किमान तापमान : 28.12° से.
कमाल तापमान : 28.7° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 68 %
वायू वेग : 2.68 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.7° से.
27.8°से. - 29.04°से.
गुरुवार, 05 डिसेंबर घनघोर बादल27.27°से. - 28.62°से.
शुक्रवार, 06 डिसेंबर टूटे हुए बादल26.15°से. - 27.83°से.
शनिवार, 07 डिसेंबर घनघोर बादल24.97°से. - 25.89°से.
रविवार, 08 डिसेंबर घनघोर बादल22.95°से. - 26.45°से.
सोमवार, 09 डिसेंबर घनघोर बादल23.1°से. - 27.21°से.
मंगळवार, 10 डिसेंबर छितरे हुए बादलप्रहार : दिलीप धारुरकर
कायदेमंडळातील लोकशाहीचे वस्त्रहरण थांबवा! – भारतीय संसदीय लोकशाहीत कायदेमंडळ ही सर्वांत महत्त्वाची व्यवस्था मानली जाते. सरकार कायदेमंडळाला जबाबदार असते. लोकांनी, लोकांचे आणि लोकांसाठी चालविले जाणारे राज्य म्हणजे लोकशाही राज्यव्यवस्था. अशी जी लोकशाहीची व्याख्या आहे, त्यामध्ये लोकांचे आणि लोकांनी चालविलेल्या राज्याचे दर्शन म्हणजे कायदेमंडळ. राज्यात विधानसभा आणि केंद्रात लोकसभा अशी सभागृहे, ज्यात लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार यांनी जनतेसाठी कल्याणकारी राज्य चालविण्यासाठी आवश्यक कायदे करावेत, चर्चा करावी, सरकारच्या कारभारावर अंकुश ठेवावा, असे अपेक्षित असते. मात्र, वरचेवर संसदीय लोकशाहीत चर्चा, वाक्पटुत्व, मुत्सद्देगिरी यापेक्षा गोंधळ, रुमणेशाही, धक्काबुक्की याचेच दर्शन होऊ लागले आहे. कामकाज किंवा चर्चा करून आपले म्हणणे सभागृहात मांडण्यापेक्षा इतरांना बोलण्यापासून रोखण्याचे, गोंधळ करून चर्चा बंद पाडण्याचेच नियोजन केले जाते. आता तर केवळ तोंडाने गोंधळ करण्यापलीकडे जाऊन माईक तोडून फेकाफेक, कागद फाडणे, मंत्र्यांच्या, सभापतींच्या हातातून कागद हिसकावून टरकावणे, मिरचीचा स्प्रे मारणे… असे सगळे प्रकार होऊ लागले आहेत. सत्ताधारी, मंत्रीसुद्धा गोंधळ करण्यात आघाडीवर दिसू लागले आहेत.
‘आम्ही मेंढरं मेंढरं, यावं त्यानं हाकलावं
पाच वर्षांच्या बोलीनं होतो आमुचा लिलाव’
या कवितेच्या ओळी लोकशाहीतील जनतेची अवस्था सांगण्यासाठी लिहिल्या गेल्या होत्या, मात्र आता त्या सभागृहातील प्रतिनिधींचं वर्णन करतात की काय, असे वाटू लागले आहे. राजा धर्माधिकारी यांच्या ‘हनुमानाची नोकरी’ या कवितेत कवी हनुमानाला म्हणतो की,
‘मग तुमी इचार करा असा
का म्हाराष्ट्राच्या राजकारनात जाऊन तुमी धसा
खातेवाटप चालूच आहे त्वा फायदा हुईल,
मंत्र्याची जागा तर नक्कीच भेटून जाईन
देव म्हने म्हाराष्ट्रातल्या मंत्र्याले काय काम असते
कवी म्हने म्हाराष्ट्रातल्या मंत्र्याले काईच काम नसते
खोटं बोलनं जमलं का सारं काम भागते
कदी कदी ईधानसबेत मुंडी हलवाय लागते.’
आता कवीने वर्णन केलेल्या या कामात आणखी एक काम वाढवावे लागेल-
‘कोणत्याही मंत्र्याले ओरडायला यायला लागते
इरोधकांचा आवाज बंद पाडायला लागते…’
संसदेच्या या अधिवेशनात असेच अजब चित्र बघायला मिळाले. तेलंगणाच्या विषयावर कॉंग्रेस पक्षाचे केंद्रीय मंत्रीच लोकसभेत आपापल्या जागा सोडून गोंधळ करण्यात आघाडीवर होते. सरकारचेच रेल्वेमंत्री रेल्वेचे अंदाजपत्रक मांडत असताना, त्याच पक्षाचे आणि त्याच मंत्रिमंडळातले मंत्री थेट वेलमध्ये जाऊन प्रचंड गोंधळ घालत होते. कहर म्हणजे त्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर याच सरकारचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले की, संसदेतील गोंधळ पाहून म्हणे त्यांचे हृदय विदीर्ण झाले! पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळातील मंत्री त्यांचे ऐकत नव्हते, की मंत्र्यांना आदेश देण्याची, संसदेत मंत्र्यांना गप्प करण्यासाठी तंबी देण्याची त्यांची हिंमत होत नव्हती? एकशेवीस कोटींच्या देशाचा पंतप्रधान इतका नामोहरम, इतका कमजोर आणि इतका दुखी झाल्याचा कधी पाहिला नव्हता! केवळ संसदेत गोंधळ करणार्या कॉंग्रेसच्या मंत्री आणि खासदारांचाच हा प्रश्न नाही, तर पंतप्रधानांच्या हातात काही अधिकार न ठेवणार्या कॉंग्रेसच्या नेतृत्वाच्या दृष्टीने ही शरमेची गोष्ट आहे. सोनिया गांधी यांनी अंतरात्म्याचा आवाज ऐकून, त्यांच्याकडे आलेलं पंतप्रधानपद अलगद डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे दिलं आणि त्या मनमोहनसिंग यांना हताश, आपल्याच मंत्र्यांकडून दुखावले गेल्याचे पाहताना सोनिया गांधी यांचा अंतरात्म्याचा आवाज कुठे जातो? तेलंगणातील मते मिळवण्यासाठी अशा प्रकारे पंतप्रधानांना हताश, लाचार बनवायचे, तामिळनाडूतील मित्रपक्षाचा पाठिंबा कायम राहावा म्हणून राजीव गांधींच्या खुन्यांची फाशी पुढे ढकलत न्यायची… अरेरे! भारतीय लोकशाही आणखी किती खाली घसरणार आहे?
लोकसभेतल्या चर्चेचा दर्जा वरचेवर खालावत चालला आहे. विशेषत: लोकसभेचे प्रक्षेपण दूरदर्शनवर दाखविण्यास सुरुवात झाल्यापासून देशातील जनतेसमोर आपले विचार मांडण्यापेक्षा, आपली रुमणेगिरी दाखविण्याकडेच सदस्यांचा कल जास्त दिसतो आहे.
१५ व्या लोकसभेचे कामकाज संपल्यानंतर विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज्य यांनी, या लोकसभेत कामकाज जितके तास चालले त्यापेक्षा जास्त तास वाया गेले, असे म्हटले आहे. ही लोकसभा सुरू झाल्यानंतर एकदा तर अशी स्थिती आली की, संसदेचे संपूर्ण अधिवेशन गोंधळातच पार पडले. विरोधी पक्षांनी टु-जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यावर संसदीय समिती नेमण्याची मागणी करत संसदेचे संपूर्ण अधिवेशन रोखून धरले. त्या वेळी सत्तारूढ पक्ष आणि काही प्रसारमाध्यमांतील दीडशहाणी मंडळी विरोधी पक्षांवर, संसदेचे कामकाज वाया घालवत असल्याबद्दल टीकेची झोड उठवत होते. जनतेचा किती पैसा वाया गेला याचे हिशोब मांडत बसले होते. मात्र, पाहता पाहता न्यायालयाने बडगा उगारला आणि २ लक्ष ७६ हजार ३७९ कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा यांना अटक होेऊन तिहार जेलमध्ये पाठविण्याची वेळ आली. तोपर्यंत सरकार, हा घोटाळा झालाच नाही, मंत्री दोषी नाहीत, अशा प्रकारची ओरड करत होते. संसदेतील विरोधकांची मागणी अनाठायी नव्हती, हेच ए. राजा, कनिमोझी यांना तुरुंगात जावे लागल्याने सिद्ध झाले.
या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन संपल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सुषमा स्वराज्य यांनी सांगितल्याप्रमाणे, १५ व्या लोकसभेत विरोधकांनी र्गोधळ करून कामकाज बंद पाडले, त्या वेळी सरकारच्या गंभीर भ्रष्टाचाराचा आणि घोटाळ्याचाच विषय होता. सरकारच्या कारभारावर अंकुश ठेवण्याचे जर संसदेचे काम असेल आणि सरकार जर संसदीय मार्गाने न जुमानता बहुमताच्या, सत्तेच्या आणि झुंडशाहीच्या जोरावर विरोधकांचा आवाज गप्प करत घोटाळे, भ्रष्टाचार दडवणार असेल, तर मग विरोधकांना गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्याशिवाय दुसरा मार्गच नव्हता.
मात्र, गेली तीन वर्षे संसदेत विपरीत चित्र दिसले आहे. लोकसभेत कामकाज बंद पाडल्याबद्दल विरोधकांना दूषणे देणारे सत्ताधारीच, गेले काही दिवस लोकसभेत गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्यासाठी सरसावले आहेत. तेलंगणाच्या विषयावर जो काही गोंधळ लोकसभेत झाला आहे त्यात सत्ताधारी खासदार, मंत्री आघाडीवर आहेत. आता कुठे गेला यांचा लोकशाहीचा धर्म? आता कुठे गेली लोकसभेच्या कामकाजावर होणार्या खर्चाची चिंता? कुठे गेले ते हिशोब घालणारे वाहिन्यांवरील विद्वान? तेलंगणा विधेयक मांडताना तर या सगळ्या गोंधळाचा सर्वोच्च बिंदू गाठला गेला. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाने लटक्या रागाने पक्षातून काढून टाकलेल्या सदस्यांनी सभागृहात मिरचीचा पेपर-स्प्रे मारून खासदारांना दवाखान्यात दाखल करण्यापर्यंत वेळ आणली. अतिरेक्यांनी संसदेवर हल्ला केला होता त्याला बहाद्दूर सुरक्षा जवानांनी, आपले बलिदान देत रोखले आणि सभागृहात त्यांची अपवित्र पावले पडू दिली नाहीत. मात्र, आता तर संसदेत लोकांनी निवडून देऊन पाठविलेल्या सत्तारूढ दलाच्या खासदारांनीच बेशरमपणे संसदेवर हल्लाच केला!
या शेवटच्या अधिवेशनात प्रत्येक दिवशी सत्तारूढ कॉंग्रेसचेच सदस्य आणि मंत्री आपापल्या जागा सोडून गोंधळ घालत होते आणि हा गोंधळ होणार आहे, हे माहीत असल्याने, पूर्वनियोजित नाटक असल्यासारखे, आपल्या नेत्यांना संरक्षण देण्यासाठी कॉंग्रेसचेच काही पहिलवानसदस्य साखळी करून नेत्यांना संरक्षण देत होते! संरक्षण देणारेही कॉंगे्रसचेच, ज्यांच्यापासून संरक्षण द्यायचे तेही कॉंग्रेसचेच! नियोजन करणारेही कॉंग्रेसचेच! इतका बेशरमपणाचा कळस यापूर्वी कधी झाला नव्हता. बेईमानी, खोटेपणा करून, नाटके करून तेलंगणा हवा असलेल्या आणि तेलंगणा होऊ नये असे तीव्रतेने म्हणणार्या अशा दोन्ही लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ही विसंगती, हे लटके भांडण, हे लटके संरक्षण अशी योजना केली जात होती. पंतप्रधान हताशपणे, रडायची वेळ आली, असे जाहीरपणे सांगत होते! राज्यसभेत तेलुगू देसम्च्या खासदाराने सचिवाच्या हातातून विधेयकाचे कागद हिसकावून घेतले आणि ते फाडून उपसभापतींच्या माईकवर फेकले. या सगळ्या र्गोधळावरून स्फूर्ती (?) घेऊन उत्तरप्रदेशच्या विधानसभेत राष्ट्रीय लोकदलाच्या आमदारांनी तर कहरच केला. भर सभेत त्यांनी स्वत:चे आणि जणू लोकशाहीचे वस्त्रहरणच केले! आपले कपडे काढून अर्धनग्न होत त्यांनी सगळ्या सभागृहाला थक्क केले. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळी हा उर्मट, बेशरम, निर्लज्ज प्रकार चालला होता. त्याच दिवशी जम्मू-काश्मीरच्या विधानसभेत निवडून आलेल्या सदस्याने मार्शलच्या कानाखाली वाजविली!
‘आम्हा घरी घन शब्दांचीच रत्ने
शब्दांचीच शस्त्रे यत्न करू
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन
शब्द वाटू धन जनलोकां
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव
शब्देचि गौरव पूजा करू॥
ही आमची सभ्यता आणि परंपरा, या बेशरम रुमणेगिरीने पार चोळामोळा करून टाकली आहे. शब्दांचे सामर्थ्य जणू हे लोक विसरून गेले आहेत. शहाण्यांना शब्दांचा मार असतो. इथे आता शहाणे नाहीतच! यांना शब्दांचा मार लागतच नाही. त्यामुळे मंडळी शब्दापेक्षा मिरची, हात, माईक चालवू लागले आहेत. खुर्च्या सोडण्याऐवजी इतरांवर फेकू लागले आहेत.
आता लोकशाहीचा निवडणूक नावाचा उत्सव समोर आला आहे. जनतेची सेवा करण्याची संधी द्या, असे म्हणत मंडळी घरोघरी दारावर येणार आहेत. त्यासाठी पक्षाचे तिकीट मिळवतानाही आता हमरीतुमरी करूनच आपली पात्रता सिद्ध करण्याचा आटापिटा कॉंग्रेसचे उत्सुक उमेदवार करू लागल्याचे चित्र औरंगाबादसारख्या ठिकाणी ‘निरीक्षकां’समोर दिसते आहे. घराघराच्या दारात हे असले रुमणेशाहीचे नवे अवतार आले की, जनतेने त्यांना जाब विचारला पाहिजे! मताच्या अमोघ अस्त्राने या दबंगगिरीला नामोहरम करण्याचा धडा गिरवला पाहिजे. जनतेबरोबर, जनभावनेबरोबर, लोकशाहीच्या मूल्यांबरोबर, सभागृहातील सभ्यता आणि व्यवस्थेबरोबर खेळ करणार्या कॉंग्रेससारख्या पक्षाला धडा शिकवण्याची संधी जनतेने मतदानाच्या वेळी सोडता कामा नये. कायदेमंडळातील लोकशाहीचे हे वस्त्रहरण थांबविलेच पाहिजे. जनताजनार्दनाला आता मतदानाचे सुदर्शनचक्र त्यासाठी हाती घ्यावेच लागेल…
शेवटच्या अधिवेशनात प्रत्येक दिवशी सत्तारूढ कॉंग्रेसचेच सदस्य आणि मंत्री आपापल्या जागा सोडून गोंधळ घालत होते आणि हा गोंधळ होणार आहे, हे माहीत असल्याने, पूर्वनियोजित नाटक असल्यासारखे आपल्या नेत्यांना संरक्षण देण्यासाठी कॉंग्रेसचेच काही पहिलवानसदस्य साखळी करून नेत्यांना संरक्षण देत होते! संरक्षण देणारेही कॉंगे्रसचेच, ज्यांच्यापासून संरक्षण द्यायचे तेही कॉंग्रेसचेच! नियोजन करणारेही कॉंग्रेसचेच! इतका बेशरमपणाचा कळस यापूर्वी कधी झाला नव्हता. बेईमानी, खोटेपणा करून, नाटके करून तेलंगणा हवा असलेल्या आणि तेलंगणा होऊ नये असे तीव्रतेने म्हणणार्या, अशा दोन्ही लोकांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ही विसंगती, हे लटके भांडण, हे लटके संरक्षण अशी योजना केली जात होती. पंतप्रधान हताशपणे, रडायची वेळ आली, असे जाहीरपणे सांगत होते!