१५ वर्षांनंतर गीता मायदेशी परतली
Tuesday, October 27th, 2015=दिल्लीत भव्य स्वागत=
नवी दिल्ली, [२६ ऑक्टोबर] – सुमारे १५ वर्षांपूर्वी अनावधानाने पाकिस्तानच्या सीमेत प्रवेश करणारी आणि तेव्हापासून तिथेच राहिलेली मूक-बधिर भारतीय कन्या गीताचे आज सोमवारी पाकिस्तान एअरलाईन्सच्या विमानाने राजधानी दिल्लीत आगमन झाले. यावेळी तिचे भव्य स्वागत करण्यात आले.
सात ते आठ वर्षांची असताना गीता समझोता एक्सप्रेसने पाकमध्ये पोहोचली होती. पाकी सैनिकांनी तिला ताब्यात घेतले आणि ईधी या स्वयंसेवी संस्थेच्या स्वाधीन केले होते. याच संस्थेने तिला दत्तक घेऊन पालनपोषण केले आणि तिचे नाव गीता असे ठेवले होते. अभिनेता सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटामुळे गीताचा शोध लागला आणि तिला मायदेशी परत आणण्यासाठी सुरू झालेली प्रक्रिया आज सोमवारी संपली. विशेष म्हणजे, तिच्या इच्छेनुसार सलमान खानसोबत तिची भेट करून देण्यात येणार आहे.
कराची विमानतळावरून साडेनऊच्या सुमारास पाक एअरलाईन्सच्या विमानाने दिल्लीकडे उड्डाण घेतले आणि साडेदहा वाजता विमान दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावर उतरले. यावेळी विमानतळावर भारतीय परराष्ट्र मंत्रालय तसेच पाकिस्तान उच्चायोगातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आता २५ वर्षे वय असलेल्या गीतासोबत ईधी फाऊंडेशनचे पाच सदस्यही भारतात आले आहेत. भारत सरकारने ईधी फाऊंडेशनच्या सदस्यांना शासकीय अतिथीचा दर्जा दिला आहे. दरम्यान, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्वीट करून गीताचे भारतात स्वागत केले.
गीताची डीएनए चाचणी
भारतात आल्यानंतर गीताला दिल्लीतील हॉटेल पार्क प्लाझा येथे आणण्यात आले. यावेळी सुषमा स्वराजही प्रामुख्याने उपस्थित होत्या. तिचे डीएनए घेण्यासाठी अ. भा. आयुर्विज्ञान संस्थेतील दोन वरिष्ठ डॉक्टर या हॉटेलात आले असून, काही वेळातच तिचे डीएनए घेण्यात आले. यावेळी गीताने संकेतानेच सुषमा स्वराज यांना, ‘मी आपल्या देशाला एक क्षणही विसरू शकली नाही. आयुष्याची १५ वर्षे पाकमध्ये राहिली असली, तरी भारत माझ्या हृदयात बसला होता,’ असे सांगितले.
असे राबवण्यात आले ‘ऑपरेशन गीता’
पाकिस्तानात एक दशकापेक्षा जास्त काळ राहिलेली गीता आज भारतात परतली असली तरी तिला शोधण्याची मोहीम मोदी सरकारने अतिशय चिकाटीने राबवली. त्यामुळेच गीता भारतात परतू शकली.
परराष्ट्र मंत्रालयात सोमवार, २६ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रपरिषदेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘ऑपरेशन गीता’ ची माहिती दिली. भारतातील एक मुलगी पाकिस्तानात असल्याची आणि तिची भारतात परतण्याची इच्छा असल्याची बातमी एका चॅनेलवरून पाहण्यात आली, ही बातमी पाहिल्यानंतर आपण पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त राघवन यांना आपल्या पत्नीसह कराचीला जाऊन या वृत्ताची पडताळणी करण्याचे निर्देश दिले, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.
त्यानुसार राघवन यांनी आपल्या पत्नीसह कराचीला जाऊन ईधी फाऊंडेशनमध्ये गीताची भेट घेतली आणि ती मुलगी भारतातील असल्याचे तसेच तिची मायदेशात परतण्याची इच्छा असल्याचा अहवाल मला पाठवला. गीताने राघवन यांना आपल्या कुटुंबाची माहिती दिली, एवढेच नाही तर आपले घर कुठे आहे, याबाबतची त्रोटक माहितीही दिली, असे स्पष्ट करत स्वराज म्हणाल्या की, त्यानंतर गीताच्या आईवडिलांचा शोध घेण्याची तसेच तिला भारतात परत आणण्याची मोहीम सुरू झाली.
गीताच्या आईवडिलांचा शोध लागला नाही तरी तिला भारतात आणण्याचा निर्धार सरकारने केला होता, याकडे लक्ष वेधत स्वराज म्हणाल्या की, गीताच्या आईवडिलांचा शोध लागला नाही तर तिला कुठे ठेवायचे याचाही विचार केंद्र सरकारने केला होता. त्यानुसार इंदूर येथील अत्यंत प्रतिष्ठित अशा मूक-बधिर संस्थेची निवड करण्यात आली. ही मूक-बधिर संस्था मोनिका पंजाबीचे आईवडील चालवतात. विशेष म्हणजे हे दोघेही मूक-बधिर असले तरी त्यांची दोन्ही मुले पूर्णपणे धडधाकट आहेत. मोनिकानेही आपल्या आईवडिलांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत या संस्थेचे काम सुरू केले. या संस्थेच्या वसतिगृहात ६०० मुले आहेत. याठिकाणी मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगवेगळी व्यवस्था आहे. त्यामुळे याठिकाणी गीताला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे गीताची आणि मोनिका पंजाबी तसेच त्यांच्या संस्थेतील एक महिला वॉर्डनची, जी मोनिकासोबत दिल्लीत आली, यांची ‘वेवलेंथ’ जुळली असून गीतानेही इंदूरच्या मूक-बधिर संस्थेत जाण्याची तयारी दर्शवली, असेही स्वराज यांनी स्पष्ट केले.
गीताच्या आईवडिलांचा शोध सुरू झाल्यावर चार कुटुंबांनी ती आपलीच मुलगी असल्याचा दावा केला. ही कुटुंबे पंजाब, बिहार, उत्तरप्रदेश आणि झारखंडमधील होती. त्यामुळे संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या कुटुंबाच्या दाव्याची पडताळणी करण्यात आली. गीताने आपल्या लहानपणच्या ज्या आठवणी सांगितल्या, त्या या कुटुंबाशी पडताळून पाहण्यात आल्या. यात काही कुटुुंबे बाद झाली. कारण त्यांची माहिती गीताने दिलेल्या माहितीशी जुळत नव्हती, असे सुषमा स्वराज यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशातील एका कुटुंबाने गीता ही आपलीच मुलगी असल्याचा दावा केला. त्यामुळे या कुटुंबाचे फोटो मागवून ते पाकिस्तानात पाठवण्यात आले. मात्र, गीताने ते ओळखण्यास नकार दिला. त्यामुळे पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. दरम्यान, झारखंडच्या महतो कुटुंबीयांनी आपली भेट घेत गीता ही आपलीच मुलगी असल्याचा दावा केला. मात्र, आपल्या मुलीचे लग्न झाले असून तिला मुलगीही होती, असा या कुटुंबाचा दावा होता. मात्र, अन्य माहिती जुळत असल्यामुळे या कुटुंबातील मुलांचे फोटो पाकिस्तानात पाठवण्यात आले. यातील काही जणांना गीताने ओळखले आणि ते आपले भाऊबहीण असल्याचे सांगितले. त्यानंतर गीताला भारतात परत आणण्याच्या मोहिमेला गती आली, असे सुषमा स्वराज यांनी स्पष्ट केले.
मात्र, आज मायदेशी परतल्यावर गीताने आपल्या आईवडिलांना ओळखले नाही. त्यामुळे आता गीताच्या कुटुंबीयांचा शोध डीएनए चाचणीवरून करण्याची सरकारची भूमिका आहे. डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतरच गीताच्या आईवडिलांचा शोध लागेल, याकडे स्वराज यांनी लक्ष वेधले.
गीताला भारतात परत पाठविण्यासाठी पाकिस्तान सरकारने केलेल्या सहकार्याबद्दल सुषमा स्वराज यांनी त्यांचे आभार मानले. २०१४ मध्ये आमचे सरकार आले आणि त्यानंतर गीताला परत आणण्याच्या मोहिमेचा आम्ही पाठपुरावा केला आणि त्याचा परिणाम म्हणून आज गीता मायदेशी परतली, असे सुषमा स्वराज यांनी अभिमानाने सांगितले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25350

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!