किमान तापमान : 25.43° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
24.24°से. - 26.99°से.
गुरुवार, 23 जानेवारी साफ आकाश23.54°से. - 26.57°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.37°से. - 26.9°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.24°से. - 27.36°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.79°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.72°से. - 28.15°से.
मंगळवार, 28 जानेवारी छितरे हुए बादलतत्कालीन उपमुख्यमंत्री चंद्रमोहन उर्फ चॉंदने तत्कालीन साहाय्यक महाधिवक्ता अनुराधा बाली उर्फ फिजासोबत मुस्लिम धर्मपरिवर्तन करून दुसरा निकाह केला आणि दोन महिन्यांच्या सहवासानंतर चॉंदने (एसएमएस द्वारा) तलाक दिला. एकेकाळी हरियाणाच्या राजकारणात वादळ निर्माण करणार्या रूपसुंदरी फिजाचा सडलेला मृतदेह घरात आढळून आला. तिच्या जीवनातून चॉंद निघून गेल्यानंतर तिला निराशेने ग्रासले होते. तिची मानसिक स्थिती ‘खोया खोया चॉंद’सारखी झाली होती….
सध्या देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. स्त्रीभ्रूणहत्या, तीन वर्षांच्या बालिकेपासून वृद्ध स्त्रीवर होणारे बलात्कार- सारेच विचलित करणारे आहे. गेल्याच पंधरवड्यात गुवाहाटीमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाच्या प्रकरणाने सबंध देश ढवळून निघाला. त्यामुळे ‘सातच्या आत घरात’पासून ते महिलांनी ‘उत्तेजक कपडे घालू नयेत’ अशी पारंपरिक भूमिका कर्नाटक राज्य महिला आयोग अध्यक्षांनी व्यक्त केली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा ममता शर्मा आणि अनेक गणमान्य सुप्रसिद्ध महिलांनी, उत्तेजक कपडे घालू नयेत, असा माफक सल्ला दिला. काहींनी पश्चिमेचे अंधानुकरण न करण्याचा सल्ला दिला म्हणून असा विचार करणार्यांना झापडबंद संस्कृतिरक्षक अशी पदवी देण्यात आली.
फेसबुक ‘प्रेमकहानी’
याच पार्श्वभूमीवर दोन प्रसिद्ध वृत्तपत्रांच्या मुख्य पानावर प्रसिद्ध झालेल्या दोन बातम्या वाचल्यानंतर समाज कुठल्या मार्गाने आगेकूच करतो आहे, याची स्पष्ट झलक दिसून येत आहे. म्हणूनच जे घडते ते चांगले की वाईट, यावर विचारमंथन आवश्यक आहे. पहिली बातमी नागपूरची आहे. पतीबरोबर वितुष्ट आल्याने स्वातीने काडीमोड घेतला होता. दोन मुले सोबत घेऊन ती वडिलांकडे मागील तीन वर्षांपासून राहत होती. दीड वर्षापासून तिची फेसबुकवर एका प्रिन्सशी ओळख झाली. त्यानंतर ते दोघेही अनेकदा एकमेकांना भेटले. प्रिन्सने स्वातीकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला, पण तिने तो नाकारला. कारण, तिला अपेक्षित असलेला पूर्वाश्रमीचा प्रिन्स हा नव्हता. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यात वाद चालू होता. त्याची परिणती शेवटी गोळीबारात झाली. सध्या स्वाती जखमी अवस्थेत खाजगी इस्पितळात भरती आहे. तिच्यावर उपचार चालू आहेत व फेसबुकवाला गोळीबार करणारा प्रिन्स फरार आहे.
अजब प्रेम की गजब कहानी
दुसरी घटना चिंचोली, जिल्हा भंडारा येथील आहे. नातवंडं खेळविण्याच्या वयात साठ वर्षीय प्रेमवीराची पहिली पत्नी तसेच कुटुंबात विवाहित चार मुली व एक मुलगा आहे. तरीही त्याच्या प्रेमात ४५ वर्षीय विवाहित महिला पडली. तिला एक मुलगा तसेच एक मुलगी असूनही या वयात पतीला व मुलांना सोडून तंटामुक्ती समिती व ग्रामपंचायत समितीच्या बैठकीत लिव्ह इन पद्धतीने त्या ज्येष्ठ विवाहित पुरुषाबरोबर राहावयास तयार झाली. ही दोन वयस्क महिलांची नमुन्यादाखलची उदाहरणे आहेत. या दोन्ही प्रकरणांत पुरुषांचा दोष नसेल असे कुणीही म्हणणार नाही.
ये रास्ते हैं बरबादीके…
असाच एक प्रकार एका विवाहित डॉक्टर पती-पत्नींबद्दल घडला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी होती, तरीही ही वयस्क महिला डॉक्टर अन्य विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली. डॉक्टर पतीने तिला परोपरीने समजावण्याचा प्रयत्न केला, पण विवाहित प्रियकराच्या प्रेमात पडलेल्या महिला डॉक्टरने तेव्हा पतीचे ऐकले नाही. शेवटी डॉक्टर पतीने तिला अनिच्छेने घटस्फोट दिला. मुलांना सांभाळायचे म्हणून दुसर्या वयस्क मुलीबरोबर विवाह केला. सध्या मुलगा व मुलगी जन्मदात्या आईचे नावही काढीत नाहीत. उलट त्यांना तिच्याबद्दल घृणा वाटते. त्याच वेळी संबंधित डॉक्टरीणबाईंचा लिव्ह इन पार्टनर व दुसरा विवाहित पती काही दिवसानंतर तिच्या सहवासाने उबगला आणि आपली प्रथम विवाहित पत्नी व मुलांना घेऊन परदेशात चुपचाप निघून गेला. सध्या कटीपतंग झालेली डॉक्टरीणबाई आता डॉक्टर पतीच्या दारावर विमनस्क अवस्थेत जाऊन बसते, पण तिची दखल कुणीही घेत नाही. अशीच उदाहरणे बहुसंख्य ठिकाणी आढळून येतात. अशा दुष्परिणामांना पुरुषांपेक्षा स्त्रियांना जास्त बळी पडावे लागते. म्हणूनच ‘स्वत:ची स्पेस शोधायच्या नादात किती वाहत जायचे?’ हा स्वेच्छाधिकार निदान सुशिक्षित आणि आर्थिक संपन्न गटातील महिलांनी जाणीवपूर्वक वापरायला पाहिजे. लिंगपिसाट माणसापासून स्त्रीला पाठबळ व संरक्षण म्हणून आवश्यकतेपोटी शासनाने अनेक कायदे केलेत. परंतु, लिंगपिसाट स्त्री जर मध्यवयात पती व मुलांची पर्वा न करता बेताल जगत असेल, तर व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून तिला सोडून द्यायला पाहिजे? पूर्वी निदान सामाजिक दबाव तरी होता, आता तर सर्वत्र ‘निर्लज्जम् सदा सुखी’ असाच मामला आहे आणि पाठीशी कायद्याचे पाठबळ.
द्वंद्व
मानवी जीवनावर भौगोलिक वातावरणाचा प्रभाव पडतो. भौगोलिक वातावरणानुकूल त्या भूभागातील मानवाची जडणघडण नैसर्गिकरीत्या घडत असते. स्त्री आणि पुरुष ही निसर्गाची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. निसर्गानेच पुरुष आणि स्त्रीला वेगवेगळी कर्मे व शरीररचना प्रदान केलेली आहे. प्रकृती आणि पुरुष हे दोन आहेत म्हणजे द्वैत आहे. हे द्वैत जेव्हा एकाकार होते म्हणज अद्वैत होते तेव्हा नवनिर्मिती होते. सार्या विश्वाचा भार तेच वाहत असतात. मग द्वंद्व कशाला?
समाजस्वास्थ्य समायोजक
अनंत विश्वात विविधतेने नटलेल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या मानवी संस्कृतीचा विकास झाला. अनेक वर्षांच्या अनुभवांती मानवी स्वास्थ्याला व समाजाला उपकारक अशी जीवनपद्धती विकसित झाली. समाजाच्या सू-संचालनाकरिता धर्मबंधने निर्माण झाली. भविष्यात मानवी गरजेनुसार बंधने सैल करण्यात आली. संस्कृती व परंपरा हे डबके नसून, हा प्रवाह आहे. तो सतत पुढे जातो आणि चांगले बदल तेवढे समाज स्वीकारतो. परंतु, जगातील सर्व भूभागात एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे विवाहसंस्था. विवाहसंस्थेची बंधने भौगोलिक परिस्थिती व काळानुरूप बदलत असतात. भारतासारख्या उष्णकटीबंधीय देशात भारतीय परंपरा व संस्कृतिनुरूप जीवनपद्धती समाजस्वास्थ्याची समायोजक असल्याचे अनेक वर्षांच्या अनुभवांती दिसून येते.
लई पानी देता
आधुनिक पिढीबद्दल काय बोलावे? बहुतेक घरी एक किंवा दोन मुले आहेत, तिही अत्यंत लाडावलेली. अति लाड करणे घातकच, हे परंपरागत माहीत असलेलं सत्य. पण, बहुसंख्य पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्याचे दुष्परिणाम मुलाबाळांना भविष्यात भोगावे लागतात.
झाडाला जास्त पाणी घातले तर त्याची मुळे फार खोलवर जात नाहीत. मानवी जीवनाची दिशा दर्शविणारी ही एका कवयित्रीची सुंदर कविता आहे-
लई पानी देता, मुळे होतील ऐदी
सुखाचेच कैदी रातदिन
लई पानी देता, लाडावती रोप
डांग आडमाप फोफावते
खते खाऊनिया माजतात झाडं
मस्तवाल खोड इथे-तिथे…
मागील एका वर्षात महाराष्ट्रात पस्तीस हजार घटस्फोट झाले. त्यापैकी जवळपास महत्तम घटस्फोट मुंबई, पुणे व नाशिक या सुवर्ण त्रिकोणातील असून, त्यापैकी ८० टक्के घटस्फोट सुशिक्षित व उच्च आर्थिक संपन्नता असलेल्या गटातील होते, अशी माहिती प्रसिद्ध झाली आहे.
सामाजिक परिवर्तनातून आलेल्या स्वत्वाने कधी कधी स्त्री-पुरुष संघर्ष पराकोटीला पोहोचतो. अख्ख्या आयुष्यभराची साथ द्यावयाची सप्तपदीतील शपथ परस्पर सामंजस्याअभावी वर्ष-सहा महिन्यात झालेल्या द्वंद्वात विसरली जाते आणि घटस्फोटाकडे वाटचाल होऊन संसार उद्ध्वस्त होतो. त्याची खंत कुणालाही वाटत नाही, परत डाव मांडायला मोकळे होतात. त्यांना तो भातुकलीचा पोरखेळ वाटतो. जेव्हा प्रथम विवाहाचा उभयंतांचा संमतीने घडलेला समाजमान्य ‘खाटमांडू’ सामंजस्याअभावी घटस्फोटाकडे वाटचाल करीत असेल, तर दुसरा ‘पाटमांडू’ विवाह तरी सुखकारक ठरेल काय? याचा विचार उभयतांनी करायला पाहिजे. कारण, संसार हे स्त्री-पुरुषातील द्वंद्व नाही.
मानवी हक्क
हिंसामुक्त जीवन हा स्त्रीचा मानवी हक्क आहे. या दृष्टिकोनातून नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातील काही ठळक तथ्ये पुढीलप्रमाणे-
* उच्चशिक्षित आणि अशिक्षित स्त्रियांवर होणार्या अत्याचाराचे प्रमाण सामान्य शिक्षित स्त्रियांवरील अत्याचाराच्या तुलनेत अधिक दिसून आले.
* लहान वयात लग्न झालेल्या स्त्रियांच्या अत्याचाराच्या तुलनेत उशिरा लग्न झालेल्या स्त्रियांमध्ये जास्त आढळून आले.
* मध्यमवर्गीय आणि उच्च उत्पन्नगटातील कुटुंबात मानसिक अत्याचाराचे प्रमाण अधिक आढळले.
* संयुक्त कुटुंबापेक्षा एकल कुटुंबात तुलनेने स्त्रियांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. हे निकष समाजाच्या वास्तवतेची जाण देतात. खरे म्हणजे भारतीय समाजव्यवस्थेचा तथाकथित ‘पुरुषप्रधान’ डोलारा खर्या अर्थाने बहुसंख्य स्त्रियांच्या त्याग व विवेकशील सद्वर्तनावर अवलंबून आहे.
सर्व्हायल इन्स्टिन्क्ट
स्वतंत्र भारतात आपल्याला स्वतंत्रपणे विचार करण्याचा, ते मांडण्याचा, हवं तिथे काम करण्याचा, मोकळेपणाने जगण्याचा हक्क मिळाला आहे. परंतु, भारताने सन १९९१ पासून स्वीकारलेल्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरण नीतिअंतर्गत वाढत्या महागाईने त्रस्त झालेली जनता जगण्यासाठी अधिक पैसा व सुखसोई मिळविण्याच्या हव्यासात माणूस एक उपकरण बनलेला आहे. फ्लॅट, गाडी, प्रमोशन आणि अधिक बँक बॅलन्स मिळविण्याच्या धुंदीत तो एवढा राबतोय् की, स्वत:च्या सुखी जीवनाचा, कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचा विचार करण्याची सवड त्याच्याजवळ नाही. त्यात पुरुषांबरोबर महिलांचाही सहभाग आहे. आताची पिढी तर जन्मापासून एकविसाव्या दशकाचे ‘सर्व्हायल इन्स्टिन्क्टचे’ बाळकडू पिऊन आहे म्हणजेच याच भोगवादी मुक्त अर्थवादामुळे एमडीआरएल एअर लाइन्सची माजी कर्मचारी तेवीस वर्षीय गीतिका शर्मा हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे तिच्या मृत्युपूर्व चिठ्ठीत लिहून ठेवलेले आढळले. हरयाणाचे राज्यमंत्री गोपाल कांडा यांना या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला.
पैशासाठी सर्वकाही
सामाजिक उत्क्रांती ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. सामाजिक बदल अपरिहार्य असतात, पण त्याची गती सौम्य असते. परंतु, जागतिकीकरणाच्या लाटेत मोबाईल, लॅपटॉप, बाईक व तोंडाला गुंडाळलेल्या ओढणीने सर्व संदर्भ बदलले आहेत व जे परिवर्तन अनेक वर्षांनी घडले असते, ते बहुसंख्य घरांच्या उंबरठ्यावर आले आहे. त्याचे प्रत्यंतर शाळकरी मुली, कॉलेजकन्यका, सीरियलमधील तारका आणि मध्यमवयीन स्त्रिया पैशाच्या हव्यासाने पोलिसांच्या छाप्यात सामान्य हॉटेलमध्ये, पंचतारांकित हॉटेल तथा रेव्हपार्ट्यांत पकडल्या जातात. त्यावरून पैशासाठी सर्वकाही अशीच एकंदरीत स्थिती आहे, असे दिसून येते.
पाटमांडू
आतापर्यंत नवसंस्कृतीचे वारे चोचले म्हणून आर्थिकदृष्ट्या अतिसंपन्न वर्गात व गरज म्हणून आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गात घोंगावत होते. सध्या मध्यमवर्गात टोरनाडो बनून प्रचंड वेगाने घोंगावते आहे. समाजाला सभ्य आणि सुसंस्कृत मानवांचा सतत पुरवठा व्हावा हे विवाहसंस्थेचे प्रयोजन होते, ते अबाधित राहण्याची गरज आहे. म्हणूनच पुरुषांनी पूर्वकालीन पुरुषप्रधान संस्कृतीप्रमाणे स्त्रीचे क्षेत्र केवळ चूल आणि मूल असल्याच्या भ्रामक समजुतीतून बाहेर पडावे, सहचरी म्हणून तिचा सन्मान करावा आणि स्त्रीने व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावावर आत्मकेंद्रित न राहता सर्वार्थाने सामंजस्याची भूमिका स्वीकारल्यास संसारातील द्वंद्व संपेल आणि खर्या अर्थाने संसार सुखाचा होईल. विवाह खाटमांडू असोत की, पाटमांडू असोत, ते टिकणे आवश्यक आहे. कारण, त्यापुढील पाऊल स्वैराचाराकडे वळणारे असेल. म्हणूनच-
‘झाले गेले विसरून सारे
सोबत राहण्याचा करू गुन्हा
विसकटलेले जीवन धागे
चल परत जुळवू या पुन्हा’
अशी भूमिका स्वीकारायला पाहिजे.
भास्करराव ज. अरबट, ७८७५३८०२८९