Home » संवाद » १६ मे नंतर

१६ मे नंतर

१६ मे नंतर – मे महिना देशाच्या घटनाक्रमात महत्त्वाचा राहात आला आहे. कारगिलचे युद्ध याच महिन्यात सुरू झाले होते, तर पोखरणच्या अणुचाचण्या १३ व १८ मे रोजी करण्यात आल्या होत्या. आता देशाचे नव्हे तर सार्‍या जगाचे लक्ष १६ तारखेला होणार्‍या मतमोजणीकडे लागले आहे. सोळाव्या लोकसभेची मतमोजणी १६ तारखेला सकाळी सुरू होईल आणि पहिल्या काही तासात या लोकसभेचे चित्र कसे असेल, याचा अंदाज येईल, तर सायंकाळपर्यंत नव्या लोकसभेचा चेहरा- मोहरा स्पष्ट होईल. नवी लोकसभा कशी असेल यावर उलटसुलट चर्चा होत आहे. देशात मोदी लाट आहे वा नाही या चर्चेचे उत्तरही या दिवशी मिळणार आहे. लाट असल्यास ती देशाच्या कोणत्या भागात प्रभावी असेल, कोणत्या राज्यात या लाटेचा काहीही परिणाम दिसणार नाही, हेही स्पष्ट होईल. या असणार्‍या वा नसणार्‍या लाटेतून लोकसभेत कोणते चित्र तयार होईल, याचा विचार केला जात असताना, तीन शक्यता वर्तविल्या जात आहेत.

चित्र पहिले

देशात मोदी लाट तयार होऊन भाजपाला २३० ते २५० च्या जवळपास जागा मिळणे ही पहिली शक्यता आहे. एका जनमत चाचणीने भाजपाला २३३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे, तर दिल्ली सट्टा बाजाराने भाजपा व मित्रपक्षांना ३१७ जागा मिळतील, असे म्हटले आहे. उत्तर भारतात दिल्ली, हापूर व अमृतसर या तीन ठिकाणी सट्टाबाजार अस्तित्वात आहे. यात हापूर व अमृतसर या ठिकाणी होणारे व्यवहार दिल्ली- मुंबईपेक्षा मोठे असतात. अमृतसर सट्टा बाजाराने भाजपाला २४७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तविला आहे, तर हापूर बाजारात भाजपाला २४० जागा दिल्या जात आहेत. देशभरात मोदी समर्थनाचे जे वातावरण तयार झाले आहे, सामान्य जनतेचा जो प्रतिसाद मिळत आहे. त्यातून लाटेची ही चर्चा सुरू झाली व नंतर जागांचा आकडा समोर आला. १९९८, १९९९ या दोन निवडणुकींत भाजपाला १८१ जागा मिळाल्या होत्या. त्यात आणखी ६०-७० जागांची भर पडल्यास भाजपाच्या २३०-२५० जागा होतात. या वाढीव जागा कुठून येतील? त्या मोदी लाटेमुळे येतील, असे भाजपा नेत्यांना वाटते. उत्तरप्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांत एकूण २७६ जागा आहेत. त्यातून भाजपाला १७५ जागा मिळू शकतात, असे काहींना वाटते. उर्वरित ६० ते ७० जागा इतर राज्यांमधून मिळतील. यात झारखंड, छत्तीसगड, दिल्ली, ओरिसा, आसाम, उत्तराखंड व पश्‍चिम बंगाल यांचा समावेश आहे. मोदींच्या विरोधात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाले आहे, असा एक तर्क देत भाजपाच्या जागा १८० च्या पुढे जाणार नाहीत, असे सांगितले जाते. मुस्लिम मतांचे काही ठिकाणी ध्रुवीकरण झाले असले तरी काही ठिकाणी मुस्लिम मतदार आम आदमी पक्षाकडे जात असल्याचे दिसून आले. हे दिल्लीत होताना दिसले. काही ठिकाणी मुस्लिम मतदारांचा उत्साह ओसरल्याचे दिसून आले. ही बाब मुंबईत दिसली. तेथे मुस्लिम प्रभावाच्या भागात सरासरीपेक्षा कमी मतदान झाले. मोदींच्या विरोधात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होण्याची जी शक्यता वर्तविली जात आहे, तसेच ध्रुवीकरण हिंदू समाजातही होत आहे. हे ध्रुवीकरण मुस्लिम समाजाएवढे मोठे नसेल, पण हिंदू लोकसंख्येचे प्रमाण पाहता हिंदू समाजात होणारे लहान ध्रुवीकरणही मुस्लिम समाजाच्या मोठ्या ध्रुवीकरणाला टक्कर देणारे ठरत आहेत. समाजाच्या वेगवेगळ्या घटकांचा मोदींना वेगेवगळ्या कारणाने पाठिंबा मिळत आहे. युवकांना मोदी विकासपुरुष वाटतात, काहींना ते हिंदुत्वाचे प्रतीक वाटतात, काहींना ते राष्ट्रवादी वाटतात. काहींना त्यांच्यात एक कणखर नेता दिसतो. या सर्वांच्या मिश्रणातून मोदी लाटेचे रसायन तयार झाले. भाजपाला मोठ्या यशाची जी आशा वाटत आहे त्याचा आधार म्हणजे ही मोदी लाट.

नवा अनुभव

देशातील जनता प्रथमच एका नेत्याला- मोदींना पंतप्रधान करण्याच्या इराद्याने मतदान करीत आहे. यात भाजपा दुय्यम ठरला आहे. भाजपाची मते मोदींसाठी एकवटली गेली आहेत. पण, भाजपासमर्थक नसणारेही मोदींसाठी भाजपाला मतदान करत आहेत. या लाटेत जाती-उपजाती या सार्‍या भिंती कोसळून पडतील, असे मानले जाते. प्रादेशिक पक्षांच्या प्रभुत्वालाही यात धक्का बसण्याचे संकेत आहेत. ‘दिल्लीत मोदी, ओरिसात नवीनबाबू’, ‘दिल्लीत मोदी, बंगालमध्ये ममतादीदी’, ‘दिल्लीत मोदी, लखनौत माया’ अशी एक समान मानसिकता देशात तयार झाल्याचे दिसून येत आहे. ही मानसिकता मतदारांच्या परिपक्वतेची परिचायक आहे. यात प्रादेशिक भावना जपत असतानाच देशासाठी एक बळकट- स्थिर सरकार निवडण्याची मतदारांची भावना दिसून येत आहे.

एनडीएची कमजोरी

१९९८ व १९९९ च्या तुलनेत यावेळी भाजपा आघाडीची कमजोरी म्हणजे मोदी लाट प्रभावी असली तरी त्या निवडणुकींच्या तुलनेत यावेळी भाजपाचे मित्रपक्ष कमजोर आहेत. १९९८- १९९९ च्या निवडणुकीत भाजपाचे मित्रपक्ष शक्तिशाली होते. बीजू जनता दल, तृणमूल कॉंग्रेस, अण्णाद्रमुक वा द्रमुक, जनता दल यू , शिवसेना, समता पार्टी या पक्षांनी जवळपास १२० जागा जिंकल्या होत्या. याने राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे संख्याबळ ३०० च्या आसपास पोहोचले होते. यावेळी भाजपाचे मित्रपक्ष फक्त ४०-४५ जागा भाजपाच्या झोळीत टाकू शकतात. लोक जनशक्तीपक्ष, शिवसेना, तेलगू देसम, तामिळनाडूतील आघाडी या पक्षांना मिळणार्‍या जागा विचारात घेता भाजपाच्या मित्रपक्षांना ४० जागा मिळतील. मित्रपक्षांच्या संख्येतील ही घट भाजपाला स्वत: भरून काढावी लागेल. याचाच अर्थ भाजपाला १९९९ च्या तुलनेत ५०-६० जागा जादा मिळवाव्या लागतील. मोदी लाटेत त्या मिळण्याची शक्यता तयार झाली आहे. तसे झाल्यास वाजपेयी सरकारच्या तुलनेत मोदी सरकार अधिक स्थिर असेल. कारण, ते मित्रपक्षांवर कमी अवलंबून असेल. भाजपा -२४०, मित्रपक्ष -४० याव्यतिरिक्त तेलंगणा राष्ट्रीय समिती, हरयाणातील लोक दल, वायएसआर कॉंग्रेस यांना मिळणार्‍या जागाही भाजपाच्या हिशेबी जमा होतील. म्हणजे भाजपा व मित्र पक्ष यांना ५४३ सदस्यांच्या लोकसभेत ३०० चा आकडा पार करता येईल. निकालानंतर पूर्वोत्तर भागातील लहान लहान पक्षांचे खासदार भाजपाला पाठिंबा देतील. या पक्षांची कोणत्याही पक्षाशी बांधीलकी नसते, केंद्रात जे सरकार येईल त्याला ते आपला पाठिंबा देत असतात. याने मोदी सरकारला भक्कम स्थैर्य येईल.

चित्र दुसरे

भाजपाने २०० चा आकडा जेमतेम गाठणे, ही दुसरी शक्यता आहे. मित्रपक्षांचे संख्याबळ विचारता घेता भाजपाचे संख्याबळ २४० ते २५० जाऊ शकते. या स्थितीत आणखी काही पक्ष मोदी सरकारला पाठिंबा देऊ शकतात. यात पहिले नाव आहे तेलंगणातील तेलंगणा राष्ट्र समिती. दुसरा पक्ष आहे जगनमोहन रेड्डींची वायएसआर कॉंग्रेस. तामिळनाडूतील अण्णाद्रमुक वा द्रमुक या दोनपैकी एक पक्ष मोदी सरकारला पाठिंबा देऊ शकतो. तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्ष भाजपाशी निवडणूक समझोता करील, असे मानले जात होते. भाजपाने मोदींऐवजी अन्य कुणाला नेता घोषित केल्यास जयललिता भाजपासोबत जाणार नाहीत. मात्र, मोदींना नेता घोषित केल्यास त्या भाजपाशी युती करतील, असे त्यांच्या पक्षातूनच सांगितले जात होते. मात्र, जयललितांनी भाजपाशी युती केली नाही. डाव्या पक्षांसोबत त्यांनी युती करण्याची घोषणा केली आणि प्रत्यक्षात त्यांच्यासाठी एकही जागा न सोडता सर्व जागांसाठी जयललितांनी आपले उमेदवार घोषित केले. त्या भाजपाशी जागावाटप करतील असा एक अंदाज होता. तेही झाले नाही. मुस्लिम मतांमुळे त्यांनी भाजपाशी जागावाटप केले नाही, असे सांगितले जात असले, तरी ज्या लहरीपणासाठी त्या ओळखल्या जातात, त्यांची तीच कार्यशैली आजही कायम असल्याचे यावेळी पुन्हा दिसून आले. निवडणुकीनंतर जयललिता हमखास भाजपाला पाठिंबा देतील, असे अण्णाद्रमुकचे नेते सांगत आहेत. जयललितांचा आजवरचा इतिहास बेभरवशाचा आहे, राजकीय सौदेबाजीचा आहे. त्या तुलनेत द्रमुक हा अधिक स्थिर, विश्‍वासू राजकीय सहकारी मानला जातो. पण, स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे या पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे. आज अण्णाद्रमुक व द्रमुक हे दोन्ही पक्ष भाजपासोबत नसले, तरी निवडणुकीनंतर एक पक्ष भाजपासोबत येईल. याचा अर्थ निवडणुकीनंतर तेलंगणा राष्ट्र समिती, जगनमोहन रेड्डींचा पक्ष, अण्णाद्रमुक वा द्रमुक, हरयाणातील लोकदल असे काही पक्ष मोदी सरकारला पाठिंबा देतील व मोदी सरकार बहुमतात जाऊन पोहाचेल. मात्र, असे सरकार फार स्थिर राहणार नाही. यात जमेची बाजू म्हणजे कॉंग्रेस १२५ च्या खाली आलेली असेल. म्हणजे कॉंग्रेसकडून सरकारला धोका नसेल. पण, सरकारमध्ये स्थैर्य नसेल.

तिसरे चित्र

मतमोजणीत निर्माण होणाते तिसरे चित्र भाजपा १८० जागांवरच थांबणे हे आहे. त्या स्थितीत निवडणूकपूर्व मित्रपक्ष व निवडणुकीनंतरचे मित्रपक्ष यांना विचारात घेता भाजपा २५० पेक्षा पुढे जात नाही. देशात अल्पमताचे सरकार गठित करण्याची परंपरा नसली, तरी १९९१ मध्ये सत्तेवर आलेल्या नरसिंहराव सरकारजवळ स्पष्ट बहुमत नव्हते, हा इतिहास आहे. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला २२५ जागा मिळाल्या होत्या. लोकसभेत होणार्‍या प्रत्येक शक्तिपरीक्षणात कम्युनिस्ट पक्ष लोकसभेतून सभात्याग करीत सरकारला वाचवीत होता. मात्र, असे भाग्य भाजपाला मिळणार नाही. १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयींचे सरकार एका मताने पराभूत झाले होते. अशा स्थितीत मोदी अल्पमताचे सरकार स्थापन करतील, असे वाटत नाही. दुसरा पर्याय तृणमूल कॉंग्रेस, बीजू जनता दल यासारखे पक्ष मग किंगमेकरच्या भूमिकेत असतील. मात्र, ते मोदी यांना पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. भाजपाने नेता बदलल्यास हे पक्ष भाजपा सरकारला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. यात आणखी काही पक्षांचा पाठिंबा भाजपाला मिळू शकेल. मात्र, भाजपा असे करण्याची शक्यता कमी आहे. भाजपाने असे करता कामा नये. मोदींच्या नावाने मत मागून ऐनवेळी अन्य कुणाला पंतप्रधान करणे जनता व पक्ष कार्यकर्त्यांर्ंंंशी विश्‍वासघात करणारे ठरेल. सत्तेसाठी हपापलेला पक्ष अशी पक्षाची प्रतिमा तयार होईल. त्या स्थितीत भाजपाने विरोधी बाकावर बसणे योग्य ठरेल. कॉंग्रेस पक्ष सध्या याच व्यूहरचनेवर काम करीत आहे. भाजपाला १८० जागा मिळतील हे कॉंग्रेसने मान्य केले आहे. मात्र, मित्रपक्षांचा पाठिंबा मिळूनही केंद्रात मोदींचे सरकार स्थापन होणार नाही. मग, उर्वरित ३०० खासदारांनी केंद्रात नवे सरकार करावे, असे प्रयत्न पक्षातून केले जात आहेत. मोदी रोको हा या प्रयत्नांचा मुख्य उद्देश आहे. याचा फायदा भाजपाला मिळेल. तिसरी आघाडी, चवथी आघाडी असे सरकार चालणार नाही, ते टिकणार नाही. १९९६ मध्ये कॉंग्रेसने असाच प्रयोग केला होता. प्रथम देवेगौडा व नंतर इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून त्याला बाहेरून पाठिंबा दिला होता. कॉंग्रेसने पुन्हा असा प्रयत्न केल्यास त्याचा मोदी व भाजपाला फायदाच होईल. यासाठी भाजपाला वर्ष-दीड वर्ष विरोधी बाकावर बसावे लागेल, जे भाजपाने केले पाहिजे. यात महत्त्वाची बाब म्हणजे वय मोदींच्या बाजूने आहे. मोदी ६३ वर्षांचे आहेत. वर्ष-दीड वर्ष थांबणे मोदींना-भाजपाला जड जाणार नाही. आज कॉंग्रेस व गैरभाजपा गोटात ही तिसरी शक्यता प्रबळ मानली जात आहे. देशात कोणतीही लाट नाही, केंद्रात भाजपाचे सरकार येऊ शकते, मोदींचे सरकार येणे नाही, असे या गोटातून ठामपणे सांगितले जात आहे. ममता, जयललिता, बीजू जनता दल, सपा, बसपा हे पक्ष मोदींना पाठिंबा देणार नाहीत. म्हणजे त्यांचे सरकार गठित होण्याचा प्रश्‍न नाही, असे या पक्षांना व कॉंग्रेसला वाटते. कॉंग्रेसला किमान १२५ जागा मिळतील. सपा-बसपा, द्रमुक- अण्णाद्रमुक यांना ८० जागा मिळतात. ममता-नवीन पटनायक, डावे पक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय लोकदल या पक्षांना १०० जागा मिळतील. या सर्व खासदारांची संख्या ३०० हून अधिक होते. लाट! दुसरीकडे भाजपा गोटात, मोदी लाट पक्षाला सत्तेच्या दालनात नेईल असे वाटते. देशात मोदी लाट आहे यात शंकाच नाही. मात्र, ही लाट पक्षाला किती जागा मिळवून देते हे मतमोजणीत दिसणार आहे. लाटेचा अंदाज कधीच बांधता येत नाही, हा इतिहास आहे. १९७७ च्या लाटेचा अंदाज करता आला नाही, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या लाटेचा अंदाज करता आला नाही, दिल्लीत आम आदमी पक्षाची लाट आली, त्याचाही अंदाज करता आला नाही. मोदी लाट कशी असेल, केवढी असेल हेही सांगता येत नाही. लाट म्हणजे नेमके काय? एक नेता म्हणाला, जी येऊन गेल्यावर कळते, ती खरी लाट!

– रवींद्र दाणी, नवी दिल्ली

Short URL: https://vrittabharati.in/?p=13464

Posted by on May 12 2014. Filed under संवाद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in संवाद (94 of 112 articles)


=धनंजय केळकर= भाग : २ शाळेतल्या इतिहासाच्या पुस्तकात चांगल्या राजाचे वर्णन नेहमी एकच असायचे. "त्याने रस्ते बांधले, विहिरी खणल्या, दवाखाने ...

×