Home » विविधा » संक्रांतीचे वाण आणि वसा

संक्रांतीचे वाण आणि वसा

 Tilgul आटपाट नगर होतं. नगराचा राजा प्रजेची सुखदु:खं जाणून घ्यायचा. एकदा नेहमीप्रमाणे राजा प्रधानजीला म्हणाला, ‘‘काय प्रधानजी, राज्यात सर्व कुशल मंगल आहे ना? काही खास खबर?’’
प्रधानजी- राजेसाहेब, तसे सर्व कुशलमंगल आहे. पण, आपल्या राज्यात अलीकडे मुलींचा दुष्काळ पडत आहे.
राजा- काय म्हणता प्रधानजी? मुलींचा दुष्काळ! अहो, अन्नाचा दुष्काळ, पाण्याचा दुष्काळ समजू शकतो, पण मुलींचा दुष्काळ! डोकं ठिकाणावर आहे का तुमचं?
प्रधानजी- खरंच सांगता, राजेसाहेब. अहो, गावागावातून मुलींची संख्या इतकी कमी झाली की, भावांना ओवाळण्यासाठी, राखी बांधण्यासाठी बहिणी कमी पडतात, एवढंच नाही तर लग्नायोग्य मुलांना मुली मिळत नाही.
राजा- अरे बापरे! काय सांगताय् काय? प्रधानजी ही तर मोठीच समस्या आहे. मुलींची समस्या होणे यातून कितीतरी समस्या निर्माण होणार, समाजाचा समतोल बिघडणार, सामाजिक आरोग्य धोक्यात येईल… तेव्हा-
प्रधानजी- तेव्हा आता काय करायचे?
राजा- काय करायचे म्हणजे? आत्ताच्या आत्ता तुम्ही कामगिरीवर निघा. आपल्या राज्यात मुलींची संख्या एवढी कमी का झाली? याची कारणे शोधून काढा. राज्यात मुलींची संख्या वाढेल असे अभियान राबवा. निघा. निघा लवकर.
प्रधानजी- होय महाराज, मी तपास करून पाहतो. (प्रधानजी वेष बदलून निघाले. वाटेत एका घराजवळ थांबले. त्यांना आतून संवाद ऐकू आला.)
गीता- आलीस का वं सुमन? काय म्हंते तुई सून?
सुमन- आता सून का म्हननार हाय? आता नातवाची वाट पाहून राह्यलो. या वक्ती मले नातूच पायजे बाप्पा.
गीता- पन मले सांग सुमन, ते का आपल्या हातची गोस्ट हाय.
सुमन- आता हातचं नाही म्हून पोरीयांची गर्दी का करायची हाय? मी मायावाल्या सुनेला म्हनलं का तू बी तपासणी करून घे. पोरगी हाय का पोरगा हे समजते मने पह्यलेच. पोरगा आसन तर राहू दे नाहीतर…
गीता- नाहीतर सुमनताई, काय करनार आहात तुम्ही?
सुमन- काय करनार म्हंजे? आजपावतं तीन वेळा जे केलं तेच. पोट्टी नाय पायजेन बाप्पा. पोरगी असंन तर जलमायच्या अगोदरच…
गीता- बस्स बस्स झालं आता सुमन. अग, तू सुद्धा कोणाची तरी मुलगी आहेस, हे कसं विसरतेस? असा निष्ठुरपणा करायला तुला काहीच कसं वाटत नाही?
सुमन- आता मले का वाटनार हाय? आपल्या घरादाराला वारस पायजे. वंशाला दिवा पायजे हे खोटं हाय का?
गीता- वंशाचा दिवा, वंशाचा दिवा मनता मनता तुम्ही हे काय चालवलं आहे? आता मात्र मी तुझ्या सुनेच्या पाठीशी आहे. मी हे मुळीच खपवून घेणार नाही. बिचारी पुष्पा. सतत तिच्यावर जबरदस्ती करून तुम्ही तिची तब्येत किती खराब करून टाकली आहे.
सुमन- तिच्या तब्येतीले का धाड भरली हाय? चांगले खाते पेते अन् पसरते.
गीता- असं कसं म्हणते सुमनबाई, अगं येणारं बाळ हे मुलगा असो की मुलगी असो, आईला सारख्याच वेदना सहन कराव्या लागणार नाही का? अगं येणारं बाळ हे निरोगी, योग्य वजनाचं, सुदृढ व्हावं म्हणून गर्भवती स्त्रीने सकस पोषक आहार घ्यायलाच हवा. तसेच अशा अवस्थेत खूप अवजड काम करू नये. जरा विश्रांतीही घ्यावी. मीच सांगितलं तुझ्या सुनेला तसं.
सुमन- हो वं गीता मोठ्ठ्या डागदरनीवानी तू बी सांगून राह्यली.
गीता- अग बाई बरं आठवलं. आपल्या गावातल्या डॉक्टर मॅडम येणार आहेत तिळगूळ समारंभाला, संक्रांतीच्या हळदीकुंकवाला, चल ना तू पण. गावातल्या सगळ्या बायकांना बोलावलं आहे.
सुमन- चाल बाई चाल. डाक्टरीनबाईची भेट बी होईन. चाल ना चाल.
(दोघीही जातात.)
डॉक्टर- नमस्कार मंडळी. कशा आहात तुम्ही. मला दवाखान्यातून निघायला जरा उशीरच झाला.
गीता- तुम्ही आमच्यासाठी वे काढून आल्या हे आमचं भाग्यच.
डॉक्टर- तसं काही नाही. आज संक्रांतीच्या तिळगूळ समारंभाच्या निमित्ताने तुमच्याशी भेटायला बोलायला मला खूप आवडेल.
काय सुमनबाई, काय म्हणते तुमची सून?
सुमन- आता सून काय म्हननार हाय. एक-दोन दिवसात घेऊनच येतो तिले दवाखान्यात.
डॉक्टर- जरूर या. फार गुणी आहे तुमची सून.
सुमन- व्हय व्हय, पण तिच्यावानी नातू बी व्हायला पायजेन नाई का? तुमच्या वाल्या दवाखान्यात आन् नातू होनार की न्हाई सांगजा बाप्पा.
डॉक्टर- अहो सुमनताई, आम्ही पेशंटच्या ज्या काही टेस्ट करतो त्या काही प्रॉब्लेम तर नाही हे बघण्यासाठी.बाळाची वाढ नीट होतेय् की नाही हे पाहण्यासाठी.
गीता- पहा ना मॅडम, मी नेहमीच सुमनबाईला या बाबत सांगत असते. गर्भलिंग परीक्षा म्हणजे मुलगा आहे की मुलगी हे पाहणे म्हणजे गुन्हा करणे होय असे ऐकले आहे.
डॉक्टर- अगदी बरोबर आहे. हे बघा भगिनींनो, आजकाल लोक गर्भलिंग परीक्षा करून मुलगी असेल तर तिला जन्मालाच येऊ देत नाही. यामुळे मुलींचा जन्मदर सगळीकडेच कमी झाला आहे म्हणून आपल्या सरकारने कायदाच केला आहे.
सुमन- कायदा? कायचा कायदा जी आमाला सांगा ना.
डॉक्टर- गर्भलिंग परीक्षा करावयास भाग पाडणारे कुटुंबीय आणि प्रत्यक्ष गर्भलिंग परीक्षा ही टेस्ट करणारी व्यक्ती म्हणजे वैद्यकीय अधिकारी यांना कायद्यानुसार सजा आणि दंड देण्याची तरतूद आहे.
गीता- हो ना डॉक्टर मॅडम, टीव्ही आणि पेपरमधून खूप दाखवले जाते याबद्दल.
डॉक्टर- खरंच गीताबाई, तुम्ही खूप जागरूक आहात ही खूप चांगली गोष्ट आहे. परंतु, या बाबत संपूर्ण गावात जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. हे बघा भगिनींनो, आपल्या राज्यातील मुलींची संख्या झपाट्याने कमी होत आहे ही एक फार मोठी सामाजिक समस्या आहे. मुली नको म्हणून त्यांना जन्मालाच येऊ द्यायचे नाही ही प्रवृत्ती समाजात वाढत आहे. म्हणूनच सरकारने आता गर्भलिंग परीक्षेवर कायद्याने बंदी घातली आहे. समाजात मुलींची संख्या कमी होणे ही फार भीषण समस्या आहे. समाजातील मुलींची, स्त्रियांची संख्या कमी झाली तर समाजात अनाचार, अत्याचार वाढेल. तुम्ही सर्व भगिनी हे लक्षात का घेत नाही?
सुमन- खरं हाय डाक्टरीनबाई आत्ता माह्या डोस्क्यात परकाश पडला.
डॉक्टर- नुसता प्रकाश पडून चालणार नाही आता सर्वांनी आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालून घ्यायचे आहे.‘लेक वाचवा, लेक वाचवा’ हे अभियान राबवायचे आहे. राजाज्ञाच आहे तशी.
राज्यात सर्वत्र मुलींचा जन्मदर कसा वाढेल या बाबत उपाययोजना सुरू झाल्या. कळदीकुंकवाच्या कार्यक्रमात बायका म्हणू लागल्या.
संक्रांतीत मिळाला काटेरी हलवा
अहो लेक वाचवा, तुम्ही लेक वाचवा.
समाजातील सर्वच स्तरावर लेकींना, मुलींना वाचवण्यासाठी अभियान सुरू झाले. म्हणूनच बायांनो, मायभगिनींनो लेकींवर प्रेम करा. त्यांचा गळा घोटू नका. भगिनींनो आपल्या लेकींंना वाचवा, फुलवा पण कळ्या असतानाच खुडू नका. आपली लेक, मुलगी ही दोन घरांचा उद्धार करते.
रोशन करेगा बेटा तो एक कुलका
दो दो घर की लाज होती हैं बेटीयॉं
सगळीकडे नारे गुंजू लागले. मुलींचे महत्त्व आपण विसरलो आणि बाईच बाईच्या जिवावर उठली तेव्हा सखे-
जागव ग जागव समाजाला जागव
समाजासाठी आपल्या लेकीला वाचव
अशा या आपल्या मुली स्वत: मात्र
कॉटोकी राहपर खुद ही चलती रहेगी
औरोंके लिए फुल बोती हैं बेटियॉं
अशा प्रकारे आपण लेकींना वाचवले तर समाजाची सर्वच क्षेत्रे स्त्रियांच्या कर्तृत्वाने फुलतील. समाजात स्त्रीच्या जन्मामुळे नवे तेज आणि चैतन्य प्राप्त होते.संक्रांतीच्या संक्रमण पर्वावर समाजात विचारसंक्रमण व्हावे, यासाठी राजाने ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधी’ अभियान चालवले, समाजाने लेकींना वाचवण्याचा वसा घेतला, राजा प्रजेला म्हणाला, ‘‘ऊतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका.’’
लेकींना वाचविण्याचे अभियान यशस्वी करून कुटुंबातील लेकी, बहिणी, सासू, सुना सगळ्या सुखी झाल्या, आनंदी झाल्या. तसेच, आपल्याही घरात मुलींना सुखी होऊ द्या, आनंदी होऊ द्या. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण होवो.
जयश्री देशकर
नागपूर

Short URL: https://vrittabharati.in/?p=1520

Posted by on Feb 6 2013. Filed under विविधा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in विविधा (2 of 7 articles)


जासत्ताक भारताचा सहा दशकांचा कालावधी लोटल्यानंतर स्त्रीशक्तीची वाटचाल लक्षात घेता,जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत स्त्रियांनी पुरुषांच्या बरोबरीने आघाडी घेतलेली आहे,हे वास्तव असतानाही ...

×