Home » संवाद » मिशन २७२ यशस्वी

मिशन २७२ यशस्वी

महागाई, भ्रष्टाचार, घोटाळे, महिलांवरील अत्याचार, कायदा-सुव्यवस्थेचा सत्यानाश, सरकारची जनतेप्रती कमालीची असंवेदनशीलता याला कंटाळलेल्या देशवासीयांनी अखेर देशात परिवर्तन घडवून आणले. गेल्या सहा महिन्यांपासून देशात परिवर्तनाची लाट आली होती. लोकांना परिवर्तन हवे होते. जो तो कॉंग्रेसप्रणीत संपुआच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करताना दिसत होता. प्रत्येकाच्या मनात असंतोष खदखदत होता. कॉंग्रेसला सत्तासिंहासनावरून उचलून फेकण्याची संधी शोधत होता. अखेर ती संधी मतदारांना भाजपाने दिली. विपरीत परिस्थितीत राज्याचा विकास घडवून गुजरातमधील जनतेसाठी चांगले दिवस आणणार्‍या मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपाने पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले आणि देशात मोदींची लाट आली. ‘अबकी बार मोदी सरकार’ हा नारा एवढा लोकप्रिय झाला की दोन-तीन वर्षे वयाची लहान मुलेही या नार्‍याचा जयघोष करू लागली. पाहता पाहता नरेंद्र मोदी घराघरांत पोहाचले आणि १६ मे रोजी लागलेल्या लोकसभा निकालांनी देशवासीयांना स्तंभित केले. जनतेने सुराज्याला कौल दिला. नरेंद्र मोदी यांच्या पारड्यात मतांचे भरघोस दान टाकून त्यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा केला. ५४३ पैकी ३३५ जागा भाजपाप्रणीत रालोआला देऊन त्रिशंकू सरकार टाळत मतदारांनी सूज्ञपणाचा परिचय दिला. देशाच्या पंतप्रधानपदाचा मार्ग उत्तरप्रदेशातून जातो, याची जाणीव असलेल्या मतदारांनी या राज्यातून तब्बल ७२ जागांचा भाजपाला दिलेला कौल ऐतिहासिक आणि अभूतपूर्व म्हणावा लागेल. १९८४ साली इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर सहानुभूतीच्या लाटेचा फायदा कॉंग्रेसला मिळाला होता. ४०० पेक्षा जास्त जागा जिंकत कॉंग्रेसने दोनतृतीयांश बहुमताचे सरकार चालविले. पण, त्यानंतर २००४ पर्यंत झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. स्वातंत्र्य मिळाल्यापासून देशात सर्वाधिक काळ कॉंग्रेसचीच सत्ता राहिली. जेव्हा गैरकॉंग्रेसी सरकार सत्तेत आले तेव्हा ते आघाडीचे होते. सर्वाधिक जागा जिंकणार्‍या पक्षाच्या नेतृत्वात आघाडीची सरकारं केंद्रात आली. त्याचा फटकाही देशालाच सहन करावा लागला. विकासाच्या प्रक्रियेला खीळ बसली. यंदा २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच मतदारांनी पुन्हा एकदा एका पक्षाला स्पष्ट बहुमत दिले आहे. सरकार स्थापन करण्यास आवश्यक २७२ या आकड्यापेक्षाही दहा-बारा जागा जास्तीच्या देऊन मतदारांनी समजूतदारपणा दाखविला आहे. आघाडीच्या सरकारमध्ये घटक पक्ष प्रमुख पक्षाला कसे ब्लॅकमेल करतात आणि विकासाच्या मार्गात अडसर निर्माण करतात हे देशाने अनुभवले आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीचा उपयोग करीत मतदारांनी भाजपाला स्पष्ट कौल दिला हा एकप्रकारे जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा विजयही म्हणावा लागेल. आघाडीच्या सरकारला कामे नीट करता येत नाहीत, घटक पक्षांना विश्‍वासात घेतल्याशिवाय निर्णय घेता येत नाहीत, निर्णय घेतलाच तर घटक पक्षांच्या नाराजीसमोर तो टिकत नाही अशा विचित्र कात्रीत सापडलेले सरकार कामच करू शकत नाही याचा अनुभव देश गेली २५ वर्षे घेतो आहे. तसला प्रकार आता पुढल्या पाच वर्षांत घडणार नाही अशी तजवीज मतदारांनीच करून दिली हे देशाचे भाग्यच म्हटले पाहिजे.
मतदारांनी भाजपाला रात्रीतून निवडून दिलेले नाही. भाजपानेही जादूची कांडी फिरविलेली नाही. भाजपाने गेल्या सहा महिन्यांत प्रचंड परिश्रम घेतले. विषेशत: भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी दिवसरात्र एक करून अथक परिश्रम केले. निवडणुका घोषित व्हायच्या असतानाही मोदी यांनी देशभर दौरे केले. ठिकठिकाणी सभा घेतल्या. निवडणुकीच्या काळात तर तीन लाख किलोमीटरचा प्रवास करून चारशेपेक्षा जास्त सभा घेतल्या आणि आक्रमक प्रचार करीत, विकासाच्या राजकारणावर भर देत, संपुआ सरकारच्या गैरकारभाराचे वाभाडे काढत, माता-पुत्राच्या सरकारवर जोरदार प्रहार केले. जनतेच्या मनाला थेट भिडणारी आणि सुराज्याच्या बाबतीत आश्‍वस्त करणारी ओजस्वी भाषणं करीत जनताजनार्दनाला जिंकण्याची किमया मोदी यांनी साधली. त्याच्याच परिणामी भारतीय जनता पार्टीला दणदणीत यश मिळाले आहे. मोदींचा पेहराव, त्यांची भाषणाची शैली, त्यातील मुद्दे, त्यांचा आक्रमकपणा अशा सगळ्याच बाबी जनतेला भावल्या आणि त्याचे परिणाम १६ मे रोजी झालेल्या मतमोजणीत पाहायला मिळाले. ‘सबका साथ सबका विकास’ हा मोदींनी दिलेला नारा अतिशय प्रभावी ठरला. अच्छे दिन आनेवाले है, असे जे मोदींनी मतदारांना सांगितले त्याचाही परिणाम जनतेवर झालेला स्पष्टपणे दिसतो आहे. जात-पात-धर्म-पंथ-भाषा-भौगोलिक आणि सामाजिक मर्यादांच्या पलीकडे जाऊन भाजपानेही प्रचार केला आणि मतदारांनीही त्याला साद घातली, हे या निवडणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
निवडणुका जिंकण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जिवाचे रान केले. निवडणुकीच्या प्रचाराचे सुयोग्य असे नियोजन केले. ज्या राज्यात त्यांनी सभा घेतली तेथील भाषेत भाषणांची सुरुवात करून मतदारांना जिंकले. ज्या राज्यात सभा, त्या ठिकाणच्या समस्यांवर प्रकाश टाकून भाषणातूनच मतदारांशी संवाद साधला. नेमकी हीच बाब मतदारांना आवडली आणि त्यांनी जी कमाल केली ती आपल्या सगळ्यांनीच पाहिली. स्वतंत्र भारतात सुराज्य आणण्याचा संकल्प नरेंद्र मोदी यांना सोडला आणि मतदारांनीही त्याला साथ दिली. नरेंद्र मोदी यांनी मिशन-२७२ हाती घेतले होते. सरकार स्थापन करायचे तर बहुमतातलेच असा निर्धार त्यांनी केला होता. सहा महिन्यांपूर्वी बिहारमधले नितीशकुमार भाजपाची साथ सोडून रालोआबाहेर पडल्यानंतर सगळ्यांनी मिळून भाजपाची टिंगलटवाळी केली. भाजपाचे सत्तेवर येण्याचे स्वप्न हास्यास्पद ठरविले. राजकारणात भाजपाला जातीयवादी संबोधून एकटे पाडण्याचे प्रयत्न झाले. मोदींच्या मिशन २७२ चीही खिल्ली उडविण्यात आली. पण, ना मोदी डगमगले ना भाजपा. मोदींनी मिशन पुढे नेले. अगदी नेटाने पुढे नेले. त्याचे परिणाम आज आपण पाहतो आहोत. कॉंग्रेसला ६० वर्षे दिलीत, मला ६० महिने तर द्या, हे मोदींनी केलेले भावनिक आवाहन एवढे प्रभावी ठरले की एकदा संधी देऊनच पाहू, असे म्हणत जनतेने भाजपाचे कमळ फुलविले. मोदींबद्दल मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्नही झालेत. पण, मतदारांनी कशालाही भीक न घालता, स्वत:ची दिशाभूल करवून न घेता भाजपाच्या झोळीत मतांचे आधिक्य टाकले आणि मोदींना पंतप्रधान म्हणून मान्यता दिली. नरेंद्र मोदी हे बडोद्यातून ५ लाख ७० हजार मतांनी विजयी झाले आणि बडोद्यातील जनतेचे आभारही त्यांनी बडोद्यात जाऊन मानले. बडोद्यातील मतदारांसमोर बोलतान मोदींनी परिपक्वतेचा परिचय दिला. जी भाषणं केली होती, त्या दिशेनेच प्रवास करणार असल्याबाबत आश्‍वस्त केले. मेरे जैसा मजदूर नंबर वन आपको नही मिलेगा, असे सांगत त्यांनी देशाच्या विकासासाठी आपण रात्रंदिन झटणार असल्याचे, पर्यायाने दिलेली आश्‍वासने पूर्ण करून जनतेचे जीवन सुकर करणार असल्याचेच संकेत दिले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसमुक्त भारताचा नारा दिला होता. कॉंग्रेस म्हणजे भ्रष्टाचार, कॉंग्रेस म्हणजे महागाई, कॉंग्रेस म्हणजे महिलांवर अत्याचार, कॉंग्रेस म्हणजे घोटाळेबाजांची कंपनी अशा अर्थाने भाषणं करीत मोदी यांनी कॉंग्रेसविरुद्ध आक्रमक प्रचार केला. त्याच्याच परिणामी आज गुजरात, राजस्थान, दिल्ली, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गोवा, जम्मू-काश्मीर या राज्यांमध्ये कॉंग्रेसला खातेही उघडता आले नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात कॉंग्रेसला केवळ दोन जागा मिळाल्या. अतिशय दारूण पराभव कॉंग्रेसच्या वाट्याला आला. कॉंग्रेसच्या या पराभवाची कारणमीमांसाही याच लेखात पुढे करणार आहे.
भारतीय जनता पार्टीने अतिशय योग्य वेळ साधून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले. पक्षातील सर्व नेत्यांनी मोदी यांचे नेतृत्व मान्य करीत निवडणुकीची जय्यत तयारी केली. मोदी यांनी अतिशय परिश्रम घेत पक्षातील सर्व सहकार्‍यांना सोबत घेत निवडणुकीसाठी पक्षाची व्यूहरचना केली. अतिशय बारीकसारीक बाबी लक्षात घेत नियोजन केले. कुठेही काही कमी पडणार नाही याची काळजी घेतली. अगदी मोदी यांच्या जॅकेटवर जे कमळाचे चिन्ह आपण पाहिले तेही त्यांनी विचारपूर्वक लावले होते. लोकांमध्ये मोदींबद्दल प्रचंड आकर्षण होते. मोदींना मत देण्याचा निर्धार लोकांनी केला होता. पण, ग्रामीण भागातील लोकांना कोणत्या चिन्हासमोरील बटन दाबले पाहिजे हे कळावे यासाठी मोदींनी योजनापूर्वक आपल्या जॅकेटवर कमळ लावले होते. भाजपाची प्रचार यंत्रणा एवढी प्रभावी केली की कॉंग्रेसची डाळच त्यापुढे शिजली नाही. मोदी आणि भाजपाने कॉंग्रेसचे अपयश जेवढ्या आक्रमकपणे जनतेसमोर मांडले, तेवढ्या आक्रमकपणे कॉंग्रेसला आपली कामगिरी मांडता आली नाही. मॉं-बेटे की सरकारवर मोदी यांनी पोलादी प्रहार केल्याने घायाळ झालेली कॉंग्रेस पराभूत मानसिकतेत चालली गेली. त्या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी लागणारे डॉक्टर शेवटपर्यंत न मिळाल्याने अखेर कॉंग्रेसचा राजकीय मृत्यू झाला.
पराभवाची कारणे
मोदी आणि भारतीय जनता पार्टीच्या यशाचे विश्‍लेषण करताना कॉंग्रेसच्या पराभवामागील कारणेही लक्षात घेणे क्रमप्राप्त ठरते. महागाई, भ्रष्टाचार यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून जनता त्रस्त आहे. कॉंग्रेसप्रणीत संपुआच्या सरकारचीच ही देण आहे. रालोआच्या सरकारचा पराभव करून जेवढ्या दमदारपणे कॉंग्रेसने दहा वर्षांपूर्वी सत्ता मिळविली होती, तेवढ्याच आक्रमकपणे मतदारांनी या सरकारला सत्तेतून हाकलून लावले आहे. जनतेने या सरकारला हाकलण्याचा चंगच बांधला होता हे आता स्पष्ट झाले आहे. अतिशय कमजोर नेतृत्व, सर्व आघाड्यांवर आलेले अपयश, त्वरित निर्णय न घेता येणे असे अनेक आरोप कॉंग्रेसवर लागले.
२००४ साली जेव्हा कॉंग्रेसचे सरकार आले त्यावेळी सोनिया गांधी यांनी स्वत: पंतप्रधान व्हायला पाहिजे होते. पण, तसे न करता त्यांनी मनमोहनसिंगांसारख्या एका नोकरशहाला पंतप्रधानपदी बसविले. एक मजबूत नेता निवडण्याऐवजी कॉंग्रेसने एक मजबूर नेता निवडला. सगळ्या प्रकारच्या नियुक्त्या, सगळे महत्वाचे निर्णय घेताना आपलाच वट राहावा या हेतूनेच मनमोहनसिंगांची निवड करण्यात आली होती, हे आधीच स्पष्ट झाले आहे. डॉ. मनमोहनसिंग हे एक विद्वान आहेत, अर्थशास्त्री आहेत हे सगळे खरे असले तरी ते राजकीय नेते नाहीत, त्यांना सामान्य जनतेच्या समस्यांची जाण नाही, ही बाबच कॉंग्रेसने लक्षात घेतली नाही. प्रशासकीय नैपुण्य लक्षात घेतानाच राजकीय नैपुण्याच्या अभावाकडे कॉंग्रेस हायकमांडने दुर्लक्ष केले. असे दुर्लक्ष केले नसते तर कदाचित आज चित्र वेगळे दिसले असते. संपुआच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात मनमोहनसिंगांना संधी दिल्यानंतर पुन्हा पाच वर्षे द्यायला नको होती. पण, हातचे बाहुले पाहिजे असल्याने सोनियांनी त्यांना संधी दिली आणि स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला.
बेजबाबदार विधानं
देशात बोकाळलेल्या भ्रष्टाचाराकडे कॉंग्रेसने साफ दुर्लक्ष केले. कॉंग्रेसमधील मंत्रीही अतिशय बेजबाबदारपणे वागले. महागाईच्याही बाबतीत अशीच वर्तणूक अनुभवायला मिळाली. महागाई कमी करण्यासाठी आमच्याकडे काही जादूची छडी नाही असे सांगत मंत्र्यांनी जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न केले. ज्या जनतेने यांना लोकसभेवर निवडून पाठविले त्या जनतेला जर अशी बेजबाबदारपणाची उत्तरे मिळत असतील तर ती जनता धडा शिकविणारच. समस्या सोडविण्याऐवजी त्यांचे स्वरूप आक्राळविक्राळ करण्याकडेच मंत्र्यांचा कल दिसला. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी समस्यांची आग विझविण्याऐवजी आगीत तेल टाकण्याचेच काम केले.
सोनिया गांधींच्या नेतृत्वातील संपुआ सरकारमधील प्रत्येक मंत्र्यावर जनतेप्रती उदासीन असल्याचा आरोप लागला. पाकिस्तानने पाच भारतीय जवानांची हत्या केल्यानंतर संरक्षणमंत्री ए. के. ऍण्टनी यांनी संसदेत जे उत्तर दिले होते ते अतिशय बेजबाबदार, चीड आणणारे आणि शहीदांचा अपमान करणारे होते. ज्यांनी हत्या केली ते पाकिस्तानी सैनिक नव्हते तर सैनिकांच्या वेशातील ते अतिरेकी होते, असे विधान करून ऍण्टनी यांनी निर्लज्जपणाचा आणि भेकडपणाचा परिचय दिला होता. एकप्रकारे ऍण्टनी यांनी पाकिस्तानला दोषमुक्त ठरविले होते. काय गरज होती असे विधान करण्याची? गरज नसताना केलेले हे विधान कॉंग्रेसला महागात पडल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
कॉंग्रेसच्याच कार्यकाळात देशात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांच्या आयोजनात प्रचंड भ्रष्टाचार झाला. ज्याला जेवढे लुटता येईल तेवढे त्याने लुटले. मोठा घोटाळा झाला. जगभर देशाची बदनामी झाली. देशाच्या जनतेत कॉंग्रेसबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली. भ्रष्टाचाराचे स्वरूप पाहता असे वाटत होते की देशात क्रीडा महोत्सव आहे की लूट महोत्सव. कॉंग्रेसच्याच कार्यकाळात १ लाख ७६ हजार कोटी रुपयांचा टू-जी घोटाळा झाला, १ लाख ८६ हजार कोटी रुपयांचा कोळसा घोटाळा झाला. देशाच्या चेहर्‍यावर काळिमा फासण्याचे काम कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी केले. दहा वर्षांच्या कार्यकाळात जेवढे लुटता येईल तेवढी लूट कॉंग्रेसजनांनी केली.
कॉंग्रेसच्याच कार्यकाळात देशात मोठी आंदोलनं झाली. अगदी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनापेक्षाही मोठी आंदोलनं झाली. भ्रष्टाचाराविरुद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत प्रचंड मोठे आंदोलन उभारले होते. पण, त्यांना तिहार तुरुंगात टाकून त्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला अन् जनतेचा असंतोष ओढवून घेतला. पुढे अण्णांच्या आंदोलनासाठी त्यांना हवी असलेली जागा न देता दडपशाहीचे धोरण चालूच ठेवले. अण्णांचे तत्कालीन सहकारी अरविंद केजरीवाल यांचे आंदोलन दडपून त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला. आंदोलनांचे महत्त्व ओळखून कॉंग्रेस वागली असती तर त्याचे चांगले परिणाम त्या पक्षाला मिळाले असते. पण, अण्णांचेच आंदोलन नाही तर निर्भयावरील बलात्कारानंतर झालेल्या आंदोलनाचीही कॉंग्रेसने योग्य ती दखल घेतली नाही. त्यामुळे सरकारवर असंवेदनशीलतेचा आरोप लागला तो कायमचाच. रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्नदेखील कॉंग्रेसच्या अंगलट आला.
कॉंग्रेसप्रणीत संपुआ सरकारमधील मंत्री व नेते आपल्या मतदारसंघांकडे दुर्लक्ष करीत होते. राजधानी दिल्लीत राहण्यातच धन्यता मानत होते. आम आदमीपासून दूर राहणाहे हे मंत्री व नेत्यांबद्दल जनतेच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला होता. आपापल्या मतदारसंघात जाऊन जनतेच्या समस्या जाणून घेणे, त्यावर तोडगा काढणे अन् जनतेला दिलासा देण्याऐवजी शाही जीवन जगण्यावर मंत्र्यांनी भर दिला. त्याचे परिणाम आज आपल्यासमोर आहेत. अमेठी आणि रायबरेली हे दोनच मतदारसंघ अपवाद ठरले आहेत. तिथली विकासाची अवस्था पाहिली तर तिथेही कॉंग्रेस पराभूत व्हायला पाहिजे होती. पण, प्रत्यक्ष सोनिया गांधी आणि युवराज राहुल गांधी मैदानात असल्याने ते वाचले.
कॉंग्रेसने आपल्या कार्यकाळात सीबीआयचाही फार दुरुपयोग केला. आपल्या राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी वारंवार सीबीआयचा एक हत्यार म्हणून वापर केला. त्याचमुळे मुलायमसिंग यादव आणि मायावती यांनी इच्छा नसतानाही संपुआचे सरकार संकटातून वाचविले. ज्यांनी पाठिंबा काढला त्यांच्याविरुद्ध सीबीआयला कारवाई करायला लावली. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या भाजपाच्या नेत्यांविरुद्धही सीबीआयला कारवाई करण्यास भाग पाडले. पण, आपल्याकडे न्यायालयांची सक्रियता वाढल्याने सीबीआयचा दुरुपयोग करून राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यात कॉंग्रेस शेवटच्या काळात अपयशी ठरली.
कॉंग्रेसच्या राजवटीत देशात बेरोजगारी प्रचंड वाढली. शिकलेले तरुण काम नसल्याने रोजगारासाठी भटकत राहिले. १८ त २२ या वयोगटातील सुमारे १५ कोटी तरुण यंदा पहिल्यांदाच मतदान करणार होते. त्यांना आपल्याकडे वळविण्यात कॉंग्रेस अपयशी ठरली. भाजपाने मात्र बेरोजगारीचा मुद्दा प्रभावीपणे मांडत तरुणाईला आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले. एवढ्या मोठ्या संख्येतील नवमतदारांकडे दुर्लक्ष करण्याचा परिणाम कॉंग्रेसला भोगावा लागला आहे. युवराज राहुल गांधी स्वत:ला तरुण समजत असतानाही त्यांना तरुणाईची नाडी ओळखता आली नाही ही बाबही कॉंग्रेसला पराभवाच्या खाईत लोटती झाली. कॉंग्रेसने ‘युवा जोश’चा नारा तर दिला होता, पण युवकांमध्ये जोश भरण्यात कॉंग्रेस अपयशी ठरली. नव्या पिढीला जलद गतीने निर्णय घेणारे नेते आवडतात ही बाब लक्षात घेऊन मनमोहनसिंगांना बदलायला पाहिजे हेही कॉंग्रेसच्या लक्षात आले नाही. शेवटी व्हायचे तेच झाले.
निवडणुकांच्या खूप आधीपासूनच भारतीय जनता पार्टीने तयारी केली होती. नियोजन केले होते. प्रचार कार्यक्रमाची आखणी केली होती. मोदींसारख्या तडफदार नेत्याकडे सूत्रे सोपविली होती. उमेदवार निवडीची प्रक्रियाही सुरू केली होती. याउलट कॉंग्रेसचे होते. कॉंग्रेसने योजनाच केली नव्हती. कॉंग्रेसचे निवडणूक धोरण अतिशय गचाळ होते. एकीकडी भाजपा आक्रमक झाली असताना कॉंग्रेस मात्र गलितगात्र झाली होती. कॉंग्रेसचे सगळे नेते हवेतच होते. भाजपाने केलेल्या आरोपांना दमदारपणे उत्तर देणे आणि आपल्या सरकारची कामगिरी प्रभावीपणे जनतेपुढे मांडणे यात कॉंग्रेस अपयशी ठरली. भाजपाने उभे केलेले आव्हान ओळखून त्याबरहुकूम योजना अमलात आणण्याऐवजी मोदींवर आरोप करण्यातच कॉंग्रेस नेत्यांनी धन्यता मानली. कॉंग्रेसच्या बोलघेवड्या नेत्यांनी पक्षाला अडचणीत आणण्याचेच काम केले. एकीकडे मोदी विकासाची चर्चा करीत असताना कॉंग्रेसचे नेते मोदींवर वैयक्तिक टीका करण्यातच धन्यता मानत होते. त्यामुळे फायदा होण्याऐवजी कॉंग्रेसच्या विरोधात नकारात्मक वातावरण तयार झाले आणि त्याची जबर किंमत कॉंग्रेसला मोजावी लागली.
एकूणच यावेळची निवडणूक ही भारतीय लोकशाहीला कलाटणी देणारी ठरली. आपण कसेही वागलो, जातीय सलोखा बिघडवून समाजात दुही निर्माण केली, विकासाकडे दुर्लक्ष केले तरी चालते हा समज मतदारांनी खोटा ठरविला आहे. निवडणुकीने जो कौल दिला आहे तो नरेंद्र मोदी, भारतीय जनता पार्टीच्या परिश्रमाला आणि संवेदनशीलतेला दिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या सुराज्याला कौल दिला आहे.
–  गजानन निमदेव

Short URL: https://vrittabharati.in/?p=13474

Posted by on May 21 2014. Filed under संवाद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in संवाद (92 of 112 articles)


चांगले शासनकर्ते निवडून देण्याचा अधिकार सर्वसामान्यांना असणे ही एक फार मोठी सशक्त व्यवस्था असते. परंतु चांगले शासनकर्ते निवडून देण्यासाठी डोळसपणे ...

×