|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 22.99° से.

कमाल तापमान : 24.08° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 56 %

वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

22.99° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.53°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » चंदेरी » ‘स्मित’हास्य लोपले!

‘स्मित’हास्य लोपले!

चित्रपट अभिनेत्री म्हटली की, एक ग्लॅमरस रूप आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. स्मिता तळवलकर याला अपवाद होत्या. तुमच्या-आमच्या अवतीभवती वावरणार्‍या लोकांप्रमाणेच या व्यक्तिमत्त्वाची एकूण चेहरेपट्टी होती. सर्वसामान्य कुटुंबामध्ये वावरणार्‍या गृहिणीचे दर्शन या व्यक्तिमत्त्वात होत होते. काही प्रकारच्या भूमिका आपल्या वाट्याला येऊच शकणार नाही, या मर्यादेची कदाचित त्यांना जाणीवही असावी. आपल्या मर्यादा काय आणि आपले बलस्थान काय, याचा कलावंताला पुरेपूर परिचय असला, तर त्याला यश संपादन करण्यासाठी ते साहाय्यभूत ठरते. या जाणिवेतूनच सशक्त कलाकार जन्माला येतो. स्मिता तळवलकरांनी मराठी चित्रपटसृष्टीवर एक अमिट छाप सोडली, हे तेवढेच खरे!
स्मिता तळवलकर या मराठमोळ्या अभिनेत्रीने सर्व रसिकांच्या काळजाचा ठोका चुकवत अकाली एक्झिट घेतली. एक स्मितहास्य लोपल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरातून ऐकायला मिळते आहे.
स्मिता तळवलकरांचा अमरावतीशी तसा काहीच संबंध नव्हता. काही व्यावसायिक नाटकांच्या निमित्ताने त्यांचे अमरावतीला येणे व्हायचे. मात्र, अमरावतीच्या सांस्कृतिक क्षेत्रात एक तप भरीव कामगिरी करणार्‍या ‘सुरभि’ या संस्थेच्या दशकपूर्ती समारोहाला स्मिता तळवलकर पाहुण्या म्हणून आल्या होत्या. सुरभिच्या तत्कालीन अध्यक्ष डॉ. मोहना कुळकर्णी यांची स्मिता तळवलकर ही पुण्याची बालमैत्रीण. दोघींचीही शाळेतील ओळख व नाते नंतरही टिकलेले. मोहनाताईंच्या मैत्रीपोटीच त्या पाहुण्या म्हणून आल्या. एखाद्या कार्यक्रमाला सिनेअभिनेत्रीला अतिथी म्हणून बोलवले तर त्या अतिथीला सांभाळणे किती कठीण असते, याचा अनुभव अनेकांना आहे. मात्र, स्मिता तळवलकरांबाबत वेगळाच अनुभव आला. एखाद्या चित्रपट अभिनेत्रीला कसे आणि किती झेलावे, याचे दडपण सुरभिच्या कार्यकर्त्यांवर आले नाही. चित्रपट क्षेत्रात यश मिळाल्यानंतरही स्मिता तळवलकरांचे पाय जमिनीवर होते, हेच या अनुभवावरून दिसून आले.
केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नितीन गडकरी यांनी स्मिता तळवलकरांना श्रद्धांजली वाहताना त्यांचा नागपूरशी असलेला आणखी एक महत्त्वपूर्ण ऋणानुबंध नमूद केला आहे. नागपूरच्या संजय सूरकर नामक तरुणाची चित्रपटसृष्टीत पाय रोवण्यासाठी मुंबईत धडपड सुरू असताना स्मिता तळवलकरांनी त्यांना चित्रपट दिग्दर्शनाची संधी दिली. या संधीमुळेच संजय सूरकरसारखा प्रभावी दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला. विदर्भाशी त्यांचे काही नाते असेल तर ते एवढेच!
एक संवेदनशील कलावंत म्हणून स्मिता तळवलकरांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. चित्रपटक्षेत्रात यश मिळाल्यानंतर याच क्षेत्रात करीअर करू पाहणार्‍यांसाठी अत्यल्प दरात प्रशिक्षण देणारी ऍकेडमी त्यांनी स्थापन केली होती. शेवटचे काही वर्ष त्या कर्करोगाने त्रस्त होत्या. मात्र, त्यांनी आपल्या दुखण्याचा लवलेशही चेहर्‍यावर दिसू दिला नाही. जिथे शक्य आहे तिथे आनंदात कसे जगावे, याचा मंत्र त्यांनी अनेकांना दिला. कर्करोगाने जडलेल्या लोकांच्या एकत्रीकरणात जाऊन हात-पाय गाळलेल्या लोकांना त्यांनी जगण्याची उमेद दिली. एक संवेदनशील कलावंतच असे वागू शकतो.
त्यांचा अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती म्हणून झालेला प्रवास सहज नव्हता. सर्वांना करावा लागतो तो संघर्ष त्यांनाही करावाच लागला. सुरुवातीला त्यांनी मुंबई दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून आपल्या कामाला प्रारंभ केला. त्याहीपूर्वी त्या रेडिओवर युवावाणी नावाचा कार्यक्रम करायच्या. दूरदर्शनवर बातम्या वाचण्याचा त्यावेळचा रिवाजच वेगळा होता. बातम्या हा पाहण्याचा विषय नसून त्या ऐकल्या गेल्या पाहिजेत, अशी धारणा होती. सुरुवातीच्या काळात दूरदर्शनवर बातम्या सांगणार्‍याच्या चेहर्‍यावरचे भाव स्थितप्रज्ञ आणि अलिप्त असले पाहिजेत, असे बंधन होते. फार हाव-भावांना स्थान नव्हते. पारदर्शी साड्या चालत नव्हत्या. वेषभूषेचेही बंधन होते. वृत्तनिवेदिकांना अशा प्रकारचे प्रशिक्षणच दिले जायचे. त्या वेळी केवळ स्मिता तळवलकरच नव्हे, तर पुढच्या काळातील आघाडीची नायिका स्मिता पाटील आणि रंगभूमीवर फुलराणीला अजरामर केलेल्या भक्ती बर्वे या देखील वृत्तनिवेदिकाच होत्या. आपल्या एका मुलाखतीत स्मिता तळवलकर यांनी याबाबत बोलकी प्रतिक्रिया दिली होती. ज्यावेळेला तुम्ही पडद्यावर दिसता त्यावेळेला तुमचे डोके जास्त चालले पाहिजे, हा सर्वांत महत्त्वाचा संस्कार आपल्यावर याच काळात झाला. आता वाहिन्यांचे पीक आल्यावर वृत्तनिवेदिकांच्या आताच्या पिढीत असा संस्कार दिसत नसल्याचे स्मिता तळवलकरांनी खेदपूर्वक नमूद केले होते. टीव्हीमुळेच स्मिता तळवलकर यांना पुलं, सई परांजपे, सुहासिनी मुळगांवकर, ज्योत्स्ना किरपेकर, विजया जोगळेकर-धुमाळे, विनय धुमाळे, विनय आपटे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. शिवाय वाचिक अभिनयाचा चांगला सरावही त्यांना याच काळात झाला असावा. सोबतच रंगभूमीवरही उल्लेखनीय कामगिरी करता करता स्मिता तळवलकर नावाची एक अभिनेत्री मराठी चित्रपटाला मिळाली. मात्र, निर्मिती आणि दिर्ग्दशनामुळे स्मिता तळवलकर यांना एक आगळीवेगळी उंची लाभली.
चित्रपटक्षेत्राची एक विशेष बाब आहे. ज्या चित्रपटांना पुरस्कार मिळतात ते व्यवसाय करीत नाहीत आणि बॉक्स ऑफिसवर दणकून चालणार्‍या चित्रपटांना पुरस्कार मिळतीलच असे नाही. मात्र, स्मिता तळवलकरांचे मराठी चित्रपट व्यवसाय आणि पुरस्कार या दोन्हींसाठी पात्र ठरले, हे त्यांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. स्मिता तळवलकरांचा आणखी एक नवा परिचय म्हणजे त्यांनी आपल्या चित्रपटांची वितरण व्यवस्था अतिशय चोख सांभाळली. विविध कल्पना राबवून त्यांनी आपल्या चित्रपटांना धंदा मिळवून दिला. आपले चित्रपट क्लासेससाठी नसून ते मासेससाठी असतात असे स्मिता तळवलकर नेहमी म्हणायच्या. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांतून हळुवार उलगडत जाणारी नाती, हलकाफुलका विनोद आणि मुख्य म्हणजे मनाला स्पर्श करणारे कथानक प्रेक्षकांच्या मनात उतरायचे.
एका परिपूर्ण चित्रपटाच्या निर्मितीसाठी सगळ्यात महत्त्वाचे असते टीमवर्क. संपूर्ण चमूने सांघिक भावनेने काम करण्याचे श्रेय अर्थातच निर्माता किंवा दिग्दर्शकाचे असते. त्या दोघांपैकी एकाला तरी सर्व कलावंतांची मोट बांधावी लागते. यात स्मिता तळवलकर प्रवीण होत्या. कळत-नकळत, चौकट राजा, सवत माझी लाडकी, तू तिथे मी आणि सातच्या आत घरात हे गाजलेले चित्रपट पाहताना, सर्वच कलावंतांनी केलेले परिश्रम आपल्याला जाणवतात. त्यासाठी आवश्यक ते वातावरण उभे न झाल्यास ही बाब अशक्य असते. तसे झाले नाही तर त्या कलाकृतीला हमखास प्रेक्षक नाकारतात.
स्मिता तळवलकरांनी चित्रपटांची निर्मिती करताना केवळ रंजनाला महत्त्व दिले नाही, हेही त्यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्यच. दिल्लीच्या निर्भया प्रकरणापासून संपूर्ण देशातील समाजमन सुन्न झाले आहे. जागतिकीकरणाच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात भारतात महिलांची स्थिती पूर्वी कधीच नव्हती एवढी खराब झाल्याने सगळेच चिंतित आहेत. स्मिता तळवलकरांनी ‘सातच्या आत घरात’ या चित्रपटातून या गंभीर प्रश्‍नाची उकल करण्याचा प्रयत्न केला. मराठी चित्रपटसृष्टीला सामाजिकपटांची परंपरा आहे. या परंपरेत नव्या काळातला एक अत्यंत प्रभावी चित्रपट म्हणून ‘चौकट राजा’ या चित्रपटाचा आपल्याला आवर्जून उल्लेख करावा लागेल. त्यांच्या कारकीर्दीतील सगळ्यात उल्लेखनीय कामगिरी म्हणून चौकट राजाचा उल्लेख करावा लागेल.
या चित्रपटात दिलीप प्रभावळकरांनी उभा केलेला मतिमंद नंदू अजरामर ठरला. शरीराने वाढलेला मात्र मनाने केवळ दहाच वर्षांचा असलेला मतिमंद मुलगा पोटी जन्माला घातला म्हणून पिडलेली आणि शेवटी त्याच मुलासाठी जगणे भाग आहे म्हणून जगणारी आई सुलभा देशपांडेंनी समर्थपणे साकारली. मतिमंद नंदूशेठला समजून घेणारा आणि त्यावर अपार प्रेम करणारा गणा अशोक सराफांनी साकारला. यातील काही ह्रदयस्पर्शी प्रसंगाने लोक गलबलून जातात. नंदूशेठला हे कायमचे मतिमंदत्व येण्यास आपणच कारणीभूत असल्याचे, आयुष्याच्या मध्यात असलेल्या मीनलच्या म्हणजेच स्मिता तळवलकरांच्या लक्षात येते. मतिमंद नंदूशेठमध्ये मीनलचे गुंतणे तिच्या पतीला राजनला मान्य नसते. एकीकडे नंदूशेठच्या आजच्या या अवस्थेसाठी तुटणारा मीनलचा जीव आणि दुसरीकडे नवर्‍यासोबत सुरू झालेले द्वंद्व ही द्विधा मन:स्थिती, त्यातून येणारी तगमग आणि त्यातून उभा राहणारा संघर्ष या चित्रपटाचे बलस्थान आहे.
समाजामध्ये नंदूसारख्या घटकांकडे बघण्याची मानसिकता कशी आहे, याचे वास्तव चित्रण चौकट राजा चित्रपटात करण्यात आले आहे. एक सामान्य गृहिणी आपल्या कुटुंबातील वातावरण बदलवते. बालपणाच्या मैत्रीतील भावबंध जपण्यासाठी ती आपल्या कुटुंबाची मानसिकता बदलवते. अखेर राजन आणि मीनल एकाकी असलेल्या नंदूला दत्तक घेऊन आपली सामाजिक बांधिलकी निभावतात. या चित्रपटातील सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिकांना पूर्ण न्याय दिला आहे. शिवाय चौकट राजा चित्रपट आपले अनुभवविश्‍व सर्वाधिक समृद्ध करून गेल्याचे स्मिता तळवलकर नेहमी सांगायच्या. केवळ रंजनापुरते मर्यादित न राहता समाजाला आवश्यक असलेल्या विषयांची नीट मांडणी केली, तर त्याचा परिणामही होतो आणि व्यवसायाच्या पातळीवरही यश मिळते, असा ट्रेंड चौकट राजा या चित्रपटाने मराठीत आणला, असे आपल्याला निश्‍चित म्हणता येईल.
‘तू तिथे मी’ हादेखील त्यांचा एक भावनाप्रधान चित्रपट. आयुष्यभर काबाडकष्ट करून संसार उभा केलेल्या अनेक वृद्धांच्या वाट्याला आयुष्याच्या संध्याकाळी असहाय जीवन जगण्याची वेळ येते. अनेकांच्या वाट्याला वृद्धाश्रम येतो. प्रत्येक घरात तीन पिढ्या असतात. यातील तरुण पिढी स्वत:चे आयुष्य उभे करण्याच्या धुंदीत असते. अनेकदा घरातील ज्येष्ठांशी त्यांचे भावबंध घट्ट असले, तरी ते दर्शविण्याची काळजी घेतली जात नाही. आपल्या नोकर्‍या, आपली बढती, आपला संसार या भानगडीत वृद्ध पिढीच्यादेखील काही आवश्यकता आहेत, याचे भान ठेवले जात नाही. प्रेमाची भावना असतानाही नकळत ज्येष्ठांची गोची होते. नकळत अवहेलनाही होते. या काळात त्यांना आपल्या ‘पार्टनर’ची सर्वांत जास्त आवश्यकता असते, याची जाणीवही नसते. या गतिमान युगात मग त्या वृद्धांची फरफट होते. त्यांनाही भावभावना आहेत. हे घर उभे करण्यासाठी त्यांनी आयुष्य दिले असले, तरी त्यांचे स्वत:चेही वैयक्तिक आयुष्य आहे. केवळ शारीरिक गरजा भागवून चालणार नाही, तर त्यांच्या मानसिक गरजांचाही विचार केला गेला पाहिजे. अशा एका हळुवार विषयावर ‘तू तिथे मी’ची मांडणी त्यांनी फारच प्रभावीपणे केली. हिंसाचार, रक्तपात, हाणामारी, भडक नृत्य, कर्णकर्कश डायलॉगबाजी यापेक्षा वेगळे, हळुवार देण्याचा प्रयत्न स्मिता तळवलकरांनी केला. मराठी रसिकांना अभिरुचिसंपन्न करण्यात त्यांचाही वाटा आपल्याला मान्य करावाच लागेल.
केवळ चित्रपटसृष्टीतच नाही, तर स्मिता तळवलकर यांनी दूरदर्शवरही आपली छाप उमटवली होती. अनेक मालिकांच्या माध्यमातून त्या घराघरांत पोहोचल्या. बहुतांश मालिकांमध्ये सर्वसामान्य मराठी माणसाच्या घरात आजही पाहायला मिळणारे वातावरण दिसतच नाही. पंचतारांकित वस्त्यांमध्ये कथित श्रीमंतांच्या आणि लब्धप्रतिष्ठितांच्या कुटुंबातील मानवी नात्यांची गुंतागुंत दाखवण्याचाच अनेकदा प्रयत्न असतो. कथेचा एक ‘प्लॉट’ तयार केला की, ती कथा केवळ ‘टीआरपी’ वाढवण्याच्या उद्देशानेच वळण घेत जाते. या पार्श्‍वभूमीवर स्मिता तळवलकरांच्या मालिका बर्‍याच अंशी आपले मराठमोळेपण जपणार्‍या होत्या. गतिमान युगात माणसांच्या नात्यांची वीण सैल होत चालली, ती अधिक घट्ट करण्याचा संदेश देणार्‍या मालिका त्यांनी जन्माला घातल्या. मुख्य म्हणजे मराठी माणसाने त्यांच्या या प्रयत्नांना भरभरून प्रतिसादही दिला. राष्ट्रीय स्तरावरचे आणि राज्य स्तरावरचे सन्मानही त्यांच्या पदरी पडले. स्मिता तळवलकरांना दीर्घायुष्य लाभले असते, तर त्यांच्या समृद्ध अनुभवविश्‍वाचा मराठी रसिकांना अधिक लाभ झाला असता. मात्र, नियतीला ते मान्य नव्हते. एक अनुभवसंपन्न स्मितहास्य काळाने हिरावून नेले…
– शिवराय कुळकर्णी

Posted by : | on : 15 Aug 2014
Filed under : चंदेरी
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g