|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » संवाद, स्तंभलेखक » दिल्लीच्या राजकारणात दादागिरीचा अवतार!

दिल्लीच्या राजकारणात दादागिरीचा अवतार!

प्रहार : दिलीप धारुरकर
दिल्लीच्या राजकारणात दादागिरीचा अवतार! –
पूर्वी दादागिरी करणारे लोक बाहेरून राजकारण्यांना पाठबळ द्यायचे. नंतर नंतर त्यांच्या लक्षात आले की आपल्याच बळावर राजकारण चालते तर आपणच नेता का होऊ नये? असा एक बाहुबली दादा पंधरा वर्षांपूर्वी पहिल्यांदा राजकारणात आलेला मी पाहिला आहे. गुंडगिरी अंगात भिनलेली असल्याने तो आपल्या वॉर्डात गुंडगिरी करून चकाचक रस्ते, कोणत्या गल्लीला पाणी मिळत नसेल तर पालिकेच्या कर्मचार्‍यांना शिवीगाळ -दमदाटी करून त्यांना मेन पाईपलाईन पंक्चर करायला लावून आपल्या वॉर्डात कनेक्शन घेऊन फुल्ल प्रेशरने पाणी आले पाहिजे असे स्वत: उभे राहून एका रात्रीत काम करून घेत असे. त्याच्या वॉर्डात गटारे कधीच तुंबलेली नसत. रस्त्यावरचे दिवे कधीच बंद नसत. गटारे तुंबली किंंवा दिवे बंद असतील तर संबंधित कर्मचार्‍याची काही खैर नाही. तो दिसेल तिथे या दादांच्या हातून थोबाडीत खाणारच! त्यामुळे पालिकेचे एरवी नगराध्यक्षांनी दिलेल्या आदेशाकडे डोळे झाक करणारे या दादाच्या वॉर्डात तक्रार आली की धावत जाऊन जिवाच्या आकांताने दुरुस्त्या करत. मी त्या वॉर्डातील एका विचारी, प्राध्यापकाला त्या नगरसेवकाबाबत मत विचारले. ते महाशय म्हणाले की, तो कसा वागतो त्याच्याशी आम्हाला काय करायचे आहे? आमची गटारं, पाणी, लाईट, रस्ते याबाबत एकही तक्रार नाही. आम्ही सुखी आहोत. शिवाय तो आम्हाला वाकून नमस्कार घालतो. कोणाला दादा, कोणाला काका, कोणाला भाऊ असे म्हणून नम्र असतो. तो दादागिरी करतो असे बिलकुल वाटत नाही. त्यामुळे आम्ही त्याच्यावर खूष आहोत. तुम्ही तुमच्या हिंदुत्त्ववादी लोकांना सांगा जरा याच्याप्रमाणे वॉर्डातील कामे करा म्हणावं, फक्त तत्त्वाच्या गप्पा मारून चालत नाही. अशी या निवेदनाला एक झणझणीत फोडणीही त्यांनी देऊन टाकली.
दहा पावलांवर हे दादा भेटले. नमस्कार साहेब. जरा आमच्याबद्दल चांगलं लिहा राव. बगा आमच्या वॉर्डात काही तक्रार आहे काय? तुमचा तो … पेपरवाला, मला दादागिरी केली म्हणतो. ‘च्या ….. ’ असं म्हणत त्यांनी चार शिव्या घातल्या. पुढे त्यांनी पालिकेतील विविध पक्षांच्या तीन चार नेत्यांनाही शिव्या घातल्या. कोणी पाईपलाईनमध्ये पैसे खाल्ले, कोणी रस्त्याच्या कामात गाळा काढला, अशा स्वरूपाचे आरोप धडाधड करून टाकले. भोवती जमलेले वॉर्डातील चार सुशिक्षित लोक तर अगदी प्रभावित होऊन त्यांची ही बडबड ऐकत होते. त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले त्यापैकी एक माझे अगदी जवळचे मित्र होते. बिचारे पालिकेच्या कामात एकही अनियमितता न करता रामभाऊ म्हाळगी यांचे नाव घेत काम करणारे होते. मात्र या दादाने भररस्त्यात, भर चौकात चार लोकात आत्मविश्‍वासाने त्यांच्यावर पैसे खाल्ल्याचा आरोप करूनच टाकला.
सध्या दिल्लीत आम आदमी पार्टीचे राज्य या गल्लीतल्या दादा नगरसेवकासारखेच चालले आहे. त्या नगरसेवकाचे ठीक आहे, त्याला देशापुढच्या तात्त्विक प्रश्‍नांबाबत काही देणे घेणे नाही. मात्र, आम आदमी पार्टीला आज दिल्लीत आणि उद्या देशात कारभार करण्याची तीव्र इच्छा आहे. पण यांची चाल गल्लीदादासारखीच आहे. हे पाणी, विजेच्या बाबतीत लोकांना आवडतील अशा घोषणा देणार. स्वत: पोलवर चढून वीज कनेक्शन जोडून देणार. काश्मीर प्रश्‍न, दहशतवाद, मुस्लिम समस्या, घुसखोरी अशा राष्ट्रीय प्रश्‍नांबाबत ब्र काढणार नाहीत. इतर सर्व राजकीय पक्षांचे नेते चोर आहेत असे अत्यंत खालच्या दर्जाची भाषा वापरत आरोप करत राहणार. त्याला ना काही पुरावा ना काही साक्ष!
केजरीवाल आणि कंपनीने सर्व मर्यादा तोडल्या आहेत. हम करे सो कायदा असा यांचा खाक्या आहे. आम्ही करतो ते बरोबर आणि इतर करतात ते सर्व चूक असे रेटून सांगण्याचा यांचा प्रयत्न आहे. टीव्ही वाहिन्यांवर या पक्षाचे जे नेते चर्चेत जातात ते त्यांना न आवडणारे, अडचणीत टाकणारे प्रश्‍न विचारले की चिडतात. एकतर ते टीव्ही वाहिन्यांवर आरोप करतात किंवा चर्चेत समोर असलेल्या नेत्यांना चिडून आडवे तिडवे विषयांतर करून प्रश्‍न विचारतात. पत्रकारांवर विकल्या गेल्याचा आरोप करतात. मीडिया यांची स्तुती करतो तोपर्यंत चांगला असतो. मीडियाने यांच्या चुका दाखवायला सुरू करताच मीडिया भाजपा किंवा कॉंग्रेसला विकला गेलेला असतो.
सोमनाथ भारतीसारखा माणूस जेव्हा विरोधी नेत्यांच्या तोंडावर थुंकण्याची भाषा करतो, पत्रकारांना मोदी यांनी किती पैसे दिले असे विचारतो तेव्हा केजरीवाल आणि कंपनी त्या विधानापासून पक्षाला बाजूला करतात. माफी मागून मोकळे होतात. मात्र, जेव्हा केजरीवाल महाशयच घसरतात तेव्हा काय करणार? केजरीवाल यांनी आजवर एका महिन्यात अनेक चुका केल्या आहेत. यांना कायद्याची काहीच चाड नाही. ते पोलिसांनी गणवेश उतरवून बंड करण्याचे आवाहन करतात, देशातील लोकांना दिल्लीत येऊन गर्दी करा आणि प्रजासत्ताक दिनाची परेड होऊ देऊ नका असे आवाहन करतात. कधी बटाला हाऊसबाबत विधान करतात तर कधी न्यायालयच चुकले आहे असे ठोकून देतात. ना न्यायालयाची चाड ना सभ्यतेच्या मर्यादा.
केजरीवाल यांनी कॉंग्रेसचा पाठिंबा घेऊन सरकार स्थापन केले मात्र, शपथ घेण्याआधीपासून ते आणि त्यांच्या पक्षाचे नेते कॉंग्रेसला गालीप्रदान करण्यात आघाडीवर आहेत. आता त्यांनी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एकसुद्धा भ्रष्ट नेता लोकसभेत जायला नको अशा महान उद्देशाने एक हिटलिस्ट जाहीर केली आहे. मी तेवढा स्वच्छ आणि इतर सगळे डागाळलेले असा भाव या आगंतुकपणामागे आहे. एक दिल्लीसारख्या छोट्या राज्याची सत्ता मिळाली आहे तर ती यांना पचविता येईनाशी झाली आहे. यांना आकाश ठेंगणे वाटू लागले आहे. स्वर्ग आता दोन बोटे उरला असल्याचा भास यांना होत आहे. त्यामुळे हे आणि यांचे मंत्री कायदा हातात घेऊन रस्त्यारस्त्यावर जाहीर धिंगाणा घालायला निघाले आहेत. या मंत्र्यांना जाब विचारताच महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच हे बदलायला निघाले आहेत. आपण हसे लोकांना आणि शेंबूड आपल्या नाकाला अशा प्रकारचा यांचा भाव आहे. दुसरीकडे लोककल्याणाचा जो आव यांनी आणला होता त्याचाही बोर्‍या वाजला आहे. दिल्लीच्या रस्त्यारस्त्यावर थंडीमुळे ११ लोकांचा मृत्यू झाला त्यावर हे अधिकृतरीत्या तोंड उघडायला तयार नाहीत. दिल्लीत दहा दहा तास वीजपुरवठा खंडित होण्याची वेळ आली आहे. मात्र, जे यांच्या हातात नाही त्या दिल्ली पोलिसांना शिव्या देऊन किती दिवस यांच्या नाकर्तेपणावर हे पांघरूण घालणार?
महाराष्ट्रात युती सरकार असताना अण्णा हजारे यांनी शशिकांत सुतार आणि महादेव शिवणकर यांच्यावर आरोप करत अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी ज्या दिवसापासून अण्णांनी नितीन गडकरी यांच्यावर बेताल आरोप केले त्या दिवसापासून अण्णांच्या त्या आंदोलनाच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. आता केजरीवाल पुन्हा तीच चूक करत आहेत. गडकरी यांच्यावर धाडी घातल्या गेल्या त्यात एक छोटी चूक जरी असती तर कॉंग्रेस सरकारने त्यांना बदनाम करण्याची संधी सोडली नसती. मात्र, गडकरी यांच्या विरोधात काहीच सापडले नाही. पण इतरांवर आरोप करणार्‍या या आम आदमी पार्टीचे काय? आपण धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असल्याचा दावा करणार्‍या केजरीवाल यांच्या महाराष्ट्रातील नेत्या अंजली दमानिया यांच्यावरही जमीन व्यवहारात गैरव्यवहाराचे आरोप आहेत. या बाई उघडपणे दाऊद इब्राहिमला आम आदमी पक्षात स्वागत करण्याची भाषा करत आहेत. गावगन्ना आश्‍वासने आणि सवंग लोकरंजनाचे निर्णय घेऊन मिळालेल्या लोकप्रियतेची झिंग या लोकांच्या डोक्यात घुसली आहे. नितीन गडकरी यांनी केजरीवाल यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. दिग्विजयसिंग यांनी ना खाता ना वही, केजरीवाल बोले वही सही अशी खिल्ली उडविली आहे. कपिल सिब्बल यांनी केजरीवाल यांनी आरोप सिद्ध केले तर राजकारण सोडून देऊ असे म्हटले आहे.
माझ्या दृष्टीने या सर्वांपेक्षाही केजरीवाल आणि कंपनीचा अपराध मोठा आहे तो देशविरोधी भूमिकेचा! हे उघड उघड सांगतात की काश्मीर प्रश्‍न, मुस्लिम दहशतवाद, घुसखोरी अशा विषयांवर म्हणे यांना प्रश्‍न विचारायचे नाहीत. असे कशामुळे? या प्रश्‍नांची उत्तरे देण्याची यांची इच्छा का नाही? यांचे नियंत्रण करणारे किंवा यांना प्रायोजित करणारे परदेशातील यांचे आका या प्रश्‍नावर देशभक्तीपर विचार मांडले तर यांची रसद तोडतील अशी यांना भीती वाटते की काय? या परदेशातील प्रायोजकांच्या बाजूचे मत व्यक्त केले तर प्रशांत भूषण यांच्यासारखी आपली गत होईल आणि या देशातील देशभक्त जनता आपली पूजा तुका म्हणे ऐशा नरा.. या न्यायाने बांधील अशी यांना भीती वाटते. म्हणून लोकसभा निवडणुकांना सामोरे जाताना देशापुढील महत्त्वाच्या समस्यांवर बोलण्यापेक्षा भ्रष्टाचारासारख्या विषयांवर विरोधी पक्षातील नेत्यांचे चारित्र्यहनन करण्याचा सोपा मार्ग यांनी निवडला आहे.
कोणी केजरीवाल यांच्यावर भ्रष्टाचार शिरोमणी असल्याचा आरोप केला तर? तर हे आरोप करणार्‍यावर भडकतील, काहीही आरोप करतील, भाजप कॉंग्रेसच हस्तक म्हणतील. मात्र केजरीवाल यांनी सरकारी नोकरीत पगारी रजा देऊन एका स्वयंसेवी संस्थेत भक्कम पगाराची नोकरी केली हे खरे नव्हे काय? सरकारी नोकरीत असताना दोन दोन पगार उचलणे हा भ्रष्टाचार नाही काय? सरकारी नोकरी सोडून सामाजिक कार्य सुरू करताच काही महिन्यातच यांना रॅमन मॅगसेसे ऍवॉर्ड कसे काय मिळाले? यांच्या कबीर या संस्थेला परदेशातून किती आणि कशी मदत मिळाली? अण्णांच्या आंदोलनात सिम कार्डे विकून आलेल्या दोनशे कोटींचा हिशोब यांनी अण्णांनाही का दिलेला नाही? आम आदमी पार्टीला परदेशातून मिळालेल्या निधीचा हिशोब यांनी अजून दिलेला नसल्याचे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले आहे त्याचे काय? या प्रश्‍नांची उत्तरे न देता इतर नेत्यांवरच हे जर जीभ सैल सोडून भ्रष्टाचाराचे बिनबुडाचे आरोप लावत असतील तर लोक कसे काय विश्‍वास ठेवणार?
केजरीवाल यांनी आरोप करण्याचा हा सर्व प्रकार म्हणजे राजा भिकारी ऽऽ माझी टोपी चोरली ऽऽ असा आरोप केल्यासारखाच प्रकार आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडआधी तीन दिवस धरणे आंदोलन करून केजरीवाल यांना काय साधायचे होते? जपान-चीन यांचा वाद आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. त्यात जपानचे पंतप्रधान प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून दिल्लीत येणार असल्याने त्यांना अपशकुन करण्याचा केजरीवाल यांचा इरादा होता की काय? कोणाच्या इशार्‍यावरून या उचापती होत्या? देशभरातल्या लोकांना दिल्लीत येऊन प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विघ्न आणण्याचा खतरनाक इरादा का केला होता? या देशातील जनता देशभक्त आहे. ती एका मर्यादेपर्यंत कोणालाही भुलते. मात्र, त्याचा गैरफारदा घेत कोणी जनतेच्या आड लपून देशद्रोह करू पहात असेल तर जनता त्याला तिथल्या तिथे सोडून देते. केजरीवाल यांचा इरादा स्पष्ट झाल्याबरोबर दिल्लीतील वा देशातील जनतेने केजरीवाल यांना कवडीइतकेही समर्थन दिले नाही. धरणे आंदोलनातील गर्दी कमी होत गेली. फार इभ्रत जाऊ नये यासाठी केजरीवाल यांना धरणे आंदोलन मागे घ्यावे लागले. केजरीवाल अमेरिकेतील सीआयएचे एजंट आहेत की माओवाद्यांचे हत्यार आहेत? मौलानांपुढे लाचार लोटांगणे घालणारे ढोंगी सेक्युलर आहेत की पुरस्कार घेऊन इमान आंतरराष्ट्रीय संस्थांना विकणारे गद्दार आहेत? केजरीवाल तर त्यांचे खरे रूप जाहीर करणार नाहीत. मात्र, लोकांनी यांची चाल ओळखली पाहिजे.

Posted by : | on : 7 Feb 2014
Filed under : संवाद, स्तंभलेखक
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g