Home » उद्योग, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय » डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड भारताचे बलस्थान

डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड भारताचे बलस्थान

  • पंतप्रधान मोदींनी दिला थ्रीडी मंत्र
  • मेक इन इंडिया सप्ताहाचे दिमाखात उद्घाटन
  • पोलंड, फिनलॅण्डच्या पंतप्रधानांची उपस्थिती
  • १२ राज्यांचे मुख्यमंत्रीही हजर
  • ६८ देशांचा सहभाग
  • जगभरातील उद्योगपतींची हजेरी

मुंबई, [१३ फेब्रुवारी] – जगाच्या आर्थिक प्रगतीत भारताचा वाटा १२ टक्के असून, भारताच्या या झपाट्याने चाललेल्या प्रगतीचे जगभरातून कौतुक केले जात आहे. देशाच्या उत्पादन निर्मितीचा दर हा १.७ टक्क्यावरून आज १२.६ टक्क्यांवर पोहचला आहे. भारत हा विकसनशील देश असून, याचे श्रेय डेमोक्रसी, डेमोग्राफी आणि डिमांड या भारताच्या बलस्थानाला जाते, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना काढले. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला देशाचा सर्वात मोठा ब्रँड बनवू असेही ते म्हणाले.
देशात विदेशी गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने १३ ते १८ फेब्रुवारी चालणार्‍या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचा मुंबईच्या वांद्रे-कुर्ला संकुलात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार शुभारंभ झाला. पोलंड, फिनलँड आदी देशांच्या पंतप्रधानांसह जगभरातील मान्यवर उद्योजकांनी या अभूतपूर्व सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, देशात राबविल्याजाणार्‍या उपक्रमांपैकी एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणून ‘मेक इन इंडिया’कडे पाहिले जाते. देशातील उत्पादन क्षेत्राला चालना देऊन विदेशी गुंतवणूक वाढावी आणि त्यातून देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी मिळावी यासाठी हे अभियान देशभरात राबविण्याचा आमचा मानस आहे. भारतात संधीचे अमर्याद पर्याय उपलब्ध आहेत. भारतात परकीय गुंतवणूक वाढली असून, व्यवसायाच्या दृष्टीने पोषक वातावण निर्माण करून देऊ. त्यासाठी तुम्ही एक पाऊल पुढे या, आम्ही दोन पावले पुढे येऊ, असे आवाहन पंतप्रधानांनी देशभरातील उद्योजकांना केले.
मागीलवर्षी सर्वाधिक ऊर्जानिर्मिती भारताने केली असून, ऊर्जा निर्मिती व देशातील तरुणाईचा मोठा टक्का ही देशाची ताकद आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीवर अधिक भर देऊन, पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे उद्दिष्ट आहे. २०१५ पासून देशाच्या विकासाला खरी चालना मिळाली असून, आगामी काळात भारतच गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय राहणार आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.
यावेळी फिनलॅण्डचे पंतप्रधान जुहा सिपीला, पोलंडचे उपपंतप्रधान प्रो. पिओत्र ग्लिन्स्की यांच्यासह महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र पॅव्हेलियनचे
पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन
‘मेक इन इंडिया’ सप्ताहांतर्गत मुंबई येथे स्थापित मेक इन इंडिया सेंटरमधील महाराष्ट्र पॅव्हेलियनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिमाखदार सोहळ्यात उद्घाटन झाले. महाराष्ट्राच्या उद्योगस्नेही धोरणाचे प्रदर्शन करणार्‍या विविध विभागांच्या दालनांची यावेळी पंतप्रधानांनी पाहणी केली. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या घारापुरी येथील जगप्रसिद्ध त्रिमूर्तीच्या शिल्पाची भव्य प्रतिकृती, पैठण येथून आलेल्या महिला कारागिरांनी हातमागावर विणलेली पैठणी, कोल्हापुरी चपला, वारली चित्रकला यासारख्या महाराष्ट्राच्या कला संस्कृतीचे प्रदर्शन करणार्‍या दालनांसोबतच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, जगभरात बॉलीवूड या नावाने ओळखली जाणारी चित्रनगरी आदी दालनांना पंतप्रधान मोदी यांनी भेट देऊन कौतुक केले. यावेळी पंतप्रधानांचा शाल व वीणेची प्रतिकृती देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्राच्या विकासाचे प्रदर्शन
महाराष्ट्रातील औद्योगिक समृद्धी, सांस्कृतिक परंपरा व विकासाच्या महत्त्वाकांक्षी योजना, उपक्रम यांचे दर्शन महाराष्ट्र पॅव्हेलियनमध्ये घडते. राज्यातील माहिती तंत्रज्ञान, वाहन निर्मिती, अन्नप्रक्रिया, औषध निर्मिती उद्योग, वस्त्रनिर्मिती, संरक्षण दलाची महाराष्ट्रातील केंद्रे, कृषिउद्योग, मुंबईतील चित्रपट उद्योग याविषयीच्या सचित्र माहितीसह राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य सांगणारे मॉडेल्सही दालनात मांडण्यात आले आहे.
राज्य शासनाचे जलयुक्त शिवार अभियान, महाराष्ट्र अहेड, मेक इन महाराष्ट्र आदी योजनांची माहिती देणारे स्वतंत्र कक्ष आहेत. त्याचप्रमाणे, हातमाग उद्योग, कोल्हापुरी चपला निर्मिती व्यवसाय यांची प्रात्यक्षिकासह माहिती मिळते. कापडावर वीणकामातून छायाचित्र साकारणारे, तसेच वारली चित्रकला कलावंत सहभागी झाले आहेत. राज्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या वस्त्ररचनाकारांनी तयार केलेल्या वस्त्रांचे दालनही या प्रदर्शनात आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26845

Posted by on Feb 14 2016. Filed under उद्योग, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in उद्योग, छायादालन, ठळक बातम्या, राष्ट्रीय (824 of 2477 articles)


=पुण्यातील कमांड मुख्यालय उडविणार होतो: डेव्हिड हेडलीचा नवा गौप्यस्फोट= मुंबई, [१३ फेब्रुवारी] - मुंबईतील २६/११ रोजीच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील लष्कराच्या ...

×