Home » चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक » संघाचे सेवा कार्य ही राष्ट्रसाधना : सुहासजी हिरेमठ

संघाचे सेवा कार्य ही राष्ट्रसाधना : सुहासजी हिरेमठ

•चौफेर : अमर पुराणिक•

कोणतंही सेवा कार्य म्हंटलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच नाव सर्वप्रथम पुढे येतं. कोणतीही नैसर्गिक आपत्ती असो की, समाजिक आपत्ती असो संघाची  सेवाकार्याची शैली अप्रतिम आहे. राष्ट्रीय आणि सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्थापनेपासूनच सामाजिक सुधारणा आणि समरसता निर्माण करण्यात मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘सेवा भारती’च्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम अविरत राबवले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सेवा प्रमुख सुहासजी हिरेमठ यांनी संघाच्या सेवाकार्यासंदर्भात तरुण भारतशी संवाद साधत विस्तृत चर्चा केली.

suhas hiremath‘सेवाकार्याच्या बाबतीत हिंदू चिंतनच संघाच चिंतन आहे. हिंदू चिंतनानूसार सेवा याचा अर्थ निस्वार्थ भावाने, पूज्यभावनेने, कर्तव्य भावनेने सेवा करणे यालाच खरी सेवा म्हणतात’, असे सुहासजी हिरेमठ यांनी स्वामी विवेकानंदाच्या वचनाचा संदर्भ देत सांगितले. काही दुर्भाग्यपुर्ण कारणामुळे समाजातील जे लोक मागे राहिले आहेत त्यांच्या उन्नतीसाठी, त्यांना पुढे आणण्यासाठी केलेली साधना म्हणजे सेवा आहे. संघासाठी सेवा ही साधना आहे, साध्य नव्हे. संघाच्या सेवाकार्याचा उद्देश हा नाही की समाजातील एक वर्ग कायम सेवा देणारा राहील आणि दूसरा वर्ग कायम सेवा घेत राहील. सेवा कार्याचा उद्देश हा सेवित जनांच्या मनामध्ये स्वाभिमान जागृत करणे हा आहे. आज जे सेवा घेत आहेत ते लवकरच दूसर्‍या पिडीतांची सेवा करणारे व्हावेत. आज जे हात घेण्यासाठी पुढे आले आहेत तेच हात उद्या देण्यासाठी पुढे यावेत हाच मुख्य सेवा कार्यांचा उद्देश आहे. सेवा कार्याच्या दरम्यान असे अनेक अनुभव समोर आले आहेत की सेवा घेणारे लोक पुढे चांगले कार्यकर्ते झालेले आहेत. त्यांच्या मनात ही भावना निर्माण झाली की  समाजाचे आपल्यावर काही ॠण आहे. समाजाकडून आपल्याला जे मिळाले आहे त्याच्या बदल्यात समाजाला काही तरी परत दिले पाहिजे, आपण त्या ॠणाची परतफेड समाजाला केली पाहिजे, अशी अनेक उदाहरणं सार्‍या देशातून समोर आली असल्याचे सुहासजी हिरेमठ यांनी सांगितले.
संघाच्या सेवाकार्यात प्रामुख्याने सामाजिक समरसता निर्माण करणे, अस्पृश्यता दूर करणे, समाजापासून दूर गेलेल्या लोकांना पुन्हा समाजात परत आणणे, त्यांना सन्मान मिळवून देणे, गांव नशामुक्त करणे हे कार्य केले जाते. समाजातील वंचित घटकांना सबल बनवून त्यांना राष्ट्रनिर्माण कार्यात उभं करणे, समाजातील दोष आणि विकृती दूर करुन चारित्र्यवान समाजाची निर्मिती करुन समाजातील सर्व वर्गांना एक समान बनवून राष्ट्राला वैभवसंपन्न बनवणे हाच या सेवाकार्यांच्या मागचा उद्देश आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वयंसेवकांच्या माध्यमातू प्रदीर्घ काळापासून सेवाकार्य अविरतपणे सुरु ठेवले आहे या सेवाकार्याचा परिणाम हा झाला की समाजातील विषमता दूर करण्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सेवाकार्यांच्या माध्यमातून मोठे यश मिळवले असल्याचे सुहासजी हिरेमठ म्हणाले.
संघ स्थापनेपासूनच स्वयंसेवक सेवा कार्य करत आले आहेत. कालांतराने वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने सेवा कार्यांचे संचालन होत आले आहे. त्यात राष्ट्रीय आपदा निवारण असु द्या किंवा वंचित, दलित, पिडीतांची सेवा असुद्यात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक सेवा कार्यात संलग्न आहेत. महाराष्ट्रात तर आज सेवा कार्याला ७५ वर्षे झाली आहेत. अन्य प्रांतातही सेवा कार्य जोमात सुुरु आहे, पण १९८० नंतर या सेवा कार्यांचा वेग आणि व्याप मोठ्‌याप्रमाणात वाढला आहे. उत्तर भारतात अधिकांंश सेवा कार्ये ही ‘सेवाभारती’च्या नावाने चालतात. अन्य प्रांतातही वेगवेगळ्या नावाने कार्य चालते. उदारणार्थ, महाराष्ट्रात जनकल्याण समिती, विदर्भात लोक कल्याण समिती, कर्नाटकात हिंदू सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रोत्थान परिषद या नावाने सेवा कार्य चालत असल्याकडे सुहासजी हिरेमठ यांनी लक्ष वेधले.
सेवाभारती काय कार्य करते, याची खूलासेवार माहिती देताना सुहासजी हिरेमठ म्हणाले की, वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्यांमध्ये सेवा कार्यांबद्दल माहिती प्रसिद्ध होत नाही त्यामुळे संघाच्या सेवाकार्यांचा परिचय नागरिकांना होत नाही, त्यांना सेवा कायार्र्ची माहिती मिळत नाही. पण लाखोंच्या संख्येने लोक सेवा कार्यात गुंतलेले आहेत. शिवाय अनेक संस्था, स्वयंसेवी संस्था, संघटना सेवा भारती सोबत सेवा कार्यात काम करत आहेत. या सर्वांना जोडणे, सामंजस्य निर्माण करणे, सुसूत्रता निर्माण करणे, कार्याच्या विचारांचे, अनुभवांचे अदान-प्रदान करणे, सेवा कार्याची गुणवत्ता विकसित करणे, प्रांतातील सेवा संस्थांना बहूआयामी बनविणे, स्थानिक आवश्यकतांप्रमाणे आयाम निर्माण करणे, प्रशिक्षण देणे आदी कामे सेवा भारती करत असते. सध्या सेवा भारती बरोबर ८०० सेवासंस्था संलग्न आहेत. यातील  जवळजवळ ४० टक्के संस्था या स्वतंत्रपणे कार्य करतात, स्वयंप्रेरणेने काम करतात. राष्ट्रीय सेवा भारतीच्या माध्यमातून जवळपास ६५००० सेवा कार्य सुरु असल्याचा गौरवपुर्ण उल्लेख सुहासजी हिरेमठ यांनी केला. याशिवाय संघाशी संबंधित अन्य संघटना जसे विद्या भारती, विश्‍व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम, सक्षम, आरोग्य भारती, भारत विकास परिषद आदी संस्थांसह अन्य संघटनांचे सेवा भारतीच्या माध्यमातून कार्य सुुरु आहे. यासर्व संस्थांची मिळून देशात एकूण १,५२,३८८ सेवा कार्ये संघाचे स्वयंसेवक करत आहेत.
संघाची सेवा कार्ये ही मुख्यत: चार विभागात केली जातात. यात शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि स्वावलंबन या चार प्रमुख मुद्यांवर सेवाकार्य आधारित असते. या शिवाय आणखी दोन विभाग म्हणजे ग्राम विकास आणि दूसरा गो सेवा हे होत. राष्ट्रीय सेवा भारती याबाबतीत माहिती, प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाचे कार्य करते. संघाच्या सेवा कार्यापैकी सर्वात जास्त म्हणजे ७८,६२७ प्रकल्प शिक्षण क्षेत्रात राबवले जात आहेत. त्या खालोखाल सामाजिक क्षेत्रात १७,०३९ प्रकल्प तर स्वावलंबन क्षेत्रात २२,४५० प्रकल्प सुरु असल्याचे सुहासजी हिरेमठ यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, संपुर्ण देशात सर्वसाधारणपणे सेवेच्या दृष्टीने तीन भाग करण्यात आले आहेत. यात एक म्हणजे नागरी क्षेत्र. म्हणजे नागरी क्षेत्रात वाड्‌या-वस्त्यांत हे काम चालते. दुसरे म्हणजे दुर्गम ग्रामीण क्षेत्र जेथे सुख-सुविधांचा आभाव आहे. आणि तिसरे आणि सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे वनवासी क्षेत्र. भारताच्या पुर्वोत्तर भागात सर्वात मोठे क्षेत्र जे दुर्गम ही आहे आणि वनवासी क्षेत्र पण आहे, केवळ याच भागात जवळजवळ ८००० सेवा कार्ये सुरु आहेत. सेवा कार्य करत असताना कोणाच्याही मत-पंथ, जात-पात, उच्च-कनिष्ठ याचा विचार केला जात नाही. कोणत्याही भेदभावाविना हे कार्य चालते. काही भागात मुसलमान तर काही भागात ख्रिश्‍चन मोठ्‌या संख्येने आहेत. पण कोणताही भेदभाव न करता सेवा कार्य केले जाते. पुर्वोत्तर भाग हा ख्रिश्‍चन बहूल आहे. या क्षेत्रात २०० छात्रावास सुरु आहेत यातून जवळजवळ ६००० विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेले आहे. मिझोराम, नागालँडमध्ये मुख्यत: ख्रिश्‍चन विद्यार्थी जास्त आहेत. पण संघाने कधीच्या त्यांच्या उपासना पद्धतीत दखल दिलेली नाही. जम्मू-काश्मिरमध्येही असे प्रकल्प चालतात तेथे मुसलमानांची संख्या जास्त आहे. प्रत्येक मताचे-पंथाचे लोक संघाशी जोडलेले आहेत.
रा.स्व.संघामध्ये सेवा ही नि:स्वार्थ भावानेने, कर्तव्य भावनेने, सेवा भावाने आणि पूजा भावाने केले जाणारे कार्य आहे, प्रत्येक जीवाला परमात्मा मानून सेवा केली जाते. ही सेवा करत असताना भीती दाखवून किंवा आमिष देऊन मत परिवर्तन करुन धर्मांतर करायला भाग पाडणे म्हणजे सेवा नव्हे. आमचे संघाचे स्वयंसेवक कधीच असली कामे करत नाहीत, असे सांगून सुहासजी हिरेमठ म्हणाले की, दूर्दैवाने देशाच्या पुर्वोत्तर भागात ख्रिश्‍चन मिशनरींचे मोठ्‌याप्रमाणात मदत करण्याच्या नावाखाली धर्मांतर करण्याचे काम सुरु आहे. इतकेच नाही तर लोकांमध्ये विघटनवाद रुजवण्याचा आणि पोसण्याचा प्रयत्नही केला जातोय. त्यामुळे जेव्हा संघाचे स्वयंसेवक तेथे सेवा कार्यासाठी पोहोचले तेव्हा सुुरुवातीला मोठ्‌या विरोधाचा सामना करावा लागला. दक्षिण भारतातही मोठ्‌याप्रमाणात ख्रिस्तीकरण झालेले आहे. अशा प्रभावित कन्याकुमारी जिल्ह्यात संघाची ६००० सेवाकार्य सुरु आहेत. सुरुवातीला मोठा विरोध झालेला असला तरीही संघाच्या सेवाकार्यांमुळे आता तेथे बदल घडून येतोय. नशामुक्ती, धर्मांतर मुक्ती, महिला सुरक्षा, आर्थिक उन्नती झालेली आता दिसून येतेय. मिशनरींचा विरोध करण्याऐवजी लोकांना जागृत करणे, त्यांच्या मनात आपला धर्म, संस्कृती आणि परंपरेबाबतीत श्रद्धाभाव जागृत करत गेल्यामुळे आता धर्मांतर बंद झाले आहे. तेथील समाज स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनत असल्याचे सुहासजी हिरेमठ यांनी सांगितले.
धर्मांतराच्या कार्यासाठी अमेरिका आणि युरोपमधील काही ख्रिश्‍चन संस्थांकडून मोठ्‌या प्रमाणात पैसा पुरवला जातोय. त्यामुळे आता सरकारने काही स्वयंसेवी संस्था(एनजीओ)वर बंदी आणली आहे. ‘फेरा’अंतर्गत अशा संस्थाचे बँक खाते बंद केलेले आहेत. काहीची खाती सील केलेली आहेत. येत्या काळात आणखीन प्रतिबंध आणणे अपेक्षित आहे. मागील काही दिवसांत काही वर्तमान पत्रात ख्रिश्‍चन मिशनरींना मिळणार्‍या मदतीचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यात वार्षिक ४० हजार कोटी ते ८० हजार कोटी रुपयांची मदत केल्याचा दावा वर्तमान पत्रात केला आहे. शिवाय लाखोंच्या संख्येने वालंटीयर कार्यरत आहेत.
राष्ट्रीय सेवा भारतीच्यावतीने सेवा संगमाचे आयोजन केले जात असल्याचे सांगून सुहासजी हिरेमठ म्हणाले की, सेवा संगमाच्या माध्यमातून संघाच्या सर्व छोट्‌यामोठ्‌या संस्था संघटीत करणे हा उद्देश आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून सेवासंस्थांचा गुणात्मक विकास होतो. दर ५ वर्षाला सेवा संगमाचे आयोजन केले जाते.
तरुणांना सेवाकार्याशी जोडण्याच्या दृष्टीने युथ फॉर सेवा नावाने दहा वर्षांपुर्वी कार्य सुरु केले आहे. पहिल्यांदा कर्नाटकात यांची सुरुवात झाली. यामाध्यमातून तरुणांना सेवा कार्यासाठी प्रेरित केले जाते, सध्या २००० युवक सेवा कार्य करत आहेत. कर्नाटक नंतर आता दिल्ली, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्रात युथ फॉर सेवाचे कार्य सुरु असल्याचे सुहासजी हिरेमठ म्हणाले.
विवेकानंद, राम कृष्ण परमहंस यांसह अन्य महापुरुषांच्या वचनानुसार पिडीतांची सेवा करणे म्हणजे देवाकडून मिळालेली संधी आहे. पिडीतांना देवाच्या रुपात पाहिलं पाहिजे. नर सेवा हिच नारायणाची सेवा आहे. जीव सेवा ही शिव भावनेने केली पाहिजे आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता सेवा केली पाहिजे, याच आपल्या प्राचीन हिंदू संस्कृतीच्या मुल्यांना धरुन संघाची सेवा अविरत सुरु राहिल असा विश्‍वास सुहासजी हिरेमठ यांनी व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22406

Posted by on May 4 2015. Filed under चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चौफेर : अमर पुराणिक, संवाद, स्तंभलेखक (76 of 125 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• राज्यपातळीवरील छोट्‌या पक्षांमुळे १९८९ पासून राज्यसभेत महत्त्वाच्या विधेयकांबाबत मोठे गतिरोध निर्माण झाले आणि ही एक मोठी ...

×