किमान तापमान : 26.94° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.87 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
26.93°से. - 31°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.73°से. - 29.76°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.81°से. - 29.63°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.54°से. - 29.57°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.84°से. - 29.35°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाश25.78°से. - 28.96°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल=ठरावाच्या बाजूने ४५, विरोधात २२ मते=
मुंबई, [१६ मार्च] – विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने मांडलेला अविश्वास ठराव आज सोमवारी ४५ विरुद्ध २२ मतांनी मंजूर झाला. उपसभापती वसंत डावखरे यांनी सदर निकाल जाहीर करताच नियमानुसार सभापती पदावरून शिवाजीराव देशमुख हे पदमुक्त झाले. विधान परिषदेच्या इतिहासात अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने गेल्या हिवाळी अधिवेशनातच शिवाजीराव देशमुख यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मांडला होता. हा प्रस्ताव दिल्यानंतर कॉंग्रेस पक्षाने सभापतीपद सोडून उपसभापतीपदावर दावा केला होता. मात्र, कॉंग्रेस पक्षाचा प्रस्ताव राष्ट्रवादी कॉंग्रेसने अमान्य केला. त्यामुळे सभागृहात भाजपाचे १२, कॉंग्रेस २१, राष्ट्रवादी कॉंग्रेस २८, शिवसेना ७ आणि अपक्ष ७ अशी ७८ संख्या असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस यशस्वी होईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. सदर प्रस्ताव देऊन नियमानुसार १४ दिवस पूर्ण झाल्याने सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात हा अविश्वास ठराव सभागृहात मांडून चर्चेसाठी स्वीकारला गेला. त्याप्रमाणे सभागृहाच्या गटनेत्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार सोमवारी या अविश्वास ठरावावर चर्चा झाली. राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला. उपसभापती वसंत डावखरे यांनी या ठरावावर चर्चेसाठी अनुमती दिल्यानंतर, प्रत्यक्ष चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेत कॉंग्रेस गटनेते माणिकराव ठाकरे, शिवसेनेचे गटनेते व मंत्री रामदास कदम, कपिल पाटील, प्रा. जोगेंद्र कवाडे, शेकापचे जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे गटनेते सुनील तटकरे यांनी सहभाग घेतला. रामदास कदम यांनी अविश्वास ठराव हा नियमाला धरून नसल्याचे मत व्यक्त केले. अपक्ष आमदार कपिल पाटील आणि माणिकराव ठाकरे व प्रा. कवाडे यांनी ही या प्रस्तावाला विरोध करून अविश्वास ठराव मागे घेण्याची मागणी सभागृहात केली.
मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि गटनेते सुनील तटकरे यांनी हा अविश्वास ठराव नियमाच्या चौकटीत बसणारा असल्याचे उपसभापतींच्या निदर्शनास आणून दिले. सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याबद्दल आम्हाला खूप आदर असून, सभापतींविरोधात द्वेष नसून त्यांच्या सभोवताली असलेल्या सल्लागारांच्या विरुद्ध घेतलेली ही भूमिका असल्याचे स्पष्ट करून, तटकरे यांनी माणिकराव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तर, संख्याबळानुसार सभापतींनी राजीनामा दिला असता तर आम्ही हा ठराव आणला नसता, असे स्पष्ट करून संविधानाचा आदर करून लोकशाही मार्गाने हा ठराव असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
दरम्यान, सभागृहात सर्वात मागच्या रांगेत बसलेले सभापती शिवाजीराव देशमुख यांनी त्यांच्याविरोधात मांडलेल्या अविश्वास ठरावावर एक शब्दही न बोलता आपला जीवनप्रवास सभागृहासमोर मांडला. त्यानंतर उपसभापती वसंतराव डावखरे यांनी मतदान घेण्याचे जाहीर केले. मात्र, रामदास कदम यांनी शिवसेना मतदानात भाग घेणार नसल्याचे सांगत तटस्थ भूमिका घेतली. त्यानुसार सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करून आवाजी मतदान घेतले. त्यानंतर उपसभापती वसंत डावखरे यांनी लागलीच निकाल जाहीर केला. यावेळी शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बाजूने मतदान केले.
विधिमंडळाच्या इतिहासात दुसरी घटना
महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात हा दुसरा अविश्वास ठराव मंजूर झाल्याची नोंद झाली आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या गजानन गरुड यांच्याविरुद्ध १९७९ साली अविश्वास ठराव मंजूर झाला होता, तर विधानपरिषदेच्या इतिहासात सभापतींविरुद्धचा हा पहिलाच अविश्वास ठराव आहे.
सभापतींनी मानले सर्वांचे आभार
सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सभागृहात अविश्वास ठरावावर आपले मत मांडले. यावेळी त्यांनी आपला जीवनप्रवास सभागृहात उलगडला. ११ वर्षे काम करताना विधिमंडळाचे अधिकारी, कर्मचारी, सदस्यांचे सहकार्य मिळाले असल्याने त्यांची आभार मानून पक्षनेत्या सोनिया गांधी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सेनेने कॉंग्रेसचे समर्थन केले – अजित पवार
लोकशाहीमध्ये जे निर्णय वेळीच घ्यायचे असतात, ते घेतले नाहीत. उलट नागपूर अधिवेशनात आमच्या विरोधीपक्षनेतेपदासाठी खोडा घालण्याचा प्रकार कॉंग्रेसने केला. आमची सदस्यसंख्या जास्त असल्याने, कॉंग्रेसने स्वतःहून राजीनामा देऊन सभापतीपद राष्ट्रवादीला द्यायला पाहिजे होते. असे केले असते तर हा प्रसंगच ओढावला नसता, असे मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केले. सभागृहात सेनेने कॉंग्रेसचे उघड समर्थन केले, मावळते सभापती शिवाजीराव देशमुखांनी भर सभागृहात उद्धव ठाकरेंचे आभार मानले. हा सर्व प्रकार सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितला. त्यामुळे इतरांकडे बोट दाखविण्याचे कोणतेही कारण नाही, असे खडेबोलही पवारांनी सेनेला सुनावले.
फडणवीसांच्या कुटनीतीचे यश – ऍड. आशीष शेलार
या घटनेकडे राजकीय दृष्टीने बघितले असता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे उघड झाले आहे आणि विरोधकांमध्ये पडलेली ही फूट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटनीतीचे यश असल्याने, खर्या अर्थाने मी त्यांचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया अविश्वास ठरावाचे समर्थन करताना, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ऍड. आशीष शेलार यांनी दिली.
कॉंग्रेसमुक्त भारत घोषणेला अनुसरून केलेली कृती- खडसे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॉंग्रेसमुक्त भारताच्या घोषणेला अनुसरून आम्ही कॉंग्रेसला दूर करण्यासाठी राष्ट्रवादीला पाठिंबा दिला. राष्ट्रवादीच्या ठिकाणी अन्य कोणताही दुसरा पक्ष असता तरी आम्ही त्याला पाठिंबा दिला असता, असे मत ज्येष्ठ मंत्री व भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.