|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:05 | सूर्यास्त : 18:43
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 31.03° C

कमाल तापमान : 31.99° C

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 4.5 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.99° C

Weather Forecast for
Wednesday, 24 Apr

28.17°C - 31.99°C

few clouds
Weather Forecast for
Thursday, 25 Apr

27.95°C - 30.6°C

few clouds
Weather Forecast for
Friday, 26 Apr

27.8°C - 30.3°C

few clouds
Weather Forecast for
Saturday, 27 Apr

27.56°C - 30.67°C

light rain
Weather Forecast for
Sunday, 28 Apr

28.32°C - 32.12°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 29 Apr

28.86°C - 32.1°C

sky is clear
Home » अग्रलेख, संपादकीय » समाजवादी पार्टीची अनास्था

समाजवादी पार्टीची अनास्था

संपूर्ण भारतात मुसलमानांचे आपणच एकमेव कैवारी आहोत, अशी उठता बसता बांग देणारे मुलायमसिंग आणि त्यांचे पुत्र अखिलेश यादव हे उत्तरप्रदेशात मुसलमानांवर कसा अन्याय आणि अत्याचार करीत आहेत, त्यांचा किती क्रूरपणे छळ केला जात आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मग ती पोलिस अधीक्षक जिया उल हक यांची हत्या असो की, मुसलमानांना मृतदेह दफन करण्यासाठी जागा न देण्याचा प्रश्‍न असो, मुलायमसिंगांची तेथे हुकूमशाहीच चालली. आम्ही सांगतो ते मुकाटपणे ऐका आणि तसेच वागा, असा फतवाच जणू मुलायमने उत्तरप्रदेशात काढला आहे. त्याचे भोग आता तिथला मुसलमान समुदाय भोगत आहे. ताजी घटना मुजफ्फरनगर आणि शामली जिल्ह्यात उसळलेल्या दंगलीने प्रभावित झालेल्या गरीब हिंदू-मुसलमान बांधवांची आहे. दंगल उसळून चार महिने लोटले. पण, अजूनही शिबिरात राहत असलेल्या हिंदू आणि मुस्लिमांना योग्य न्याय देण्याचा, वातावरण शांत करून तेथे सद्भाव आणि शांतता निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न मुलायम वा अखिलेशकडून झाला नाही. उलट त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा अश्‍लाघ्य प्रकार तेथे गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू आहे. या शिबिरात राहणारी बालके अतिशय आजारी असताना, त्यांना वैद्यकीय मदतीची नितांत गरज असताना, त्यांना कोणतीही मदत अखिलेश सरकारने पुरविली नाही. परिणामी तेथे एकापाठोपाठ बालकांचा मृत्यू होऊ लागला. प्रसिद्धी माध्यमांनी या गंभीर बाबींकडे लक्ष वेधल्यानंतरही अखिलेश सरकार जागेवरून हलले नाही. उलट एवढे मृत्यू झालेच नाहीत, माध्यमे खोटी माहिती देत आहेत, असा आरोप अखिलेश यादव यांनी केला. मुसलमानांप्रति या यादव पिता-पुत्रांच्या मनात कोणतीही आस्था नसल्याचे त्यांनी दाखवून दिले. शेवटी प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले आणि आता तोंड लपवत होय, तेथे ३४ बालकांचा मृत्यू झाल्याची बाब अखिलेश सरकारने मान्य केली. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतरच अखिलेश सरकारने केवळ ही बाब मान्य केली आहे. अन्य सोयी-सुविधांबाबत अजूनही कोणतीच पावले उचलली गेली नाहीत. एकीकडे ही बाब मान्य करतानाच, शिबिरार्थींच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम तिथल्या एका दिवट्या अधिकार्‍याने केले. अनिलकुमार गुप्ता हे त्याचे नाव. हा माणूस उत्तरप्रदेशात गृहविभागाचा प्रधान सचिव आहे. काय म्हटले त्याने. तो म्हणाला की, थंडीने लोक थोडेच मरतात. असे असते तर सायबेरियात एकही माणूस वाचला नसता. आता बोला. एवढ्या निगरगट्टपणे एक जबाबदार अधिकारी बोलत आहे, हे पाहून तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहत नाही. अखिलेशने काय केेले? त्याने या गुप्ताचीच पाठराखण केली. हा आहे उत्तरप्रदेशात मुस्लिमांबाबत यादव पिता-पुत्रांचा व्यवहार. उलट या शिबिरांमध्ये कॉंग्रेस आणि भाजपाचेच लोक असून ते इथल्या लोकांना भडकावीत आहेत, असा नवा जावईशोध मुलायमने लावला. आता हेही प्रकरण न्यायालयात जाणार आहे. या घटनेवर समाजवादी पार्टीचे अन्य नेते अगदी चिडीचूप आहेत. मुंबईत बसून तोंडाच्या वाफा काढणारे अबु असीम आझमी यांचे तोंड आता बंद झाले आहे. मध्यंतरी तिसर्‍या आघाडीचे डावे नेते प्रकाश कारत यांनी शिबिरांना भेट दिली. पण, त्यांनी मुलायमचे कान उपटले नाही. काहीतरी करा, असा मिळमिळीत सल्ला देऊन ते दिल्लीला परत आले. आता मात्र अखिलेश सरकारनेच मृत्यूंची कबुली दिल्यानंतर वृंदा कारतसह अन्य डाव्या आघाडीच्या नेत्यांनाही कंठ फुटला आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मात्र गुप्ताच्या विधानावर तीव्र शब्दात टीका केली आहे. या गुप्तांना अतिशय कमी कपड्यांत अतिशय थंड भागात पाठविले पाहिजे, तेव्हाच त्याला कळेल की, थंडी काय असते. आज सर्व राजकीय पक्ष मुलायम आणि अखिलेशच्या तोंडात शेण घालत असताना, दोन्ही बाप-लेकांना त्याची चिंता नाही. यावरून त्यांची मगरुरी लक्षात यावी. आज शिबिरांमध्ये कोणत्याही सोयी नाहीत. कापड आणि काही ठिकाणी ताडपत्र्यांचे त्रिकोणी तंबू तेवढे आहेत. चोहोबाजूंनी थंड वारे आत येत असल्यामुळे लोक आपले कपडे बालकांच्या अंगावर टाकून संपूर्ण रात्र शेकोट्या पेटवून घालवीत आहेत. त्यासाठी सरकार लाकडे पुरवीत आहे. अजूनही तेथे पाच हजार शरणार्थी शिबिरात गेल्या चार महिन्यांपासून कसेतरी राहत आहेत. मुलायमने या लोकांना अशी अट घातली आहे की, जे लोक आपल्या गावी जाण्यास इच्छूक नाहीत, त्यांना घराची जागा पाहून एकरकमी मोबदला दिला जाईल. त्यानंतर मुसलमानांचा आपले घर, शेती यावरील हक्क राहणार नाही. स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारची क्रूर अट घालण्याची ही पहिलीच वेळ असावी.
अगदी काही दिवसांपूर्वी, मुस्लिमांना त्यांच्या नातेवाईकांच्या दफनविधीसाठी अखिलेश सरकारने कब्रस्तानमध्ये जागा देण्यास नकार दिल्यामुळे मुस्लिमांनी आपल्या नातेवाईकांचा दफनविधी आपल्याच घरात केला. आज हे सर्व लोक त्याच ठिकाणी राहत आहेत. एवढा सगळा छळ सुरू असताना, दंगल पेटविणारे मुस्लिम नेते कुठे गडप झाले, कुणास ठावूक. लोकांना दंगलीच्या ज्वाळांमध्ये ढकलून आपण नामानिराळे राहण्याचा यांचा धंदा जुनाच आहे. तो या गरीब मुस्लिमांच्या लक्षात अजूनही येत नाही, हीच मोठी शोकांतिका आहे.
ऊठसूट गोध्रा दंगलीचे भूत उकरून नरेंद्र मोदींवर टीका करणारे मुलायमसिंग आपल्या राज्यात मुस्लिमांना साधे संरक्षण देण्यास असमर्थ ठरले आहेत. आता या दोन राज्यांचीही तुलना केली जात आहे. मोदींच्या गुजरातमध्ये २००२ नंतर एकही दंगल झालेली नाही, हे पाहून असे झालेच कसे, असा प्रश्‍न एकजात सर्व राजकीय पक्ष विचारीत आहेत. मुस्लिम नेते मोहम्मद हाशीम अंसारी यांनी तर स्पष्ट शब्दात कॉंग्रेसला सुनावले आहे की, केवळ मोदी आणि भाजपाची भीती दाखवून कॉंग्रेस पक्ष मुस्लिमांना भयभीत करून सोडीत आहेत. पण, यावर मुस्लिमांनी विश्‍वास ठेवू नये. कॉंग्रेसने गेल्या ६० वर्षांत मुस्लिमांसाठी काहीही केले नाही, असा आरोप करून हाशमी म्हणतात, गुजरातमध्ये गेल्या दहा वर्षांत एकही दंगल झाली नाही. उलट तिथला मुस्लिम सुखी आणि समाधानी आहे. आपला कामधंदा वाढवीत आहे. त्यामुळे त्याला तेथे कोणतीही भीती वाटत नाही. हीच प्रतिक्रिया अनेक मुस्लिम नेत्यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे स्वत: मुस्लिम नेते मोदींचे गुणगान करीत असताना, दुसरीकडे स्वत:ला मुस्लिमांचे मसीहा म्हणणार्‍या मुलायम-अखिलेशच्या राज्यात मुस्लिमांची कशी ससेहोलपट होत आहे, हे संपूर्ण जगापुढे आले आहे. आतातरी मुस्लिमांनी सद्सद्विवेक बुद्धी वापरून कोण खरे, कोण खोटे यातला फरक ओळखला पाहिजे. कॉंग्रेस, सपा, बसपा हे सर्वच पक्ष मुस्लिमांना न्याय देऊ शकत नाही, हेही गेल्या दहा वर्षांत दिसून आले आहे.
मुलायमसिंग अधूनमधून तिसरी आघाडी सत्तेत येणार, असे दिवसाही स्वप्न पहात असतात. जेथे हिंदू आणि मुस्लिम सलोख्याने राहू शकत नाहीत, जेथे दोन्ही समुदायांवर अन्याय, अत्याचार केला जातो ते नेते पंतप्रधानपदाची स्वप्ने कशी काय पाहू शकतात? मुलायमसिंगांना कोणता पक्ष मदत करून आपल्या पायावर धोंडा मारून घेणार आहे. तरीही मुलायमला मुंगेरीलालके हसीन सपने पाहण्यापासून कुणी रोखू शकत नाही. त्यांनी स्वप्न जरूर पहावेे. पण, आधी आपल्या राज्याच्या घटनादत्त जबाबदारीचे, कर्तव्याचे नि:ष्पक्षपणे पालन केले पाहिजे. कोणत्याही जाती, धर्माबद्दल दु:स्वास ठेवणे हे मुलायमच्या हिताचे नाही, हे येणार्‍या लोकसभा निवडणुकीत दिसूनच येणार आहे. आज मुलायमसिंग हे संपूर्ण यादव समाज आपल्यासोबत असल्याचा दावा करतात. त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, केवळ एका समुदायाच्या बळावर ते दिल्लीपर्यंत पोहोचू शकत नाही. मुस्लिमांचे मसीहा म्हणविणार्‍या मुलायमला हा समुदाय जवळ करतो की दूर फेकतो, हे अगदी काही महिन्यांत कळणारच आहे.

Posted by : | on : 29 Dec 2013
Filed under : अग्रलेख, संपादकीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g