Home » सखी » सूर्यथाळी

सूर्यथाळी

भगवान श्रीकृष्णाने, प्रिय भगिनी द्रौपदीला सूर्यथाळी दिल्याचे आपण श्रीकृष्णचरित्रात वाचतो. हीच थाळी आपल्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सादर केली आहे. आपण त्याविषयी माहिती घेऊ या…
आपल्या देशात जवळजवळ नऊ महिने चांगले ऊन तापते. या उन्हाच्या साह्यानेच ही थाळी (सूर्यचूल) आपल्यासाठी एक वरदान ठरली आहे.
या थाळीचे फायदे अनेक आहेत ते असे-
१) गॅस, रॉकेल, वीज व सरपणाची बचत होते.
२) सर्वत्र उपलब्ध होऊ शकते.
३) प्रदूषणरहित.
४) वापरण्यास सोपी.
५) अपघाताचा धोका नाही.
६) गृहिणीचा वेळ वाचवणारी.
७) गृहिणीचे कष्ट वाचवणारी.
८) शिक्षित-अशिक्षित अशा कोणत्याही व्यक्तीने वापरता येण्याजोगी.
९) स्वस्त आणि मस्त.
तसेच या थाळीचे उपयोगदेखील अनेक आहेत. जसे-
१) सर्व तर्‍हेचा भात उत्तम शिजतो.
२) तुरीचे वरण उत्तम शिजण्यासाठी डाळ भिजवून घ्यावी किंवा डाळीत गरम पाणी घालावे.
३) बटाटे, कैर्‍या, भुईमुगाच्या शेंगा, गवार, वाल, चवळी, श्रावण घेवडा, तुरीच्या शेंगा इत्यादी भाजीच्या शेंगा उकडवून फोडणी घातल्यास भाजी उत्तम होते. फक्त फ्लॉवर यात शिजवू नये, लचका होतो.
४) सर्व प्रकारचे कडधान्य उत्तम शिजते.
५) भाजणे-भाजणी : सातू, मेतकूट, शेंगदाणे, रवा, पोहे, कांद्याचे काप इत्यादी प्रकार उत्तम प्रकारे भाजले जातात.
६) लाडूसाठी तुपात रवा/बेसन घालून ठेवणे, केक, ढोकळा, साबुदाणा, शेंगदाणे, भगर, शिंगाडे, मसाल्याचे सामान व्यवस्थित भाजले जाते. मिरची व हळकुंडदेखील चांगले गरम होतात, पण थोडा रंग बदलतो.
७) बासुंदीसाठी दूध आटवता येते.
८) इडलीही छान होते, पण डब्यात केल्यामुळे चौकोन कापून घ्यावे लागतात.
(इडली, ढोकळा करताना जास्त वेळ ठेवल्यास कोरडा होतो व खाताना त्रास होतो. तेव्हा गृहिणींनी वेळेचा अंदाज घ्यावा.)
न होणार्‍या गोष्टी-
१) सर्व तर्‍हेचे तळण व परतवून करावयाच्या भाज्या, मेथी, पातीचे कांदे, झुणका, पोळ्या, भाकरी इत्यादी. पण, वसतिगृहांसाठी मोठ्या प्रमाणात पोळ्या व भाकरी करताना मी स्वत: पाहिले आहे. उलट्या उघड्या छत्रीसारखे काच लावलेल्या तव्यावर डोक्यावर छत्री घेऊन एक महिला उभ्याने पोळ्या शेकते व दोन,तीन महिला सावलीत बसून पोळ्या लाटून देतात.
ही चूल सध्या तीन ते चार डब्यांची उपलब्ध आहे. साफ करताना डबे आतून साबणाने घासता येतात, पण बाहेरून फक्त पाण्याचा हलका हात फिरवावा, काच व आरसा कोरड्या फडक्याने पुसावा. काम होताच पेटी नीट बंद करून सावलीत ठेवावी.पेटी उन्हाकडे तोंड करून ठेवावी व आरशाचे प्रतिबिंब डब्यावर नीट पडेल याकडे लक्ष द्यावे. काचेचे झाकण व आरसा आघाताने फुटणार नाही याकडे लक्ष द्यावे व काळजी घ्यावी.
अशा प्रकारे सर्वतर्‍हेने उपयुक्त अशा सूर्यचुलीचा (थाळी) हवा तसा प्रसार, सूर्यप्रकाश मुबलक असणार्‍या आपल्या देशात हवा तसा झालेला नाही. कुणीही त्याची गांभीर्याने दखल घेताना दिसत नाही. तेव्हा प्रसारमाध्यमांच्या द्वारा सूर्यचुलीचे महत्त्व जर लोकांना पटवून दिले गेले, तर याचा नक्कीच योग्य असा परिणाम लोकांवर होईल व देशासमोरची इंधनाची ज्वलंत समस्या सोडविण्यास थोडातरी हातभार लागेल.
तेव्हा भगिनींनो, ही थाळी (सूर्यचूल) वापरून देशापुढील एक ज्वलंत समस्या सोडविण्यास आपण खारीचा वाटा उचलू या.
‘थेंबे थेंबे तळे साचे’ होय ना! म्हणून म्हणते-
‘‘थाळी ही द्रौपदीची
संतुष्ट करो सर्वांसी
प्रार्थना अन्नपूर्णा मातेची
उदर भरो अनेकांची…’’
तथास्तु.
प्रा. सुमन पाटे

Short URL: https://vrittabharati.in/?p=4931

Posted by on May 19 2013. Filed under सखी. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in सखी (5 of 7 articles)


नेहमी मी रस्त्याने जाताना बघते, प्रवासात बघते, तीनही ऋतूत अगदी पहाटे पाच-साडेपाचलासुद्धा बघते व खूप आश्‍चर्य वाटते. विचार करते व ...

×