|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 25.43° से.

कमाल तापमान : 25.99° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

25.99° से.

हवामानाचा अंदाज

24.24°से. - 26.16°से.

गुरुवार, 23 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.54°से. - 26.57°से.

शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.9°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.24°से. - 27.36°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.65°से. - 27.79°से.

सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.72°से. - 28.15°से.

मंगळवार, 28 जानेवारी छितरे हुए बादल
Home » युवा भारती » पाऊस काही रुपे काही रंग

पाऊस काही रुपे काही रंग

पाऊस… माणसांचा सखा, धरतीचा मित्र. पाऊस म्हणजे निसर्गाची सृजनशील प्रतिभा. पाऊस म्हणजे निसर्गाची उत्कट कविता. पाऊस म्हणजे सृजनशीलतेची अक्षय ऊर्जा. पाऊस म्हणजे नवनिर्माणाचा सोहळा!

* * * *
पाऊस म्हणजे आई. पाऊस म्हणजे सदासर्वदा समता देणारे मातृहृदय. पाऊस म्हणजे साक्षात वात्सल्य. पाऊस म्हणजे करुणा. मायेच्या नात्यांचा शब्दातीत गोतावळा म्हणजे पाऊस. शब्दांत न मावणार्‍या आभाळभर भावना म्हणजे पाऊस. अगणित धारांनी कोसळणारा पाऊस म्हणजे वात्सल्याचा, प्रेमाचा कल्लोळ!
* * * *
पाऊस म्हणजे ओहोटी नसणारी अपार प्रीती, पाऊस म्हणजे न आटणारी भक्ती. मनामनांची बेरीज करणारी सृजनवेळा म्हणजे पाऊस. अनामिक आर्ततेनंतरची तृष्णातृप्ती म्हणजे पाऊस.
* * * *
पाऊस म्हणजे गावाच्या जगण्याला श्‍वासांचे आंदण. पाऊस म्हणजे कोरड्या तलावांच्या पदरातला थेंबांचा जोगवा. पाऊस म्हणजे लोकसरितेला आभाळाचे जीवनदान. पाऊस म्हणजे शेतांना, जंगलांना दिलेला हिरवाईचा स्वाभिमान. धरतीच्या अंगाला अंकुरांची हिरवीगर्द पिसे येणे म्हणजे पावसाचे येणे!
* * * *
पाऊस म्हणजे निरागसांच्या ओठावरचे बडबडगीत. रस्त्याच्या कडेला वाहणार्‍या ओहोळांमध्ये चिमुकली नाव सोडण्याचा महोत्सव म्हणजे पाऊस. पोरासोरांच्या भिजण्याचे खरे नाव पाऊस. शाळेभोवतीच्या तळात मुलांचे मनसोक्त धावणे आणि आकाशात ढगांचे धावणे जेव्हा एकाच वेळी सुरू असते तेव्हा पाऊस बालगीतांचा मल्हार आळवतो. पाऊस म्हणजे मूर्तिमंत बालपण.
* * * *
पाऊस म्हणजे फक्त उत्कट आनंदच असतो का? कधी पाऊस बेसुमार बरसतो, तेव्हा तो निर्दयी वाटतो, पाऊस म्हणजे दु:खाचा ऋतू वाटतो. नदी तीरावरचा गाव रात्रभर रडतो अन् फूल तोडावे तसा नदीचा पूर एखादा जीव खुडून नेतो. पिकांच्या माना मुरगाळतात. घराच्या छपराला आधार देणारे भिंतीचे हात निखळतात. घराचे-बापाचे हृदय गहिवरते. आईचा पदर मुलांच्या जिवासाठी किल्ल्याचा परकोट होतो. नदी जेव्हा वस्तीतील प्रत्येकाच्या घरी पाहुणी जाते, तेव्हा सारेच धान्य आंदण म्हणून घेऊन जाते. चिमणीलाही टाकायला जेव्हा घरात दाणे नसतात, तेव्हा घरातले चिमणे जीव गहिवरल्या गळ्याने भुकेची भैरवी गातात. अशा वेळी पाऊस सखा नसतो, पाऊस असतो जन्माचा वैरी; मरण देत नाही अन् जगणे हिरावल्याशिवाय राहात नाही. पाऊस म्हणजे आभाळभर दु:ख, पाऊस म्हणजे फक्त रडणे. बेसुमार पाऊस आभाळातून अश्रूंचे खलिते पाठवतो. बेसुमार पाऊस गावाला युद्धकैद्यांचे मरण नावाचे जगणे देतो. माणसांचा कणाही मोडून टाकतो अनेकदा क्रूर पाऊस!
* * * *
फूटपाथवरच्या पावसाला मनच नसते. भीक मागणार्‍या पोरांच्या उघड्या अंगांची पावसाला तमा नसते. औषधाविना रस्त्याच्या कडेला तळमळून मरणार्‍यांनाही पाऊस जीव जातपर्यंत छळल्याशिवाय राहात नाही. स्मशानात जळणार्‍या प्रेतांवरही पावसाची वक्रदृष्टी पडल्याशिवाय राहात नाही. गटारातले पाणी जेव्हा फूटपाथवर येते, तेव्हा माणसे मुंग्यांसारखी आश्रय शोधतात. फूटपाथवरची पावसाळी रात्र म्हणजे प्रेताजवळ जागण्याची रात्र असते. अन्नाला पारख्या असणार्‍या दिवसाची भुकेली रात्र म्हणजे फूटपाथवरचा पाऊस! फूटपाथवरच्या आणि महानगरीय झोपडपट्ट्यांमधल्या माणसांसाठी पाऊस दयाघना कधीच नसतो. पावसाची झड रोजगार बुडवते, झोपड्यांच्या गर्दीत पाणी तुंबते, चहूकडे पाणी पण पिण्याला थेंब नाही, असे घडते, तेव्हा ढगांतून पाऊस नव्हे, दु:ख, वेदना, अश्रू, समस्या, दारिद्र्य बरसते.
पावसाशी आपले शब्दात न मावणारे नाते असते. सर्वस्व हिरावून नेणारा, जन्माचा वैरी अशीही रूपे असली तरी पाऊस हवाहवासा वाटतो. पाऊस गद्दार असतो, पाऊस दगाफटका करतो, एकदा भेटून अंगभर खेटून पुन्हा न भेटणारा प्रियकर असाही पाऊस असतो आणि वेड्या आशा पल्लवीत करून न येणारा दुष्काळाचे दुष्कृत्य करणाराही पाऊसच असतो; पण तरीही पावसावरची प्रीत ढळत नाही; पाऊस नको असे मन म्हणत नाही. आभाळ थेंबाथेंबांनी जेव्हा धरणीला भेटते, तेव्हा थेंबाएवढे मन ढगाएवढे होते. मातीचा सुवास जेव्हा आभाळाला जडतो, पाऊस तेव्हा प्रत्येकाच्या मनात दरवळतो. पावसाचा स्पर्श मायेचा स्पर्श असतो. पावसाचा स्पर्श मातीच्या सृजनशील अस्तित्वाचा स्पर्श असतो. पाऊस म्हणजे ये हृदयीचे ते हृदयी देण्याच्या समर्पणशीलतेचा उत्कट संस्कार! पाऊस रुसला तरी त्याच्यावरचे प्रेम कमी होत नाही, उलट वाढते. अन् पाऊस बेसुमार बरसला; दु:खाला पारावार नसणारा पूर आला तरी आता कधीच पाऊस नको; असे म्हणता येत नाही. पावसावर मानवाचं अखंड आणि अथांग प्रेम आहे. पाऊस चिडवतो, रडवतो, कधी आयुष्यातून उठवतो, कधी जिवंतपणीच मरणाचाही अनुभव देतो, पण चिवटपणे जगणे शिकवतो. जगण्यावर शतदा प्रेम करण्याची उदंड ऊर्जा पाऊस देतो. पावसाला त्याच्या सर्व दोषांसह स्वीकारता येत नाही आणि त्याच्या सर्व गुणांसह नाकारताही येत नाही. स्वीकारल्यावर आपला म्हणता येत नाही आणि नाकारल्यावर परका म्हणता येत नाही. पावसाचे प्रत्येकाशी शब्दांच्या, भावनांच्या पलीकडचे नाते आहे. पाऊस नावाच्या निसर्गाच्या एका रूपाचे माणसांशी हळवे अनुबंध आहेत. हे अनुबंध शब्दात गुंफले, त्याचे रंग, त्याची रूपे कितीही आळवली, तरी त्यातले नवेपण संपत नाही. पाऊस असा वेगळा आणि विरळा असतो.
प्रा. अजय देशपांडे, ९८५०५९३०३०

Posted by : | on : 24 Aug 2012
Filed under : युवा भारती
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g