Home » अग्रलेख, संपादकीय » आता खरी कसोटी

आता खरी कसोटी

न खोखले दावे, न झुटे वादे
सच की राजनीती, स्वराज का संकल्प
अशी घोषणा करत निवडणुकीपूर्वी आपले वचनपत्र जनतेला सादर करणार्‍या आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बरेच आढेवेढे घेत शेवटी राजकारणाच्या सारिपाटावर सत्तेचा डाव मांडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. येत्या गुरुवारी त्यांचा शपथविधी होऊ घातला आहे. सत्तेपासून कोसो दूर राहिलेल्या, पंधरा वर्षे दिल्लीवर सत्ता गाजवल्यानंतर आता केजरीवालांना पाठिंबा देण्याची नामुष्की ओढवलेल्या कॉंग्रेसवाल्यांना ‘आप’चा हेवा वाटणे स्वाभाविक आहे. सत्तेच्या अगदी जवळ पोहोचूनही त्यापासून दूर राहावे लागलेल्या भाजपाच्या नेत्यांनाही हळहळ वाटणे नैसर्गिक आहे. पण आता खरी सत्त्वपरीक्षा आहे ती अरविंद केजरीवालांची.
दिल्लीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर उद्भवलेल्या त्रिशंकू अवस्थेत कॉंग्रेस अगदीच स्पर्धेबाहेर फेकली गेली. तर सर्वाधिक जागा मिळूनही भारतीय जनता पक्षाला सत्ता स्थापनेची संधी मिळाली नाही. या वावटळीत दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष, तिसर्‍या क्रमांकाच्या पक्षाची सोबत घेऊन सत्तेच्या चाव्या ताब्यात घ्यायला सज्ज झाला आहे.
‘आप’च्या रूपात सामान्य माणसांचा पक्ष पहिल्यांदाच या देशात दिल्लीसारख्या राज्यात सत्तेवर येतोय्. नाही तर आजवर मतदानाच्या पलीकडे कधी अधिकार गवसले नाहीत त्याला. कधी कुण्या राजकीय पक्षाला, कधी मोठ्या घराण्यातील राजपुत्रांना, झालंच तर गावगुंडांना आपल्या किमती मतांच्या भरवशावर निवडून द्यायचे आणि त्यानं चालवलेला तमाशा उघड्या डोळ्यांनी बघायचा. वाट्याला येतील त्या बाबी नशिबाचे भोग म्हणून सहन करायचे, एवढेच काय ते त्याच्या हातात असायचे. यावेळी पहिल्यांदाच तो राजसिंहासनावर बसण्याचा अनुभव घेणार आहे.
सामान्य माणसाच्या मनातल्या स्वप्नांना खुणावत आम आदमी पार्टी निवडून आली आहे. कल्पनाही केली नसेल एवढी मते दिल्लीकरांनी आपच्या झोळीत टाकली. तेरा महिन्यांपूर्वीच स्थापन झालेल्या आपला थेट सत्तेच्या दालनात नेऊन सोडले जनतेने. हे यश अनाकलनीय होते, तसेच अनपेक्षितही होते. त्यामुळेच की काय हडबडलेल्या आपने सुरुवातीपासूनच सत्तेसाठी नकारघंटा वाजविली होती. मुलामा तत्त्वांचा असला, तरी मुळात सत्ता सांभाळण्याचे आव्हान आपल्याला पेलवेल की नाही, याबाबत मनात असलेली साशंकता आणि भीती त्या नकारातून स्पष्ट होत होती.
लोकांचा दबाव आणि विरोधकांच्या राजकीय खेळीने या पक्षाला सत्तेच्या दारापर्यंत आणून सोडले आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, आपण सत्तेवर येऊ असे कधी वाटले नसावे केजरीवालांना. पण कॉंग्रेसची धोरणं आणि महागाईने पिचलेल्या सामान्य माणसाने त्या पक्षाला पाऽऽर दूर फेकत कधी नव्हे, ते सामान्य माणसाच्या पक्षाला आणि त्याच्या सामान्य नेत्याला सत्ता स्थापनेची संधी बहाल केली आहे.
स्वत: पराभूत झाल्यानंतर आपला सत्तास्थापनेचे आव्हान देताना कॉंग्रेसच्या मनातली खदखद स्पष्टपणे जाणवत होती. वाटलं तर आम्ही देतो पाठिंबा, पण सरकार स्थापन करा! असे सांगणार्‍या कॉंग्रेसच्या नेत्यांची भाषा आता मात्र बदलली आहे. हा पाठिंबा विनाअट असणार नाही, तो मागे घेण्याचा पर्याय खुला असल्याचे शीला दीक्षित आता म्हणताहेत. याचाच अर्थ केजरीवालांना सुखासुखी राज्य करू न देण्याची योजना कॉंग्रेसने अप्रत्यक्षपणे अगदी पहिल्याच दिवशी जाहीर करून टाकली आहे.
आम आदमी पार्टीने निवडणुकीच्या काळात दिलेली आश्‍वासनं लईच भारी आहेत. खरं तर या देशातल्या सामान्य माणसाचं ते स्वप्न आहे. पण धनदांडग्यांच्या गराड्यात कायम वेढलेल्या सत्ताधार्‍यांनी आजवर त्या स्वप्नांचा कायम चुराडाच केला. त्याच स्वप्नांच्या झुल्यावर आकाशी उंच झोके घेण्याचा इरादा केजरीवालांनी जाहीर केला अन् जनतेनं त्याला भक्कम पाठिंबा दिला. म्हणूनच केजरीवालांच्या सुरुवातीच्या नकाराने अस्वस्थ झालेल्या आम जनतेचा उत्साह आता त्यांच्या होकारानंतर कसा ओसंडून वाहतोय्. आपल्या इच्छा, आशा, आकांक्षा पूर्ण करणारा एक माणूस दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होत असल्याचे दृश्य लक्षावधी लोक मोठ्या आतुरतेने डोळ्यात साठवणार आहे. त्या अनुपम सोहळ्याचे साक्षीदार होताना आपल्या स्वप्नपूर्तीची दालनं नकळत खुललेली त्याला दिसणार आहेत. कारण कधी नव्हे, ते केजरीवालांच्या आम आदमी पार्टीने त्याच्या स्वप्नांना साद घातली आहे.
सत्ता गमावलेल्यांनी पहिल्या दिवसापासूनच, केजरीवालांनी एकदा सरकार चालवून बघावेच, असे आव्हान दिले आहे. दुरून बोलणे केवढे सोपे असते अन् प्रत्यक्षात काम करणे किती अवघड, हे या निमित्ताने त्यांना कळावे अन् जनतेच्या मनातला भ्रमाचा भोपळाही शक्य तितक्या लवकर फुटावा, हे त्यामागचे गणित आहे. पण म्हणून आजपासूनच केजरीवालांच्या अपयशाची गाथा रचण्याचे काहीकारण नाही. स्वप्न बघण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे आणि त्याच्या पूर्ततेसाठी धडपडण्याचाही. केजरीवालांनी केवळ स्वत: स्वप्न पाहिली नाहीत. ती लोकांनाही दाखवली. आता त्याच्या पूर्ततेसाठी धडपडण्याचीही त्यांची तयारी आहे. तशी संधीही त्यांना गवसली आहे. त्या धडपडीच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे.
आश्‍वासन, मग ते भ्रष्टाचारमुक्तीचे असो, वा मग अर्ध्या पैशात वीज उपलब्ध करून देण्याचे. घराघरात मोफत पाणी, स्वच्छ दिल्ली, स्वस्त आणि दर्जेदार आरोग्य सुविधा, सार्वजनिक परिवहन व्यवस्था, झोपड्यांचे पुनर्वसन, कंत्राटदारी संपवून सर्वांना कायम नोकरी, यमुनेची स्वच्छता मोहीम, औद्योगिक प्रगती, अक्षम लोकांना आधार, वंचितांना न्याय… अशी आश्‍वासनांची भलीमोठी यादीच आता विरोधकांनी पाठ करून ठेवली आहे. त्याचे स्मरण ते केजरीवालांना वारंवार करून देताहेत.
निवडणूक लढवताना दिलीत ना ही आश्‍वासने, मग करा आता ती पूर्ण, अशी भाषा कॉंग्रेसचे नेते पाठिंबा देण्यापूर्वीच बोलताहेत. केजरीवालांना मुख्यमंत्रिपदावर बसवून नंतर त्यांच्या फजितीचा तमाशा दुरून बघण्याचे कॉंग्रेसचे षडयंत्र एव्हाना जगजाहीर झाले आहे. त्याचे भान जपत ‘कॉमन मॅन’ च्या आकांक्षांच्या पूर्तीसाठी केजरीवालांना यापुढे मार्गोत्क्रमण करायचे आहे.
केवळ तेरा महिन्यांचे अस्तित्व लाभलेला पक्ष, त्याला न पेलवणारा यशाचा डोलारा, त्यानेच शिगेला पोहोचवून ठेवलेल्या जनताजनार्दनाच्या अपेक्षा, अनुभवाचा लवलेश नसलेले सहकारी, येत्या काळात देशभरात लागू होणारी आचारसंहिता, त्यात ठप्प होणारी विकासकामे अन् आपच्या अपयशासाठी जणू ठाण मांडून बसलेल्या कॉंग्रेसचा पाठिंबा, अशा हिंदोळ्यात हेलकावे खाणारे सरकार टिकवून ठेवण्याची कसरत केजरीवालांना या काळात करायची आहे.
या सार्‍या गोष्टी ‘आप’ला मुळीच जमणार नाहीत असा कयास आतापासूनच बांधणे म्हणचे केजरीवालांच्या क्षमतेवर अकारण अविश्‍वास व्यक्त करण्यासारखे होईल. निवडणुकीतली आश्‍वासने देताना आपण ‘खयाली पुलाव’ शिजवलेला नव्हता, असे त्यांनी म्हटलेले आहे. याचा अर्थ या आश्‍वासनांच्या पूर्तीसाठी काही योजना त्यांनी तयार केलेल्या असणारच. त्यासाठीची संधी त्यांना दिली गेली पाहिजे. ती न देताच त्यांच्या अपयशाकडे कुणी आस लावून बसले असतील, तर तो नतद्रष्टपणा ठरेल.
एक मात्र खरे की राजकारण हे फार वेगळे विश्‍व आहे. इथे चेहर्‍यावरच्या हास्यामागेही कावेबाजपणा असतो. इथे बोलण्यालाही अर्थ असतो अन् मौनातही गर्भितार्थ. इथली आसवंही बरेचदा खोटीखोटी असतात. आज खांद्यावर पडलेला हात उद्या पाठीत खंजीर खुपसणारच नाही, याचीही शाश्‍वती नसते इथे. पदार्पणातच या जगातले हे बारकावे लक्षात आले, तर ठीक अन्यथा इथले मुरलेले लोक नव्या माणसाच्या विश्‍वासाचा गळा केव्हा आवळतील याचा नेम नाही. इथे तर केजरीवालांच्या अपयशावर विरोधकच काय, पण त्यांना पाठिंबा देणारे सहकारीही टपलेले आहेत. अशात भ्रष्टाचारमुक्ती कशी होऊ शकते आणि वीज अर्ध्या पैशात कशी उपलब्ध होऊ शकते, हे सिद्ध करण्याच्या कसोटीत केजरीवालांना यशाची कमान साकारायची आहे…आम आदमीच्या त्यांना खूप शुभेच्छा!

Short URL: https://vrittabharati.in/?p=9287

Posted by on Dec 29 2013. Filed under अग्रलेख, संपादकीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अग्रलेख, संपादकीय (11 of 13 articles)


आगामी लोकसभा निवडणुकीत देशवासीयांनी पक्षाला पाहून मतदान न करता, देशासाठी मतदान करा-‘व्होट फॉर इंडिया’ असा नारा भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र ...

×