नको रॅगींगचं दडपण!

•चतुरस्त्र : मृणाल काशीकर•

तरुणाई – भाग : ९
STUDENTS ARTICLE SERIES_9हॅलो फ्रेंड्स!! काय मग झाली का होस्टेलची तयारी पूर्ण? घरापासून लांब जाताना मन खरच जड होवून जात. आई बाबांच्या सूचना संपता संपत नाहीत. तुम्हालाही दडपण असत की कसं काय नवीन मुलं-मुलींमध्ये आपला निभाव लागेल. चित्रपटामध्ये भडक रॅगींगचे प्रकार पाहिले असल्याने थोडे अजून दडपण आलेले असते. म्हणूनच आज रॅगींगबद्दल थोडसं बोलावं असं ठरवलं.
आपण सर्वांनीच मुन्नाभाई एम्. बी. बी. एस्. किंवा थ्री इडीयटस् हे चित्रपट पाहिले आहेत. त्यातली रॅगींगच्या सीन्स मधली गम्मत सगळ्यांना अजून आठवत असेल. पण असं किती मुले धीटपणे रॅगींगच्या प्रसंगांचा सामना करू शकतात? त्यासाठी प्रचंड मानसिक बळ पाहिजे आणि अशा प्रसंगांना सामोरं जावं लागू शकतं याची कल्पना देखील असावी लागते. त्यासाठीच हा लेखनप्रपंच!
रॅगींग म्हणजे नक्की काय?
रॅगींग म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या मनाविरुद्ध एखादी अशी गोष्ट करायला लावणे जी केल्याने त्याला लाज वाटेल, शारीरिक अथवा मानसिक त्रास होईल, दडपण येईल, आणि हे करण्यासाठी त्याला धमकावणे, चिडवणे, त्याच्यावर वैयक्तिक विनोद करणे, त्याची मानहानी होईल अशी वर्तणूक करण्यास भाग पाडणे, इ.
रॅगींग कोण करते?
रॅगींग हे बहुदा वरच्या वर्गांतील विद्यार्थी नवीन आलेल्या विद्यार्थ्यांवर आपला प्रभाव पाडण्यासाठी, दबाव टाकण्यासाठी करतात. स्वतःचे शक्तीप्रदर्शन, आपण जास्त बलवान आहोत आणि त्यामुळे आपले इतरांनी ऐकले पाहिजे, या मानसिकतेमधून रॅगींग घडते. नवीन आलेले विद्यार्थी आधीच थोडे बावचळून गेलेले असतात. त्यांना थोडा त्रास देवून स्वतःला मानसिक समाधान ज्यांना मिळते अशा विकृत मानसिकतेचे विद्यार्थी रॅगींग करतात. बरेचदा, या विद्यार्थ्यांना ते नवीन असताना त्यांच्या सिनिअर मुलांनी रॅगींग केलेले असते; त्याचा बदला म्हणून देखील ती अशा कृत्यामध्ये सामील होतात. यात मुलांचा समावेश अधिक असतो. परंतु, आजकाल मुली देखील या कृत्यांमध्ये मागे राहिलेल्या नाहीत. तरीही, मुलांच्या बाबतीत रॅगींगचे प्रकार सर्वाधिक घडतात.
रॅगींग कोणावर होते?
असं काहीच सांगता येणार नाही! तरी त्यातल्या त्यात कमकुवत मानसिकतेचे विद्यार्थी किंवा जे अतिशय साधे किंवा ग्रामीण भागातून आलेले आहेत, त्यांना अशा त्रासाला जास्त सामोरे जावे लागते. थोडक्यात ज्यांच्यावर सहज दबाव आणणे शक्य आहे अशा मुलांना रॅगींगसाठी लक्ष्य बनवलं जातं.
रॅगींग कुठे होवू शकते?
रॅगींग हे बहुतेकवेळा शैक्षणिक संस्थेच्या आवारात, कॅन्टीन, क्लासरूम, कॉरीडोर्स, होस्टेल अशा ठिकाणी केले जाते.
रॅगींगचे स्वरूप काय असते?
यामध्ये समोरच्याला त्याच्या वेशभूषेवरून, भाषेवरून, घरच्या परिस्थितीवरून चिडवणे, कमी लेखणे,  छोटी मोठी कामे सांगणे, काही लहान मोठ्या स्वरूपाच्या शिक्षा करणे अशा छोट्या-मोठ्या गोष्टींपासून ते अगदी शारीरिक छळसुद्धा केला जातो. अनेकवेळा विद्यार्थ्याचे लैन्गिक शोषण देखील केले जाते. या सर्व गोष्टी मजा म्हणून केल्या जातात, पण याचे परिणाम अतिशय गम्भीर असू शकतो, यासाठीच काही पाहिलेल्या घटना इथे तुमच्याशी शेअर कराव्याश्या वाटतात.
मला आठवत की आमच्या परिचितांपैकी एकांचा मुलगा मुंबईला मेडिकलचे शिक्षण घ्यायला होस्टेलला राहिला होता. त्याला इतका शारीरिक त्रास दिला की त्याला खूप डीप्रेशन आले. त्याला रॅगींग म्हणून सिनिअर मुलांनी इलेक्ट्रिक शॉक दिल्यामुळे त्याला शारीरिक कमजोरी देखील आली व पुढील शिक्षण अशक्य झाले. आज देखील त्याच्या आई वडिलांना त्याचे आयुष्य कसे मार्गी लावायचे याची चिंता आहे. तसेच अजून एक केस आठवते, ज्यात माझ्या कॉलेज मधील एका मुलाला रॅगींगचा सामना करावा लागला. होस्टेलमध्ये त्याने त्याच्या सिनिअर मुलांचे ऐकले नाही म्हणून त्याच्या डोक्यावर उकळते पाणी ओतले होते. त्यामुळे त्याच्या डोक्याची कातडी पूर्ण भाजली व सर्व केस गळून गेले. एक वर्ष या धक्क्यामुळे तो घरी होता. मात्र, त्याच्या आई वडिलांनी, परिचितांनी त्याला त्या मनस्थितीतून बाहेर काढले. डोक्याच्या जखमा बऱ्या झाल्यावर तो पुन्हा कॉलेजला रुजू झाला आणि त्याने त्याचे मेडिकलचे शिक्षण पूर्ण केले. आज तो अतिशय प्रतिष्ठीत चर्मरोगतज्ञ (स्कीन स्पेशालिस्ट) आहे.
हे प्रसंग सांगण्याचा उद्देश वाचकांना रॅगींगबद्दल घाबरवणे हा नसून केवळ त्याच्या गांभीर्याची जाणीव करून देणे, सावध करणे, इतकाच आहे. मला माझ्या कॉलेज लाईफ मधील काही घटना आठवतात, ज्यात सिनिअर मुले आपण शिक्षक असल्याचे भासवून आमच्या वर्गात येवून आमची ओळख परेड घ्यायची. मग आम्हालाही हे सारं गमतीत चाललंय आहे, हे कळल्यावर दडपण गेलं आणि हे रॅगींग गमतीपुरतच राहिलं. पण, नेहमी आपण जागरूक राहिलं पाहिजे.
रॅगींग होत असेल तर काय करायचं?
आजकाल कायद्यानुसार(महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगींग अक्ट, १९९९)नुसार प्रत्येक शैक्षणिक संस्थेस रॅगींगविरोधक समिती बनवणे हे बंधनकारक आहे. या समितीमध्ये प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी प्रतिनिधी असतात. त्यांच्याकडे तुम्ही तुमच्याशी होणारे कोणतेही गैरवर्तन जे रॅगींग असू शकते त्याची तक्रार करू शकता. या तक्रारीवर ताबडतोब कारवाई करणे बंधनकारक आहे. रॅगींग करणे हा कायद्याने गुन्हा आहे. यासाठी वरील कायद्यानुसार दंड अथवा शिक्षा (कैद) किंवा दोन्हीही होवू शकते.
रॅगींग संबंधीचा कायदा तर आपल्या मदतीला आहेच. तरीही, विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी जेणेकरून रॅगींगच्या त्रासामधून वाचता येईल?
⦁नवीन विद्यार्थ्यांनी आपला देखील एक ग्रुप बनवावा. ज्यामुळे त्यांना एकेकटे गाठून त्रास देणे सहजशक्य होणार नाही.
⦁कॉलेजमधील ऍन्टी रॅगींग सेलचे मदतीसाठी असलेले मोबाईल नंबर आपल्याजवळ ठेवावे व रॅगींग अथवा रॅगींगसदृश काहीही घटना घडते आहे असे वाटल्यास त्या नंबरवर संपर्क करून सांगावे. जर, तक्रार करण्यास आपणास भीती वाटत असेल अथवा दडपण येत असेल तर आपल्या शिक्षकांशी त्याबद्दल मोकळेपणाने बोलावे. ते नक्की यातून मार्ग सुचवतील व आपणास मदत करतील.
⦁आपल्या पालकांना नेहमी आपल्या कॉलेजच्या घडामोडींबद्दल कल्पना द्यावी. पालकांनी देखील आपल्या मुलाला / मुलीला काही मानसिक दडपण किंवा अस्वस्थता आहे, असे जाणवल्यास मोकळेपणाने विचारून ताण हलका करावा. रॅगींग किंवा रॅगींगसदृश काही त्रास होत आहे असे निदर्शनास आल्यास पालकांनीदेखील त्वरित कॉलेजमध्ये त्याबद्दल तक्रार करावी. कारण, वेळीच लक्ष न् दिल्यास रॅगींगचे काही गम्भीर प्रकार घडू शकतात ज्यामुळे मुलांचे आयुष्य देखील उध्वस्त होवू शकते.
⦁ रॅगींग हा गुन्हा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इतरांना रॅगींग करणे देखील टाळावे!
कॉलेज यासाठी काय काय करतात अथवा करू शकतात?
⦁ऍन्टी रॅगींग समिती आणि पथकांची नेमणूक करणे व त्यांच्या मदतीने रॅगींग होवू नये याची खबरदारी घेणे.
⦁नवीन विद्यार्थ्यांना रॅगींग व त्यासंबधी उपलब्ध असलेल्या मदतीची कल्पना देणे.
⦁रॅगींग अवेअरनेस प्रोग्राम आयोजित करणे.
⦁नवीन व जुन्या विद्यार्थ्यांची ओळख होवून त्यांच्यामध्ये मैत्री निर्माण होण्यासाठी विविध कल्चरल, स्पोर्ट्स, व शैक्षणिक स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणे. काही कॉलेजेस यासाठी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यास देखील प्रोत्साहन देतात.
⦁कॉलेजमध्ये ऍन्टी रॅगींग समिती व्यतिरिक्त देखील कॉन्सेलरची नेमणूक करणे ज्यांच्याशी विद्यार्थी मोकळेपणाने बोलू शकतात व असा काही त्रास होत असल्यास त्यांना सांगून मदत मिळवू शकतात.
मित्रमैत्रिणींनो, रॅगींगबद्दल वाचून घाबरून जावू नका… तर जागरूक रहा, धाडसी व्हा. रॅगींगला बळी पडू नका आणि रॅगींग करू नका.

ई-मेल- mrinal.propathconsultants@gmail.com
(लेखिका लीगल आणि HR कन्सल्टंट असून मॅनेजमेण्ट इन्स्टिट्यूटसमध्ये अध्यापन करतात.)

Short URL: https://vrittabharati.in/?p=23476

Posted by on Jul 21 2015. Filed under चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in चतुरस्त्र : मृणाल काशीकर, युवा भरारी, स्तंभलेखक (57 of 125 articles)


•चौफेर : अमर पुराणिक• मध्य अशियावर चीनचे प्रेम हे उगीच नाही. मध्य अशियाई देश आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. खनिज संपदेने भरलेले ...

×