Home » छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र » शेतकर्‍यांची ३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी

शेतकर्‍यांची ३४ हजार २२ कोटींची अभूतपूर्व कर्जमाफी

=देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा निर्णय
=शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेंतर्गत निर्णय
=दीड लाख रुपयांची सरसकट कर्जमाफी
=४० लाख शेतकर्‍यांचा सातबारा होणार कोरा
=८९ लाख शेतकर्‍यांना मिळणार लाभ
=परतफेडीसाठी २५ हजारांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान
=३० जूनपर्यंत कर्ज भरणार्‍यांच्या बँक खात्यात पैसा,
मुंबई, २४ जून –
राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना ३४ हजार २२ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय आज शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला.
तातडीने बोलावलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंत्रालयातील त्रिमूर्ती परिसरात आयोजित पत्रपरिषदेत मुख्यमंत्र्यांनी सदर ऐतिहासिक निर्णयाची माहिती दिली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, २०१२ पासून शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे कर्जात बुडाले होते. कर्ज भरू शकत नसल्याने कर्जमाफी करण्याबाबत मागणी सातत्याने होत होती. अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक होते. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विविध घटकांशी चर्चादेखील सुरू होत्या. शेतकरी आंदोलनातही राज्य शासनाने शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. मंत्रिगटाची उच्चाधिकार समिती नियुक्त करून त्यांनी विविध घटकांशी आणि शेतकरी सुकाणू समितीच्या पदाधिकार्‍यांशी चर्चाही केली. राष्ट्रवादी कॉंगे्रसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, खासदार राजू शेट्टी यांच्याशीदेखील या संदर्भात चर्चा केली. सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र शासनाने संपूर्ण देशात कर्जमाफी केली होती. त्यात महाराष्ट्रातील ७ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा समावेश होता. यावर्षीची ही कर्जमाफी ३४ हजार २२ कोटी रुपयांची आहे. १ एप्रिल २०१२ ते ३० जून २०१६ या कालावधीत थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात येणार असून, यामुळे ९० टक्के शेतकर्‍यांचा सातबारा कोरा होणार आहे. दीड लाखांहून अधिक थकबाकी असलेल्या शेतकर्‍यांसाठी एकवेळ समझोता योजना राबविण्यात येणार आहे.
यांना मिळणार नाही कर्जमाफी
राज्यातील विद्यमान किंवा माजी मंत्री, राज्यमंत्री, विद्यमान किंवा माजी लोकसभा, राज्यसभा सदस्य, विद्यमान किंवा माजी विधिमंडळ सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, केंद्र व राज्य शासनाचे तसेच निमशासकीय संस्था आणि अनुदानित संस्थांचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी या कर्जमाफीसाठी पात्र असणार नाहीत. मात्र, चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांना लाभ मिळणार आहे.
मंत्री, आमदार देणार एक महिन्याचे वेतन
शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी निधी उभा करण्याकरिता सर्व मंत्री आणि आमदार एक महिन्याचे वेतन देणार आहेत.
शेतकर्‍यांना तत्काळ देण्यात येणार्‍या १० हजार रुपयांच्या तातडीच्या मदतीच्या निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नये यासाठी शेतीमधील गुंतवणूक वाढविण्यात येणार.
शेतमालाला हमी भाव मिळण्याकरिता केंद्र शासनाशी चर्चा करून त्यासंदर्भात एक यंत्रणा निर्माण करण्यात येईल.
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना लागू करून शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या राज्य सरकारचे अभिनंदन. या ३४ हजार २२ कोटी रुपयांच्या सर्वात मोठ्या शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयासोबत भाजपाने विधानसभा निवडणुकीत दिलेले एक महत्त्वाचे आश्‍वासन पूर्ण केले आहे.
– खा. रावसाहेब दानवे, प्रदेशाध्यक्ष
सत्ताधारी पक्षाने निवडणुकीपूर्वी शेतकर्‍यांना सात-बारा कोरा करण्याचा शब्द दिला होता. परंतु, तो पाळला नाही. सरकारने सर्व शेतकर्‍यांचे सर्व कर्ज माफ केले पाहिजे. मागील दोन वर्ष हे सरकार कर्जमाफीसाठी टाळाटाळ करीत होते. हा निर्णय दोन वर्षांपूर्वी झाला असता तर हजारो शेतकर्‍यांचे प्राण वाचले असते. आपले हे पाप लपविण्यासाठीच या योजनेला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले.
-राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते
मुख्यमंत्री म्हणाले-
या निर्णयामुळे राज्य शासनावर आर्थिक भार येणार असला, तरी अडचणीत असलेल्या शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. यासाठी पैसा उभारण्याकरिता बँकांशी संपर्क साधून हप्ते पाडून त्याची परतफेड करू. मात्र, सरकारला कितीही भार सोसावा लागला तरी शेती क्षेत्रातील गुंतवणूक वाढवूच. त्यात काही तडजोड करणार नाही.
आघाडी सरकारच्या काळात दिलेल्या कर्जमाफीसारखी परिस्थिती या कर्जमाफीची होणार नाही. सर्व बँकांवर बारकाईने लक्ष ठेवून याचा लाभ केवळ शेतकर्‍यांनाच मिळेल, याबाबत राज्य सरकार विशेष लक्ष घालणार.
राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी घेतलेल्या या अभूतपूर्व अशा कर्जमाफीच्या निर्णयानंतरी कुणाला शेतकर्‍यांच्या आडून राजकारणच करायचे असेल, तर त्यांनी खुशाल करावे. मात्र, आता शेतकरी त्याला बळी पडणार नाही. (तभा वृत्तसेवा)

Short URL: https://vrittabharati.in/?p=34813

Posted by on Jun 25 2017. Filed under छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in छायादालन, ठळक बातम्या, महाराष्ट्र (45 of 2476 articles)


=समोर आले धक्कादायक सत्य श्रीनगर, २४ जून - नौहाटा येथील जामिया मशिदीच्या परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस उपअधीक्षक ...

×