Home » संवाद » नरेंद्र मोदीच का?

नरेंद्र मोदीच का?

=धनंजय केळकर=

मागे मी एक प्रश्न विचारला होता. नरेंद्र मोदीच का? पण कोणीही का हवेत किंवा का नकोत काहीच सांगितले नाही. मोदी समर्थकांना मोदीच होणे योग्य वाटत होते आणि विरोधकांना ते अगदीच अयोग्य वाटत होते. मग मीच शोध घ्यायला सुरवात केली. तेंव्हा एक गोष्ट लक्षात आली कि दोघांमध्येही मोदींबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. बऱ्याच जणांना त्यात भाजप समर्थकही होते, मोदी हे स्वतःला नॉस्त्राडॅमसचा वीर समाजत असावेत आणि त्या भ्रमात, सत्तेवर आल्यावर प्रचंड युध्द वगैरे होईल अशी भीती वाटत होती. आणि बऱ्याच मोदी समर्थकांना ते नॉस्त्राडॅमसचा वीर आहेत याची खात्री होती आणि म्हणूनच ते मोदी समर्थक होते. विरुध्द राजकीय पक्ष्यातील तगड्या नेत्याला कसेही करून कुठल्यातरी खटल्यात अडकवायचे आणि त्याचे खच्चीकरण करायचे हा जुनाच राजकीय खेळ आहे. आणि सत्तेत असल्याने काँग्रेस तो चांगल्या प्रकारे खेळू शकते. या खेळात माध्यमांनीही बरीच साथ देवून मोदींचे अगदीच विचित्र चित्र उभे केले. त्यामुळे अतिरेकी विचारसरणीच्या हिंदुना ते सगळ्या मुसलमानांना धडा शिकवतील आणि साध्यासुध्या मुसलमानांना मोदी पंतप्रधान झाले तर आपल्याला ठार करतील असे वाटू लागले. पण संघाचा स्वयंसेवक असा असूच शकत नाही हे फार कोणालाच कळत नाही. भारतात अनेक पूजा-अर्चना पद्धती आहेत आणि याच अनेक पद्धती जगभर विखुरल्या आहेत. यातील ज्या पद्धतीनं एक अवतारी पुरुष आणि एक मार्गदर्शक ग्रंथ अशी रचना आहे त्याला पंथ म्हणतात. धर्म हा सृष्टीतील सगळ्यांचा एकच आहे. पंथ म्हणजे धर्म नव्हे, धर्म एकच आहे. पूर्वी भारतात त्याला सनातन असेही म्हणत असत. पण त्याला वेगळे नाव द्यायची गरज कोणाला वाटत नव्हती. या देशाचे नाव हिंदुस्थान आहे. अगदी ‘ये देश हिंदुओंका नही है|’ असे म्हणणारे उत्तर भारतीय समाजवादीसुद्धा या देशाचा उल्लेख हिंदुस्थान असाच करतात हे विशेष. पूजा अर्चना पद्धती कुठलीही असो या देशात राहणारे ते हिंदु आणि ते सगळे आमचे रक्ताचे बांधव आहेत, ही आणि एव्हढीच संघाची भूमिका आहे. बातमीच्या आणि नेत्यांच्या वक्तव्यापलीकडील सत्य पारदर्शीपणाने पाहणाऱ्या व्यक्तींना हे सहज कळू शकेल. मधू किश्वर या स्त्रीने स्वतः गुजराथेत जावून ते पहिले. संघात जात पात नसते आणि खरेतर ती कोणाला माहीतही नसते. कोणी विचारातही नाही कि जाणूनही घेत नाही. याचा अनुभव महात्मा गांधीनी १९३२ साली स्वतःच घेतलेला आहे आणि आणि डॉ. हेडगेवारांना या बाबतीत तर तुम्ही माझ्या खुपच पुढे गेला आहात असेही प्रांजळपणे सांगितलेले आहे. या माहितीवर बरेच जान खोडसाळ आक्षेप घेतीलच, पण हे सत्य आहे.
शेवटच्या फाळणी नंतर पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर मुसलमानांची अवस्था फारच चमत्कारिक झाली. जे आपला देश झाला म्हणून खुशी खुशी पाकिस्तानात गेले ते कायमच ‘मोहाजिर’ म्हणून हिणवले गेले आणि त्यांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळाली. तेथील हिंदूंची मालमत्ता त्यांना मिळेल असे ठरले होते ती मिळालीच नाही. आणि जे भारतात राहिले त्यातील काही “हसके लिया पाकिस्तान लडके लेंगे हिंदुस्तान” अश्या मनोभूमिकेत राहिले तर बहुसंख्य या भूमीशी “वतन आधा ईमान है” या भूमिकेतून हिंदुस्थानशी एकनिष्ठ राहिले. पण हिंदूंमधील टोकाची भूमिका घेणाऱ्या आणि फाळणीतील कत्तलीनी दुखावलेल्या हिंदुनी त्याना कधी आपले मानले नाही. ना घरका ना घाटका अश्या अवस्थेतील मुसलमानांना कॉंग्रेसने व्यवस्थितपणे आपल्या दावणीला व्होटबँक बनवून बांधून ठेवले. मोगलकालीन शाही इमाम या बिरुदाने अधिकृत भासवल्या जाणाऱ्या इमामांच्या फतव्याने ही दुरी अधिकच वाढली. त्यातच मदरशा मध्ये कुराणशरीफ व्यतिरिक्त ऐहिक शिक्षण न देण्याच्या मानसिकतेतून बहुसंख्य समाज हा अशिक्षित सदराखालीच राहिला. त्यामुळे त्यांचे उद्योगधंदेही वेगळ्या स्वरुपात राहिले. या प्रश्नांना प्रथम उत्तर दिले ते अटल बिहारी वाजपेयी सरकारने. दर तिसऱ्या महिन्यात दूरदर्शन वरून मुस्लिमांच्या प्रश्नावर एक चर्चात्मक कार्यक्रम होत असे. त्यातच मदरश्या मधून धार्मिक शिक्षणाबरोबरच एस एस सी ची परीक्षाही देता यावी या मागणीने जोर धरला. तशी पावलेही उचलली गेली. मुस्लिमांचे राष्ट्रीय प्रवाहात या वेळी खरेखुरे आगमन सुरू झाले. त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटली. कल्याणसिंह उत्तर प्रदेश मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर संघाच्या एका वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून मी एक भूमिका मांडली होती. मुस्लीम मुलींना फक्त फुकट शिक्षण देवून भागणार नाही तर त्यांना स्टायपेंड पण दिला पाहिजे त्याशिवाय त्यांना शाळेत पाठवले जाणार नाही. शिकून काय करणार घरी बसून आईला मदत कर असेच म्हटले जाईल. ही भूमिका कल्याणसिंह आणि शरद पवार दोघानीही उचलून धरली. व सर्वच मुलींना स्टायपेंड सुरू केला. २५ वर्ष्यानंतर बनारस हिंदु युनिव्हर्सिटी मधून २५ मुलीनी गोल्ड मेडल मिळविले आणि त्यातील एकीनेतर संस्कृत मधून गोल्ड मिळविले तेंव्हा माझ्या एव्हढा खुश कोणीच झाला नसेल.
त्यानंतरचे मोठ्ठे पाऊल माननीय सरसंघचालक सुदर्शनजीनी टाकले.
१८५७ च्या स्वातंत्रयुध्दात हिंदूंबरोबर मुसलमानही लढले होते. या स्वातंत्र्यात त्यांचाही मोलाचा वाटा आहे. लोकसंख्येच्या वीस टक्के असलेल्या लोकांनी आपण अल्पसंख्य आहोत ही मानसिकता सोडावी आणि मुख्य प्रवाहात भाग घ्यावा अशी भूमिका मांडली. त्यांच्याच प्रेरणेतून मुझफ्फर हुसेन या संघ स्वयंसेवकाने मुस्लीम राष्ट्रीय मंचाची सुरवात केली. सध्या माननीय इंद्रेषकुमार मुस्लीम राष्ट्रीय मंचाचे गाईड आणि फिलोसोफर आहेत. गेल्या महिनाभरात मु.रा.म.(मुस्लीम राष्ट्रीय मंच) तर्फे देशभरात पाच कोटी मुसलमानांशी संपर्क साधून “देशासाठी मतदान करा बाकी सर्व गोष्टी बाजूला ठेवा हा संदेश देण्यात आला.
अडचणीत आल्यास हिंदु मुस्लीम दंगली घडवून आणायच्या आणि मुसलमान नेत्यांना संतुष्ट करायचे आणि सामान्य मुसलमानांना घाबरवून आपल्या अंकित करायचे हा कॉंग्रेसचा डाव्या हातचा मळ होता.
नवा मुल्ला छगन भुजबळांनी तर पोलिसांना स्वतःच्या लेखी हुकमाशिवाय गोळ्या घालण्यावर बंदी आणून मोकाट रान मिळवून दिले होते. पण नरेंद्र मोदींनी त्यांचा हा डाव उलटवला. आठवडाभर दंगल चालण्याची परंपरा असलेल्या गुजरातमधील दंगल तीन दिवसात आटोक्यात आणली. त्यासाठी शेजारच्या राज्यांमधून कुमकही मागवली. पण एकाही काँग्रेसी राज्याने कुमक पाठवली नाही तरी सुद्धा कडकपणाने दंगल तीन दिवसात आटोपली. आणि नंतर होवूच शकली नाही. वार्षिक दंगलींची परंपरा असलेल्या कॉंग्रेसला हा मोठाच धक्का होता.
मोदी आपल्याला धोकादायक आहेत ही गोष्ट काँग्रेस आणि अमेरिकन उद्योजकांना ताबडतोब लक्ष्यात आली आणि मुले कुठारः या न्यायाने मोदींविरुद्ध बरीच षडयंत्रे सुरू झाली. १२ वर्षे त्यांना कसेही करून २००२ च्या दंगलीत दोषी ठरवायचे याची आघाडी उघडण्यात आली. मुळात कुठल्याही धार्मिक वादात राजकारण किंवा अर्थकारणच गुंतलेले असते ते लक्ष्यात ठेवा. पूर्वी नागपूरमध्ये हातमाग चालवणारे हिंदु आणि कापडे विणणारे मुसलमान रंगारी यांच्यात दंगल होत असे. हे त्यांचे माग जाळून टाकत असत आणि ते त्यांची रंगवलेली कापडे. दंगलीनंतर दोघेही कपाळावर हात ठेवून बसून असायचे. माग जळल्याने विकायला कापड नाही आणि कापडच नाही तर रंगवणार काय? हातमाग व्यवसायाचे खच्चीकरण असेही होऊ शकते.
त्या दंगलीनंतर मोदींना पुन्हा लोकांसमोर जायचे होते निवडणुका घेवून आपल्या कामाचे मुल्यांकन करून घ्यायचे होते. इलेक्शन कमिशनने ते होऊ दिले नाही. लिंगडोह यांना माग्सेसे अवार्ड मिळाले.
या सगळ्या दंगल गाजावाजा प्रकरणाने मोदींची प्रतिमा हिटलर हिंदु अतिरेकी वगैरे वगैरे भासवण्यात काँग्रेस आणि माध्यमांना बऱ्यापैकी यश मिळाले. त्यामुळे अनेक भाजपा समर्थक सुद्धा मोदींबद्दल जपूनच बोलत होते. मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषीत करण्याच्या काळातील आजच्या काही मोदी समर्थकांच्या पोस्ट पहिल्यात तर मी काही मोदी समर्थक नाही पण हा मुद्दा पहा अश्या प्रकारच्या जपून टाकलेल्या पोस्ट होत्या. उगाच कोणी आपल्याला जहाल मुस्लीमविरोधी म्हटले तर काय घ्या. असो.
हिंदूंची ही अवस्था तर मुसलमानांचे तर विचारायलाच नको. मोदींबद्दल चांगले बोललो तर आपले समाजबांधवच आपल्याला त्रास देतील अश्या भावनेने ते मनात काहीही असले तरी उघड बोलत नव्हते. त्यातच देवबंदी मौलाना मसूद यांनी, कॉंग्रेसने आमच्यासाठी काही केले नाही आम्हाला फसवले असा राग आळवायला सुरवात केली. ते प्रत्यक्ष मोदींना मते द्या एव्हढेच म्हणाले नाही. बाकी अप्रत्यक्षपणे तेच, मोठ्या खुबीने सुचविले. डाव्या समजल्या जाणाऱ्या मधू किश्वर यांनी प्रत्यक्ष गुजरातमध्ये जावून तेथील मुसलमानांशी बोलून मोदींबद्दल निर्वाळा दिल्यानंतर मात्र हे प्रकरण जड जाऊ लागल्याचे अनेकांच्या ध्यानी आले. आणि आपच्या जन्मावर शिक्कामोर्तब झाले.
मोदींनी विकास केला म्हणजे नेमके काय केले आणि त्यांच्या विरुध्द आंतरराष्ट्रीय षडयंत्र कसे निर्माण होऊ लागले ते पुढील भागात पाहूया.
क्रमशः…..

Short URL: https://vrittabharati.in/?p=12533

Posted by on Apr 7 2014. Filed under संवाद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in संवाद (96 of 112 articles)


दिल्ली दिनांक : रवींद्र दाणी नवी दिल्लीचा रस्ता बनारसवरून जातो! भाजपाने बनारसहून नरेंद्र मोदी यांची उमेदवारी जाहीर केल्यापासून राजकीय वर्तुळात ...

×