मी कोण आहे?

॥ बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर |
| www.beejconsultancy.com |

मुद्दा आहे ‘आपलं आयुष्याचं ध्येय काय’ हे ठरवण्याचा. ‘मला काय करायचंय’ हे ठरवण्यापूर्वी ‘मी कोण आहे?’ हे उत्तर शोधणं आवश्यक आहे. अध्यात्मात काय किंवा व्यवसायात काय, या प्रश्‍नाचं उत्तर शोधता आलं नाही तर बस चुकलीच म्हणून समजा! ‘मी कोण आहे?’ हा काही आध्यात्मिक प्रश्‍न नव्हे आणि जरी प्रश्‍न आध्यात्मिक असला तरी उत्तर व्यावहारिकच द्यावं लागतं.

Who Am I

Who Am I

शाळेत असताना फार थोड्या लोकांना ‘मी कोण होणार?’ याचं उत्तर मिळतं. माझ्यासारखे अनेक लोक तर शाळेत, कॉलेजमध्ये दरवर्षी वेगवेगळं उत्तर देतात. ज्यांचं ‘मी कोण होणार’ हे पक्कं ठरलेलं असतं, त्यांच्यामध्ये दोन प्रकार असतात. एक तर त्यांना लहानपणीच कमालीची स्पष्टता असते. (अशा लोकांना कोपरापासून दंडवत!) आणि दुसरे प्रवाहाबरोबर पोहतात, अनुकरण करतात आणि आपल्याला काय येतं यापेक्षा आपल्याला काय करायला हवं याचा विचार करतात. म्हणजे माझ्या ओळखीत लहानपणी रक्त पाहिल्यावर गरगरणारे लोक पुढे स्वतःच्या मनावर ताबा वगैरे मिळवून डॉक्टर झालेत! हे ते कसं जमवतात ते त्यांचं त्यांनाच माहीत! पण माझं निरीक्षण असं आहे की, हे दुसर्‍या पद्धतीचे लोक आपल्या नोकरी-व्यवसायाला लवकर कंटाळतात. असो. तर मुद्दा आहे ‘आपलं आयुष्याचं ध्येय काय’ हे ठरवण्याचा.
‘मला काय करायचंय’ हे ठरवण्यापूर्वी ‘मी कोण आहे?’ हे उत्तर शोधणं आवश्यक आहे. अध्यात्मात काय किंवा व्यवसायात काय, या प्रश्‍नाचं उत्तर शोधता आलं नाही तर बस चुकलीच म्हणून समजा!
‘मी कोण आहे?’ हा काही आध्यात्मिक प्रश्‍न नव्हे आणि जरी प्रश्‍न आध्यात्मिक असला तरी उत्तर व्यावहारिकच द्यावं लागतं. काही वर्षांपूर्वी बचतगटाच्या महिलांसमवेत बोलताना ‘स्वतःला ओळखा’ अशी छोटी चाचणी आम्ही घेतली होती. प्रश्‍न अगदी साधे होते. तुमचं वय, शिक्षण, छंद, आवडीनिवडी, विचार करण्याच्या पद्धती ओळखण्यासाठी २/४ प्रश्‍न वगैरे वगैरे. तर एक महिला नंतर येऊन आम्हाला म्हणाली, ‘काहीही काम द्या पण स्वयंपाकाचं नको.’ मी विचारलं, ‘का हो, घरी खूप काम असल्यामुळे म्हणता का? तुमचं मोठं कुटुंब वगैरे आहे का?’ तर ती म्हणाली, ‘नाही! पण मला स्वयंपाक करायला आवडत नाही. रोजचा मी करते पण उत्पन्नाचं साधन म्हणून परत हाच विषय नको.’ मला वाटलं हिची गाडी स्त्रीमुक्ती विषयाकडे वळते का काय? पण तिच्या नजरेतला ठामपणा मला काहीतरी सांगत होता. ती असं का म्हणाली हा विषय आपण इथेच सोडून देऊ. पण, ती ठामपणे स्वतःला ओळखू शकली हे आमच्यासाठी यश होतं.
आपण स्वतःला नीट ओळखलं तर आपण हाती घेतलेलं काम उत्तम पार पाडू शकतो व आपण ठरवलेलं ध्येय उत्तमरित्या साध्य करू शकतो. मुळात ‘ध्येय ठरवणं’ हे आपल्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खूप आवश्यक आहे. काहीतरी वाटतंय पण काय करू हे समजत नाही या संभ्रमावस्थेत अनेक लोक बराच काळ तरंगत राहतात. याउलट आपल्याला काहीतरी करायचंय म्हणजे नेमकं काय हे जर आपलं आपण वेळ घेऊन शोधू शकलो तर आपल्याला रस्ता दिसायला सुरुवात होते.
आपल्याला काय येतं आणि आपण काय करू शकतो हा काही सोपा विषय नाहीच पण ढोबळमानाने आपल्याला हे शोधता येतं.
आपल्याला जे छान येतं, त्याचं आपल्याला सोनं करता येऊ शकतं हे ‘तारें जमीन पर’ चित्रपटात सांगितलं आहे! उद्योग किंवा व्यवसाय करायचा असेल, तर मुख्यतः आपल्याला उद्योगाची संधी ओळखता यायला हवी. तीच उद्योजक होण्याची ठळक खूण असते. नोटाबंदीच्या काळात पेटी झरूीां आणि उहळश्रश्ररी सारखे अ‍ॅप ज्यांनी शोधून काढले, त्यांनी अशा अडचणीमध्ये स्वतःला उद्योजकतेची संधी कशी शोधता येते हे उत्तमरित्या सिद्ध केलं आहे. अगदी साधं उदाहरण घेऊ. डोंबिवलीसारख्या उपनगरात राहून ज्या महिला दररोज किमान १ तास प्रवास करून घरी परत येतात, त्यांचा वेळ वाचावा म्हणून महाराष्ट्रात ‘घरगुती पोळी-भाजी केंद्र’ प्रथमतः सुरू झाली. ज्यांनी कुणी पहिल्यांदा हे सुरू केलं त्यांनी दोन गोष्टींचा विचार केला. बाजारपेठेमध्ये नेमकी कसल्या गोष्टीची कमतरता आहे आणि माझ्यातले कोणते गुण ही पोकळी भरून काढू शकतात, बस्स, हे समजलं की झाला उद्योग सुरू! आज एक-दोन नव्हे तर अशी शेकडो, हजारो केंद्रं शहरांमध्ये उघडलेली दिसतात. ही या उद्योगाची लाटच सुरू झाली. जो अशी आर्थिक संधी शोधू शकतो, त्यावर काहीतरी सृजनशील विचार करू शकतो, ज्याची मेहनत घेण्याची तयारी आहे, त्याला उद्योजकतेचा रस्ता पकडायला हरकत नाही.
पुणे जिल्ह्यात माझ्या एका मैत्रिणीच्या सासूने खेडेगावातील बाजारपेठेची गरज अभिनवरित्या जोखली. खेड्यातील बाजारात माणसं १००/२०० रुपये घेऊन गेले तर जास्तीत जास्त वस्तू आणण्याचा प्रयत्न करतात. पण काही वस्तू महाग असल्याने खूप घेणं शक्य नसतं. पण अशा वेळी ५/१० रुपयाच्याही पाकिटामध्ये या गोष्टी उपलब्ध असतील तर लोक त्या घेतात, असा अभ्यास करून पट्टी पॅकिंगचे प्रॉडक्टस् जुन्नरला विकायला सुरुवात केली. वेलदोडे, लवंग अशा मसाल्याच्या पदार्थांपासून दैनंदिन व्यवहारात लागणार्‍या किमान ५०० वस्तू त्यांनी ५/१० क्वचित २ ही रुपयाच्या पाकिटात विकायला सुरुवात केली. गेली २० वर्षं हा व्यवसाय उत्तमरित्या सुरू आहेच त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्यांनी ह्या उद्योगांची लाट सुरू केली…
उद्योगाची सोपी व्याख्या काय आहे?
उद्योग म्हणजे स्वतःचा रोजगार स्वतः शोधणं. तसं तर नोकरीसुद्धा आपली आपल्याला मिळवावी लागते. पण मग नोकरी आणि उद्योग यामध्ये काय फरक आहे. उद्योजक स्वतःतील प्रेरणा जागृत करतो आणि उद्योगासाठी संधी शोधतो. त्यासाठी नवनवीन कल्पना विकसित करतो. इतरांना बरोबर घेऊन त्या उद्योगाचे नेतृत्व करतो, त्यातील आर्थिक व्यवहार हाताळतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्या उद्योगाची ‘मालकी’ मिळवतो.
‘मी कोण आहे’ म्हणजे मी उद्योजक होऊ शकतो का या प्रश्‍नाचे उत्तर देताना, या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. स्वतःचा अभ्यास करताना तुमच्या आसपासच्या लोकांचं निरीक्षण करा. उद्योजक म्हणून त्यांचं स्थान लक्षात घ्या. त्यांच्या कोणत्या गुणांच्या जीवावर ते उद्योजक होऊ शकलेत याचा मनोमन अभ्यास करा. ‘नोकरीचा कंटाळा आला’ किंवा ‘बॉस वाईट आहे’ ही नोकरी सोडून उद्योग करण्याची प्रेरणा असू शकत नाही. त्यापेक्षा उद्योगाचा आपण नीट अभ्यास केला आहे ना ते तपासा. आपण संधी ओळखू शकतो का? एखादे उत्पादन तयार करताना त्याच्या तांत्रिक बाबी नीट हाताळू शकतो ना याची खात्री तपासा. संवादकौशल्य कमी तर नाही पडत ते पहा. व्यवसायामध्ये लागणारी नियोजनाची तत्त्वे आर्थिक जोखमीशी निगडीत असतात, ती आपल्यात आहेत ना ते पहा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, काहीही झालं तरी आपला आत्मविश्‍वास डळमळीत नाही ना होत हे परत परत तपासा. या सगळ्यामधल्या काही गोष्टी कमी-जास्त प्रमाणात आपल्यात असतील, पण त्या आपल्यामध्ये थोड्याफार असायलाच हव्यात.
सहज गंमत म्हणून एक गोष्ट करा. स्वतःशी एक खेळ खेळून पहा. ‘आपल्याला जगायला फक्त एक वर्ष आहे’ असं जर यमाने आपल्याला कानात सांगितलं तर, आपण काय म्हणून जगू आणि काय म्हणून मरू असा विचार करा? बघा तुमचं तुम्हाला उत्तर सापडेल. पैसे किती मिळतील हा विचार न करता मला काय केलं की सगळ्यात छान वाटेल, अशा करियरचा विचार करा. त्या गोष्टी कागदावर मांडा. काय करायला आवडेल, कसं करू शकू? आत्ता काय अडचणी आहेत आणि मात कशी करणार? हे तुम्ही एकदा यमाच्या भीतीने करून बघाच! २-३ दिवस विचार करून तुमचा रस्ता, तुमच्या क्षमता, तुमची कमकुवत स्थानं सगळं काही तुम्हाला सापडेल! आणि हे एकदा सापडलं की यमाची चिंता करायलाच नको!
। dhanashree.bedekar@gmail.com | रविवार, दि. ०४ डिसेंबर २०१६

साभार – सोलापूर तरुण भारत. www.tarunbharat.org

Short URL: https://vrittabharati.in/?p=35546

Posted by on Jan 26 2019. Filed under बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर, सखी, स्तंभलेखक (1 of 111 articles)

Communation
॥ बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर | | www.beejconsultancy.com | ‘भांडवल’ हे खरोखरंच फक्त ‘पैसा’ असतं का? नीट विचार केल्यावर जाणवतं ...

×