किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमहत्त्वाकांक्षी- आजचे राजकीय वास्तव दर्शवणारी कादंबरी
पुस्तक परीक्षण: प्रा. व्यंकटेश वळसंगकर, गुलबर्गा.
सर्वोत्तम सताळकर हे कथाकार म्हणून गेल्या काही वर्षात प्रसिद्ध होत असलेले लेखक आहेत. कथा या साहित्यप्रकारात त्यानी लक्षणीय यश मिळवले आहे हे अनेक दर्जेदार नियतकालिकातून प्रसिद्ध झालेल्या आणि पारितोषिके प्राप्त केलेल्या त्यांच्या कथावरून सिद्ध होते. आपल्या वैशिष्ठ्यपूर्ण लेखनाने महाराष्ट्रातील अनेक मासिकात आणि दिवाळी अंकात त्यानी आपले स्थान स्थिर केले आहे.
सर्वोत्तम सताळकर यानी आपल्या नव्या पुस्तकात त्यांच्या पूर्वनिर्मित कृतीपेक्षा एक वेगळा प्रयोग केला आहे. त्यानी साहित्यातील अवघड अशा ’कादंबरी’ या ’फॉर्म’ ला हात घातला आहे. नुकतीच प्रकाशित झालेली ’महत्त्वाकांक्षी’ ही गुलबर्गा भागातील लेखकाने लिहिलेली ही पहिली स्वतंत्र कादंबरी असावी. या भागातील साहित्यिकांनी पुसलेल्या वाटेपेक्षा सताळकरांनी ही जी वेगळी वाट निवडली आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे.
’जीवनाचे कलात्मक आणि विस्तृत गद्य चित्र’ अशी कादंबरीची एक व्याख्या सांगता येईल. कादंबरीमध्ये गोष्ट किंवा कथा याचबरोबर काहीतरी एक ’विषय’ हा असतो. विषय हा लेखकाने कादंबरीत सांगितलेल्या कथेचा आत्मा असतो. कादंबरीत प्रसंगाची मालिका,कथानक आणि विषय यांचे एकरूप पहायला मिळते. थोडीशी कल्पनारम्यता असूनही ’प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट’ या न्यायाने कादंबरी ही सत्यपूर्ण असते. कादंबरीबाबतच्या या कसोटीच्या आधारावर मी ’महत्त्वाकांक्षी’ या कादंबरीचे विश्लेषण करतो आहे. या दृष्टीने पहाता कादंबरी या साहित्यप्रकाराची नस सर्वोत्तम सताळकर यांना आपल्या पहिल्याच कादंबरीत अचूक सापडली आहे असे म्हणावे लागेल.
नाथा किनवटकर या एकेक पायरी चढत राजकीय यशाची शिखरे गाठणाया महत्त्वाकांक्षी राजकीय नेत्याचा हा जीवनप्रवास आहे. सत्तास्पर्धा, राजकारण, पैसा मानवी महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठी व्यक्तीपरत्वे होणारा संघर्ष हा या कादंबरीचा गाभा आहे.चित्रपटासारख्या एखाद्या दृश्यमाध्यमाद्वारे सांगावे तसे एकामागोमाग एक घडणारया घटनांच्या सहाय्याने लेखकाने या कादंबरीतील कथानकाची मांडणी केली आहे. तसेच लेखकाने वेधक आणि चित्ताकर्षक प्रसंगमालिका, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्ती आणि त्यांची स्वभावचित्रे आणि वाचकांचे कुतूहल वाढवणारी उत्कंठावर्धक शैली यांच्या आधारे कादंबरीची वाचनीयता कायम ठेवली आहे. महत्त्वाकांक्षी नायक नाथा किनवटकर, त्याची अशिक्षित पण स्वाभिमानी पत्नी महादेवी, जीवनातल्या संघर्षासाठी प्रेरणा देणारी त्याची आई रुक्मिणी, नाथाचे राजकीय गॉडफादर गुरूजी अशा मुख्य व्यक्तिरेखांचे ठसठशीत घटना आणि बोलके प्रसंग यांच्या माध्यमातून यथायोग्य चित्रण करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.
एखाद्या रहस्यकथेला शोभेल अशा नायकाच्या हत्येच्या प्रसंगानेच या कादंबरीची सुरूवात होते आणि कादंबरीच्या शेवटी या हत्येचे रहस्य लेखक वाचकांना उलगडून सांगतो. कादंबरीच्या या दोन टोकामध्ये लेखकाने लॅशबॅक तंत्राने नायकाचा लहानपणापासूनचा जीवनप्रवास सांगितला आहे. बेडरवृत्तीचा आणि बंडखोर नायक नाथा किनवटकर हा वैभव आणि यश मिळवण्यासाठी राजकारणात पडतो आणि कर्तृत्वाची वेगवेगळी शिखरे गाठतो. त्यासाठी कुठल्याही मार्गाचा अवलंब करण्यात त्याला चूक वाटत नसते. त्याच्या महत्त्वाकांक्षेला कुठल्याही विवेकाचा अंकुश नसतो.मग आपल्या हिंमतीने स्वत:चे नेतृत्व सिद्ध करणे, त्याच्या राजकीय पक्षाचे प्रमुख असणाया गुरूजींच्या मनाप्रमाणे वागून त्यांची मर्जी संपादन करणे, भलेबुरे मार्ग वापरून निवडणुका जिंकणे, आपल्या विरोधकावर मात करणे हे सगळे साध्य करत नाथा राजकारणात यशस्वी होतो पण हे सगळे यश मिळवताना स्वत:च्या पित्याकडे दुर्लक्ष करणे, पत्नीची प्रतारणा करणे, कुठल्याही प्रकारचा विधीनिषेध न बाळगणे आणि स्वत:च्या जवळच्या माणसांना धोका देणे हे ही त्याच्याकडून घडत जाते. मग यातूनच यशाच्या अत्त्युच्च शिखराच्या जवळ पोंचत असतानाच त्याची हत्या होते आणि एका यशस्वी राजकीय नेत्याच्या जीवनाची शोकांतिका होते.
पण एक रहस्यमय कथानक सांगून वाचकांचे केवळ मनोरंजन करणे हा लेखकाचा हेतू निश्चित नाही. त्याला आजच्या राजकारणाचे दाहक वास्तव सांगायचे आहे आणि त्यात तो यशस्वी झाला आहे हे ही कादंबरी वाचल्यानंतर जाणवते.आजच्या राजकारणातील तत्वशून्यता, फसवणुक जीवघेणी स्पर्धा, आणि सत्तेच्या वेगवेगळ्या खेळात जाणारे निरपराध लोकांचे बळी हे सगळे वेगवेगळ्या प्रसंगातून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात सताळकर यशस्वी झाले आहेत. या कादंबरीचे प्रस्तावनाकार न्या. श्री नरेन्द्र चपळगांवकर यांच्या शब्दात सांगायचे तर ’ समाजाच्या नीतीकल्पनांना मुळापासून उखडून फेकणारे राजकारणाचे वास्तव हेच कादंबरीचे मुख्य कथानक आहे.’ शेवटच्या प्रकरणातील ’फार हिंसक आणि क्रूर आहे आजचं राजकारण’ या वाक्यातून कादंबरीचे मर्म ध्यानात येते. एकूणच वाचकाच्या विचाराला चालना देण्यात, आजच्या राजकारणाच्या भीषण सत्यस्थितीवर प्रकाश टाकण्यात आणि अशा भ्रष्ट राजकारणाच्या परिणामाचे भान वाचकांना देण्या्त सताळकर यशस्वी झाले आहेत यात शंका नाही.
वाचकांना एक उत्कंठावर्धक तशीच वास्तववादी कादंबरी दिल्याबद्दल सर्वोत्तम सताळकर यांचे मनापासून अभिनंदन आणि त्याच्या पुढच्या साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा!
कादंबरी : महत्त्वाकांक्षी,
लेखक : सर्वोत्तम सताळकर,
प्रकाशक : अपूर्व पब्लिकेशन्स, पुणे,
पृष्ठे : १७५,
मूल्य : रू. १६०,
संपर्क : मो. ०९२४२१९३७९२.
प्रा. व्यंकटेश वळसंगकर
’ सुयोग’ जयतीर्थ कल्याण मंडपाच्या
मागची कॉलनी, उदनूर रस्ता
गुलबर्गा (कर्नाटक)
मोबाईल-०८९५१७५२१६४