Home » युवा भरारी » रंगभूतचा सुळका

रंगभूतचा सुळका

साल २००७. मार्च महिन्याला सुरुवात झाली होती.माहुली गडावरचा गडप्रेमींचा ओळखीचा सुळका ‘रंगभूत’ आम्ही नेहमीच्याच मार्गाने सर केला. त्यावेळी या किल्ल्याच्या विजयापेक्षा भावली ती त्याची सरळसोट ३५० फुटांची खडकाळ एकसंध धार. असे अवघड मार्ग सर करण्याचे सोडून सोप्या मार्गांनीच सह्याद्रीतील बहुसंख्य सुळके, कडे सर केले जातात. याची मनाला खंत वाटते.रंगभूतची ती खडकाळ एकसंध धार पाहिल्यावर ठरवून टाकलं.याच बाजूने किल्ल्याची चढाई करून अवघड माथा गाठायचा. पण तो दृढ निश्चय सत्यात उतरायला २०१२ साल उजाडावं लागलं.
या नवीन मोहिमेसाठी नोव्हेंबर महिना ठरवताना अंदाजे दहा दिवसांचा कालावधी ठरवण्यात आला. बहुसंख्य क्लायंबर्सची चढाई करण्याची ती पहिलीच वेळ होती.वीसेक सभासदांनी मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा दर्शवूनसुद्धा प्रत्यक्ष मैदानात अवघे दहा-बारा जणच जमले. पण गत्यंतर नव्हतं.एकदा ठरवलेली मोहीम कोणत्याही परिस्थितीत पूर्णत्वास न्यायची, हा संस्थेचा आजवरचा इतिहास!
ठरल्याप्रमाणे आम्ही गेल्या महिन्यात (१६ नोव्हेंबर २०१२) सकाळी नऊ वाजता आसनगाव स्टेशनवर जमलो.माहुली गावातील वाटाड्या गुरू आगीवले हाक देताच टेम्पो घेऊन आला. साधारण अकराच्या सुमारास माहुली गाव गाठलं.इथून भर उन्हात आमचा ट्रेक सुरू झाला. प्रत्येकाच्या पाठीवर किमान तीन किलो वजनाची सॅक होती.माणसं कमी पडली म्हणून गुरुलाही कामाला जुंपलं.दुपारी तीन वाजता माहुली गडाचा माथा गाठला.तिथून रंगभूत सुळका गाठायला चार वाजले.आम्हाला गडावर सोडून गुरू आणि राहुल परतीच्या वाटेस लागले.
आम्ही बेस कँप उभारण्यासाठी योग्य जागा शोधण्यास सुरुवात केली. जवळ पाण्याची सोय असणंही गरजेचं होतं.आणि ती होती गडावर. तिथून जे लक्ष्य गाठायचं होतं तो सुळकाही होता उजव्या हाताला खोलवर दरीत! त्यामुळे गडावरच मुक्काम करण्याचं ठरलं. मी २००७ साली आलो असताना फोटोग्राफीसाठी जिथे थांबलो होतो,तीच जागा पुन्हा एकदा शोधून काढली. सुदैवाने ती मिळालीही. जागा अगदी माहुली गडाच्या कड्याच्या टोकावर होती.आणि समोरच होता खोल दरीत दिसणारा रंगभूत सुळका. चार तंबू ठोकून बेस कँप उभारेपर्यंत अंधाराने आम्हाला गाठलंच. सर्व सामान काढून योग्य जागी लावेपर्यंत
काही सहकार्‍यांनी जेवणाची व्यवस्था केली. दुपारीच आसनगावाहून विकत घेतलेली कोंबडी-रस्सा-भात-चपात्या हा जेवणाचा फक्कड बेत होता. दिवसभर उपवास घडल्यामुळे प्रत्येक जण दाबून जेवला. इतका की, जेवणाचे टोप खणखणले. जेवून कधी एकदा झोपतोय, असं झालं. दिवसभराच्या श्रमांनी झोपेची वाट पाहवी लागली नाही.
दुसर्‍या दिवशी (१७ नोव्हेंबर) आम्हाला जाग आली ती लोकल ट्रेन, रिक्षा, माणसांच्या गडबडाटाने नव्हे, तर पक्ष्यांच्या किलबिलाटाने. उठल्यानंतर प्रत्येकाने नेमून दिल्याप्रमाणे कामं आटोपायला सुरुवात केली. एक्सपान्शन बोल्टसाठी वेजेस कापण्यात आल्या. सर्व तयारी करून रंगभूत सुळक्याच्या पायथ्याशी पोहोचायला सकाळचे साडेदहा वाजले. गणरायाला साकडं घालून ठीक अकरा वाजता चढाईचा श्रीगणेशा किशोरने केला. किंचित उताराच्या रॉकपॅचवर दोन बोल्ट आणि एक मेख वापरून सुमारे ८० फुटांची चढाई पूर्ण करून लेज गाठण्यात आली. इथूनच आमची मुख्य चढाई सुरू होणार होती.लेजवरील रॉकपॅचवर सलग तीन बोल्ट ठोकून दुसर्‍या दिवशीची चढाई थांबवण्यात आली.
तिसर्‍या दिवशी (१८ नोव्हेंबर) किशोर आणि हितेशनी दिवसभरात सहा खिळ्यांची भर घालून वीसेक फूट चढाई केली.चौथ्या दिवशीच्या (१९ नोव्हेंबर) चढाईत वासुदेव व सतीश या नवीन मेंबर्सना समाविष्ट केलं. त्यांनी एकूण पाच खिळे ठोकून दिवस भरला.२० नोव्हेंबरला पुन्हा एकदा किशोरनेच चेन बोल्टिंग करत पाच खिळे ठोकून आणखी वीसेक फुटांची उंची गाठली. चढाई सुरू होऊन चार दिवस झाले होते; पण म्हणावी तशी प्रगती होत नव्हती.त्यामुळे बेसकँपवर थोडंसं अनुत्साही वातावरण पसरलं.त्या दिवशी रात्री जेवणानंतरच्या सेफ्टी मिटिंगमध्ये या परिस्थितीवर मात करण्यासाठी उद्याची चढाई मी करायची असं सर्वानुमते ठरलं. या निर्णयामुळे मीसुद्धा थोडासा सांशकच होतो. २००६ साली केलेल्या कोकणकडा चढाईनंतर तब्बल सहा वर्षांनी पुन्हा एकदा प्रथमच सहाव्या दिवशी (२१ नोव्हेंबर) कृत्रिम चढाईत भाग घेणार होतो.
सहाव्या दिवशी सकाळी लवकर निघूनसुद्धा जुमारिंग करून शेवटच्या बोल्टपाशी पोहोचून मुख्य चढाईला सुरुवात करण्यास सकाळचे नऊ वाजले. पहिलीच दहा फुटी सुरेख फ्री-मूव्ह करत एका स्लोपर रॉकपॅचवर तोल सांभाळत जेमतेम उभा राहिलो. तशाच स्थितीत फक्त कोपरातून हात हलवत हातोडीच्या साहाय्याने पंचिंग करू लागलो. हातोडीचा हात जराही जास्त बाहेर घेतला तर निसटून खाली पडण्याची शंभर टक्के खात्री. सुमारे अर्धा तास खणून मी तो पहिलाच खिळा (बोल्ट) ठोकण्यात यशस्वी झालो. उजवीकडे नजर फिरवली तर तिथून वरच्या दिशेने पुढे सरकण्याची संधी दिसली. ती लक्षात येताच, मी पुन्हा एकदा जिद्दीने सरसावलो आणि दम घेतला तो, सुमारे ४० फुटांची उंची गाठूनच! इथे पुन्हा एकदा तोल सावरत दुसरा खिळा ठोकत होतो. तो ठोकून होताच अजून एक फ्री-मूव्ह केली. तिथे तिसरा खिळा ठोकून होताच हितेशला वर येण्याचा इशारा केला. सुमारे शंभरेक फूट जुमारिंग करून येईपर्यंत मी थोडीशी विश्रांती घेतली. त्यानंतर खालील खिळ्यांमध्ये शिडीत सेट होताच सलग दोन खिळे ठोकले. इथून पुन्हा एक फ्री-मूव्ह करण्यासाठी सज्ज झालो. हितेशला सावध राहण्याचा इशारा करून अंगाबाहेर
आलेल्यापॅचवर तिरकस रेषेत चढाई करण्याचे दोन प्रयत्न फसले; पण त्यांना न जुमानता तिसर्‍या प्रयत्नात यश मिळवून वरच्या भागात पोहोचून सहावा खिळा ठोकला. तेव्हा आपण प्रचंड दमलो असल्याची जाणीव झाली. त्यामुळे सहाव्या दिवसाची चढाई थांबवावी लागली. तिथून आम्ही बेस कँप गाठला. सहाव्या दिवशी दिवसभरात लागोपाठ केलेल्या फ्री-मूव्हमुळे सुमारे ९० फूट चढाई झाली.हा इतका मोठा टप्पा गाठल्यामुळे बेसकँपवर पुन्हा एकदा उत्साहाचं वातावरण पसरलं होतं.
सातव्या दिवशी (२२ नोव्हेंबर) आदल्या दिवशीच्या उत्साही वातावरणाचा फायदा घेत किशोर आणि हितेशनी चढाई सुरू केली. सलग चार खिळे ठोकून होताच किशोरनेही संधी मिळताच सुमारे ३० फुटांची अप्रतिम फ्री-मूव्ह केली. एका टप्प्यावर पोहोचून इथे डावीकडे एक मेख ठोकली. तिच्या आधाराने उभे राहून तोल सावरत एक पिटॉन ठोकला. त्यानंतर सलग दोन खिळ्यांची भर घालून चढाई थांबवली.सातव्या दिवशी किशोरने सहा खिळ्यांच्या साथीने पन्नासेक फूट चढाई पूर्ण केली. त्यामुळे सर्वांचाच आनंद द्विगुणीत झाला.
आठव्या दिवशीची आघाडी (२३ नोव्हेंबर) मी आणि किशोरने सांभाळायचं ठरलं.सातव्या दिवशी किशोरने ठोकलेल्या शेवटच्या खिळ्यापासून डावीकडे वळसा(ट्रॅव्हर्स)घेत मूव्ह करण्याचा प्रयत्न सुरू केला. मूव्ह खूपच अवघड होती. खडकावर एकही म्हणावा तसा होल्ड सापडत नव्हता. इथेही दोनदा प्रयत्न करूनही यश मिळेना. थोडी
विश्रांती घेत तिसर्‍या प्रयत्नात इच्छीत साध्य झालं; पण डावीकडे सरकल्याने नको ती आफत ओढवली.परत मागं फिरावं तर जमणं मुश्कील. पुढे जाऊन अजून फसगत होण्यापेक्षा आहे तिथेच बॅलेसिंग करत पंचिंग करण्याचा निर्णय घेतला. जवळ-जवळ एक इंच खोल छिद्र खडकात पाडून झालं होतं. नेमका हातातील पंचच तुटल्याने घात झाला. फ्री-मूव्ह करताना वजन नको म्हणून सर्व जड साहित्य मागेच ठेवून मी इथवर पोहोचलो होतो.आहे तसाच खिळा ठोकावा तर खडकातील छिद्रात पंच तुटून जाम झालेला. मनावर संयम ठेवून हातोडीने ठोकीत शेवटी एकदाचा अडकलेला पंच काढला. तेव्हा कुठे हायसं वाटलं. अर्धवट छिद्रात तसाच खिळा ठोकला. पुन्हा माघारी जात सर्व साहित्य सोबत घेऊन स्थिरस्थावर होताच सेकंडमन किशोरला वर येण्यासाठी कॉल दिला. किशोरला बिले देण्यास सांगून मी पुढील चढाई सुरू केली. खडकातील क्रॅकमध्ये एक पिटॉन भक्कम ठोकून मी डाव्या बाजूस आडवा वळसा घेण्यास प्रारंभ केला.पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होत सुमारे ३० फुटांवरील मोठी लेज गाठली. इथून वरच्या दिशेने वीसेक फूट फ्री-मूव्ह करत योग्य जागी बोल्ट ठोकला. त्यात मेमरी प्लेट फिक्स केली. माहुली गडावरून रंगभूत सुळका पाहताना ती मेमरी प्लेट सहजपणे लक्ष वेधून घेणार होती. माझ्या प्रस्तरारोहण कारकीर्दीतला चारशेवा खिळा ठोकून पूर्ण झाला होता.
लगेचच जुमारिंग करत सेकंडमन किशोर येताच मी हालचाल केली. बोल्टपासून वरच्या दिशेने सरळ रेषेत फ्री-मूव्ह करून एका क्रॅकमध्ये पिटॉन ठोकला. पुन्हा फ्री-मूव्ह आणि उजवीकडे आडवा वळसा मारत अजून एक लेज(खालच्या लेजपासून सुमारे ४० फूट उंचीवर) गाठली. इथे मोहिमेतला शेवटचा ३७ वा खिळा ठोकून होताच किशोरने मला गाठलं. साडेचार वाजले होते. मलाही थकवा जाणवू लागला होता. पुढची शेवटच्या टप्प्याची चढाई किशोरकडे सोपवून मी सेकंडमनची भूमिका घेतली. १०-१५ फुटांची आघाडी घेत इथे किशोरने पिटॉन ठोकला.पुन्हा डावीकडे वळसा घेत पुढे निघाला खरा; पण मी खालून त्याला पाहू शकत नव्हतो. हातातील सरकणार्‍या दोरामुळे जाणवू शकत होतो.मार्गातील लूज रॉक्स-स्क्रीची पण सोपी चढाई संपवली.ठिक पावणेपाच वाजता त्याने सुळक्याचा माथा गाठला. गिरीविराजची १३२ वी मोहीम पूर्णत्वास नेली. गेल्या आठ दिवसांचा शीण दूर झाला होता.पण अजून जबाबदारी संपली नव्हती.
नवव्या दिवशी (२४ नोव्हेंबर) नवीन मेंबर्स आणि जुने सहकारी यांचं जुमारिंग,टिमक्लायम्बिंग इत्यादी सोपस्कार दिवसभरात उरकले. त्यानंतर या मोहिमेतली सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘वाइंड अप’ची (सुळक्यावरील दोर आणि चढाईची साधनं काढत क्रमाक्रमाने पायथा गाठणं) जबाबदारी पार पाडून संध्याकाळी बेसकँप गाठला.
या मोहिमेत किशोर मोरे याच्या नेतृत्वाखाली योगेश सदरे, हितेश साठवणे, सतीश कुडतरकर, निकिता अडफडकर, वासुदेव दळवी, राधेश तोरणेकर, अनिकेत साळुंखे, राहुल शिंदे, दर्शन एडेकर, पराग सावळे, संजय गवळी यांनी सहभाग घेतला.
किरण अडफडकर

Short URL: https://vrittabharati.in/?p=1733

Posted by on Jan 7 2013. Filed under युवा भरारी. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in युवा भरारी (20 of 28 articles)


नवीनवर्षाच्या शुभेच्छा! हे वर्ष तुम्हा सर्वांनासुखाचे, समृद्धीचे, आनंदाचे, आरोग्यपूर्ण, यशस्वीआणि समाधानाचे जावो... जुने वर्ष सरत आले की, अगदी शेवटी सुरुवात ...

×