Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » सामान्यांचे प्रतिनिधित्व करणारा नेता हरपला: मुख्यमंत्री

सामान्यांचे प्रतिनिधित्व करणारा नेता हरपला: मुख्यमंत्री

=आर. आर. पाटील, पानसरेंना विधिमंडळाची श्रद्धांजली=
Devendra-Fadnavis3मुंबई, [९ मार्च] – आर. आर. पाटील यांनी संसदीय कामकाजात दाखवलेली सर्वसामान्यांसाठीची तळमळ आणि गोरगरिबांसाठी राबविलेले अनेक पथदर्शी उपक्रम बघता, जाणीवेचा लोकप्रतिनिधी, उत्तम वक्ता, अभ्यासू नेता, उत्कृष्ट संसदपटू आणि खर्‍या अर्थाने अतिशय उत्तम माणूस, सर्वसामान्यांचे, गोरगरिबांचे प्रतिनिधित्व करणारा संवेदनशील नेता या सभागृहाने आणि राज्याने गमावला आहे, अशा भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सभागृहात व्यक्त केल्या.
अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, आमदार प्रकाश उर्फ बाळा सावंत, माजी मंत्री जगन्नाथ जाधव, माजी मंत्री रमेश वळवी, माजी आमदार भागुजीराव गाडे-पाटील, माजी आमदार सुखदेव उईके, माजी आमदार रामकिशन दायमा, माजी आमदार विश्‍वनाथराव जाधव आणि ज्येष्ठ समाजसेवक गोविंद पानसरे यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सामान्य कुटुंबातून राजकारणात आलेल्या आबांनी कायम सर्वसमान्य जनतेचा विचार केला. संसदीय राजकारणातील सारी आयुधे जनहितासाठी वापरण्यासाठी त्यांची धडपड असे. म्हणूनच संसदेच्या धर्तीवर जेव्हा विधिमंडळात उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराची सुरुवात करण्यात आली तेव्हा त्याचे पहिले मानकरी आबा ठरले. गृहमंत्रिपद सांभाळताना पारदर्शक पोलिस भरतीची प्रक्रिया आबांनी राबविली. तंटामुक्तीसारख्या त्यांच्या योजनांची दखल जागतिक पातळीवर घेतली गेल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
आबांच्या मनात ‘बडे बडे शहरो मे…’ चे शल्य- अजित पवार
राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ म्हणजे जवळपास अकरा वर्षे गृहमंत्रिपदी राहणार्‍या आर. आर. पाटील यांनी तत्त्वांशी कधीच तडजोड केली नाही. पारदर्शीपणे कारभार केला. पण, शेवटपर्यंत त्यांच्या मनाला एक शल्य होते. ते म्हणजे २६/११ च्या मुंबई हल्ल्यानंतर ‘बडे बडे शहरों मैं..’ हे वाक्य त्यांच्या तोंडी घालण्यात आल्याचे. आबा तसे बोलले याचा कोणताच पुरावा नाही आणि त्यांनी स्वत: त्याचे खंडनसुद्धा केले. पण, माध्यमांसह सर्वांनीच त्यांच्यावर टीका केली. या आरोपाची शल्य त्यांना कायम होते. किमान आता तरी त्या आरोपातून आबांना मुक्त करा, असे भावनिक आवाहन आबांच्या शोकप्रस्तावावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत केले. आपण सर्वांनी तंबाखूपासून दूर राहू असा निर्धार केल्यास, तीच आबांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही अजित पवार म्हणाले.
प्रामाणिक आबांनी शेवटी बेईमानी केली – सुधीर मुनगंटीवार
आर. आर. पाटील म्हणजे कलियुगात जन्माला आलेला दुर्मिळ प्रजातीचा नेता होता. एक नेता जो हृदयाने काम करतो असा. त्यांच्यात प्रामाणिकता होती, इमानदारी होती. असे असताना शेवटी मात्र कुणालाही कळू न देता आमच्याशी बेईमानी करून धोका देऊन सोडून गेले, या शब्दात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोकप्रस्तावावर बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. आबा सामाजिक कार्यकर्त्यांसाठी ऊर्जा देणारे स्रोत होते. आज व्यक्ती गमावला नसून, दीपस्तंभ गमावला आहे. लोकशाही ही केवळ राज्य करण्याची पद्धत नसून, तो जीवन जगण्याचा मार्ग आहे. असे सांगणारा नेता आमच्यात आज नाही. भविष्यात त्याची भाषणं, शब्द आणि विचार आम्हाला प्रेरणा देत राहील, असेही मुनगंटीवार म्हणाले.
यावेळी विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, गणपतराव देशमुख, एकनाथ शिंदे, जयंत पाटील, पतंगराव कदम, अर्जुन खोतकर, छगन भुजबळ, अबू आझमी आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21217

Posted by on Mar 10 2015. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (1945 of 2451 articles)


=औरंगाबाद येथे गोपीनाथ मुंडेंचे भव्य स्मारक उभारणार= मुंबई, [९ मार्च] - समाजाच्या सर्वस्तरांतील लोकांच्या कल्याणासाठी आणि विशेष करून तळागाळातील व ...

×