललेला, तर दुसरा अहिंसेचा पुजारी. एक मृत्युंजय दुसरा मनोजय. सावरकर आणि गांधीजींच्या वा भेटीकडे सार्‍या देशाचे लक्ष लागलेले. आपल्या ‘गांधीगोंधळ’सारख्या लिखाणातून गांधीजींच्या राजकारणाची चिरफाड करणार्‍या तात्यांना गांधीजींच्या भेटीची विलक्षण आतुरता. अंदमानच्या यमयातना भोगलेले सावरकर दिसतात कसे, याचे गांधीजींना विलक्षण कुतूहल. अखेर बापूंचे आगमन झाले. सावरकर सदनाचा रोम रोम या अलौकिक क्षणांना मनात साठवताना पुलकित झाला. अत्यंत आवेगाने स्नेहालिंगन, क्षेमकुशल झाले. दोन मोठ्या माणसांमधल्या मतभेदांपल्याड कसे मनोमिलन असते, याचे विलोेभनीय दर्शन सार्‍या उपस्थितांना झाले. वैचारिक भिन्नता राखूनही त्या भेदांची काजळी मनावर साचू न देणारेच खरे महामानव असतात. लंडनमधील भारतभवनात झालेली सावरकरांची पहिली भेट बापूंना आठवली. तेव्हा रसरसत्या तारुण्याने मुकुटासारख्या शोभणार्‍या तात्यांच्या दुर्दम्य आत्मविश्‍वासाला अंदमानातलं काळंपाणीही थिजवू शकलं नव्हतं. मोकळा हास्यविनोद सुरू असतनाच सावरकरांनी खोचक प्रश्‍न केला- ‘‘बापू, तुमच्या देशभक्तीच्या व्याख्येत तर आम्ही सारे क्रांतिकारक वाट चुकलेले वेडेच. अशा वाट चुकलेल्या मला भेटण्यासाठी तुम्ही आज वाट कशी काय चुकवली?’ दोघेही खळखळून हसले. वातावरणातला ताण जरासा हलका झाला. ‘‘सावरकर, खरं सांगू? मला तुम्हाला भेटायची काही फार इच्छा नव्हती. पण, काय करू. या कस्तुरबाने हट्ट धरला होता. ही मला नेहमी म्हणायची, बापू, तुमच्याहीपेक्षा काकणभर जास्त देशभक्त असणारा माणूस बघायचाच मला. तात्याराव, तुम्हीच सांगा, तुमच्याशिवाय कुणाकडे भेटीला न्यायचं तिला…’’ बापूंचा हात हातात घट्ट धरून ठेवताना नकळतच सावरकरांचे डोळे पाणावले. तेजानं केलेल्या तेजाच्या आरतीनं सारा आसमंत उजळून निघाला होता.
वेध चार
लंडनमधल्या भारतभवनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे सहकारी तात्यांवर विलक्षण नाराज आहेत. भारतभवनात अलीकडे एक नवीन तरुण येऊ लागला आहे. अभियांत्रिकी इंजिनीअर होण्यासाठी लंडनला आलेला ‘हा’ तरुण सार्‍या शहरात चांगलाच प्रसिद्ध आहे. अमृतसरच्या गर्भश्रीमंत डॉ. साहिब दित्तामलांचा हा मुलगा रगेल आणि रंगेल! उत्तम पोशाख, घमघमणार्‍या अत्तरांचा सुगंध अन् खिशात खुळखुळणार्‍या पैशाच्या माजावर लंडनच्या रूपगर्वितांना हा हा म्हणता फिरवणारा मजनू. आयुष्य हे कणाकणानं उपभोगायचं असतं, जगातल्या सगळ्या सुंदर आणि मादक वस्तू आस्वादकच असतात, हीच त्याची जीवननिष्ठा. जन्मात लाभलेलं वैभव आपल्या युरोपियन मैत्रिणींवर उधळणं हाच त्याचा विरंगुळा. वेगवेगळे फॅशन शो अन् कलात्मक मद्यालये हा तर त्याचा जीविचा विसावा. अशा ‘वाया’ गेलेल्या तरुणाला तात्यारावांनी ‘भारतभवन’सारख्या पवित्र वास्तूत येऊ द्यावं? देशभक्तीने ओतप्रोत पेटलेल्या हुकारांचं आवर्तन जिथे चालतं, तिथे विकारी उसास्यांचं नर्तन खपवून घ्यावं? हत्तीच्या गंडस्थळावर झेप घेणार्‍या छाव्यांच्या कळपात वासनांध उकिरड्यावर लडबडणार्‍या गांडुळानं शिरावं?
परवाचाच प्रसंग. बैठकीतल्या गंभीर चर्चेत त्याचे मन रमेना. तो हळूच उठला. शेजारच्या खोलीतल्या ग्रामोफोनवर त्याने इंग्लिश गाण्याची तबकडी लावली. रस्त्यावरून जाणार्‍या काही तरुण मुलींनी गाणे ऐकून तिथेच नाचायला सुरुवात केली. हा गाण्यासोबत शिट्टी वाजवत मुलींना साथ देत होता. गोंधळ अनावर झाल्याने तात्या त्या खोलीत गेले आणि जाम भडकले- ‘‘परदास्यात खितपत पडलेल्या मातृभूमीचं करुण रुदन सुरू असताना असा नंगानाच! देशभक्तीच्या ज्वालांनी मनामनांत अंगार पेटला असताना तुला शृंगार सुचतोयच कसा?’’ तात्यांच्या शब्दांचे वार त्याला घायाळ करून गेले. एक विलक्षण निर्धार डोळ्यांत चमकला. क्षणार्धात ग्रामोफोनची तबकडी तुकडे करून फेकून दिली त्याने. मातृभूमीच्या उत्कट भक्तीनं त्याच्या तनमनाचं राऊळ झालं. रंगेलपणाचं उरलंसुरलं हीण राष्ट्रयज्ञाच्या धगात जळून खाक झालं. विकार विवेकात बदलले. विलासाची जागा विरागाने घेतली. जणू पुनर्जन्मच झाला त्याचा. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तात्या सांगतील ते अग्निदिव्य पेलायला सज्ज झाला तो. त्यांच्या गळ्यातला तर तो ताईतच बनला. पण इतरांचे काय? ‘‘रम आणि रमणीच्या तालावर नादावलेल्या या ‘बिघडलेल्या’ पोराला भारतभवनात पायही ठेवू देऊ नका.’’ एकाचा आग्रह. ‘‘माजावर आलेली ही तरुणाई निरर्थकच.’’ एक पोक्त सल्ला. चर्चेला उकळी फुटतेय अन् तिकडे शेगडीवरच्या द्रावणालाही. बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारे अतिज्वालाग्राही द्रावण शेगडीवर ठेवलंय् याचा विसरच पडलाय सार्‍यांना, अरे बापरे! आता हे द्रावण ऊतू जाऊन सांडले तर… तर क्षणार्धात विध्वंस होणार भारतभवनाचा. प्रत्यक्ष काळच परीक्षा घ्यायला कृतांतासारखा अंगावर आलाय्. जवळपास फडकं किंवा सांडशी नाही. काय करायचं? उकळी ओसंडणार… तेवढ्यात बाहेरून एक तरुण तीरासारखा धावत येतोय्. आपल्या हातांनी लालबुंद झालेले ते भांडे खाली उतरवतोय्. बधिर झालेले सारे त्याच्याकडे भयचकित होऊन पाहताहेत. आपले काळे ठिक्कर भाजलेले छिन्नविच्छिन्न तळवे जोडून तो तात्यांना नमस्कार करतोय्. वेदनेचा साधा ओरखडाही त्याच्या सुहास्य चेहर्‍यावर नाही. तात्यांचे डोळे अभिमानाने भरून येतात. त्याला कवटाळताना अश्रूंचा बांध मोकळा होतोय्. मदनलाल धिंग्रा त्याचं नाव…
– आशुतोष अडोणी

Posted by : | on : 9 Mar 2014
Filed under : संवाद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g