|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:45 ए एम | सूर्यास्त : 5:52 पी एम
हवामान

किमान तापमान : 28.31° से.

कमाल तापमान : 33.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 46 %

वायू वेग : 3.2 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

33.99° से.

हवामानाचा अंदाज

27.38°से. - 33.99°से.

गुरुवार, 05 डिसेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.54°से. - 28.9°से.

शुक्रवार, 06 डिसेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

26.74°से. - 28.42°से.

शनिवार, 07 डिसेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

26.23°से. - 27.78°से.

रविवार, 08 डिसेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.61°से. - 25.97°से.

सोमवार, 09 डिसेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.16°से. - 25.8°से.

मंगळवार, 10 डिसेंबर छितरे हुए बादल
Home » संवाद » छुपा अजेंडा

छुपा अजेंडा

पाणी फुकट आणि वीजदरात ५० टक्के सवलत देण्याच्या लोकप्रिय घोषणा आणि अण्णा हजारेंच्या पुण्याईच्या बळावर स्वार झालेल्या अरविंद केजरीवाल यांनी पहिल्याच झटक्यात २८ विधासभेच्या जागा पटकावल्या. देशात एक वेगळेच वातावरण तयार झाले. कॉंग्रेस पक्ष भुईसपाट झाला. पण, कॉंग्रेसने चाल खेळली आणि आपला बिनशर्त पाठिंबा ‘आप’ ला देऊन टाकला. सत्तेच्या चाव्या आपल्या हातात येत असल्याचे पाहून, ज्या कॉंग्रेसला आधी यथेच्छ शिविगाळ केली होती, त्यांच्याच गळ्यात गळा घालून केजरीवाल यांनी सत्ता स्थापन केली. कॉंग्रेसला वाटले, मोदींचा प्रचाररथ रोखण्याचा हा तात्कालिक उपाय प्रभावी ठरू शकतो. सोबत कॉंग्रेसवर होणार्‍या टीकेपासून लोकांचे लक्ष वळविणेही आपसुकच सोपे जाईल. झालेही तसेच. वाहिन्यांचे कॅमेरे दिल्लीवर केंद्रित झाले. पण, सत्तेच्या धुंदीत मदमस्त झालेल्या केजरीवाल यांना एकदम जवळच असलेल्या दिल्लीची स्वप्ने पडू लागली आणि त्यांनी घोषणाही करून टाकली. दीड कोटी लोकसंख्येची दिल्ली आणि एकशे वीस कोटींचा भारत हे एकसमानच आहे, असा समज त्यांनी करून घेतला. पण, जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतसे नवे प्रश्‍न निर्माण झाले. हे प्रश्‍न होते देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचे, भ्रष्टाचार मुळापासून निखंदून काढण्याचे, महागाईचे, महिलांच्या सुरक्षेचे, दहशतवादाचे, नक्षलवादाचे, काश्मीरचे, पूर्वांचलातील घुसखोरीचे, आर्थिक घडी नीट बसविण्याचे, सांप्रदायिक हिंसा प्रतिबंधक विधेयकाचे असे कितीतरी प्रश्‍न देशात आ वासून उभे आहेत. केजरीवाल यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली, सदस्यत्व एक कोटीपेक्षा अधिक नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला हे सगळे ठीक. पण, वरील एकाही राष्ट्रीय मुद्यावर स्वत: केजरीवाल आणि त्यांचे सहकारी चकार शब्द काढायला तयार नाहीत. देशाच्या पातळीवर निवडणुका लढविताना, देशाच्या प्रश्‍नांवर ते आपली भूमिका का मांडत नाहीत? असा प्रश्‍न आता चोहोबाजूने विचारला जात आहे. दिल्लीतील सर्व प्रमुख वर्तमानपत्रे आणि वाहिन्या वारंवार हा प्रश्‍न उपस्थित करीत आहेत. टाईम्स नाऊ या आघाडीच्या इंग्रजी वाहिनीने तर ‘आम आदमी पार्टी केवळ पाणी आणि वीज इथपर्यंतच मर्यादित आहे’ असा टोला हाणला आहे.
दुसरी बाब म्हणजे ज्या दिल्लीत केजरीवाल यांनी मोफत पाणी देण्याची घोषणा केली होती, त्याचा लाभ फक्त ज्यांच्याकडे मीटर आहे, त्यांनाच झाला. ज्यांच्याकडे मीटर नाही, जे परप्रांतातून आलेत आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहत आहेत, त्यांना पाणी नाही. केवळ एक लाख लोकांना या मोफत पाणी योजनेचा लाभ मिळत आहे आणि तो सुद्धा सरकारी खजिन्यातून दिलेल्या सबसिडीमुळे. उर्वरित जनतेची स्थिती ‘जैसे थे’. वीजदरात ५० टक्के सवलतीचा लाभ फक्त दहा टक्केच लोकांना मिळाला. उर्वरित जनतेला केजरीवाल यांनी वार्‍यावर सोडून दिले आहे. लघुउद्योगांना जो त्रास आधी वीज बिलांचा होत होता, तो कायम आहे. दिल्ली आणि लगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्पेअर पार्ट आणि अन्य वस्तू बनविणार्‍या लघुउद्योगांची संख्या फार मोठी आहे. या सर्वांच्या नशिबी निराशाच आली.
केजरीवाल म्हणतात, पाणी साठवा
दिल्लीत चार दिवसांपासून पाणी नाही. कारण, अमोनियाचे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा कितीतरी अधिक पटींनी वाढले. दिल्लीत पाणी येते हरयाणातून. दिल्लीत पाण्याचे स्त्रोत नाहीत. आता केजरीवाल यांनी आपला बचाव करण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली आहे. दिल्लीकरांना पाणी हवे असेल तर त्यांनी पावसाळ्यात पाणी साठवून ठेवावे असा सल्ला त्यांनी दिला आहे. हा सल्ला त्यांनी मोठ्या इमारतीत राहणार्‍यांना दिला आहे. त्यांनी हे स्टेटमेंट करताच, सर्व पत्रकारांना हसू आवरले नाही.
वीजचोरांवर खटले चालवू नका
केजरीवाल यांनी एक अफलातून फतवा काढला आहे. ते म्हणतात, जे लोक वीज चोरी करताना पकडले गेले त्यांच्यावर खटले दाखल करू नका. त्यांना कनेक्शन द्या. ते बिल देतील. या सर्व लोकांनी निवडणुकीत माझ्या पक्षाचे काम केले म्हणून त्यांचे थकित बील सरकार भरेल. याचा अर्थ या वीजचोरांना वीज बिलमाफीची म्हणा वा वीज बिल भरण्याची लाच केजरीवाल यांनी दिली होती, हे स्पष्ट आहे. दिल्लीत आजही ४० टक्के लोक सर्रास वीजचोरी करतात. पण, त्यांना हात लावू नका, असे केजरीवालांचे आदेश आहेत. याला संवैधानिकदृष्ट्या वैध मानता येईल का? जे लोक प्रामाणिकपणे वीज बिल भरतात त्यांना भुर्दंड आणि जे चोर आहेत, त्यांना संरक्षण हा ‘आप’ चा छुपा अजेंडा होता, हे जनतेच्या लक्षात आलेच आहे.
कॉंग्रेसबाबत ‘गो स्लो’
आम्ही सत्तेवर येताच आठवडाभरात सर्व भ्रष्ट लोकांना अटक करू, त्यांना जेलमध्ये पाठवू, मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना तिहार तुरुंगात पाठवू अशा वल्गना केजरीवाल यांनी केल्या होत्या. पण, वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांनी दीक्षितांची एकही फाईल उघडलेली नाही. या पक्षाचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव यांना यासंदर्भात छेडले असता ते म्हणाले, सध्या प्रक्रिया सुरू आहे. पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. त्याला कालावधी लागणारच. सत्य हे आहे की, राष्ट्रकुल घोटाळ्याची चौकशी पूर्ण होऊन शुंगलू समितीने शीला दीक्षित यांच्यावर ठपका ठेवला आहे. पण, नेते म्हणतात आम्ही पुरावे गोळा करीत आहोत. याचा अर्थ कॉंग्रेस आणि केजरीवाल यांच्याच छुपा समझोता झाला आहे, हे उघड आहे. आमच्या एकाही माणसाला हात लावायचा नाही, आम्ही पाठिंबा देत राहू असा सौदा कॉंग्रेससोबत केजरीवाल यांनी जनतेच्या मतांच्या बळावर केला आहे. त्यामुळे जनतेचा आता या पक्षावरून विश्‍वास उडत चालला आहे. कॉंग्रेसही आपला वेळ तेवढा मारून नेण्याच्या प्रयत्नात आहे. ती वेळ संपली की ते आपला पाठिंबा काढून घेणार हे निश्‍चित आहे. तो दिवस फार दूर नाही.
केजरीवाल हुकूमशहा
कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजयसिंग यांनी केजरीवाल यांना हुकूमशहा असे संबोधले आहे. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी केजरीवालांना प्रशासनाचे कवडीचे नॉलेज नाही, अशी टीका केली आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांनी केजरीवाल यांच्यावर तोफ डागली आहे. केजरीवाल हे शासन चालविण्याच्या लायकीचे नाहीत, त्यांना काहीही व्हिजन नाही, असे म्हटले आहे. दिल्लीतील कॉंग्रेस नेतेही आता उघडपणे बोलू लागले आहेत. या सर्व घडामोडी पाहता, दिल्लीत आम आदमीची सत्ता फार दिवस टिकणार नाही, असेच दिसत आहे.
प्रशांत भूषण यांची राष्ट्रद्रोही विधाने
केवळ दिल्लीच नव्हे, तर राष्ट्रीय मुद्यांवर आपचे नेते वाट्टेल तसे बरळत सुटले आहेत. सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिलेले या पक्षाचे एक नेते प्रशांत भूषण यांनी तर जम्मू काश्मीर आणि नक्षल भागातून लष्कर आणि निमलष्करी दले काढून घेण्यात यावीत, त्यासाठी तेथे जनमत संग्रह घ्यावा, अशी अफलातून सूचना केली आहे. त्यांची ही विधाने देशद्रोही अतिरेकी संघटनांच्या वक्तव्यांपेक्षा वेगळी नाहीत. याचा अर्थ काय? ते असे का बोलत आहेत. प्रशांत भूषण तर दोन वर्षांपूर्वी असे म्हणाले होते की, काश्मीरला वेगळे करून टाका. केजरीवाल यांनी भूषण यांच्या विधानाचे समर्थन केले नाही. पण, त्यांच्यावर काही कारवाईही करणार नाही, असे जाहीर केले आहे. मग याचाही अर्थ काय? आम आदमी पार्टीचा हा छुपा अजेंडा आहे का? केजरीवाल हे राष्ट्रीय प्रश्‍नांवर आपल्या पक्षाची ठाम भूमिका का मांडत नाहीत? ते तर आता मुख्यमंत्री आहेत. अण्णा हजारे यांनी त्याचवेळी प्रशांत भूषण यांच्या विधानाला तीव्र विरोध दर्शविला होता.
सोमनाथ भारतींचा बचाव
आपचे दिल्लीचे विधि व न्याय मंत्री सोमनाथ भारती यांच्यावर, पुराव्यांत खोडखाड करण्याचा आणि साक्षीदारांना प्रभावीत करण्याचा ठपका ठेवला आहे. १६२ कोटींच्या स्टेट बँक ऑफ म्हैसूरमधील घोटाळ्याचे हे प्रकरण सध्या गाजतच आहे. या प्रकरणी विरोधकांनी विधिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण, केजरीवाल यांनी सोमनाथ भारतींचा बचाव केला. न्यायालयांनीच चूक केल्याचा थेट आरोप त्यांनी भारतींचा बचाव करताना केला. दुसर्‍यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे केजरीवाल अशा कलंकित लोकांना का वाचवीत आहेत?
हायकोर्ट न्यायाधीशांची बैठक
याच सोमनाथ भारतींनी काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बैठक बोलवावी असे निर्देश विधि सचिवांना दिले होते. आपणास असा अधिकार नाही, तो फक्त मुख्य न्यायाधीशांचा आहे, हे सचिवांनी भारती यांच्या ध्यानात आणून दिले असता भारती सचिवावरच भडकले आणि त्यांना अद्वातद्वा बोलले. सचिवांनी भारती यांची तक्रार नायब राज्यपालांना केली आहे. आपल्या केसमध्ये काही दिलासा मिळू शकतो का, याचा अदमास घेण्यासाठीच भारती यांनी न्यायाधीशांची बैठक बोलावली होती, असा आरोप आता प्रसिद्धी माध्यमेच करीत आहेत. केजरीवाल याचे उत्तर देण्यास तयार नाहीत. हाही आपचा एक छुपा अजेंडा जनतेसमोर आला.
बाटला हाऊस चकमक बोगस
वाचकांना स्मरतच असेल की, दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीत एक अतिरेकी व एक पोलिस अधिकारी मारला गेला होता. पण, तेव्हा केजरीवाल यांनी केवळ अल्पसंख्य लोकांचे लाड पुरविण्यासाठी बाटला चकमक ही बनावट असल्याचा आणि अटक केलेल्यांना सोडून देण्याची मागणी केली होती. त्यावेळी आप पक्ष जन्मला नव्हता. स्वत: केंद्रीय गृहमंत्र्यांनी ती चकमक बनावट नव्हती, असा निर्वाळा दिला होता. आता या मुद्यावर केजरीवाल म्हणतात, पुरानी बातें अब मत पुछिये. केजरीवालांचा हा छुपा अजेंडा आहे का?
कौन मल्लिका साराभाई?
आप पक्षाकडे अनेक चांगले लोक आकर्षित होत आहेत. त्यांचा सन्मान करण्याऐवजी केजरीवाल आाणि त्यांचे सहकारी त्यांचा अपमान करीत आहेत. प्रसिद्ध कलावंत मल्लिका साराभाई, उद्योगपती पी. साईनाथ, टीना शर्मा यांनी आम आदमी पार्टीत स्वत:हून प्रवेश केला. या तिघांनीही पक्षाच्या नेत्यांना काही प्रश्‍न विचारून समाधान करावे, अशी विनंती केली. पण, कुमार विश्‍वास म्हणाले, कोण मल्लिका साराभाई? मी त्यांना ओळखत नाही. देशात एक कोटी सदस्य आहेत, कुणाकुणाशी मी बोलू असे म्हणून विश्‍वास यांनी मल्लिकाचा अपमान केला. थेट विदेशी गुंतवणुकीच्या मुद्यावर साईनाथ यांनी आक्षेप घेतला. योगेंद्र यादव यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, आम्ही सर्वांनाच ओळखत नाही. आम्हाला अमुक माणूस सदस्य झाला हे एसएमएसने कळते. याचा अर्थ स्पष्ट आहे. केजरीवाल खोटे बोलत आहेत. या पक्षात सामान्य सदस्याला कोणताही प्रश्‍न विचारण्याची, शंका उपस्थित करण्याची परवानगी नाही. आम्ही जे सांगतो तेच खरे, बाकी सर्व झूठ अशी हुकूमशाही या पक्षात आहे. हाही छुपा अजेंडा आहे का?
मिस कॉलवर सदस्यत्व
केजरीवाल म्हणतात, अमुक नंबरवर मिस कॉल दिला की, तुम्ही आपचे सदस्य व्हाल. हे नंबर मग इतके हजार, इतके लाख झालेत असे ते सांगत आहेत. हे मिस कॉल देणारे लोक प्रामाणिक आहेत, गुंड आहेत, गुन्हेगार आहेत, बलात्कारी आहेत याची कोणतीही शहानिशा केली जात नाही. जगाच्या पाठीवर हा एकमेव असा पक्ष असेल जेथे मिस कॉलवर सदस्य होता येते, असे दिल्लीच्या प्रसिद्धी माध्यमात गमतीने म्हटले जात आहे. म्हणजे, उमेदवाराची चौकशी पण सदस्याची नाही, असा हा विलक्षण प्रकार सध्या या पक्षात सुरू आहे.
आ. विनोदकुमार बिन्नी
आपचे एक आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी शनिवारी पत्रपरिषद घेऊन केजरीवाल यांच्या कार्यशैलीचे बिंग फोडले. त्यांनी कोणतेच आश्‍वासन पूर्णपणे पाळले नाही, असा आरोप करून त्यांनी जंत्रीच वाचली. त्यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी केजरीवाल आले नाहीत. त्यांनी योगेंद्र यादव आणि पत्रकार आशुतोष यांना पाठविले. उत्तरे देताना दोघांचीही दमछाक होत होती. ३७० वे कलम आणि सैन्य माघार या मुद्यांवर यादव यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. पण, त्यांनीही कुठल्याही बिकट प्रश्‍नावर तिथल्या जनतेचे मत जाणून घेऊन नंतर काय निर्णय घ्यायचा हे ठरवू असे म्हणून प्रशांत भूषणसारखीच भूमिका मांडली. याचा अर्थ आम आदमी पार्टीचा सुरक्षेच्या बाबतीत छुपा अजेंडा असल्याचे संकेत मिळत आहेत.
आपची आतापासूनच गुंडगिरी
दिल्लीत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी आतापासूनच सुरू झालेली आहे. एका ८० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची जमीन हडपणार्‍यांना हे लोक मदत करीत आहेत. हे लोक रात्रीबेरात्री गाड्या घेऊन येतात, धमक्या देतात आणि मारायला धावतात, असा आरोप या वृद्धाच्या नातवाने केला आहे. हे गुंड लोक केवळ डोक्यावर आम आदमीच्या टोप्या घालून फिरत आहेत आणि अब सत्ता हमारे हाथ मे है, हमारा कोई कुछ बिगाड नही सकता, अशा वल्गना करीत आहेत. केजरीवाल यांनी याचेही उत्तर दिले पाहिजे की, त्यांचे कार्यकर्ते हे असे गुंड मवाली आहेत का?
परप्रांतीयांना स्थान नाही
दिल्लीच्या महाविद्यालयांतील जागांपैकी ९० टक्के जागा या दिल्लीच्या लोकांसाठीच राखीव आाणि परप्रांतीयांसाठी केवळ दहा टक्के जागा राखीव ठेवण्याच्या केजरीवाल यांच्या निर्णयावर टीकेची झोड उठत आहे. दिल्ली ही देशाची राजधानी आहे, हेही ते विसरले. ज्या परप्रांतीय तरुणाईच्या भरवशावर केजरीवालांनी सत्ता हस्तगत केली, त्यांना वार्‍यावर सोडून देण्याचा निर्णय केजरीवाल यांनी घेतला आहे. हाही एक छुपा अजेंडा आपने लपवून ठेवला होता.
मुद्दा असा आहे की, ही सर्व मते केजरीवाल यांनी निवडणुकीपूर्वी जाहीरनाम्यात का मांडली नाहीत? दिल्लीत पंधरा दिवसांपूर्वी जसे वातावरण होते, ते आता राहिलेले नाही. केजरीवालांच्या घोषणा हवेत विरत आहेत. लोक बारीक लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही मंत्र्याला प्रशासनाचा अनुभव नाही, त्यांचा अभ्यास नाही, कायद्याचे ज्ञान नाही. त्यामुळे ते वाट्टेल तसे वागत आहेत. यापेक्षा भाजपाला एक संधी दिली असती, तर बरे झाले असते असे लोक बोलू लागले आहेत. कॉंग्रेसच्या डावाप्रमाणे योग्य वेळी पाठिंबा काढून घ्यावा, दिल्लीतही लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात हे सर्व सुरळीतपणे चालू आहे. पण, या पंधरा दिवसांच्या काळात केजरीवाल यांनी विरोधक आणि प्रसिद्धी माध्यमांसाठी बरेच प्रश्‍न अनुत्तरित ठेवले आहेत. ज्या वाहिन्यांच्या कुबड्यांवर आज आप पक्ष आकाशाला टेकला, त्याच वाहिन्या ‘आप’ला तेवढ्याच वेगाने खाली आपटल्याशिवाय राहणार नाहीत, असे जे बोलले जात आहे, त्यात चूक ते काय?
 बबन वाळके

Posted by : | on : 8 Feb 2014
Filed under : संवाद
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g