Home » चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक » केजरीवालांची बेसुर ‘कजरी’ आणि आपचा बेताल ‘दादरा’!

केजरीवालांची बेसुर ‘कजरी’ आणि आपचा बेताल ‘दादरा’!

•चौफेर : अमर पुराणिक•

आम आदमी पार्टीची सद्यस्थिती हेच सांगते की कशा प्रकारे मुल्य आणि आदर्शाच्या गप्पा मारणारे आम आदमी सारखे पक्ष संधी मिळताच कसे संधीसाधू होतात. जर आम आदमी पार्टीला अन्य भ्रष्ट राजकीय पक्षांसारखेच राजकारण खेळायचे असेल तर आम आदमी पार्टीची गरजच नाही, अशा पक्षांची भरमार देशभरात आहे. त्यामुळे तशाच पक्षाची भर घालण्यात काहीही हाशिल नाही. हे दिल्लीकरांसाठी सर्वात जास्त निराशजनक आहे की, दुसर्‍यांना नैतिकतेचा उपदेश देणार्‍या आणि स्वत: धूतल्या तांदळाचे असल्याचा दावा करणार्‍या, प्रत्येक हीन राजकीय हातखंडे वापरणार्‍या पक्षाला बहूमताने निवडून दिले आणि त्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांच्या पाच वर्षांचे मातेरे केले.

KEJRIWAL, PRASHANT BHUSHAN, YOGENDRA YADAVदिल्लीत नव्या तर्‍हेचे आणि स्वच्छ राजकारण करण्याचे मोठे-मोठे दावे करत चमत्कारिकरित्या जोरदार यश मिळवत सत्तेत आलेली आम आदमी पार्टी विजयाचा जल्लोष मनावण्याऐवजी कलहाग्रस्त झाली आहे. त्यामुळे आम आदमी पार्टीचे समर्थक आणि हितचिंतक अतिशय निराश आणि खजिल झाले आहेत. सरकार स्थापनेनंतर केवळ १५ दिवसांतच पक्षात धूळवड सुरु झालेली आहे. आता हे ही सांगणे कठीण आहे की आपची ही धूळवड कधी संपणार आहे. आम आदमी पार्टीच्या कार्यकत्यार्र्नाही आता हे समजणे अवघड झाले आहे की, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांना कोणत्या कारणावरुन समितीतून बाहेर ठेवण्यात आले. या दोघांनी कोेणती चूक केली आहे की, अरविंद केजरीवाल यांच्या हट्टाचे बळी ठरले आहेत. यातून एक मात्र स्पष्ट आहे की, पक्षाचे समर्थक अतिशय निराश झाले आहेत. दिल्लीकरांनाही आता पश्‍चाताप झाला आहे. त्यांनी आम आदमी पार्टीला भरघोस मताने निवडून दिले खरे पण त्यांना आता पाच वर्षं केजरीवालांची बेसुर ‘कजरी’, योगेंद्राची ‘ठूमरी’ आणि आपचा बेताल ‘दादरा’ ऐकण्याची वाईट वेळ आली आहे.
या कलहामुळे आम आदमी पार्टीने आपली प्रतिष्ठा पुर्णपणे गमावली आहे. आश्‍चर्यकारक गोष्ट ही आहे की, आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेते उघड-उघड एक-दूसर्‍यावर आरोप करत आहेत, पण पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल उपचाराच्या नावाखाली मौन धारण करुन आहेत. त्यांचे रहस्यमय मौन हेच सांगते की, एक तर आरोपांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत किंवा नेहमीप्रमाणे आरोपांचा राजकीय फायदा घेत आपल्याच हातात पक्षाचे लगाम ठेवायचेत. म्हणूनच पक्षांतर्गत विरोधक ठरवले गेलेले योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्यासाठी मागील काही दिवसांपासून केजरीवाल समर्थकांनी या दोघा नेत्यांवर जोरदार राजकीय हल्ले चढवले आहेत. त्यामुळे आता योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांची पक्षातून हकलपट्टी होण्याची शक्यता बळावली आहे. सद्यपरिस्थितीत त्यांची हकलपट्टी करणे अवघड नाही. पण या दोघांनी जे प्रश्‍न उभे केलेले आहेत ते प्रश्‍न हेच सांगतात की अरविंद केजरीवाल यांनी सत्तेसाठी समझोता करत सर्व घाणेरड्‌या चाली खेळल्या आहेत. आता केजरीवाल यांनी सत्तेसाठी असल्या अनेक तडजोडी केल्या किंवा खेळी खेळल्या आहेत, त्यामुळे त्यांना जनतेने आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केलेले आहे. केजरीवाल आपणच तेवढे स्वच्छ आणि बाकीचे सगळे राजकारणी भ्रष्ट असल्याचे सांगत होते. किंबहूना त्यांनी म्हंटले की एखादा राजकारणी किंवा अधिकारी भ्रष्ट ठरवला जायचा आणि म्हंटले तर त्याला स्वच्छ असल्याचे प्रमाणपत्र दिले जायचे. आता आपमधल्या त्यांच्याच सहकार्‍यांनी गंभीर आरोप केल्यामुळे  केजरीवालांच्याच चारित्र्यावर शिंतोडे उडालेले आहेत. अनेक कॉंग्रेस नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत सत्तासीन झालेले आणि त्याच कॉंग्रेसचे आठ आमदार फोडण्याची खेळी खेळणारे केजरीवालही त्याच माळेचे मणी आहेत हे सिद्ध झालेले आहे.
आता प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी उघड केलेल्या बाबी पत्राच्या रुपात सार्वजनिक झाल्या आहेत आणि अरविंद केजरीवालांच्या समर्थकांकडून त्याला प्रत्यूत्तर दिले जात असताना केजरीवालांची बोलती बंद झाली आहे. ते बोलले तेही केवळ पक्षात जे होतय त्यामुळे आपण दु:खी आहोत, या जुजबी प्रतिक्रियेच्या रुपात. याला काही अर्थ नाही. याचा अर्थ असाही होतो की, योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी केलेल्या आरोपांत तथ्य आहे. तसेच प्रशांत भुषण आणि योगेंद्र यादव यांना समितीतून हटवण्याच्या निर्णयाच्या वेळी झालेल्या बैठकीपासून दूर राहणेही हेच सिद्ध करते की परभारेच केजरीवालांना बोचणारे काटे निघून जावेत. या बैठकीला केजरीवाल दिल्लीत असून ही बैठकीपासून दूर राहिले. त्यांच्या काही समर्थकांकडून सांगितले गेले की, त्यांची तब्येत चांगली नाही आणि दुसर्‍याच दिवशी केजरीवाल दिल्लीहुन विमानाने बंगळूरुला निघून गेले, पण पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला हजर राहिले नाहीत. ते ही स्वत: सर्वेसर्वा असलेल्या पक्षाच्या बैठकीला. ज्या केजरीवालांनी लोकपाल आंदोलनाच्या वेळी सरकारचा सामना केला, पण त्यांच्याच पक्षातील काही नेत्यांना तोंड देणे तर दूर पण नजरही मिळवू शकले नाहीत. त्यांनी चार मार्च रोजी झालेल्या बैठकीपुर्वी संयोजक पदाचा राजीनामा दिला होता. पण सर्वांनाच हे माहीत होते की त्यांनी दिलेला राजीनामा मंजूर होणारच नव्हता. आपल्या पक्षाचे संचालन करण्याच्याबाबतीत केजरीवाल ममता बॅनर्जी आणि मायावतींच्या मार्गाने जाताहेत. यात दूमत नाही की, केजरीवाल आम आदमी पार्टीचे सर्वात मोठे नेते आहेत आणि त्यांच्याशिवाय पक्षाची कल्पना करता येत नाही. ते जर नसते तर पक्षही नसला असता, किंबहूना त्यांनी अण्णा हजारेंचा विरोध असतानाही राजकीय पक्ष स्थापन केला. असे असले तरीही प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव हे ही छोटे नेते नव्हते. त्यांचे आम आदमी पार्टीच्या निर्मितीत आणि संवर्धनात मोठे योगदान आहे त्यामुळे त्यांच्या आरोपाकडे कानाडोळा करता येत नाही. विक्रमी मतांनी निवडून दिलेल्या आम आदमी पार्टीने कॉंग्रेसहूनही घाडेरडे राजकारण करुन जनतेचा हिरमोड केला आहे.
केजरीवाल यांच्यासाठी आणखीन एक आरोपीचा पिंजरा त्या ऑडिओ टेपने तयार केला आहे, जी ऑडिओ टेप त्यांच्याच पक्षाच्या माजी आमदाराच्या माध्यमातून समोर आली आहे. या टेपमध्ये केजरीवाल कॉंग्रेससोबत सरकार बनवण्यास केवळ आतूरच दिसत नाहीत तर ते कॉंग्रेसचे आमदार फोडण्याचाही सल्ला देतात. केजरीवाल यांना त्यांच्याच तोंडच्या या उघड झालेल्या गोष्टी लपवणे किंवा खोट्‌या ठरवणे अशक्य आहे. जरी आपण मानले की केजरीवाल तेव्हाच्या राजकीय परिस्थितीत सरकार स्थापन करण्यासाठी सर्व शक्यता पडताळून पहात होते, तर मग आपण आणि आपली आम आदमी पार्टी सोवळ्यातली असल्याची नाटकं कशासाठी चालली होती. वेगळी राजनीती करत असल्याचा आव आणत नैतीकतेचे पाठ दूसर्‍यांना शिकवण्याचा आणि प्रत्येक विरोधक राजकारण्याला भ्रष्ट असल्याचा आरोप करण्याचा केजरीवाल यांना अधिकारच काय? आता हे ही त्यातलेच असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. अरविंद केजरीवाल यांची आणि आम आदमी पार्टीची सद्यस्थिती हेच सांगते की कशा प्रकारे मुल्य आणि आदर्शाच्या गप्पा मारणारे आम आदमी सारखे पक्ष संधी मिळताच कसे संधीसाधू होतात. जर आम आदमी पार्टीला अन्य भ्रष्ट राजकीय पक्षांसारखेच राजकारण खेळायचे असेल तर आम आदमी पार्टीची गरजच नाही, अशा पक्षांची भरमार देशभरात आहे. त्यामुळे तशाच पक्षाची भर घालण्यात काहीही हाशिल नाही. हे दिल्लीकरांसाठी सर्वात जास्त निराशजनक आहे की, दुसर्‍यांना नैतिकतेचा उपदेश देणार्‍या आणि स्वत:ला धूतल्या तांदळाचे असल्याचा दावा करणार्‍या, प्रत्येक हीन राजकीय हातखंडे वापरणार्‍या पक्षाला बहूमताने निवडून दिले आणि त्या आम आदमी पार्टीने दिल्लीकरांच्या पाच वर्षांचे मातेरे केले. आता दिल्लीकरांना आपल्याला ठकवले गेल्याची जाणिव झाली आहे. पण ही फसवणूक दिल्लीकर विसरणार नाहीत. खोट्‌या आणि अवास्तव आश्‍वासनांना बळी पडून, फुकटच्या गोष्टी मिळवण्याच्या मोहात पडून त्यांनी निवडून दिले खरे पण सत्ताशकट चालवण्याची मानसिकता, कष्ट  आणि कौशल्यच आम आदमी पार्टीकडे नसल्यामुळे दिल्लीच्या विकासाची गाडी पाच वर्षाने मागे गेली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21452

Posted by on Mar 15 2015. Filed under चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक (83 of 125 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• मोदी सरकारने भविष्यातील योजना, उर्जा, संरक्षण, उद्योग आणि शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात चांगली तरतूद केली आहे, ती ...

×