किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल•चौफेर : अमर पुराणिक•
कोणत्याही पक्षाचे यश हे त्यापक्षाच्या पाळामुळांवर अवलंबून आहे. जितकी पक्षाची पाळेमुळे रुजतील तितके यश हुकमी ठरत असते. त्यामुळे भाजपाला आता पक्ष बळकटीवर संपुर्ण लक्ष केंद्रीत करण्याशिवाय गत्यंतर नाही. भाजपाध्यक्ष अमित शहा हे कुशल संघटक आहेत, पक्षात आणि जनतेत त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे. याचा लाभ त्यांना आणि भाजपाला मिळेलच यांत दूमत नाही. आपली दूसरी इनिंग अमित शहा अतिशय प्रभावीपणे राबवतील आणि भाजपाला अभूतपुर्व यशाचे धनी बनवतील यात शंका नाही.
भाजपा नेते अमित शहा दूसर्यांदा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. खरे तर पुर्ण टर्मसाठी ते पहिल्यांदाच अध्यक्ष झाले आहेत. २३ जानेवारी रोजी त्यांची पहिली टर्म संपली, खरे तर ही टर्म त्यांची नव्हती, ती राजनाथ सिंह यांची होती. केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर राजनाथ सिंह मंत्री झाल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजिनामा दिला होता त्यामुळे त्या जागेवर राजनाथ सिंह यांच्या कारकिर्दीतील उर्वरित काळासाठी अमित शहा यांना भाजपाध्यक्ष होण्याची संधी मिळाली. अमित शहा यांनी लोकसभेच्या निवडणुकीत केलेल्या अभूतपुर्व कामामुळे त्यांच्या गळ्यात भाजपाध्यक्षपदाची माळ पडली. खरे तर अमित शहा यांची दूसरी टर्म ही प्रचंड आव्हान ठरणारी आहे. लोकसभेतील अभूतपुर्व विजयानंतर महाराष्ट्र, हरियाणा, आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीतही भाजपाने जोरदार कामगिरी केली. अमित शहा यांचा दिग्विजयी रथ कोणी रोखू शकले नाही. पण नंतर गेल्या वर्षात झालेल्या दिल्ली विधानसभा आणि बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला दारूण पराभव स्विकारावा लागला. येत्या कालावधीत होणार्या निवडणुकांत त्यामुळे भाजपासमोर मोठे आव्हान असणार आहे आणि ते आव्हान अमित शहा यांना पेलावे लागणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत अमित शहा यांनी उत्तम कामगिरी केली होती. विशेषत: उत्तर प्रदेशातून लोकसभेत भाजपाला प्रचंड मोठे यश मिळाले होते. तेथे एकुण ८० जागांपैकी ७३ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. तेव्हा अमित शहा हे उत्तर प्रदेशचे प्रभारी होते. उत्तर प्रदेशातील जोमदार कामामुळे लोकसभेतील भाजपाच्या यशाचे श्रेय अमित शहा यांना मिळाले होते. त्याचीच परिणीती म्हणून भाजपाध्यक्षपद अमित शहा यांना मिळाले. आता येत्या तिन वर्षांकरिता अमित शहा यांना भाजपाध्यक्ष पद मिळाले आहे. आगामी २०१९ च्या एप्रिल महिन्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि अमित शहा यांचा कार्यकाळ हा २०१९ च्या जानेवारी महिन्यापर्यंत असणार आहे. लोकसभा अजून खूप लांब असली तरीही खरे आव्हान हे पक्ष बळकट करणे, तळागाळापर्यंत पक्ष रुजविणे आहे तसेच विधानसभा निवडणुकांचेही आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अभूतपुर्व यशानंतर भाजपा सरकार सत्तेत आले. आणि सक्षम सरकार म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्तम कामगिरी करते आहे. पण पक्ष संघटनात्मक पातळीवर भाजपाची स्थिती समाधानकारक नाही. लोकसभेच्या विजयाचा परिणाम म्हणून गावा-गावांत भारतीय जनता पक्ष बलवान होणे अपेक्षित होते. पण तशी संघटनात्मक पातळीवर भाजपाची कामगिरी दिसत नाही. तसे गेल्या चार-पाच वर्षात भाजपा चांगला बळकट झाला आहे. पण ग्रामपंचायत, स्थनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपाला म्हणावे तसे यश मिळवता आलेले नाही. जोपर्यंत खेडयापर्यंत भाजपा फोफावत नाही तोपर्यंत भाजपाला हुकमी यश मिळवणे अवघडच जाणार आहे. खरे तर लोकसभा निवडणुकीतील यशाचे श्रेय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच जाते. त्यात पक्षाची कामगिरी चांगली असली तरीही स्वतंत्रपणे भारतीय जनता पक्ष म्हणावे तसे यश मिळवू शकलेला नाही. या यशाचे गमक म्हणजे पक्षकार्य तळागाळापर्यंत पोहोचणे आहे. जेव्हा पक्ष तळागाळापर्यंत, गावा-खेड्यापयर्र्ंत पोहोचून बळकट होईल तेव्हाच भाजपा खर्या अर्थाने बलवान झाली म्हणता येईल. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर पक्ष बळकटीकरणाचे कार्य वाढणे अपेक्षित होते. पण सत्तेत आल्यानंतर संघटनात्मक पातळीवर पक्ष शिथिल झाला आहे. भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या समोर खरे आव्हान हेच असणार आहे.
लोकसभेच्या यशानंतर हरियाणा, महाराष्ट्र आणि झारंखड विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकापाठोपाठ एक विजय मिळवले. त्यामुळे अमित शहा यांचे पक्षात वजन वाढले. या सगळ्या निवडणुका २०१४ मध्येच झाल्या होत्या पण त्यानंतर झालेल्या दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाला दारुण पराभव स्विकारावा लागला. जसे यशाचे श्रेय मिळते तसेच पराभवाची जबाबदारीही येत असते. या पराभवापासून भाजपाचा आणि भाजपाध्यक्ष म्हणून अमित शहा यांचा अश्वमेघी वारु थांबला. पक्षाध्यक्ष या नात्याने ही जबाबदारी अमित शहा यांच्यावरच येते. दिल्ली आणि बिहारमध्ये भाजपाची स्थिती तशी चांगली आहे, मग दिल्ली आणि बिहारमध्ये अपयश का आले, पक्ष कोठे कमी पडला, की रणनीती चूकली याचे चिंतन भाजपाने केलेले असेलच आणि केलेले नसेल तर हे करण्यासाठी भाजपाने वेळ दवडू नये. जनतेला भाजपाप्रती प्रचंड स्नेह आहे तो कायम टिकवणे व अधिक मिळवणे भाजपासाठी अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर योग्य रणनीती ही पक्षाच्या खर्या यशाचे कारण असते. खरे तर अमित शहा प्रचंड क्षमतेचे नेते आहेत त्यांचे यश हे प्रचंड कष्टाचे परिणाम आहे. त्यांनी जसे यश पाहिले तसेच अपयशही पाहिले आहे. या अनुभवातून येत्या कालावधीत भाजपा बळकट होताना दिसेल अशी आशा आहे.
येत्या काळातही अनेक राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेथे अमित शहा यांच्या कौशल्याचा कस पुन्हा लागणार आहे. भाजपा जशी मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, हरियाणा, छत्तिसगडमध्ये बळकट आहे तशी स्थिती पुर्व भारत आणि दक्षिण भारतात नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्रात भाजपा तसा बर्यापैकी बळकट आहे. पण प. बंगाल, ओरिसा, आसाम, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळात भाजपाचे अस्तित्व अतिशय नगण्य आहे. अशा राज्यात भाजपाचे पक्ष संघटन वाढवणे हेच खरे आव्हान अमित शहा यांना पेलावे लागणार आहे. येत्या काळात ज्या राज्यात निवडणुका होणार आहेत त्या राज्यांत भाजपाची सत्ता नाही तसेच पक्षाचे अस्तित्वही सामान्यच आहे. त्यामुळे अशा राज्यात भाजपाला तळापासून सुरुवात करावी लागणार आहे. जर भाजपा पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडु या राज्यात चांगले यश मिळवू शकला तर ते खर्या अर्थाने भाजपाचे यश असेल आणि त्याचे संपुर्ण श्रेय हे अमित शहा यांनाच जाईल हे नक्की. आसाम हे एक असे राज्य आहे की जेथे भाजपाला चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे. भाजपाच्या आसाममधील विजयाचे गमक हे पुर्णपणे भाजपाच्या रणनीती दडले आहे. आणि जर भाजपा आसाममध्ये यश मिळवू शकला तर पक्षाचे मनोबला वाढणार आहे त्याचा फायदा पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत होणार हे निश्चित.
२०१७ हे वर्ष अमित शहा यांच्यासाठी सर्वात मोठ्या परिक्षेचे असणार आहे कारण या वर्षांत पंजाब, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुका होेणार आहेत. पंजाबमध्ये भाजपाची सत्ता आहे पण अमित शहा यांची खरी परिक्षा उत्तर प्रदेशात होणार आहे. तेथे भाजपा गेल्या १५ वर्षांपासून सत्तेबाहेर आहे. कल्याणसिंहानंतर तेथे भाजपाला यश मिळवता आलेले नाही. विधानसभेत भाजपा तिसर्या क्रमांकावर आहे. पण लोकसभेत भाजपाला उत्तर प्रदेशात अभूतपुर्व यश मिळाले. आता अमित शहा यांच्यासमोर तेच यश उत्तर प्रदेश विधानसभेत मिळवण्याचे आव्हान आहे आणि उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणुक ही भाजपाच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
कोणत्याही पक्षाचे यश हे त्यापक्षाच्या पाळामुळांवर अवलंबून आहे. जितकी पक्षाची पाळेमुळे रुजतील तितके यश हुकमी ठरत असते. त्यामुळे भाजपाला आता पक्ष बळकटीवर संपुर्ण लक्ष केंद्रीत करण्याशिवाय गत्यंतर नाही. भाजपाध्यक्ष अमित शहा हे कुशल संघटक आहेत, पक्षात आणि जनतेत त्यांची प्रतिमा खूप चांगली आहे. याचा लाभ त्यांना आणि भाजपाला मिळेलच यांत दूमत नाही. सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे अमित शहा यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचंड स्नेह आहे आणि तो स्नेह अमित शहा यांचे मनोबल वाढवणारा आहे. आपली दूसरी इनिंग अमित शहा अतिशय प्रभावीपणे राबवतील आणि भाजपाला अभूतपुर्व यशाचे धनी बनवतील यात शंका नाही.