|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:17 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.74° से.

कमाल तापमान : 24.99° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.99° से.

हवामानाचा अंदाज

23.55°से. - 26.39°से.

गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.37°से. - 26.92°से.

शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.18°से. - 27.4°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.63°से. - 27.91°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.88°से.

सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.35°से.

मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल
Home » अग्रलेख, संपादकीय » निर्णायक लढाई

निर्णायक लढाई

भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्र्यांची पक्षाच्या संसदीय मंडळासोबत दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दुहेरी उत्साह होता. तीन राज्यांत निर्विवाद बहुमत मिळवून विजय मिळवत देशात भाजपाची लाट असल्याचे उद्घोषित करणारे तीन विजयी मुख्यमंत्री या बैठकीत होते आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केल्यानंतर देशात तयार झालेल्या भाजपाच्या या लाटेचा प्रत्यय वाराणसी, मुंबईच्या सभांमध्ये येत असल्याने त्याचाही उत्साह दिसत होता. मात्र, केवळ लाटेवर स्वार होण्याचा विचार न करता भारतीय जनता पक्षाच्या या दिल्लीतील बैठकीत भारतीय जनसंघाच्या जुन्या आपल्या शिस्तबद्ध स्वभावाचा परिचय देत मतदार संपर्क अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. विशेषत: भाजपावर कॉंग्रेसचीच कॉपी असल्याचा आरोप अत्यंत सवंगपणे आणि चढ्या आवाजात केजरीवाल आणि कंपनी करत असताना भाजपाने केलेला हा संकल्प पार्टी विथ डिफरन्स असा परिचय देणारा आहे. देशात मोदी लाट आहे आणि फक्त त्या लाटेवर स्वार होत सत्ता संपादन करायची, असा तद्दन राजकीय विचार भाजपाने ठेवलेला नाही.
भारतीय जनता पक्षाच्या या बैठकीत एक अपूर्व उत्साह होता. तीन राज्यांतील निर्विवाद यशाचे मानकरी असलेले तीनही मुख्यमंत्री आणि गोव्यात अत्यंत लोकाभिमुख सरकार चालविणारे मनोहर पर्रीकर यांचे अत्यंत आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आले.
भारतीय जनता पक्ष हा संघ संस्कारातून उभा राहिलेला पक्ष आहे त्यामुळे लोकसंपर्क हा या पक्षाचा प्राण आहे. दोन माणसे जोपर्यंत एकमेकांशी बोलायचे थांबत नाहीत, तोपर्यंत संघाचे काम बंद होऊ शकत नाही, असे संघाबाबत म्हटले जाते. ‘व्यक्ती व्यक्ती जमवुनी भवती जागृत करणे तयाप्रती’ असा संघाच्या स्वयंसेवकांचा संकल्प नेहमी व्यक्त होत असतो. याच आधारावर बंदी असो की हुकूमशाही वरवंटा असो, संघाचे काम कोणी थांबवू शकलेले नाही. या संस्काराचा वसा घेऊन राजकीय क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी जसा विचार केला पाहिजे, तसा विचार भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत, हे देशाला आश्‍वासक असे चित्र आहे.
नरेंद्र मोदी यांची मुंबईत झालेली महागर्जना सभा बरीच गाजली. या सभेत मोदी यांनी स्वत:साठी किंवा आपल्या पक्षासाठी काही आवाहन न करता वोट फॉर नेशन अशी घोषणा दिली. अटलजींचे सरकार एका मताने कोसळले आणि त्यानंतर निवडणुका झाल्या त्यावेळी मतदानानंतर पत्रकारांनी अटलजींना विचारले होते की कोण जिंकेल? काय होईल? तेव्हा अटलजींनी उत्तर दिले होते, ‘जितेगा भारत, जितेगी भारतीयता|’ तशाच प्रकारची घोषणा म्हणजे वोट फॉर नेशन ही आहे.
या विधानसभा निवडणुकीत दिल्लीत धूमकेतूसारख्या उगवलेल्या आम आदमी पार्टीच्या यशाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या या बैठकीत काय चर्चा होते आणि कोणते संकल्प होतात, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. वास्तविक आम आदमी पार्टीने पहिल्या दिवसापासून देशातील सर्व लोक चोर आहेत आणि आपणच तेवढे साव असल्याचा आव आणला आहे. या पक्षाचा राजकीय सिद्धांत कोणता? राजकीय विचार कोणता? ते अजून बाहेर आलेले नाही. फक्त सवंग घोषणा करायच्या आणि राजकारणात असलेल्या सर्वांना शिव्या द्यायच्या, एवढीच यांची कार्यपद्धती आणि तितकेच यांचे तत्त्वज्ञान, असे दिसते आहे. तरीही या पक्षाला जे यश दिल्लीत मिळाले ते कशामुळे असा प्रश्‍न अनेकांना पडला. जगात प्रस्थापित व्यवस्थेविरोधात सामान्य जनतेला उठाव करायला प्रोत्साहित करण्याचे एक कारस्थान महासत्ता म्हणविणारे देश खेळत असल्याचे दिसत आहे. केजरीवाल आणि कंपनीची भाषा पाहिली की अशाच प्रकारचे हे खेळ आहेत की काय, अशी शंका येऊ लागली आहे. दिल्लीतील निवडणूक प्रचारात या आम आदमी पक्षाने देशभक्ती, देशहिताची ना कधी भाषा केली ना देशापुढील राष्ट्रीय प्रश्‍नावर मत व्यक्त केले! फक्त आम आदमी या नावाने लोकांना भडकविण्याची यांची भाषा आहे. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या या बैठकीत झालेले चिंतन आणि निर्णय अतिशय बोलके आहेत.
आम आदमी पक्षाच्या यशावरून देशातील इतर राजकीय पक्ष काही बोध घेणार की नाही? आपली कार्यपद्धती काही सुधारणार की नाही? असा एक प्रश्‍न विचारी लोकांच्या मनात उभा राहू लागला होता. भारतीय जनता पक्षाच्या या दिल्लीतील बैठकीत या विचाराला सकारात्मक उत्तर सापडले आहे, असे म्हणावे लागेल. आगामी लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने एक व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याचे ठरविले आहे. भाजपाशासित राज्यातील सुशासन लोकांसमोर मांडण्याचा संकल्प करण्यात आला आहे. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि त्याला मिळत असलेली मोठी मान्यता, हा काही सवंगतेला मिळणारा प्रतिसाद नाही की गुजरातमध्ये दहा वर्षांपूर्वी गोध्रा नंतर घडलेल्या उद्रेकाचा परिणामही नाही. नरेंद्र मोदींनी तीन वेळा गुजरातच्या जनतेने दिलेल्या संधीचा सोन्यासारखा उपयोग केला आणि जो विकास तेथे घडवून दाखविला, प्रशासनात जी तत्परता आणि पारदर्शकता आणली त्याचा परिणाम म्हणजे हा प्रतिसाद आहे. व्यापार आणि उद्योगाच्या निमित्ताने वा अन्य कोणत्याही कारणाने देशातील कानाकोपर्‍यातील जे लोक गुजरातेत जातात, त्यांना तेथे मोदी यांच्या सरकारच्या प्रशासनाचा, विकासकामांचा अनुभव येतो आणि ते सर्वजण आपापल्या भागात जाऊन गुजरात सरकारचे दूत असल्यासारखे मत तयार करतात. यामुळे मोदी यांच्या नेतृत्वाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. मोदी यांना एक संधी दिली पाहिजे, असा विचार लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे. कॉंग्रेसची मंडळी गुजरातचा विकास झालाच नाही, असे कितीही ओरडून सांगत असले, तरी प्रत्यक्ष अनुभवांती लोकांची मोदींना पसंती असल्याने या कॉंग्रेसी प्रचाराला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. अगदी कॉंग्रेसजन खाजगीत मोदी यांना पसंती व्यक्त करताना गावागावात दिसत आहेत. या पार्श्‍वभूमीवर या दिल्लीतील बैठकीत भारतीय जनता पक्षाने अधिकाधिक लोकांपर्यंत संपर्क करण्याची योजना आखली आहे. मताबरोबरच पक्षासाठी निधीही द्यावा, असे म्हटले आहे. ४५० जागांना विचारात घेऊन दहा कोटी लोकांशी थेट संवाद साधण्याची योजना भारतीय जनता पक्षाने आखली आहे.
देशातले वातावरण अतिशय वेगळे आहे. जनता अतिशय त्रस्त आहे. वरचेवर वाढत्या महागाईने लोकांचे प्राण कंठाशी आले आहेत. दहशतवाद दारात येऊन उभा आहे. रोज एक घोटाळा बाहेर येतो आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक सामान्य माणसाला बदल हवा आहे. या पार्श्‍वभूमीवर केवळ गुजरातेतच नाही, तर मध्यप्रदेश, छत्तीसगड, गोवा येथील भारतीय जनता पक्षाच्या सरकारांनी अत्यंत लोकाभिमुख कार्य केले आहे. ऍण्टीइन्कबन्सी हा शब्द चांगल्या कामाने या राज्यांमध्ये खोटा ठरला आहे. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे तर सलग तीन वेळा लोकांनी भाजपाला स्पष्ट बहुमताने निवडून दिले आहे. गुजरात, गोवा, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड येथे अस्थिरता, असंख्य प्रश्‍न अशा पार्श्‍वभूमीवर लोकांनी भाजपाला सत्ता सोपविली आणि लोकांना वेगळा अनुभव आला. आज देशातही तसेच वातावरण आहे. अस्थिरता, महागाई, बजबजपुरी, भ्रष्टाचार यातून देशाला बाहेर काढण्यासाठी आगामी निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प लोकांना करायचा आहे. मतभेद, महत्त्वाकांक्षा, गटबाजी नसलेला प्रशासनकुशल, देशभक्त नेत्यांचा पक्ष म्हणून भाजपाला लोकांसमोर न्यायचे आहे, असा संकल्प दिल्लीच्या बैठकीतून प्रकट झाला आहे. सर्व ज्येष्ठ नेते, निर्वाचित मुख्यमंत्री यांनी ज्या उत्साही वातावरणात निडणुकीचा संकल्प केला आहे, तो पाहता येत्या काळात देशात एक आशादायी चित्र उभे राहील, अशी आशा निर्माण झाली आहे. सकारात्मक, निर्णायक बदलाकडे देशाला घेऊन जाण्यासाठी एक राजकीय पक्ष एकसंधपणे उभा रहात आहे, हे चित्र जनतेला निश्‍चित प्रोत्साहित करणारे आहे!

Posted by : | on : 29 Dec 2013
Filed under : अग्रलेख, संपादकीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g