किमान तापमान : ° से.
कमाल तापमान : ° से.
तापमान विवरण :
आद्रता : %
वायू वेग : मी. प्रतिसेकंद
स्थळ : ,
° से.
नवी दिल्ली, (३० ऑक्टोबर) – गुजरातमधील मेहसाणा येथे सुमारे ५८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी झाली. रेल्वे, रस्ते, पिण्याचे पाणी आणि सिंचन यासारख्या अनेक क्षेत्रांचा प्रकल्पांमध्ये समावेश आहे.
आधी गोविंद गुरुजींची पुण्यतिथी आणि नंतर सरदार पटेल जी यांची जयंती असल्याने ३० आणि ३१ ऑक्टोबर या दोन तारखा प्रत्येकासाठी खूप प्रेरणादायी आहेत असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. आमच्या पिढीने जगातील सर्वात मोठा पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी उभारून सरदार साहेबांबद्दल आदर व्यक्त केला आहे, असे मोदी म्हणाले. गोविंद गुरुजींचे जीवन हे भारताच्या स्वातंत्र्यात आदिवासी समाजाच्या योगदानाचे आणि बलिदानाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या काही वर्षांत सरकारने मानगड धामचे महत्त्व राष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.
तत्पूर्वी आज अंबाजी मंदिरात दर्शन आणि पूजा केल्याचा उल्लेख त्यांनी केला आणि अंबाजी देवीचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळाल्याबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली. गब्बर पर्वताचा विकास करून त्याची भव्यता वाढविण्याच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. आजच्या प्रकल्पांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, माता अंबेच्या आशीर्वादाने सुमारे ६००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे. या प्रकल्पांमुळे संपर्क व्यवस्था आणखी सुधारेल आणि या भागातील शेतकर्यांना फायदा होईल. मेहसाणा, पाटण, बनासकांठा, साबरकांठा, महिसागर, अहमदाबाद आणि गांधीनगरच्या आसपासच्या जिल्ह्यांनाही या प्रकल्पांचा फायदा होईल, असे ते पुढे म्हणाले. आजच्या प्रकल्पांसाठी त्यांनी गुजरातच्या जनतेचे अभिनंदन केले.
भारताची विकासगाथा जगभरात चर्चेचा विषय बनली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानचे अलगद उतरणे आणि जी२० च्या यशस्वी अध्यक्षतेचा पंतप्रधानांनी यावेळी उल्लेख केला. संकल्पांचा नवा अर्थ त्यांनी उलगडला आणि भारताने उंच झेप घेण्याचे श्रेय लोकांच्या सामर्थ्याला .दिले. देशातील सर्वांगीण विकास अधोरेखित करत त्यांनी जलसंधारण, सिंचन आणि पेयजल उपाययोजनांचा उल्लेख केला. रस्ते असोत, रेल्वे असो किंवा विमानतळ असोत, मोदी यांनी भारतातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासाकडे नेणारी सर्व क्षेत्रांतील अभूतपूर्व गुंतवणूक अधोरेखित केली.
आज देशाचा इतर भाग अनुभवत असलेली विकास कामे गुजरातच्या जनतेने पाहिली आहेत, यावर पंतप्रधान मोदींनी भर दिला. मोदी जो काही संकल्प घेतात, तो पूर्ण करतात, असे पंतप्रधानांनी नमूद केले. त्यांनी वेगाने झालेल्या विकासाचे श्रेय गुजरातच्या जनतेने निवडून दिलेल्या स्थिर सरकारला दिले आणि उत्तर गुजरातसह संपूर्ण राज्याला याचा फायदा झाल्याचे सांगितले.
पेयजल आणि सिंचनासाठी पाण्याअभावी संपूर्ण उत्तर गुजरात भागात जीवन कठीण झाले होते आणि एकमेव असलेल्या दुग्ध व्यवसायाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता, शेतकरी वर्षाला फक्त एकच पीक घेऊ शकत होते आणि तेही कोणत्याही खात्रीशिवाय, याकडे पंतप्रधानांनी तो काळ आठवून लक्ष वेधले. या प्रदेशाला नवसंजीवनी देण्यासाठी केलेल्या कामांवर मोदी यांनी प्रकाश टाकला आणि येथे पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी केलेल्या कामांचा उल्लेख केला. आम्ही उत्तर गुजरातच्या कृषी क्षेत्राचा तसेच औद्योगिक क्षेत्राचा विकास करण्यासाठी काम केले, असे त्यांनी सांगितले. उत्तर गुजरातमधील लोकांसाठी उत्पन्नाचे अधिकाधिक नवे मार्ग निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे, असे ते म्हणाले. गुजरातच्या विकासासाठी नर्मदा आणि मही या नद्यांच्या पाण्याचा वापर करणार्या सुजलाम-सुफलाम् योजनेवर त्यांनी प्रकाश टाकला. जास्तीत जास्त लाभ मिळावा यासाठी साबरमतीवर ६ बंधारे बांधले जात असल्याची माहिती मोदी यांनी दिली. यातील एका बंधार्याचे आज उद्घाटन झाले आहे. आपल्या शेतकर्यांना आणि डझनभर गावांना याचा मोठा फायदा होईल, असे ते म्हणाले.
या सिंचन प्रकल्पांमुळे उत्तर गुजरातमधील सिंचनाचे प्रमाण २०-२२ वर्षांत अनेक पटींनी वाढल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सूक्ष्म सिंचनाच्या नवीन तंत्रज्ञानाचा उत्तर गुजरातच्या शेतकर्यांनी लगेच अवलंब केला, असे पंतप्रधानांनी नमूद केले आणि बनासकांठामधील ७० टक्के क्षेत्रावर नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. येथील शेतकरी आता बडीशेप, जिरे आणि इतर मसाल्यांसोबत गहू, एरंड, भुईमूग आणि हरभरा अशी अनेक पिके घेऊ शकतात. देशातील ९० टक्के इसबगोल गुजरातमध्ये प्रक्रिया करून त्याला एक वेगळी ओळख दिली जाते अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यांनी वाढत्या कृषी उत्पादनाबद्दलही नमूद केले आणि बटाटे, गाजर, आंबा, आवळा, डाळिंब, पेरू आणि लिंबू यांचा उल्लेख केला.डीसा हे शहर बटाट्याचे सेंद्रिय शेती केंद्र म्हणून विकसित करण्यासाठीही प्रयत्न केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले. बनासकांठामध्ये बटाट्यांवर प्रक्रिया करण्यासाठी मोठे संयंत्र उभारण्याचा उल्लेख मोदी यांनी केला. मेहसाणा येथे बांधलेल्या अॅग्रो फूड पार्कचाही त्यांनी उल्लेख केला आणि बनासकांठामध्ये असाच मेगा फूड पार्क बनवण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याविषयी सांगितले आणि गुजरातमध्ये सुरू झालेल्या एका जलसंधारण योजनेने आता देशासाठीच्या जल जीवन अभियानाचे रूप घेतले असल्याचे सांगितले. हर घर जल अभियानाने गुजरातप्रमाणेच देशातील कोट्यवधी लोकांचे जीवनमान बदलत आहे, असे ते म्हणाले.
पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या विकासाचा सर्वात मोठा फायदा महिलांना झाला आहे, असे नमूद करून पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, उत्तर गुजरातमध्ये गेल्या काही वर्षांत शेकडो नवीन पशुवैद्यकीय रुग्णालये बांधण्यात आली आहेत ज्यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहिले आहे आणि परिणामी दुग्ध उत्पादन वाढले आहे. गेल्या दोन दशकांत उत्तर गुजरातमध्ये ८०० हून अधिक नवीन ग्रामीण दुग्ध सहकारी संस्था स्थापन झाल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली. बनास डेअरी असो, दूध सागर असो किंवा साबर डेअरी असो, त्यांचा अभूतपूर्व विस्तार केला जात आहे. दुधाव्यतिरिक्त, या दूध डेर्या शेतकर्यांच्या इतर उत्पादनांसाठीही महत्त्वाची प्रक्रिया केंद्रे बनत आहेत, असेही ते म्हणाले. केंद्र सरकार पशुधनाच्या मोफत लसीकरणासाठी एक मोठी मोहीम राबवत असून त्यासाठी १५,००० कोटी रुपये खर्च केले जात आहेत, असे त्यांनी सांगितले.पंतप्रधानांनी यावेळी परिसरातील पशुपालकांना आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहनही केले. देशात गोबरधन योजनेंतर्गत अनेक संयंत्रे उभारली जात असून त्याच्या माध्यमातून तिथे गाईच्या शेणापासून मोठ्या प्रमाणावर बायोगॅस आणि बायो सीएनजी निर्मिती होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
उत्तर गुजरातमधील वाहन उद्योगाच्या विस्ताराबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी मंडल-बेचराजी ऑटोमोबाईल हबच्या विकासाचा उल्लेख केला ज्यामुळे त्या भागात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आणि त्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढले आहे. येथील उद्योगांचे उत्पन्न केवळ १० वर्षांत दुप्पट झाले आहे.अन्न प्रक्रिया उद्योगांव्यतिरिक्त औषध निर्माण उद्योग आणि अभियांत्रिकी उद्योगदेखील मेहसाणामध्ये विकसित झाले आहेत. बनासकांठा आणि साबरकांठा जिल्ह्यांमध्ये सिरॅमिक( चिनी माती संबंधित उद्योग) संबंधित उद्योग विकसित झाले आहेत, असेही पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी आजच्या ५००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेल्या रेल्वे प्रकल्पांविषयी बोलताना मेहसाणा आणि अहमदाबाद दरम्यानच्या रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉरचा विशेष उल्लेख केला. यामुळे उत्तर गुजरातचे पिपावाव, पोरबंदर आणि जामनगर या प्रमुख बंदरांशी दळणवळण अधिक सुधारेल असे त्यांनी नमूद केले. या कॉरिडॉरमुळे उत्तर गुजरातमधील लॉजिस्टिक आणि साठवणुकीशी संबंधित उद्योग क्षेत्राच्या वाढीला अधिक बळकटी मिळेल, असेही ते म्हणाले.
देशातील हरित हायड्रोजन आणि सौरऊर्जा निर्मितीविषयी बोलताना, पंतप्रधानांनी पाटण आणि नंतर बनासकांठा येथील सौरऊर्जा प्रकल्पांचा उल्लेख केला. मोढेरा हे गाव २४ तास सौर उर्जेवर चालणारे गाव असल्याचा आपल्याला अभिमान आहे असे ते म्हणाले. आज, सरकार तुम्हाला रुफटॉप अर्थात घरांच्या छतांवर बसवण्यात येणार्या सोलर पॅनल साठी जास्तीत जास्त आर्थिक मदत देत आहे. प्रत्येक कुटुंबाचा वीज बिलावर होणारा खर्च कमीत कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी आवर्जून सांगितले. गेल्या ९ वर्षांत अंदाजे २,५०० किमी पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहतूक मार्गिकांचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. यामुळे प्रवासी गाड्या आणि मालगाड्यांना लागणारा प्रवासाचा वेळ कमी झाला आहे. हरियाणातील पालनपूर ते रेवाडी या मार्गावर धावणा-या गाड्यांमधून होणार्या दुधाच्या वाहतुकीचाही त्यांनी उल्लेख केला. काटोसन रोड-बेचराजी रेल्वेमार्ग आणि विरमगाम-सामखियाली ट्रॅकच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे ‘कनेक्टिव्हिटी’ अधिक मजबूत होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी गुजरातमध्ये पर्यटन क्षेत्रामध्ये असलेल्या मोठ्या क्षमतेवर प्रकाश टाकला आणि जगप्रसिद्ध कच्छ रण उत्सवाचा उल्लेख केला. नुकतेच जगातील सर्वोत्तम पर्यटन गाव म्हणून ओळखल्या गेलेल्या कच्छमधील धोरडो गावाचाही त्यांनी उल्लेख केला. उत्तर गुजरात हे देशातील प्रमुख पर्यटन स्थळ बनत असल्याचे ते म्हणाले. महत्त्वाचे पर्यटन केंद्र बनत असलेल्या नडाबेटचे उदाहरण त्यांनी दिले आणि एक मोठे पर्यटन केंद्र म्हणून विकसित होत असलेल्या धरोईचाही उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी मेहसाणामधील मोढेरा सूर्य मंदिर, शहराच्या मध्यभागी असलेली अखंड ज्योती, वडनगरचे कीर्ती तोरण त्याचबरोबर श्रद्धा आणि अध्यात्म यांच्या दृष्टीने महत्व असलेल्या इतर ठिकाणांचा उल्लेख त्यांनी केला. प्राचीन संस्कृतीच्या खुणा उघड करणार्या उत्खननाचा संदर्भ देत वडनगर हे संपूर्ण जगासाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारने येथे ‘ हेरिटेज सर्किट’ अंतर्गत १,००० कोटी रुपये खर्चून अनेक ठिकाणे विकसित केली आहेत, पंतप्रधान मोदी यांनी यावेळी, पाटणच्या ‘रानी की बाव’ चे उदाहरण दिले. ही विहीर पाहण्यासाठी दरवर्षी सरासरी ३ लाखांहून अधिक पर्यटक येतात, अशी माहिती दिली. भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, आज देशात आपला वारसा हा विकासाबरोबर जोडण्याचे अभूतपूर्व काम केले जात आहे. यामुळे विकसित भारत घडवण्याचा आमचा संकल्प आणखी दृढ होईल.
या कार्यक्रमाला गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, खासदार सी आर पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश आदी उपस्थित होते.