Home » मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन, संवाद » मुस्लिम मते आता कॉंग्रेसची जहागिरी नाही…

मुस्लिम मते आता कॉंग्रेसची जहागिरी नाही…

मुस्लिम जगत : मुजफ्फर हुसेन
२०१४ च्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, कॉंग्रेसला चिंता सतावू लागली आहे की, आपली वफादार मुस्लिम व्होट बँक आपला साथ देईल की नाही? गेल्या अनेक निवडणुकांमध्ये दलित व्होट कॉंग्रेसपासून दूर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. मायावतीचा जेव्हापासून उदय झाला, तेव्हापासून या व्होट बँकेला तडा गेला आहे. गेल्या संसदेत मायावतींनी भलेही संपुआला समर्थन दिले असेल, पण निवडणुकीत मात्र त्या कॉंग्रेसला एकहाती आव्हान देणारच आहेत. बसपासारखा मुस्लिमांचा राजकीय पक्ष नाही. त्यामुळे या समुदायाची मते कॉंग्रेसलाच आतापर्यंत मिळत आली. पण, मागील काही वर्षांचा रेकॉर्ड असे सांगत आहे की, दलित मते कॉंग्रेसपेक्षा अन्य पक्षांनाच अधिक मिळाली आहेत. मुस्लिम मते विखुरल्यामुळे त्याचा लाभ कोणत्याच पक्षाला होत नाही. एक काळ असा होता की, या मतांवर फक्त मुस्लिमांचा एकाधिकार होता. पण, आता ती स्थिती राहिलेली नाही. त्याची अनेक कारणे आहेत. भूतकाळात अनेक मुस्लिम पक्ष उदयास आलेही, पण त्यांची विचारसरणी ही सांप्रदायिक असल्यामुळे त्यांना लोकांनी पसंत केले नाही. आता मुस्लिम अन्य पक्षांशीही जुळू लागल्यामुळे कॉंग्रेसचा वाटा हिरावून घेतला जात आहे. कॉंग्रेस आपला उमेदवार उभा करते तरीही मुसलमान त्यांना वोट देत नाही. परिणामी, कॉंग्रेसमध्ये मुस्लिम प्रतिनिधित्व वेगाने घसरत चालले आहे. गेल्या लोकसभेत हे स्पष्टपणे जाणवले आहे. सध्याच्या लोकसभेत मुस्लिम खासदार केवळ ३० आहेत. त्यात कॉंग्रेसचे फक्त दहा आहेत. २००४ मध्ये हीच संख्या ३९ होती. याला जबाबदार कोण? स्वत: मुस्लिम. जर मुस्लिम वेगळा पक्ष स्थापन करून राजकारण करतील, तर धर्मनिरपेक्ष देश ते सहन करणार नाही. सर्वात लक्षणीय बाब ही की, जेथे मुस्लिम बहुसंख्येत आहेत, त्यांना आव्हान देणारा कुणीही नाही असे असूनही ते हारले. असे अनेक लोकसभा मतदारसंघ आहेत, जेथे मुस्लिम बहुमतात असूनही तेथे त्यांना यश मिळाले नाही. त्या ठिकाणी अन्य धर्मीय उमेदवार जिंकला. याचा अर्थ असा की, मुस्लिम स्वत:च्या समुदायाच्या उमेदवारासाठीही एकजूट होत नाहीत. याचे ज्वलंत उदाहरण लक्षद्वीप मतदारसंघ. येथे ९५ टक्के मुस्लिम मतदार असूनही कॉंग्रेसचे पी. एम. सईद पराभूत झाले! यामुळे मुस्लिमांना आता गंभीरपणे विचार करावा लागणार आहे की, त्यांचे संकुचित धार्मिक राजकारण या देशासाठीही फलदायी नाही आणि मुस्लिमांसाठीही नाही.
हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा जन्मच मुळात हिंदू-मुस्लिम दंगलीच्या उदरातून झाला, त्यामुळे त्याची सावली तर पडणे स्वाभाविकच होते. पण, ती इतक्या लांबवर जाईल, याचा विचार कधी कुणी केलाच नव्हता. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये तेव्हा संघर्ष झाले हे एकवेळ समजू या. पण, अनेक दंगली तर कॉंग्रेसमुळे झाल्या. सत्तेवर सातत्याने कॉंग्रेसच असल्यामुळे मुस्लिमांना दाबणे आणि भीती दाखविणे त्यांच्यासाठी हातचा मळ होता. हीच भीती त्यांना मग कॉंग्रेसच्या जवळ आणत गेली. कितीही अन्याय झाला तरी मुसलमान तोंड उघडत नव्हता. कारण, काही मुस्लिम नेते- जे या गरीब मुसलमानांचे पुढारी होते- त्यांना सत्तेचा तुकडा मिळत असे. पण, एक वेळ अशीही आली जेव्हा कॉंग्रेसचा हा नकाब टराटरा फाडला गेला. कॉंग्रेस नेते मुस्लिम नेत्यांना हाताशी धरून दंगे करायचे, त्या सर्वांचे चेहरे जनतेसमोर आले. १९७५ साली आणिबाणीच्या काळात संजय गांधी याने मुस्लिमांच्या नसबंदीचे आंदोलन चालविले, जामा मशिदीजवळील मुस्लिमांच्या ९५ टक्के झोपड्या जाळून टाकल्या. या कामात कोणतेही हिंदू संघटन किंवा व्यक्तीचाही समावेश नव्हता. हे केवळ कॉंग्रेसने काही मुस्लिम नेत्यांना हाताशी धरून केले होते.
भोपाळ विषारी वायुकांडाच्या वेळी मुसलमानांना व अन्य नागरिकांना अगदी तडफडून मरण्यासाठी कॉंग्रेसने बाध्य केले. त्यांना अजूनपर्यंत भरपाई मिळालेली नाही. या कांडात मेले मुसलमान आणि मलाई खाल्ली कॉंग्रेसने! इंडियन लॉ इन्स्टिट्यूटचे डॉ. उपेंद्र बक्षी यांनी या वायुकांडाशी निगडित सर्व दस्तावेज गोळा केले होते. भारताच्या दोन वकिलांनी अमेरिकन कोर्टात भरपाईसाठी दावा दाखल केला. पण, केवळ साडेबारा टक्केच म्हणजे ४६०० लाख डॉलर्स तेवढे मिळाले. ही रक्कम १९८९ पासून रिझर्व्ह बँकेत जमा आहे. का? ती पीडित मुस्लिमांना का वाटण्यात आली नाही? भोपाळच्या एकाही मुस्लिम संघटनेने याबाबत आवाज का उचलला नाही? दरवर्षी १ डिसेंबर येतो आणि गॅसपीडित मुसलमाना भोपाळच्या तलावात आपले अश्रू गोळा करतात. हेच कारण आहे की, आता मध्यप्रदेशातील मुसलमान कॉंग्रेसपासून दूर गेला आहे. मुस्लिमांच्या हत्याकांडाचे हे पाप कॉंग्रेस आणि युनियन कार्बाईडने मिळून केले होते.
बिहारमधील भागलपूर दंगलींचाही उल्लेख येथे अप्रासंगिक होणार नाही. या रक्तरंजित संघर्षात मुस्लिमांचे डोळे फोडण्यात आले होते. ही घटना जेव्हा उजागर झाली, तेव्हा चार-पाच लोकांनाच पकडण्यात आले, पण जे खरे आरोपी होते ते पडद्याआडच राहिले! दंगली झाल्या की आयोग बसविणे, हेच कॉंग्रेस करीत आली आहे. भागलपूरचा अहवाल अजूनही धूळ खात पडला आहे. पण, कॉंग्रेस मोठीच नाटकी. दंगली झाल्या की, मगरीचे अश्रू ढाळण्यात यांचा पुढाकार असतो. पण, खर्‍या आरोपींना ते पकडत नाही. कारण, त्यात अधिकांश कॉंग्रेसचे असतात ना! भागलपूरची दंगल ही मुसलमान विरुद्ध अन्य कोणताही समुदाय अशी नव्हती, तर ती कॉंग्रेसविरोधात होती. काही लोक म्हणू शकतात की, या घटना आता जुन्या झाल्या. पण, जुन्या घटना पुन्हा उफाळून येऊ शकतात. राजस्थानात गहलोत सरकार असताना, अजमेरच्या सरवाडमध्ये कुरान जाळणे आणि मशिदी तोडणे हे पाप कुणाच्या काळात झाले? कॉंग्रेसच्या! ही दंगल हिंदू-मुसलमान अशी नव्हती. अशी एकही घटना घडली नाही, ज्यासाठी बहुसंख्य समाजाला दोषी धरले जाईल. गहलोत सरकार याचेही उत्तर देईल का की, गोपालगढ मशीद वादात आठ मुस्लिमांची निर्घृण हत्या कुणी केली? माजी आमदार राव कलमेेंद्र सिंह यांनी असा आरोप केला आहे की, गहलोत यांच्या पत्नीने उदयपूरमधील त्या मशिदीची जमीन विकून टाकली, जी वक्फ बोर्डाची होती! मुस्लिमांनी आक्रोश केला, तर तीन सदस्यीय चौकशी समिती कॉंग्रेसने गठित केली. समितीने असा निर्वाळा दिला की, अशा घटना तर सामान्य आहेत आणि त्या घडतच असतात. उलट, कॉंग्रेसने यात हिंदू संघटनांचा हात असल्याचा कांगावा केला. पण, सत्य लपून राहिले नाही. कॉंग्रेसचे पाप समोर आले.
महाराष्ट्रातील मुसलमान, मुख्यमंत्र्यांना का विचारीत नाहीत की, वक्फ बोर्डाची जमीन अंबानीला कशी काय विकली? तेथे आता ‘अटलांटा टॉवर’ उभे आहे. म्हणून आज गरज ही आहे की, जेथे कुठे दंगे झाले ते कॉंग्रेसनेच घडवून आणले, हे सत्य सांगणे. यासाठी मुसलमानांनाच पुढाकार घ्यावा लागेल. आज हिंदू संघटनांना येनकेनप्रकारेण बदनाम करण्याचा कुटिल डाव कॉंग्रेस खेळत आहे. हिंदू संघटनांना अतिरेकी संबोधले जात आहे. त्यांच्यावर खोटे खटले दाखल केले जात आहेत. साध्वी आणि साधूंना अटक केली जात आहे. आज देशात निवडणुकीचे वातावरण आहे. कॉंग्रेस पुन्हा मुसलमानांना हिंदूंसोबत संघर्ष करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. म्हणून हे लोक कोण आहेत, त्यांचे मनसुबे काय आहेत, हे मुस्लिम बांधवांनी ओळखले पाहिजे.
मोदींविरुद्ध गेल्या बारा वर्षांपासून विषारी प्रचार सुरू आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतरही कॉंग्रेस, न्यायालयांचा अपमान करीत आहे. सध्याचे सांप्रदायिक दंगलविरोधी विधेयक हा हिंदूंना बदनाम करणार्‍या कटाचाच एक भाग आहे. स्वत: दंगली घडवायच्या आणि त्याचे खापर हिंदू संघटनांच्या माथी फोडायचे, असा कुटिल डाव स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच कॉंग्रेस खेळत आहे. मुस्लिमांनी यापासून सावध राहण्याची गरज आहे. त्यांनी हे ओळखले पाहिजे की, मुसलमानांना हिंदूंपासून अलग करण्याचे कारस्थान कोण करीत आहे? शीख बांधवांनी १९८४ च्या दंगलीकडे सातत्याने जगाचे लक्ष वेधून कॉंग्रेसचा जो पर्दाफाश केला आहे, तेच काम आता या देशातील मुसलमानांना करायचे आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=10897

Posted by on Feb 8 2014. Filed under मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन, संवाद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in मुस्लीम जगत : मुजफ्फर हुसैन, संवाद (108 of 112 articles)


अन्वयार्थ : तरुण विजय आता विमानतळांवर खासदार, आमदार यांच्या सोयीसुविधांमध्ये अधिकच वाढ होणार आहे, असे जेव्हा ऐकण्यात आले तेव्हा यात ...

×