कमीपणा कशासाठी?

 •चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

व्यक्तिमत्व स्त्रीचं – भाग : ९
MRINAL PERSONALITY ARTICLE9मला आठवतं, मी लॉ कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना वर्गात नेहमी शेवटून दुसऱ्या बेंचवर बसायचे. (शेवटच्या नाही, कारण शेवटच्या बेंचवर लेक्चर चालू असताना पळून जाणारे विद्यार्थी बसायचे) तर मी मागे बसण्याचे कारण हे की शिक्षकांनी मला काही प्रश्न विचारू नयेत. मोठया वर्गात शक्यतो पुढे बसलेल्या मुलांना प्रश्न विचारले जातात. मला भीती ही होती की मला जास्त इंग्लिश बोलता यायचे नाही, त्यामुळे मग आपल्याला प्रश्न विचारला तर उत्तर कसे द्यायचे? बाकीची मुलं-मुली माझे तोडके-मोडके इंग्लिश ऐकून हसतील का? अशी भीती वाटायची. माझे शिक्षण लहान गावात आणि मराठी माध्यमातून झालेले… माझ्यासारखे अनेक विद्यार्थी होते वर्गात जे याच भीतीपोटी मागे बसायचे आणि खूप कमी बोलायचे. अर्थात मी त्यावर एक सोपा उपाय शोधला होता नंतर, की आपल्याला प्रश्न विचारला तर पटकन उत्तर वहीच्या मागच्या पानावर लिहायचे आणि ते वाचून दाखवायचे, त्यामुळे चुका कमी होतील.
तर, आजही माझ्या सारख्याच अनेक मैत्रिणी आहेत की ज्या लहान गावातून मोठ्या शहरात शिकायला येतात, नवीन मोठे शहर, वेगळी भाषा, वेगळे वातावरण, यामुळे बुजून जातात. आणि कधी कधी या सगळ्याचा सराव जरी झाला तरी त्या बुजरेपणातून बाहेर येत नाहीत आणि मग एक प्रकारचा कमीपणा वाटू लागतो, की आपण लहान गावातून आलोय, आपल्याला सफाईदार इंग्लिश नाही बोलता येत, शहरातल्या मुला-मुलींसारखे स्मार्ट वागता येत नाही. या सगळ्याचा परिणाम हळू हळू अभ्यासावर आणि आत्मविश्वासावर देखील होतो. त्यामुळे बोलताना हाताला कंप सुटतो, घाम फुटतो, अडखळायला होतं, आणि आत्मविश्वास आणखीनच कमी होतो.
मी या सगळ्यामध्ये दिसणे किंवा रंग-रूप हा भाग बोलू अथवा चर्चा करू इच्छित नाही. कारण तो आपल्या हातात नसते काही अंशी आणि त्यावर पुन्हा कधीतरी लिहीनच. आज मला बोलणं आणि वागणं यामुळे जो न्यूनगंड येतो त्याबद्दल बोलायचे आहे. मी प्राध्यापिका म्हणून अनेक वर्ष काम करतेय. माझ्याकडे अनेक प्रकारची उदाहरणे आहेत, की ज्यात मुला-मुलींचं गैरहजर राहणे हा मुख्य प्रॉब्लेम असायचा. मग त्यांना नुसता रागावून प्रॉब्लेम सुटत नाही, म्हणून कित्येकदा विश्वासात घेवून, आपुलकीने विचारल्यावर निम्म्या मुलांनी सुरुवातीच्या दिवसात हे कारण सांगितले, की शिक्षक वर्गात इंग्लिशमधूनच बोलतात, प्रश्न विचारतात आणि आम्हाला इंग्लिशमध्ये उत्तर देता येत नाही… मग शिक्षा म्हणून वर्गाबाहेर जाण्यापेक्षा आम्ही तासालाच बसत नाही! म्हंटल, अरे हा काय उपाय आहे का? त्यावर मुले म्हणाली की मग बाकीचे आम्हाला हसतात. मग मी यावर विचार करून उपाय करायला सुरुवात केली. जसे की मागे बसलेल्या मुलांना प्रश्न विचारणे, त्यांना ज्या भाषेत सोपे वाटेल त्यात सुरुवातीला उत्तर द्यायला लावणे, ज्याला इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचं आहे त्याला आपण अडेल तिथे शब्द सांगून मदत करणे… आणि याचा खूप उपयोग झाला. सुरुवातीला बेंचला धरून अडखळत, घाम पुसत बोलणारी मुले नंतर हसऱ्या चेहेऱ्याने उत्तर देवू लागतात, चुकत-माकत का होईना प्रयत्नपुर्वक इंग्लिश बोलू लागतात. अनेक मुलांनी मला सांगितल की आम्हाला आता वाटते की आपण पुढे बसावे, तुम्ही प्रश्न विचारावे आम्हाला आणि आम्ही इंग्लिशमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करू!
सांगण्याचा मुद्दा हा की, आपल्याला इंग्लिश सफाईदारपणे बोलता येत नाही, याचा अनेक मुला-मुलींना कमीपणा वाटतो. त्यामुळे ते सर्वांमध्ये मिसळायला घाबरतात, कचरतात. त्यांच्या सारखाच कमीपण वाटणाऱ्या मुलांचा ग्रुप बनवतात आणि पर्यायाने कमीपणा कमी होतो पण प्रगती होत नाही! जेंव्हा नोकरी शोधायची वेळ येते तेंव्हा पुन्हा त्या कमीपणाची प्रकर्षाने जाणीव होते आणि पुन्हा एकदा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. माझ्याकडे नोकरीविषयक सल्ला मागायला येणारी कित्येक मुलं-मुली दिसायला अतिशय सुंदर, स्मार्ट असतात पण याच न्यूनगंडामुळे अनेक ठिकाणी इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्ट झाले होते व आत्मविश्वास गमावून निराश झाले होते. इंटरव्ह्यूमध्ये विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर येत असले तरी सफाईदार इंग्लिशमध्ये न सांगता आल्यामुळे चेहेरा पडतो, मग घाम येतो, चलबिचल होते, हातांची चुळबुळ सुरु होते… ही देहबोली तुमची अस्वस्थ अवस्था दर्शवते. ज्याचे मूळ कारण मुळातच स्वतःबद्दल वाटत असणारा कमीपणा आहे, न्यूनगंड आहे. यामुळे मग इंटरव्ह्यू होण्याआधीच इंटरव्ह्यूचे अतोनात टेन्शन येते आणि इंटरव्यू चांगला होण्याची शक्यताही कमी होते. मग त्यांना हळू-हळू आता तरी इंग्लिश सुधारण्यासाठी प्रयत्न करा आणि केवळ ते एक येत नाही म्हणून बाकीच्या गोष्टीमधील असलेला आत्मविश्वास गमावू नका!, असा सल्ला मी देते आणि खूप सोप्या-सोप्या इंग्लिश सुधारायच्या टिप्स देते जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास थोडा वाढेल. आज इंग्लिश भाषेला पर्याय नाही. मग ती शिकण्यासाठी थोडे कष्ट घ्यावे लागतील, पण ती भाषा न आल्यामुळे आपण टाकावू होत नाही. इंग्लिश सफाईदारपणे बोलता यावं, लिहिता यावं यासाठी प्रयत्न करणे नक्कीच आपल्या हातात आहे.
एक लक्षात घ्या, की आपण जन्मतः सर्वज्ञानी नसतो. हळू-हळू शिकतच असतो, आयुष्यभर. कधी परिस्थितीमुळे, कधी आळसामुळे, कधी गैरसोयीमुळे आपल्याला काही गोष्टी लवकर आत्मसात होत नाहीत. त्यामुळे, त्याचा कमीपणा वाटून घेण्याचे कारण नाही! कमीपणा वाटून घेण्यामुळे हळू-हळू त्याचे रुपांतर न्युनगंडामध्ये होते. आपला आत्मविश्वास डळमळतो आणि मग आपण समाजामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये मिसळताना सहजपणे मिसळू शकत नाही आणि परिणामतः त्याचा आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये मोठाच अडथळा येतो. म्हणूनच, प्रथम मनातून हे काढून टाका, की आपल्यात कमतरता आहे! एखादी गोष्ट सहजपणे न आल्यामुळे कमीपणा वाटून घेणं सोडून द्या!! हळू-हळू प्रयत्न करा आणि ती गोष्ट साध्य करायचा प्रयत्न करा. मनामध्ये स्वतःला कमी समजणे हा उपाय नव्हे. तर तो कमीपणा कशामुळे आलाय ते लक्षात घेवून त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करण्यात खरा शहाणपणा आहे.
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापनही करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=22034

Posted by on Apr 14 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

1 Comment for “कमीपणा कशासाठी?”

  1. मला इथे स्वतःचा एक अनुभव सांगावासा वाटतो, माझेही शिक्षण लहान गावात झाले. पुढे शिक्षणासाठी मोठ्या शहरात गेल्यावर मी वसतिगृहात राहावयास लागले. कॉलेज आणि वसतिगृहात अनेक प्रकारचे मित्र मैत्रिणी मिळाल्या. त्यांच्या बरोबर बोलताना जाणवले कि आपली इंग्रजी भाषा सुधारणे गरजेचे आहे. सुट्टीमध्ये गावी गेल्यावर थोडे दिवस इंग्रजी भाषेचा क्लास लावला. त्या मँडमनी माझ्या मध्ये आत्मविश्वास निर्माण केला, रोजच्या वापरातील मराठी शब्दांचे इंग्रजी अर्थ सांगितले. त्याच बरोबर रोज इंग्रजी वृतपत्र वाचायची सवय लावली. नुसते वाचायचे नाही तर जिथे अडेल तिथे, त्या शब्दाचा अर्थ माहित करून घ्यायचा. अर्थात इंग्रजी वृतपत्र वाचायची सवय मला माझ्या आई वडिलांनी लहान पानापासून लावली होती, पण आता मी सोप्या इंग्रजीतील पुस्तके पण वाचायला सुरु केले. या सर्वांचा फायदा मला आज भारताबाहेर नोकरी करताना झाला. माझ्या कार्यालयातील खूप सहकारी ब्रिटीश आहेत. पण आज त्यांच्या बरोबर बोलताना मला कुठे हि कमीपणाची भावना वाटत नाही. तसेच मी इथे रेडीओवर पण काहि कार्यक्रम केले. मी असे म्हणत नाही कि हे सगळे सोपे आहे किवा मला सर्व काही कळते, पण इच्छा असेल तर सगळे शक्य आहे. फक्त स्वता:वर विश्वास ठेवा आणि मेहनत करताना मागे हातू नका.

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, सखी, स्तंभलेखक (79 of 120 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• बहूसंख्या नागरिक आणि विशेषत: शेतकरी भूमी अधिग्रहण विधेयकाचे महत्त्व जाणून आहेत. पण ही स्वयंघोषीत विद्वानमंडळी भूमी ...

×