किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलआठवण
‘श्रद्धा’ ही नेहमी सात्त्विक भावावर, शुद्ध भावनेवर निर्माण होते आणि मग ‘श्रद्धा’रूपी शक्तीच्या आधारावर सामान्य व्यक्ती असामान्य कार्य करून जातात. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ‘श्रद्धावान लभते ज्ञानम्.’ ध्येयाचा मार्ग हा नेहमीच प्रकाशाचा मार्ग असतो, परंतु हे ध्येय समाजहिताचे, लोककल्याणचे असावे लागते. अशा ध्येयमार्गावर मार्गक्रमण करणारा ज्योतिपुंज म्हणजे राष्ट्र सेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका वंदनीय उषाताई गुणवंत चाटी. १७ ऑगस्ट २०१७ श्रावण दशमीला त्या ब्रह्मलीन झाल्या. काही दिवसांपासून त्यांचे स्वास्थ्य ठीक नव्हते, परंतु रोजनिशीतील कार्यक्रम काही बदलले नाहीत. बालपणापासून मनाला लावलेल्या सत्संस्कारांनी शारीरिक वेदनेला थाराच दिला नाही. त्यामुळे सदैव प्रसन्न चेहरा आणि आस्थेनं सगळ्यांची चौकशी. आपली वेदना कधी प्रकटच करायची नाही, पण आम्हा सेविकांच्या जखमांवर मायेची फुंकर घालायची, असा अनुभव सगळ्यांचाच आहे. हे कधी शक्य होते, ज्या वेळेला आपल्या जीवनाला ध्येय प्राप्त होते आणि त्यासाठी स्वीकारलेल्या मार्गावर आणि साधनावर साधकाचा पूर्ण विश्वास असतो. ‘नान्यह पंथ:’ या उक्तीची अनुभूती त्याच्या ठायी असते. अशीच व्यक्ती इतरांना आनंद, प्रेरणा देते, ऊर्जेचा स्रोत बनते आणि त्या प्रकाशात अनेक जीवनं उजळून टाकते. याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वंदनीय उषामावशी!
मला आठवतं, २००३ साली थंडीच्या दिवसात एका दुपारी घराची बेल वाजली. सुटीचा दिवस होता त्यामुळे मी घरी होते. काही ज्येष्ठ महिला आल्या होत्या. खणवाले मावशी, शहापूरकर मावशी इत्यादी. राखी हरकरे त्यांना घेऊन आली होती. त्यांचे माझ्याशी बोलणे म्हणजे जणूकाही आमची खूप जुनी ओळख आहे अशी. त्यांनी येण्याचं प्रयोजन सांगितलं- वंदनीय उषामावशींच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती सांगितली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावं, असा आग्रह केला. त्यासाठीच त्या आल्या होत्या. त्यांचा व्यवहार, आपुलकी बघून मला एक वेगळाच अनुभव आला. आणि माझ्या मनाला वंदनीय उषामावशींना भेटायची ओढ लागली.
कार्यक्रमस्थानी उषामावशींशी भेट झाली. सहज, सरळ, वात्सल्याचा झरा, खूप असं व्यक्तित्व. कार्यक्रम संपल्यावर त्यांची जवळून भेट झाली. हसत जवळ घेतलं आणि मनापासून कौतुक केलं. हातात हात घेऊन म्हणाल्या, कुठं होतीस आतापर्यंत? ते वाक्य, तो जिव्हाळा आयुष्याला राष्ट्रभक्तीचे सूर लावून गेला. त्यांचा तो प्रश्न जीवनाला दिशा देऊन गेला, जीवनाला जगण्याचं प्रयोजन मिळालं. घरात संघाचे संस्कार होते, वडिलांच्या रक्तातून आलेले सुप्त संस्कार अचानक जाणवू लागले, डोकं वर काढू लागले. हळूहळू शाखेत येऊ लागले, रुळू लागले. परिचयाची व्याप्ती वाढत गेली. अनेक सेविका मैत्रिणी मिळत गेल्या. शीतकालीन शिबिर, समिती शिक्षा वर्ग, धामणगावचे संमेलन, विश्व विभागाचा वर्ग यात सहभागी होऊ लागले. वेगवेगळी गीतं-चलने का वर दे दो, चाहे पथ कंटकमय हो| चाहे पथ कंटकमय हो|… आदी, ….काही विचारूच नका. जे ध्यानीमनी नाही ते सर्व शिकण्याची संधी समितीत मिळाली. पण, हे सगळं करीत असताना मायेचा स्पर्श आणि विचारपूस वं. उषामावशी आणि प्रमिलामावशी नक्की करीत, काही सूचना देत. आम्ही नागपुरात असल्यानं सगळ्या थोरामोठ्यांचा सहवास आम्हाला सहज लाभतो आणि बर्याच गोष्टी शिकायला मिळतात.
अहल्या मंदिरात गेलो, एखाद्या गीताची चाल आठवत नसेल तर मावशींकडे जावं आणि अत्यंत सहजपणे ‘‘मलापण आठवेल की नाही माहीत नाही स्वर?’’ अशी प्रांजळ कबुली देत मावशी गाणं म्हणून दाखवत.
२००४ वर्षी मला डॉक्टरेट मिळाली. समितीच्या अखिल भारतीय बैठकीत वं. उषामावशींनी शाल देऊन आशीर्वाद दिले. हा माझ्या जीवनातील सगळ्यात मोठा सन्मान आहे, असं मला वाटतं. ती शाल निरंतर मला कार्याची प्रेरणा देते.
अलीकडे आम्ही कार्यालयात गेलो की मावशी म्हणायच्या, ‘‘काय, नागपुरात काय चाललं आहे? काय कार्यक्रम घेता? मला कोणी काही सांगत नाही.’’ आमचं उत्तर असे- ‘‘मागच्या वेळी माहिती देऊन गेलो ना.’’ तेव्हा अगदी सहज म्हणत- ‘‘अगं, आजकाल थोडं विसरायला होतं.’’ पण, नागपूर शाखेच्या बर्याच कार्यक्रमांना त्या आर्वजून उपस्थित राहत, जुन्या सेविका त्यांच्याभोवती नुसता गराडा घालून असत. आम्हा सेविकांना भेटल्यावर त्यांच्या चेहर्यावरचा आनंद आणि आम्हाला त्यांच्याकडून मिळालेली ऊर्जा म्हणजेे एक अलौकिक अनुभव असे.
आताच काही दिवसांपूर्वी मावशींच्या खोलीत सहज डोकावले, तर त्या पुस्तक वाचत होत्या. कुतूहलापोटी मी विचारलं, ‘‘कोणतं पुस्तकं?’’ तर म्हणाल्या, ‘‘दत्तोपंतांचं ‘कार्यकर्ता.’’ माझ्या मनात प्रश्न आला की, सेविका ते प्रमुख संचालिका एवढा प्रदीर्घ प्रवास केलेल्या मावशी वयाच्या ९१ व्या वर्षी ‘कार्यकर्ता’ का वाचत असतील? माझं मन जाणून मावशी म्हणाल्या, ‘‘कार्यकर्ता’ कसा असावा हे समजून घेण्याचा प्रयत्न करते.’’ एरवी थोडंसं काम करून सगळ्यांकडून शाबासकी मिळवायची आणि खूप काही केल्याच्या आविर्भावात वावरणारी मी, माझा सगळा अंहकार गळून पडला आणि डोळे पाण्यानी डबडबले आणि भगवद्गीतेतील ‘कार्यकर्ता’चे लक्षण सांगणारा श्लोक आठवला…
मुक्तसंगोऽनहंवादी धृत्युत्साहसमन्वित:| सिध्द्यसिध्द्योर्निर्विकार: कर्ता सात्त्विक उच्यते॥ (भ. गीता १८-२६)
आणि मूर्तिमंत ‘कार्यकर्ता’चे साक्षात दर्शन मला झाले. एक आदर्श ‘कार्यकर्ता’- वं उषामावशी !
कमालीची विनम्रता, निरंहकारिता की ज्यांच्याजवळ गेल्यावर वेगळेपणा, परकेपणा जाणवलाच नाही कधी. त्यांची प्राणज्योत शांत झाली त्या क्षणीदेखील त्यांच्या चेहर्यावर आनंद आणि परिपूर्णतेचं समाधान होतं. अत्यंत प्रसन्नतेनं आणि सहजतेनं त्या अनंताच्या प्रवासाला गेल्या. उषाताई, तुमच्यासारखं आम्ही व्हावं, या आशीर्वादासाठी या आईच्या चरणी विनम्र श्रद्धांजली! कोटी कोटी प्रणाम!
विदर्भ प्रांत सह बौद्धिक प्रमुख
राष्ट्र सेविका समिती
डॉ. लीना गोविंद गहाणे
९४२१७०४२३७