किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल=जनस्थान पुरस्काराचे थाटात वितरण=
नाशिक, [२७ फेब्रुवारी] – समाजाचे निरीक्षण सूक्ष्मपणे नोंदवित असताना परिवर्तनाचे बीजारोपण करण्याचे कार्य अरुण साधू यांच्या साहित्याने केले, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साधू यांच्या साहित्यिक प्रतिभेचा गौरव केला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणार्या जनस्थान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर अशोक मुर्तडक, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, अरुणा साधू, जब्बार पटेल, दिनकर गांगल, किशोर पाठक, विश्वास ठाकूर, विनायक रानडे, अरविंद ओढेकर, विनिता धारकर, जि. प. अध्यक्षा विजयश्री चुंबळे तसेच बाळासाहेब सानप, डॉ. राहुल आहेर, हेमंत टकले, सीमा हिरे, देवयानी फरांदे हे आमदार यावेळी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मराठी माणसाच्या मन-बुद्धीचे भरणपोषण मूल्यांनी झाले आहे. मात्र, काळानुरूप ही मूल्ये सातत्याने समाजासमोर मांडण्याची गरज आहे. आजच्या बाजार व्यवस्थेत मूल्य सांगणारी माणसे कमी होत आहेत. म्हणून साधू यांच्यासारख्या भविष्याचा वेध घेणार्या साहित्यिकांद्वारे समाजावर होणारे मूल्यसंस्कार अधिक महत्त्वाचे ठरतात.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत केंद्रीय मंत्रिमडळात लवकरच निर्णय होईल, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले, जगात आक्रमणकर्त्यांची भाषा आणि जगण्याकरिता व्यवस्था निर्माण करणार्या भाषाच टिकू शकल्या आहेत. मराठी माणूस आक्रमणकर्ता होऊच शकत नाही. त्यामुळे मराठी व्यवहाराची आणि व्यवसायाची भाषा होणे तितकेच महत्त्वाचे आहे. नव माहिती तंत्रज्ञानासह ज्ञानाचे नवे प्रवाह मराठीतून प्रभावीपणे मांडले गेल्यास मराठीचा विकास अधिक जोमाने होईल, असेही त्यांनी सांगितले.
गिरीश महाजन यांनी साधू यांच्यासारख्या संवेदनशील लेखकाचा सन्मान होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अरुण साधू यांनी पत्रकारिता, विज्ञान, राजकारण, स्तंभलेखन, इतिहास आदी विविध विषयांवर लेखन केले आहे. समाजाला मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांच्या साहित्याने केले, असे ते म्हणाले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानद्वारे चालविण्यात येणार्या विविध उपक्रमांबद्दल त्यांनी कौतुक केले.
ज्ञानभाषा म्हणून मराठीचा विकास करण्याची गरज – साधू
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने तिच्या विकासास चालना मिळेल. मात्र, तिला ज्ञानभाषा केल्याशिवाय अलंकार प्राप्त होणार नाही आणि त्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे, असे मत अरुण साधू यांनी व्यक्त केले.
साधू पुढे म्हणाले, मराठीच्या विकासासाठी केवळ शासन स्तरावर प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत, तर मराठीच्या विकासासाठी स्वतंत्र कोष निर्मिती करणारी संस्था उभी करावी लागेल. या संस्थेचे कार्य सातत्याने सुरू रहाणे आणि कोष वाङ्मयात सातत्याने आवश्यक बदल करणे महत्त्वाचे आहे. शासनेतर संस्था, विद्यापीठांचे मराठी विभाग, मराठीचे शिक्षक आणि विविध साहित्य संस्थांनी या कार्यात पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आजच्या बाजारपेठ व्यवस्थेत चंगळवादी आणि व्यक्तिवादी तत्त्वज्ञान मांडले जात आहे. त्यामुळे मूल्यांना मानणार्या ज्येष्ठांमध्ये अस्वस्थता दिसते आहे. ती जागतिक साहित्यातून प्रकट होताना दिसते. अशा चंगळवादी तत्त्वज्ञानाला छेद देत समाजाला आदर्श आकार देणारे तत्त्वज्ञान मांडण्याची नितांत गरज आहे. लेखक आणि कवींनी हे चंगळवादी तत्त्वज्ञान बाजूला सारण्याचा प्रयत्न करतानाच समाजातील विषमता, अन्याय, स्त्री-पुरुषातील भेद नष्ट करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. आपल्या साहित्यातून हेच मांडण्याचा प्रयत्न केल्याचेही त्यांनी सांगितले. कुसुमाग्रज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या कवींनी राज्याला आणि देशाला स्फूर्ती देण्याबरोबरच कवितेतील रोमान्स दिला, असेही ते म्हणाले.
मधु मंगेश कर्णिक म्हणाले, राज्यातील बहुतांश जनता मराठी बोलणारी आहे. मराठी भाषेला कुठलीही भीती नाही. संत वाङ्मयाचा भक्कम आधार मराठीला लाभला असून अनेक लेखक-कवींच्या प्रयत्नांमुळे ती अधिक विकसित झाली आहे. अरुण साधू यांना मिळालेला पुरस्कार हा मराठी प्रज्ञेचा सत्कार आहे. सर्वांनी मिळून मराठीचा मंत्र जागविण्याचे कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.