Home » संवाद » प्रधानसेवकाची अभिवचने

प्रधानसेवकाची अभिवचने

गेल्या सुमारे वर्षभरापासून सारा देश नरेंद्र मोदींना पाहतो, ऐकतो आणि अनुभवतो आहे. या वर्षात त्यांनी चालविलेली निवडणूक प्रचार मोहीम आणि त्यानंतर कमावून स्वीकारलेले पंतप्रधानपद या काळात त्यांच्या लोकप्रियतेची कमान सतत उंचावतच चालली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान अक्षरश: हजारो सभांमधून कोट्यवधी जनतेशी संवाद साधताना कुठेही, कधीही त्यांचे एक वाक्यही वादग्रस्त ठरले नाही. कुठेही एखाद्या विधानाची उलटसुलट चर्चा नाही. पंतप्रधान झाल्यानंतर विनाकारण कुठे काही बोलले नाही की वाद उपस्थित केला नाही. अतिशय शांतपणे पंतप्रधानपदाची शान, प्रतिष्ठा कायम ठेवली. आता पंतप्रधान म्हणून लालकिल्ल्यावरून केलेल्या आवाहनाने त्यांची प्रतिमा निश्‍चितपणे अधिकच उंचावलेली दिसत आहे.
दिल्लीतील या लाल किल्ल्यावरून आतापर्यंत तेरा पंतप्रधानांनी भाषणे दिली आहेत. त्यात पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सतरा वेळा, तर त्यांच्या सुकन्या इंदिरा गांधी यांनी सोळा वेळा भाषणे दिल्याची नोंद आहे. इतर पंतप्रधानांना दोन-चार भाषणांचीच काय ती संधी मिळाली आहे. नरेंद्र मोदी या पूर्वीच्या सर्व पंतप्रधानांपासून एका बाबतीत नक्कीच वेगळे आहेत. ते या देशाच्या स्वातंत्र्यात, म्हणजेच १९४७ नंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान आहेत. स्वाभाविकच लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणारे स्वातंत्र्यानंतरच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारेही ते पहिलेच पंतप्रधान आहेत.
स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या शहिदांना आणि स्वातंत्र्यासाठी झटणार्‍या पिढ्यांना वंदन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालकिल्ल्यावर तिरंगा फडकवला. कोणत्याही सुरक्षेशिवाय त्यांनी हे भाषण दिले. उत्स्फूर्त, आक्रमक, तडफदार आणि भारतीय जनतेला उज्ज्वल भविष्याची स्वप्ने दाखविणारे हे भाषण होते. त्यांचे भाषण तासाभरापेक्षा अधिक वेळ झाले. पंडित जवाहरलाल नेहरूंनंतर सर्वाधिक मोठे भाषण नरेंद्र मोदींचेच ठरले. देशाच्या विकासासाठी झटणार्‍या प्रत्येकाचे त्यांनी अभिनंदन केले. हा देश इथपर्यंत पोहोचला त्यात आतापर्यंतची सर्व सरकारे, सर्व पंतप्रधान आणि सर्व राज्यांच्या सर्व सरकारांचे मोठे योगदान आहे, हेही त्यांनी अगदी प्रांजळपणे सांगितले.
भगवा फेटा बांधून ‘गार्ड ऑफ ऑनर’ स्वीकारणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले. भाषणानंतर परतताना आपला संपूर्ण ताफा थांबवून, मोटारीतून उतरून, विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्याशी हस्तांदोलन करणारे, त्यांची पाठ थोपटणारे ते या देशाचे पहिलेच पंतप्रधान आहेत. मुलांमध्ये मिसळण्याच्या त्यांच्या कृतीमुळे, ‘सबसे अच्छे हिरो, हमारे नये सुपरहिरो’ असा उल्लेख या मुलांनी केला. ‘दिल को छू जानेवाला, दिल से दिया हुआ’ भाषण अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया देशातील सर्वसामान्य जनतेने दिली.
मी या देशाचा ‘प्रधानमंत्री’ नाही, तर ‘प्रधानसेवक’ आहे, या वाक्याने नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाला सुरवात केली. जनता आणि पंतप्रधानांमध्ये असलेला काचेचा पडदा काढून टाकणारे, बुलेटप्रुफ पोडियमशिवाय बोलणारे, जनतेशी थेट संवाद साधणारे ते बहुदा पहिलेच पंतप्रधान असावेत. ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण अंगिकारणार्‍या सरकारचे नेतृत्व करणार्‍या मोदींनी आपल्या भाषणात देशाच्या मूलभूत मुद्यांना, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्‍नांना हात घातला, त्यांचे भाषण उत्स्फूर्त आणि अलिखित असले तरी मुद्देसूद होते, जमिनीवरचे होते, अशा प्रतिक्रिया देशभरातील प्रसारमाध्यमे, समाजसेवी, राजकीय निरीक्षक, उद्योजक अशा वर्गातून उमटल्या आहेत.
परवाच्या स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच १५ ऑगस्ट २०१४ रोजी केंद्र सरकारतर्फे शुभेच्छा देणार्‍या जाहिराती वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. काही जाहिरातींचा कदाचित अपवाद असेल, पण माहिती व जनसंपर्क खात्याच्या ६८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणार्‍या जाहिरातीत पंतप्रधान किंवा त्या खात्याच्या कोणत्याही मंत्र्याचे छायाचित्र नाही. गेल्या निदान दहा वर्षांतील अशा जाहिरातींमध्ये असणार्‍या छायाचित्रांशी या जाहिरातीची प्रसारमाध्यमांनी तुलना केली. विशेषत: मावळत्या पंतप्रधानांसोबत किंवा त्यांच्या छायाचित्राच्याही वर अनेकदा छापल्या गेलेल्या, कोणतेही सरकारी पद न भूषविणार्‍या सोनिया गांधी यांच्या छायाचित्राच्या पार्श्‍वभूमीवर तर ही चर्चा विशेष उल्लेखनीय आणि महत्त्वाची होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वातंत्र्यदिनाचे भाषण अराजकीय होते, असा आरोप काही राजकीय नेत्यांनी केला आहे. त्यांच्या भाषणावर विविध वृत्तवाहिन्यांवर सुरू असलेल्या चर्चांमध्येसुद्धा सरकारी धोरण, विदेशनीती, अर्थनीती याकडे दुर्लक्ष केल्या गेले, असाही आरोप केला गेला. वारंवार असा उल्लेख होत असलेला पाहून सूत्रसंचालन करणार्‍या एका वैतागलेल्या संपादकाने, ‘पंतप्रधानांच्या भाषणात या मुद्यांचा उल्लेख असलाच पाहिजे असा काही नियम आहे काय?’ असा प्रश्‍नच या नेत्यांना विचारून टाकला.
पंतप्रधान मनापासून बोलले, हृदयाला हात घालणारे बोलले, गावाबद्दल, समाजाबद्दल बोलले. ते कुटुंबाबद्दल, मुलांबद्दल, मुलींबद्दल बोलले, हे अप्रासंगिक कसे, असाही प्रश्‍न या देशातील जनतेला पडला आहे. मोदींच्या भाषणावर व्यक्त झालेल्या कॉंग्रेससारख्या विरोधीपक्षाच्या प्रवक्त्यांच्या व नेत्यांच्या प्रतिक्रिया तर सर्वसामान्य लोकांना चकित करणार्‍या होत्या. त्यांच्या, ‘अराजकीय भाषण’, ‘निवडणुकीचे भाषण’ अशा परस्परविरोधी प्रतिक्रियाही गमतीदार होत्या. देशातील ‘कॉमन मॅन’ला सहज कळले, समजले, त्यांच्यापर्यंत पोहोचले, तरुणाईच्या मनाला हात घातला, असे भाषण पंतप्रधानांनी द्यायचे नसते का? असाही प्रश्‍न अनेकांना काही नेत्यांची प्रतिक्रियेची सर्कस पाहून पडत होता.
काही दिवसांपूर्वी मी दिल्लीसाठी उपरा होतो. पण आपण सर्वांनी मला दिल्लीला आणले. इथल्या काही गोष्टी पाहून, अनुभवून मी चकित झालो. केंद्रातील एकाच सरकारमध्ये अनेक सरकारे असल्याचे मला दिसून आले. प्रत्येकजण आपले स्वत:चे स्वतंत्र संस्थान असल्यासारखा काम करत होता. सरकारचा एक विभाग दुसर्‍याशी भांडत असताना मला दिसला. ही भांडणे अनेकदा न्यायालयातही गेल्याचे दिसून आले. अशाने कसे होणार ? सरकार म्हणजे तुकडा तुकडा जोडून बनलेली वस्तू नाही. ते एकजीव रसायन आहे. एकाच सरकारमध्ये असलेल्या वेगवेगळ्या भिंती मला तोडायच्या आहेत. प्रशासनातील लोकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. या गुणवत्तेला एकत्र आणून दिशा देण्याचा माझा प्रयत्न आहे. सरकारी अधिकारी वेळेवर कामावर पोहोचतात किंवा पोहोचले, ही बातमी कशी होऊ शकते, असा प्रश्‍न विचारून मोदींनी, अशी जर बातमी बनत असेल तर आपण कोणत्या थराला गेलो आहोत, हेही पाहायला हवे असे बजावले.
पंतप्रधानांच्या भाषणात संपूर्ण जगाला आवाहन करणारा एक महत्वाचा मुद्दा होता, ‘कम, मेक इन इंडिया’. भारतात या, येथील साधनसंपत्ती वापरा, इथले कौशल्य वापरा, इथली गुणवत्ता वापरा, इथली मानवी शक्ती वापरा आणि इथे निर्मिती करा, असे आवाहन त्यांनी जगाला केले. ‘आयात करणारा देश’ ही आमच्या देशाची ओळख आम्हाला ‘निर्यात करणारा देश’ अशी बदलायची आहे. आमच्या देशात जे काही निर्माण होईल ते सर्वोत्तम असावे. त्यात ‘झीरो डिफेक्ट आणि झीरो इफेक्ट’ असावा. झीरो इफेक्टचा अर्थ त्यामुळे कोणाचेही नुकसान नसावे, हेही त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याकडे ‘योजना आयोग’ काम करत आहे. हा योजना आयोग आता विसर्जित करण्याची वेळ आली आहे. त्या जागी नवा विचार, नवा विश्‍वास आणून नवीन संस्थेची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. या देशात अशी व्यवस्था मला निर्माण करायची आहे की, त्यानंतर योजना आयोगाची गरजच राहणार नाही. यासाठी आम्हाला सर्वांना मिळूनमिसळून काम करण्याची गरज आहे. देश घडविण्यासाठी गावांच्या विकासावर भर देणे गरजेचे आहे. हा देश नेत्यांनी, शासकांनी किंवा कोणत्याही एका सरकारने उभा केलेला नाही. हा देश घडविण्यात शेतकरी, कामगार, महिला, युवक, संत आणि शास्त्रज्ञांचा मोठा आणि मोलाचा वाटा आहे, हेही पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या देशातील हिंसाचाराच्या मार्गाने जाणार्‍या नक्षलवादी प्रवृत्तींना आवाहन करताना मोदी म्हणाले, अशा शक्तींनी हिंसाचार सोडून राष्ट्रबांधणीच्या कामात सहभागी व्हायला हवे. खांद्यावर बंदूक घेऊन, आपल्याच बांधवांचे रक्त सांडून तुम्ही जमीन लाल करू शकता. पण त्याच खांद्यांवर नांगर घेतला तर जमीन हिरवीगार होईल. आपल्या शेजारच्याच आपल्या मित्रराष्ट्रात, नेपाळमध्ये शस्त्र घेऊन फिरणारा युवक आता लोकशाही रुजवतो आहे. नक्षली हिंसेचा मार्ग सोडत आहे. आपल्या देशातही हेच व्हायला हवे. जातीय व धार्मिक हिंसाचारांमुळे देशाचा विकास खुंटला आहे. हिंसेने काहीही मिळत नाही, केवळ भारतमातेच्या चारित्र्यावर डागच लागतात. या दुखण्यातून आम्हाला आता कायमची सुटका हवी आहे. नक्षलवाद, माओवाद अशा वादांपासून दहा वर्षे दूर राहून पाहा, पुन्हा असे वाद तुम्हाला आठवणारही नाहीत. ‘शस्त्र छोडो, शास्त्र चुनो’ , ‘बंदूक फेको, हल चुनो’ याचा अनुभव घ्या.
देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करून पंतप्रधान म्हणाले, अनेकदा आईवडील मुलीच्या येण्याजाण्याची चौकशी करतात, पण मुलाला विचारायची हिंमतही दाखवत नाहीत. बलात्कार करणाराही कोणाचातरी मुलगाच असतो. त्याची जबाबदारी कोणाची? आपला मुलगा घराबाहेर कुठे जातो, कोणासोबत राहतो, काय करतो असे प्रश्‍न पालकांनी विचारायला नकोत का? मुलांनाही काही मर्यादा घालून देण्याची गरज आहे. गुन्हा घडल्यानंतर कायदा आपले काम करतोच, पण पालकांनीही त्यांची जबाबदारी पार पाडायला हवी.
स्त्री भ्रूणहत्येबाबत बोलताना पंतप्रधानांनी, स्वत:च्या तिजोर्‍या भरण्यासाठी मातेच्या गर्भात वाढणार्‍या मुलींना मारू नका, असे आवाहन केले. पाच पाच मुले असणारे आईवडील वृद्धाश्रमात असलेले मी पाहिले आहेत. पण मुलगी मात्र आयुष्यभर प्रसंगी लग्न न करता आईवडिलांची सेवा करते, असाही अनुभव आहे. राष्ट्रकुल खेळात ४० पैकी २९ पदके मुलींनी आणली आहेत, त्यांचा आम्हाला अभिमान आहे. मुलांच्या आशेने मुलींना बळी चढवू नका, असे आवाहनही त्यांनी या देशातील प्रत्येक आईला केले. प्रत्येक खासदाराने आपला एक वर्षाचा निधी प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह निर्माण करण्यासाठी द्यावा. वर्षभरात प्रत्येक शाळेत असे स्वच्छतागृह निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करू, असे या देशातील मुलींकडे लक्ष देणारे आवाहन त्यांनी केले.
देश घडविण्यासाठी गावांच्या विकासावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीदिनी ‘संसद आदर्श ग्राम’ योजना सादर केल्या जाईल. या योजनेद्वारे लोकसभा आणि राज्यसभेतील प्रत्येक खासदाराने पाच वर्षांत आपापल्या मतदारसंघात पाच आदर्श गावांच्या निर्मितीसाठी प्रयत्न करावेत. लोकांनी आम्हाला सत्ता दिली म्हणून आम्ही मनमानीपणे वागणार नाही. सर्वांना सोबत घेऊन एकमताने, एकदिलाने आणि एका निर्धाराने पुढे जाण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. तर आम्हाला यशही येत आहे. याकडेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्ष वेधले.
२०१९ पर्यंत, महात्मा गांधींच्या १५० व्या जयंतीपर्यंत ‘स्वच्छ भारत’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे याकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आपला देश कधीही स्वच्छ होऊ शकत नाही, यावर माझा विश्‍वास नाही. सव्वाशे कोटी देशवासींनी संकल्प केला तर हे सहज शक्य आहे. सरकार स्थापन केल्यानंतर पहिले स्वच्छतेचेच काम आम्ही हातात घेतले आहे. ही स्वच्छता प्रत्येक स्तरावर आम्हाला अपेक्षित आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशातील जनतेला आपल्या भविष्यातील कारभाराबद्दल एक अभिवचनच आपल्या लाल किल्ल्यावरील पहिल्या भाषणातून दिले आहे.
– अनिरुद्ध पांडे

Short URL: https://vrittabharati.in/?p=15049

Posted by on Aug 20 2014. Filed under संवाद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in संवाद (90 of 112 articles)


भारतात १०० ‘स्मार्ट सिटीज्’ विकसित करण्यासाठी केंद्र सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात सात हजार साठ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली ...

×