Home » बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर, सखी, स्तंभलेखक » स्टार्ट अप इंडिया… : उद्योगाची कास

स्टार्ट अप इंडिया… : उद्योगाची कास

॥ बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर |
| www.beejconsultancy.com |

उद्योगासाठी लागणार्‍या अनेक गुणांपैकी कदाचित काही गुण आपल्यात नसतीलही. पण जे आहेत ते १०० टक्के विकसित करण्याचा प्रयत्न आपण किती करतो हेच तर महत्त्वाचं आहे. आत्ता देशात सकारात्मक वातावरण आहे, आपल्या डोक्यात हुशारी आहे, हातात कौशल्य आहे. कमतरता असते ती त्या लाटेशी जुळवून न घेता आपण किती कल्पकतेने त्यावर स्वार होऊ शकतो या विचारांची!

Startup India Business

Startup India Business

आपल्या देशातलं सध्याचं वातावरण खूपच उत्साहवर्धक आहे. अतिशय सामान्य माणसालाही काही तरी करण्याची उमेद यावी अशा प्रकारची धोरणं सरकारी पातळीवर राबवलेली दिसतात. यातलीच एक चमकदार गोष्ट म्हणजे मोदींनी केलेली ‘स्टार्ट अप इंडिया’ची चळवळ!
आपल्या देशातलं वर्षानुवर्षे वातावरण हे नोकरीच्या उबेत राहून धन्यता मानणार्‍यांचं होतं. सरकारी ऑफिसेस, बँका, वित्तसंस्था यांच्यातलं वातावरण पाहता तसं वाटणं सहाजिकच होतं. उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी हे दिवस जाऊन उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती असे चित्र गेली अनेक वर्ष उभं राहिल्याचं आपण पाहातोय!
व्यवसाय म्हणजे जोखिम! आणि जोखिम वगैरे घेऊन आपला सुखाचा जीव दुःखात कशाला घालायचा अशी मानसिकता वर्षानुवर्षें जोपासली गेलीय. पण गेल्या काही वर्षांत चित्र बदलतंय. जागतिकीकरणाचं स्वागत आपल्या देशातील अनेक छोट्या-मोठ्या उद्योजकांनी केलंय. सध्या नवीन ट्रेंड चालू झालाय. आपली असलेली सुखाची नोकरी सोडून आपल्यातल्या क्षमता उंचावण्यासाठी स्वातंत्र्य आणि जोखिम असं दोन्ही पत्करून पहिल्या पिढीचे अनेक उद्योजक गावोगावी तयार होताना दिसतायत.
या पहिल्या पिढीच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय? या पिढीला ताणतणावाची नोकरी करण्याचा कंटाळा आलाय. आपल्या शिक्षणाचा व हुशारीचा वापर उद्योगनिर्मिती करण्यासाठी त्यांना करावासा वाटतोय.
मागच्या पिढीतील सांगणारं कुणी नाही, आलेल्या अडचणींचा सामना कसा करायचा यासाठी अनुभव नाही. पण काहीतरी करण्याची जिद्द आहे. त्यासाठी शिकण्याची तयारी आहे. धडपडून, चुकलं तरी चालेल पण करण्याची इच्छाशक्ती आहे. एकूणातच वातावरण छान होत चाललंय. परवा सहज मोबाईलवर व्यवसायाची मानसिकता सांगणारा गुजराथी व मराठी माणसाचा एक विनोद आला होता. आलेला विनोद सहाजिकच आपण त्या त्या विषयाची आवड असलेल्यांना पाठवतो. मग नावं समोर येऊ लागली. पहाता पहाता लक्षात आलं की, आपल्या मित्र-मंडळींमध्ये व्यवसाय करणारी मंडळी अधिक होऊ लागली आहेत. नोकरीत धन्यता मानणारे किंवा व्यावसायिक आवड नसलेले लोक फार थोडे होते. मला हे खूपच प्रगतीचं लक्षण वाटलं. एखाद्या देशाचा पंतप्रधान नोटांचा काळा बाजार थांबवण्यासाठी जेव्हा एखादं महत्त्वपूर्ण पाऊल उचलतो, तेव्हा त्यांच्या मेंदूतील ‘उद्योजकीय’ तार वेगाने कंपन पावत असते. ज्या पंतप्रधानांना हा उद्योजकतेचा धागा कळतो, किंवा ज्यांना उद्योजकतेची लाट एका सकारात्मक पद्धतीने घडवायची आहे, त्यांनाच हे जमू शकते.
उद्योजकतेचा मुद्दा सहाजिकच सक्षमीकरणाकडे जातो. आपण सक्षमतेच्या बळावरच उद्योग जन्माला घालू शकतो. मग तो उद्योग महिना २०,००० मिळवून देणारा असेल किंवा २,००,००० किंवा त्याहूनही अधिक! ही उद्योजकतेची लाट म्हणजे सक्षमीकरणाची लाट! सक्षमीकरण म्हणजे कमालीची सकारात्मकता, काहीतरी चांगलं घडेल हा विश्‍वास, आपण ते घडवण्यासाठी प्रयत्न करू शकू हा आत्मविश्‍वास… आणि ही सगळी शृंखला देशाला महासत्ता होण्याच्या दिशेने नेते आहे. ही त्याची सुरुवात आहे असं आपण मानू! उद्योजकतेच्या या लाटेवर स्वार होणार्‍या प्रत्येक माणसाला पुढे जायचंय… मला त्यांना सांगावसं वाटतंय की, धीर सोडू नका, पुढे जात राहा… भविष्य उज्ज्वल आहे.
माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मला अनेक लोक भेटतात. यातील बहुतांश लोकांना आपण काहीतरी करू शकू हा विश्‍वास असतो, पण स्पर्धेत टिकून राहणे, स्पर्धेतील विजयाचा मानकरी होणे यासाठी काही वेळा मदतीची गरज असते. त्या प्रवासातील काही अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते.
सुरुवात अपयशापासून करू. कारण अपयश हे अटळ असतं आणि ते असल्याशिवाय तुम्हाला यशाची किंमत कळत नाही. तर, माझा एक जुना मित्र असाच ३/४ वर्षांपूर्वी कधीतरी नोकरी सोडून व्यवसाय करायला लागला. मधल्या काळात कसं कोण जाणे संपर्क कमी झाला होता. एक दिवशी अचानक फोन करून म्हणाला की, ‘अखेर नोकरीला लागलो!’ त्याच्या बोलण्यातला विषाद मला अस्वस्थ करत होता. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर कळलं की, व्यवसायात एक आपत्ती आली आणि ३ लाख रुपयांचं कर्ज झालं आणि ते फिटता फिटेना. बाजारपेठेची गती मंद आहे, वसुली कमी होते आहे, घराचं कर्ज आहे, लहान मुलगा आणि बायकोची जबाबदारी आहे. अशी अनेक कारणं शोधून हा मित्र नोकरीला लागला. आता आधीचं कर्ज फेडायला त्याने दुसरं कर्ज काढलं. त्याचा हप्ता, तो दर महिन्याला फेडता यावा, ही त्याची कल्पना! आई-वडिलांच्या विरोधात जाऊन व्यवसायाला लपूनछपून सुरुवात केली. बायकोची भरभक्कम साथ मात्र होती. पण परक्या मुलुखात तिला लहान मुलाला सोडून नोकरी करायला जाणं जमेना. म्हणून तिची आर्थिकदृष्ट्या साथ नाही. त्यातून दोन्ही घरातल्या लोकांना न सांगता हा व्यवसायाचा घाट घातलेला. मग, काय करणार होतो मी? असं तो प्रांजळपणे म्हणाला. त्याची अगतिकता मला समजत होती. ती त्याच्या बाजूने बरोबरही होती. मी काहीच बोलले नाही. पण अंतर्मुख झाले. देशात उद्योजकतेचं इतकं चांगल वातावरण असताना, ह्या माणसाने रणछोडदास व्हावं याचं वाईट वाटलं. ह्या मित्राची अजून काही बाजू मांडते. हा योगविद्या निपुण माणूस आहे. वयाच्या ४० व्या वर्षी म्हणजे गेली किमान १० वर्षं तो दररोज १०८ सूर्यनमस्कार घालतो. योग, आयुर्वेद या विषयावर त्याचा दांडगा अभ्यास आहे. घरात पुस्तकांचीही बरीच माया जमवून ठेवली आहे. या विषयावर बोलायला लागला की, आपण मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतो ही त्याची हातोटी! व्यवसाय करताना मार्केटिंगची अत्यंत सबळ बाजू त्याच्याकडे होती. मग हा माणूस नेमका कमी कुठे पडला? हा माणूस स्वतःला ओळखायला कमी पडला. माणसात अनेक स्कील्स असतात. त्यातल्या नेमक्या कुठल्या गोष्टींवर आपण लक्ष केंद्रित करतो हे महत्त्वाचं. त्याच्यावर वाणी प्रसन्न होती. पण त्या वाणीचा उपयोग त्याने वेगळ्या गोष्टीत केला. खरी गरज तर, स्वतःला ओळखून, त्याचा सद्परिस्थितीला धरून स्वतःला घडवण्यात असते. त्याने त्याचा व्यवसाय सांभाळून सकाळ-संध्याकाळ तो रहात असलेल्या सोसायटीमध्ये योग-आयुर्वेद या विषयावर ट्रेनिंग द्यायला जरी सुरुवात केली असती तर चित्र बदललं असतं. आपला मूळ व्यवसाय न बदलता हा जोडधंदा म्हणून चालू करायला हवा होता. यात कमीत कमी जोखिम होती. त्याच्या व्यवसायातील जाळं त्याच्या या जोडधंद्याचं रूपांतर मूळ धंद्यातही करू शकलं असतं. पण चुकतं कुठे?, तर कल्पक विचार कमी पडतो.
माझे वडील मला नेहमी सांगतात की, शेती कधी परवडते, जेव्हा शेतकरी शेतात धान्य घेतो. आपला भाजीपाला आपण पिकवतो. त्याच्या परसदारात २-६ गायी व कोंबड्या आहेत. गाईंचं शेण तो शेतीसाठी वापरतो आणि कोंबड्यांची अंडी तो जोडधंदा म्हणून विकसित करतो. हे सगळं एक चक्र आहे. ते चक्र साधलं की कुठलाही स्रोत वाया जात नाही आणि शेतकरी समृद्ध होतो. आपलंही नेमकं तसंच आहे. उद्योगासाठी लागणार्‍या अनेक गुणांपैकी कदाचित काही गुण आपल्यात नसतीलही. पण जे आहेत ते १०० टक्के विकसित करण्याचा प्रयत्न आपण किती करतो हेच तर महत्त्वाचं आहे.
आत्ता देशात सकारात्मक वातावरण आहे, आपल्या डोक्यात हुशारी आहे, हातात कौशल्य आहे. कमतरता असते ती त्या लाटेशी जुळवून न घेता आपण किती कल्पकतेने त्यावर स्वार होऊ शकतो या विचारांची!
रविवार, दि. २० नोव्हेंबर २०१६

। dhanashree.bedekar@gmail.com |

साभार – सोलापूर तरुण भारत. www.tarunbharat.org

Short URL: https://vrittabharati.in/?p=35517

Posted by on Jan 25 2019. Filed under बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर, सखी, स्तंभलेखक (3 of 111 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• तर  देशवासीयहो! चिंता करु नका! युद्ध तर मोदी सरकार सत्तेत आल्यानंतरच सुरु झाले आहे. कदाचित प्रत्यक्ष ...

×