किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलध्येय मंदिर का शिखर दिखने लगा है – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ७, ८ व ९ मार्चला कर्नाटकमधील बंगळुरू येथे राष्ट्रोत्थान विद्या केंद्राच्या भव्य परिसरात उत्साहात संपन्न झाली. संघाने गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या विभिन्न उपक्रमांचा यात आढावा घेतला गेला. जॉईन आरएसएसच्या माध्यमातून शिक्षित तरुणांना संघाशी जोडण्याचे प्रमाण निरंतर वाढत असून, गेल्या वर्षभरात ३१ हजारावर तरुणांनी संघशैली स्वीकारली. हिंदू जीवनशैलीपुढील गंभीर आव्हानांवरही या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. जम्मूतील हिंदू शक्तिसंगम, आसाममधील युवा शक्तिसंगम, स्वामी विवेकानंद सार्ध शतीनिमित्त नागपूरात पार पडलेला युवा शंखनाद, संस्कार भारतीतर्फे अरुणाचलमधील इटानगर येथे पार पडलेली ‘सरहद्द तो श्रद्धांजली’, बौद्धिक विभागाचा प्रार्थना सप्ताह, महाकौशलचे संकल्प महाशिबिर, मध्यभारताचे विद्यार्थी शिबिर, चित्तोडचे विराट हिंदू धर्म संमेलन आदी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचा यात आढावा घेतला गेला. सर्वांना सोबत घेऊन आम्हाला संघकार्य करायचे आहे तसेच डॉक्टर हेडगेवारांनी उभा केलेले संघ आपल्या जीवनात आचरणात आणायचा आहे, या सरसंघचालकांच्या पाथेयाने तसेच ध्येय मंदिर का शिखर दिखने लगा है… या गीताच्या संदेशाने बैठकीचा समारोप झाला.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत व भैयाजी जोशी यांनी दीप प्रज्वलन करून बैठकीची सुरुवात केली. सुरुवातीला सामाजिक दायित्व निर्वहन करताना आम्हाला नेहमीकरिता सोडून गेलेल्या महानुभावांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यामध्ये पश्चिम क्षेत्राचे माजी कार्यवाह विलास फडणवीस, पंजाबमधील गोसेवक राजाराम, माजी खासदार दीनानाथ मिश्रा, महाराष्ट्र प्रांताचे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते अरविंद हर्षे, प्रसिद्ध साहित्यिक नामदेव ढसाळ, मध्यप्रदेश विधानसभा अध्यक्ष ईश्वरदास रोहाणी, माजी केंद्रीय मंत्री शिशराम ओला, भाजपाचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण, नागपूरचे डॉ. विक्रम मारवाह, सिने कलाकार सुचित्रा सेन, दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला, तसेच विभिन्न दुर्घटनांमध्ये व आतंकवादी हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सरकार्यवाहांचे वार्षिक प्रतिवेदन
मागील वर्षी देशभर प्रथम वर्ष सामान्यचे ४८ वर्ग, प्रथम वर्ष विशेषचे ६ वर्ग तसेच द्वितीय वर्षाचे १२ वर्ग झाले. तृतीयचा व सामान्य व विशेष वर्ग असे दोन वर्ग झाले. सर्व मिळून देशभर ६८ वर्ग झाले. प्रथम वर्ष सामान्यमध्ये ६७५९ स्थानांवरून १०४३५ शिक्षार्थी, प्रथम वर्ष विशेषमध्ये २८६ स्थानांवरून ३८६ विद्यार्थी सहभागी होते. द्वितीय वर्षामध्ये १८२५ स्थानांवरून २२३१ शिक्षार्थी, तृतीय वर्षामध्ये ५६५ स्थानांवरून ६०७ शिक्षार्थी सहभागी झाले होते. तृतीय वर्ष विशेष वर्गामध्ये ३६० शिक्षार्थिसंख्या होती. वर्तमान स्थितीमध्ये २९६२६ स्थानांवर संघाच्या ४४९९६ शाखा सुरू आहेत. १०१५१ साप्ताहिक मिलन व ७३९० स्थानांवर संघ मंडळी सुरू आहे.
शारीरिक विभागाचे उत्साहवर्धक कार्यक्रम
गेल्या वर्षी १६ डिसेंबरला प्रहार महायज्ञाचे आयोजन शारीरिक विभागाद्वारे केले होते. त्यामध्ये १९०९६ शाखामधील २०८३८६ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी ८ करोड २८ लाख ३० हजार १२२ प्रहार काढले. यामध्ये दोन तृतियांश स्वयंसेवक ४५ वर्षांच्या आतील होते. १००० पेक्षा जास्त प्रहार काढणार्यांची संख्या ३७००६ होती.
घोष : २०१३-१४ मध्ये प्रांतस्तरावर घोष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ४७९२ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. विशेषत: ११ प्रांतांमध्ये शृंगवाद्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेे. त्यात ४७७ शिक्षार्थी उपस्थित झाले होते.
बौद्धिक विभागाचा प्रार्थना सप्ताह
१६ ते २३ फेब्रुवारीला प्रार्थना सप्ताहाची योजना बौद्धिक विभागाने तयार केली होती. स्वयंसेवकांसाठी प्रार्थनेवर बौद्धिक वर्ग व्हावा अशी योजना होती. देशभरामध्ये २०१९२ शाखांमध्ये कार्यक्रम झाले. त्यामध्ये २ लाख ९० हजार ३३४ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. सर्व प्रांतांमध्ये यानिमित्त घेण्यात आलेला वक्ता प्रशिक्षण वर्गाचा प्रयोग यशस्वी राहिला. कथाकथन कार्यशाळेचेसुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये ३० प्रांतांतून कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रचार विभाग
प्रचार विभागाद्वारे कोलकाता, दिल्ली, बंगळुरू आणि कर्णावती अशा स्थानांवर स्तंभलेखकांच्या चर्चेचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आतंकवादी समस्यांचे स्वरूप, जम्मू-काश्मीरची समस्या, भारताच्या विकासाची दिशा इत्यादी विषयांवर विचारविनिमय करण्यात आला. त्यामध्ये देशभरातून २२० स्तंभलेखक सहभागी झाले होते. जॉईन आर. एस. एस. च्या माध्यमातून शिक्षित तरुणांना संघाशी जोडण्याचे प्रमाण निरंतर वाढत आहे. त्याकरिता योग्य कार्यकर्ता नियुक्त व्हावा त्यासाठी सर्वच प्रांतांत योग्य प्रयत्न सुरू आहेत. २०१३ मध्ये या माध्यमातून संघाशी जोडल्या गेलेल्या तरुणांची संख्या ३११०२ आहे.
विविध प्रांतांमध्ये संपन्न झालेले विशेष कार्यक्रम
विविध प्रांतांमध्ये कार्यकर्त्यांनी कठोर परिश्रम घेऊन विशेष कार्यक्रम संपन्न केलेले आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाला आहे.
महाकौशल प्रांताचे संकल्प महाशिबिर
स्वामी विवेकानंद सार्धशतीच्या निमित्ताने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे विशेष म्हणजे सर्व तहसील, नगर आणि २५०५ मंडलांपैकी २०७९ मंडळाचे प्रतिनिधित्व शिबिरामध्ये झाले होते. प्रत्येक दायित्वधारी कार्यकर्ता सक्रिय व्हावा, अधिकांश स्थानांचे शिबिरामध्ये प्रतिनिधित्व व्हावे हे लक्ष्य ठेवण्यात आले होते. या माध्यमातून नवीन तरुणांना संघाशी जोडल्या गेले. ६०६६ गावांतून ७१३ नगरीय वस्तीतून १३८ नगराच्या सर्व वस्तीतून ५२ तहसीलच्या सर्व मंडलांतून आणि २४ मंडलांच्या सर्व गावांतून स्वयंसेवक सहभागी झाले होते. एकूण स्वयंसेवकांची संख्या ३४६६८ होती.
शिबिरामध्ये ‘हिंदुत्व एक जीवन दृष्टी’ या विषयाला धरून भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाला १ लाख नागरिकांनी भेट दिली. शिबिराच्या पूर्वतयारीसाठी महाकौशल प्रांतातून ११९१ विस्तारक निघाले. संपूर्ण प्रांतामध्ये १० हजार बैठकी झाल्या. ८ हजार एकत्रीकरणाचे कार्यक्रम झाले. समारोप कार्यक्रमासाठी १ लाख ६० हजार परिवारांमध्ये संपर्क झाला. समारोप कार्यक्रमामध्ये ९० हजार पुरुष-महिलांची उपस्थिती लाभली होती.
मध्यभारत प्रांताचे महाविद्यालयीन विद्यार्थिशिबिर
३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०१४ या काळात मध्यभारत प्रांताचे महाविद्यालयीन शिबिर संपन्न झाले. पूर्वतयारीसाठी प्रांतामध्ये १४२ स्थानावर एकत्रीकरणाचे कार्यक्रम घेण्यात आले. ३३१७ ची यादी तयार करण्यात आली. अर्हताप्राप्त ८३८ स्वयंसेवकांची नोंदणी झाली. प्रत्यक्ष शिबिरामध्ये ८५ स्थानांवरून ५४५ स्वयंसेवक उपस्थित होते. महाविद्यालयीन कार्यामध्ये चांगली वाढ झाली. भविष्यामध्ये विस्तारक जाण्यासाठी ४१ स्वयंसेवक तयार झाले.
गुजरात प्रांतामध्ये जिल्हाश: एकत्रीकरण
आगामी कार्यविस्ताराची योजना लक्षात घेऊन गुजरातमध्ये डिसेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ या कालखंडामध्ये संपूर्ण गुजरात प्रांतामध्ये एक दिवसीय जिल्हाश: एकत्रीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. या एकत्रीकरणामध्ये २५२ पैकी २४८ तहसील व १९४८ मंडलांपैकी ११३३ मंडलांचे प्रतिनिधित्व झाले. महानगरातील सर्व ११६ नगराच्या १२३४ वस्तींपैकी ८४२ वस्तींतून स्वयंसेवकांची उपस्थिती होती. एकूण २३८६ स्थानांवरून २६५१९ स्वयंसेवकांनी एकत्रीकरणामध्ये सहभाग घेतला होता. आगामी काळात कार्यविस्तारामध्ये चांगली वृद्धी होईल, असा विश्वास गुजरातमधील कार्यकर्ता बंधूंनी व्यक्त केला.
छत्तीसगडः विभागश: शाखा टोली शिबिर
छत्तीसगड प्रांतामध्ये गतवर्षी मुख्य शिक्षक, कार्यवाह या स्तराचे कार्यकर्ता शिबिरामध्ये बोलाविले होते. अनुवर्तनासाठी सप्टेंबर महिन्यात शाखा टोली कार्यकर्त्यांचे विभागश: शिबिर व्हावे, अशी योजना बनविली. ४४४ शाखांतून १३६२ कार्यकर्ते शिबिरामध्ये उपस्थित राहिले. परिणाम म्हणून टोलीयुक्त शाखांची संख्या वाढली आणि कार्यकर्त्यांची सक्रियतासुद्धा वाढली.
खंडश: बाल शिबिर
यावर्षी बाल स्वयंसेवकांसाठी २४ तासांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. ७७ खंडांत ही शिबिरे संपन्न झाली. त्यामध्ये ६२५ स्थानांवरून ६५९१ स्वयंसेवक सहभागी झाले. शिबिरामध्ये शारीरिक, बौद्धिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांमुळे बालांचा उत्साह वाढला होता. ४० टक्के नवीन बालस्वयंसेवकांची उपस्थिती, ही या शिबिराची विशेष उपलब्धी राहिली.
पथसंचलन व साहित्य विक्री दिवस
गुणात्मकतेच्या दृष्टिकोनातून जिल्हा केंद्रावर २२ व २४ डिसेंबरच्या मध्यात पथसंचलनाची योजना केली गेली होती. सर्व जिल्हा केंद्रांवर पथसंचलनाचे कार्यक्रम संपन्न झाले. १८४० स्थानांवरून १७८६८ स्वयंसेवक पूर्ण गणवेशात सहभागी झाले होते. ८८५ घोषवादकांची उपस्थिती होती. संचलन झाल्यावर प्रार्थना या विषयावर बौद्धिक वर्ग झाला.
घराघरामध्ये संघ साहित्य पोहोचावे, याकरिता एक दिवस साहित्य विक्रीची योजना केली होती. या योजनेमध्ये ११४ स्थानांवर ११०४ कार्यकर्ता बंधू सहभागी झाले. दोन तासांच्या या कार्यक्रमामध्ये १ लाख रुपयांची पुस्तकविक्री झाली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास व उत्साह निर्माण झाला.
चित्तोड प्रांताचे विराट हिंदू धर्मसंमेलन
चित्तोड प्रांतातील बासवाडामध्ये ‘मानगढ बलिदान शताब्दी समारोह समिती’द्वारा विराट हिंदू संमेलनाचे आयोजन झाले. याप्रसंगी सरसंघचालकांची उपस्थिती लाभली होती. परिसरातील १५० संतांनी या संमेलनाकरिता विशेष परिश्रम घेतले. सामान्य जनतेचा सहयोग व उपस्थिती अत्यंत प्रेरणादायी ठरली. या संमेलनामध्ये ३०२ मंडलांतून २०६३ गावांतून ९५३८५ पुरुष व २६१२९ महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून ८३ गावांमध्ये भजन मंडलीचा प्रवास झाला. ११२४ ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले. अनुवर्तनासाठी तहसील केंद्रावर संघ परिचय वर्गाचे आयोजन पुढील काळात करण्यात येणार आहे.
जम्मूतील हिंदू शक्तिसंगम
सरसंघचालकांच्या जम्मू प्रवासामध्ये ‘हिंदू शक्तिसंगम’ या नावाने प्रांतामधील तरुण स्वयंसेवकांचे एकत्रीकरण ठरले होते. संपूर्ण प्रांतातून ७३८ स्थानांवरून ४८५४ स्वयंसेवक निर्धारित वेशात उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये ५००० नागरिक बंधूंची उपस्थिती होती. जम्मूमध्ये या प्रकारच्या हिंदू शक्ती दर्शनाच्या कार्यक्रमामध्ये हिंदू समाजाचे मनोबल वाढले. कार्यकर्त्यांच्या सक्रियतेच्या दृष्टीने हे आयोजन सफल सिद्ध झाले.
उत्तर आसाम प्रांताचे युवा शक्तिसंगम
उत्तर आसाम प्रांताचे तीन दिवसीय शिबिर तेजपूर येथे २४ ते २६ जानेवारीला संपन्न झाले. शिबिरामध्ये २८ ते ४० वर्षे वयोगटातील स्वयंसेवकांनाच प्रवेश होता. या शिबिरामध्ये २७४९ स्वयंसेवकांनी भाग घेतला. सरसंघचालकांची शिबिरामध्ये पूर्णवेळ उपस्थिती होती. पथसंचलनसुद्धा निघाले. समारोपाच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय विश्व विद्यालयाचे पूर्व उपकुलपती डॉ. अमरज्योती चौधरी यांची उपस्थिती विशेष उल्लेखनीय बाब होती. शिबिरामध्ये संघकार्याचा परिचय देणारे प्रदर्शन लावण्यात आले होते. नगरातील ८००० नागरिकांनी प्रदर्शनाचे अवलोकन केले.
हिंदू जीवनशैलीसमोरील गंभीर समस्या
आपल्या वार्षिक प्रतिवेदनात सरकार्यवाहांनी हिंदू जीवनशैलीसमोरील दोन विषय समाज जीवनामध्ये चर्चेत असल्याचे सांगितले- १) विवाहबाह्य सहजीवन आणि २) समलैंगिकतेला वैधानिक मान्यता देण्याच्या निर्णयावर चर्चा प्रारंभ झाली आहे.
विश्वामध्ये भारत आपली विशेष जीवनशैली, संस्कृती, परंपरेसाठी ओळखला जातो. हजारो वर्षांचे प्रयोग, नैतिक मूल्याधारित एक सुसंस्कृत जीवन विकसित झाले आहे. विवाहसंस्था एक पवित्र संबंध ही आपली विशेषता आहे. परिवार, सामाजिक व धार्मिक मान्यता, मर्यादेचे पालन केल्याने समाजजीवन सुरक्षित राहिले आहे.
सरकार्यवाहांचे मनोगत
आज देशभर संघ कार्याबद्दल आस्था व अपेक्षा वाढली असल्याचा अनुभव आपण करत आहोत. परंतु आपले सामर्थ्यसुद्धा अपेक्षापूर्ती करण्यासाठी पर्याप्त प्रमाणात वाढले पाहिजे. याकरिता निरंतरता व परिश्रमावर अधिक ध्यान दिले पाहिजे. गेल्या दोन वर्षांत कार्यवृद्धीसाठी आम्ही उत्तम योजना करीत आहोत व त्याचे परिणामसुद्धा चांगले दिसत आहेत. श्रद्धा, ज्ञान व कौशल्याने जर आम्ही संघकार्य केले, तर आम्हाला लक्षपूर्तीचा आनंद घेता येईल. पू. गुरुजींच्या शब्दांचे आम्ही स्मरण करावे. ते म्हणत, ‘बोलणे कमी, काम अधिक’ हाच संकल्प आपण करावा. आपली योजना आणि परिश्रम निश्चितच संघाच्या यशाची घोषणा करेल.
सार्धशतीचे भव्य आयोजन
स्वामी विवेकानंद सार्धशतीच्या कार्यक्रमाची तयारी तीन वर्षांपासून सुरू होती. सार्धशतीनिमित्त झालेले कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक, विशाल व पूर्णपणे यशस्वी झाल्याचे चित्र देश व विदेशात दिसले. देशभरामध्ये संकल्प दिवसाचे १०२३९ कार्यक्रम झाले. त्यामध्ये पुरुष व महिला अशी ७ लाख ४० हजार ४१४ अशी संख्या होती. १२ जानेवारीला देशभरामध्ये स्वामी विवेकानंद शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. १५४०९ ठिकाणी हे आयोजन सफल झाले. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये २८७७४९८ पुरुष, ११९१८७० एवढी महिलांची उपस्थिती होती.
१८ फेब्रुवारी २०१३ ला रथसप्तमीला सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ११८८३ स्थानी एकूण ५१९२८ कार्यक्रम संपन्न झाले. एकूण कार्यक्रमामधील संख्या १०६०८७६४ एवढी होती. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यालयाची संख्या ३४६६६ होती. भारत जागो दौड स्पर्धेचा कार्यक्रमसुद्धा उत्साहात संपन्न झाला. ३६९८ स्थानी हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये युवकांची संख्या १४२७५६० एवढी होती, तर युवतींची संख्या ३६१९२० एवढी होती. अन्यांची संख्या ८१५५६८ होती.
नागपूरचा युवा शंखनाद
नागपूर येथे १२ जानेवारीला स्वामी विवेकानंद सार्धशतीनिमित्त ‘युवा शंखनाद’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाप्रसंगी सरसंघचालकजी उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध सिने अभिनेता विवेक ओबेरॉय, त्याचप्रमाणे ‘सुपर-३०’चे जनक आनंदकुमार यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाला २२००० युवकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणून २६५ वस्त्यांमध्ये जाण्याची योजना केली होती. त्याकरिता १ हजार गटनायक तयार केले होते. यानिमित्त ७२६ बैठकी संपन्न झाल्या. या सर्व आयोजनामध्ये ५० विद्यार्थ्यांनी पूर्ण वेळ काम केले. नागपूरच्या विद्यार्थ्यांकरिता अतिशय उत्साहवर्धक हा कार्यक्रम राहिला. तिन्ही मान्यवरांचे प्रभावी मार्गदर्शन मिळाल्याचा आनंद तरुणाईच्या चेहर्यावर दिसत होता.
विश्व विभाग
वर्तमान स्थितीमध्ये ३५ देशांमध्ये ५९४ संघाच्या शाखा आहेत. प्रचारक संख्या २० आहे. विदेशामध्ये १० स्थानी २५ संघ शिक्षावर्ग संपन्न झाले. त्यामध्ये १०६२ उपस्थिती राहिली. राष्ट्रसेविका समितीचे १५ वर्ग झाले. त्यामध्ये ५७२ संख्या होती. स्वामी विवेकानंद सार्धशतीनिमित्त ३२ देशांमध्ये विविध कार्यक्रम संपन्न झाले. त्यामध्ये २ लाख ५० हजार जनतेचा सहभाग राहिला. भारतीय नाहीत, अशांची संख्या २० हजार होती. अमेरिकेमध्ये सार्धशतीच्या उद्घाटनाचे कार्यक्रम ११० ठिकाणी संपन्न झाले.
अखिल भारतीय प्रतिनिधिसभेमध्ये विविध क्षेत्रांचे वृत्तसुद्धा उत्साहवर्धक होते. ८ मार्चला कार्यकर्त्यांसाठी अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य मधुभाई कुलकर्णी यांचा बौद्धिक वर्ग प्रेरणादायी ठरला.
स्वरांजली
अरुणाचल प्रदेशमधील इटानगर येथे संस्कारभारतीद्वारा ‘सरहद्द को स्वरांजली’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. चीनच्या आक्रमणाला ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त १९६२ च्या चिनी आक्रमणामध्ये शहीद झालेल्या वीरांचे स्मरण व श्रद्धासुमन अर्पित करण्यात आले. १९६३ पासून आजपर्यंत जनसामान्यांना रोमांचित करणारे ‘ए मेरे वतन के लोगों’ हे गीत व भूपेन हजारिकाद्वारा रचित स्वरबद्ध केलेले असमिया गीत ‘कत जोवा नर मृत्यु होस’ हा आकर्षणाचा कार्यक्रम राहिला. उत्तर-पूर्व चार राज्यांच्या विद्यार्थ्यांनी या प्रतियोगितेमध्ये सहभाग घेतला होता. या कार्यक्रमामध्ये शहीदवीर जसवंतसिंह रावत यांच्या ९२ वर्षीय मातोश्री लीलादेवीजी उपस्थित होत्या. १००० कलाकारांची उपस्थिती
अ. भा. प्रतिनिधिसभेच्या समारोपप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत म्हणाले, ‘आमचे काम आत्मीयतेवर उभे आहे. शुद्ध सात्त्विक प्रेम अपने कार्य का आधार है| भविष्यामध्ये छोट्या-मोठ्या गोष्टींतून शुद्ध सात्त्विक प्रेम दिसले पाहिजे, याची काळजी कार्यकर्ता बंधूंनी केली पाहिजे. कार्यकर्ता जे बोलतो, ते केले पाहिजे. कार्यकर्त्यांची व्यवहारकुशलता वाढली पाहिजे. सर्वांना मिळून, सोबत घेऊन आम्हाला कार्य करावयाचे आहे. जो संघ डॉ. हेडगेवारांनी उभा केला, तोच संघ आपल्या जीवनामध्ये उभा करावा लागेल. निराश समाजाला प्रेमाने जवळ करावे लागेल.’ सरसंघचालकांचे पाथेय घेऊन व समारोपप्रसंगी झालेल्या ‘ध्येय मंदिर का शिखर दिखने लगा है, पग बढाये’ या गीताचा संदेश घेऊन कार्यकर्ता बंधू उत्साहाने आपआपल्या प्रांतात मार्गस्थ झाले.
– राजेंद्र उमाळे, ९४२३५६३८४५
(लेखक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहकार्यवाह आहेत)