Home » चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक » लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात?

लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र व्हाव्यात?

•चौफेर : अमर पुराणिक•

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सर्व निवडणुका पाच वर्षांत एकाचवेळी घेण्यासंबंधी सूचना केली होती. लोकसभा निवडणुक पाच वर्षातून एकदाच होत असली तरी कोणत्या ना कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणुका दरवर्षी होत असतात त्यामुळे कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येतात. त्यासाठी लोकसभा आणि विधानसभा एकाचवेळी झाल्या पाहिजेत. इतके नव्हे तर स्थानिक पातळीवरील महापालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील एकाचवेळी किंवा एकाच कालावधीत होणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांची ही सूचना नवी नाही. विधिआयोग आणि बर्‍याच संसदीय समित्यांनीही एकत्र निवडणुका घेण्याच्या बाजूने मत मांडले होते. पण काही छोटे किंवा राज्यस्तरीय पक्ष याबाबत असहमती दर्शवत आहेत.

elections in indiaनुकत्याच ७ राज्यातील राज्यसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्या अनुषंगाने लोकसभा – विधानसभेच्या निवडणुका एकत्रपणे घ्याव्यात का? या जुन्याच चर्चेला नव्याने तोंड फुटले आहे. निवडणुक आयोगाने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्‌यात विधी मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या सुचनेला सहमती दर्शवताना म्हंटले आहे की, जर राजकीय पक्ष उक्तविचारांशी सहमत असतील तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रीतपणे घेण्यास आयोग तयार आहे. आयोगाचे म्हणणे आहे की, दोन्ही निवडणुका एकाचवेळी घेण्यासाठी मोठ्‌याप्रमाणात इव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशीन लागणार आहेत. ज्याच्या खरेदीसाठी जवळजवळ ९ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. विधी मंत्रालयाने एकत्र निवडणुका घेण्यासंबंधी संसदीय समितीच्या ७९ व्या अहवालात दिल्या गेलेल्या सूचना व दुरुस्त्यांसंबंधी निवडणुक आयोगाचे मत विचारले आहे. हा अहवाल विधी मंत्रालयाला डिसेंबर २०१४ मध्ये दिला होता.
मार्च २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा पदाधिकार्‍यांच्या बैठकीत सर्व निवडणुका पाच वर्षांत एकाचवेळी घेण्यासंबंधी सूचना केली होती. त्यांनी म्हंटले होते की, लोकसभा निवडणुक पाच वर्षातून एकदाच होत असली तरी कोणत्या ना कोणत्या राज्यातील विधानसभा निवडणुका दरवर्षी होत असतात त्यामुळे कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे येतात. त्यासाठी लोकसभा आणि विधानसभा एकाचवेळी झाल्या पाहिजेत. इतके नव्हे तर स्थानिक पातळीवरील महापालिका, जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका देखील एकाचवेळी किंवा एकाच कालावधीत होणे आवश्यक आहे. पंतप्रधान मोदी यांची ही सूचना नवी नाही. भाजपाने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आपल्या जाहीरनाम्यात लोकसभा – विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या मुद्द्याचा समावेश केला होता. विधिआयोग आणि बर्‍याच संसदीय समित्यांनीही एकत्र निवडणुका घेण्याच्या बाजूने मत मांडले होते. पण काही छोटे किंवा राज्यस्तरीय पक्ष याबाबत असहमती दर्शवत आहेत कारण त्यांना भीती आहे की, असे झाल्यास मतदाता केंद्रात आणि राज्यातही राष्ट्रीय पक्षाला बहुमत देतील. उदाहरणार्थ लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळीच दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहारच्या निवडणुका झाल्या असत्या तर विधानसभेतही भाजपाला या राज्यात प्रचंड बहुमत मिळाले असते आणि या राज्यात भाजपा सत्तेत आला असता.
भारतात १९५२, १९५७, १९६२ आणि १९६७ पर्यंत लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाचवेळी झाल्या होत्या. तेव्हा निवडणुका आयोगाला एकत्र निवडणुका घेण्यात अडचण येत नव्हती शिवाय राजकीय पक्षांनाही याची अडचण येत नव्हती. १९६८ आणि १९६९ मध्ये काही राज्यातील विधानसभा वेळेपुर्वी बरखास्त केल्या गेल्यामुळे नव्याने निवडणुका घेतल्या गेल्या. तर १९७० मध्ये लोकसभा मुदतीपुर्वी भंग पावल्याने आणि १९७१ साली नव्याने निवडणुका घेतल्या गेल्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची प्रक्रिया खंडीत झाली. तेव्हापासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या घेतल्या जावू लागल्या. संविधानाच्या ३२४ कलमानूसार निवडणुका आयोगाकडे निवडणुका घेण्याची जबाबदारी असल्याने स्वतंत्र आणि स्वच्छ निवडणुका घेण्याचे अधिकारही निवडणुक आयोगाला मिळालेले आहेत. त्यासाठी निवडणुक आयोग वेळोवेळी कडक नियम बनवत आले आहे. तरीही या नियमांची पायमल्ली सतत होत आली आहे हे कटूसत्य आहे. भारतातील बर्‍याच उमेदवारांचा निवडणुकीचा खर्च आयोगाच्या निर्धारित खर्चापेक्षा जास्त असतो. विधानसभा निवडणुका वेगवेगळ्या वेळी होत असल्यामुळे सर्व पक्षाचे केंद्रीय नेते राज्यांमध्ये महिनाभर तळ ठोकुन असतात आणि मतदारांवर आपल्या पक्षाचा प्रभाव पाडण्याचा पुरेपुर प्रयत्न करत असतात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेतल्यास हे सर्व नेत्यांना आपआपल्या निवडणुकांत सक्रिय रहावे लागल्यामुळे राज्यातील निवडणुकांत लक्ष घालणे शक्य होणार नाही. अर्थात प्रत्येक पक्ष आपली सत्ता यावी, आपले उमेदवार निवडुन यावेत यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारच. विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्या गेल्या नसल्या तरी किमान दोन्ही निवडणुका जवळपासच्या कालावधीत झाल्या तरीही ते योग्य होईल जेणे करुन लोकसभा आणि सर्व राज्यातील विधानसभा निवडणुका सहा महिन्यांच्या कालावधीत जरी झाल्या तरी राहिलेल्या साडेचार वर्षांच्या कालावधीत विकासकामे व योजना राबण्यात अडथळे येणार नाहीत. एकत्र निवडणुका घेण्यामागे मुख्य कारण हेच आहे की वर्षावर्षाला निवडणुका झाल्याने सतत विकासकामात अडथळे येत असतात ते बंद होईल आणि राहिलेल्या साडेचार वर्षात अखंडपणे विकासकामांना गती देणे शक्य होईल.
निवडणुक आयोग लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यास तयार आहे. शिवाय भाजपाने हा मुद्दा आपल्या निवडणुकीच्या घोषणापत्रात घेतल्यामुळे एकत्र निवडणुका घेण्यास वचनबद्ध आहे. त्यामुळे भाजपा सरकारला या प्रस्तावावर सर्व पक्षांची सहमती मिळवावी लागेल आणि जे सहमत नाहीत त्यांचे मतपरिवर्तन करावे लागेल. जर सर्व पक्ष तयार झाले तर काही राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ वाढवावा लागेल तर काही राज्यातील कमी करावा लागेल. ज्या राज्यातील विधानसभेचा कार्यकाळ कमी होणार आहे त्यांची सहमती मिळवणे कठीण आहे. येती लोकसभा निवडणुक २०१९ साली होईल. पश्‍चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ या राज्यात नुकत्याच निवडणुका झाल्या आहेत त्यामुळे या राज्यातील निवडणुकांचा कार्यकाळ ३ वर्षात संपवावा लागेल. बिहार विधानसभेला ४ वर्षे मिळतील. या राज्यांची समजूत काढणे म्हणजे दगडातून पाणी काढण्याइतके अवघड काम आहे, पण हे अशक्य काम नाही. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपले राजनैतिक कौशल्य वापरून सर्व पक्षांकडून २०१८ पर्यंत जरी सहमती मिळवू शकले तर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संविधानिक सहमती प्राप्त करणे कठीण होणार नाही. अशा स्थितीत निवडणुक आयोग २०१९ साली लोकसभा आणि राज्यसभा निवडणुका एकत्रपणे किंवा त्या वर्षभरात घेऊ शकतो. या साठी लागणार्‍या इव्हीएम मशिनरीज खरेदी करणे व इतर व्यवस्था करणे सरकारसाठी कठीण काम नाही.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समान कालावधीत करण्याबरोबर अन्यप्रकारच्या निवडणुक सुधारणा करणे आवश्यक आहे. या पहिला मुद्दा आहे की वाढत्या उमेदवारांची अनियंत्रित संख्या. काही काही निवडणुकीत उमेदवारांची संख्या शंभरापर्यंत जाऊ शकते. निवडणुकांत मोठ्‌यासंख्येने असे उमेदवार उभे राहतात. ज्यांनी कधी ग्रामपंचायत किंवा पालिकेची निवडणुक लढवलेली किंवा जिंकलेली नसते असे लोक लोकसभा आणि विधानसभेची निवडणुक लढवतात. बरेचशे उमेदवार दोन – पाचशे मतेही मिळवू शकत नाहीत. त्यामुळे निवडणुक आयोगाने यावर उपाय योजने आवश्यक आहे. जमानतीची रक्कम वाढवूनही याला आळा बसलेला नाही. यासाठी निवडणुकीला उभे राहू इच्छिणार्‍या प्रत्येक उमेदवाराचे राजकीय आणि सामाजिक कामाचे किमान ५ वर्षांचे रिपोर्ट कार्ड अनिवार्य करावे किंवा तत्सम आर्हता आवश्यक करण्यासारख्या नव्या संकल्पना राबवून याला आळा घालण्याचा प्रयत्न आयोग करु शकतो. याचा दूसरा फायदा म्हणजे लोकसभेत आणि विधानसभेत ज्यांना बहुमत मिळेल त्याच राष्ट्रीय पक्षाची सत्ता येईल व त्यामुळे राज्यसभेतही त्यापक्षाचे प्राबल्य राहिल जेणे करुन लोकसभेत मंजूर झालेले विषय राज्यसभेत फेटाळले जाणार नाहीत. कॉंग्रेस सारख्या निक्रिय पक्षांना याचा काही उपयोग होणार नाही पण विधायक काम करणार्‍या पक्षांना याचा फायदा मिळेल हे निश्‍चित.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28653

Posted by on Jun 19 2016. Filed under चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक (15 of 125 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• विदेशी कंपन्यांची मेक फॉर इंडिया उत्पादने देशी पैशावर चालणार्‍या मेक इन इंडियासाठी घातक ठरु शकतात ज्यामुळे ...

×