Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » जीएसटीचा लाभ ग्राहकांनाच

जीएसटीचा लाभ ग्राहकांनाच

  • नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
  • घटनादुरुस्ती विधेयकाला लोकसभेची एकमताने मंजुरी

narendra-modi-11नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] – जीएसटीमुळे देशात आर्थिक क्रांती होईल, महागाई, चलनवाढ, भ्रष्टाचार आणि काळाबाजार कमी होईल, रोजगारांच्या संधी वाढतील, गरिबी नाहिशी होईल, देशाचा विकास होईल आणि खर्‍या अर्थाने ग्राहक देशाचा राजा होईल, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला.
राज्यसभेत पारित करण्यात आलेल्या जीएसटीसंदर्भातील १२२ व्या घटनादुरुस्ती विधेयकावर आज लोकसभेत झालेल्या चर्चेत सहभागी होत असतांना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या तडाखेबंद भाषणातून जीएसटीमुळे देशाचा कशा पद्धतीने विकास होईल, याचा आढावा घेतला.
जीएसटीवर जवळपास पाच तास चाललेल्या चर्चेला अर्थमंत्री अरुण जेटली यांनी उत्तर दिल्यानंतर जीएसटी संदर्भातील घटनादुरुस्ती विधेयक लोकसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. सर्व राजकीय पक्षांनी एकमताने या विधेयकाला पाठिंबा दिला.
जीएसटी म्हणजे ‘ग्रेट स्टेप बाय टीम इंडिया’ आहे, त्याचप्रमाणे जीएसटीचा अर्थ ‘ग्रेट स्टेप टोवर्ड्‌स ट्रान्सफॉर्मेेशन आणि ट्रान्सपरन्सी’ आहे, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, आम्हाला गरिबी ही वारशात मिळाली आहे. या गरिबीचा सामना करण्यासाठी जीएसटी उपयोगी ठरणार आहे. आर्थिक आणि शैक्षणिक आधारावर गरिबांना ताकद देण्याचा आमचा प्रयत्न आहे, त्यासाठी आम्हाला जीएसटीचा उपयोग होणार आहे. गरिबांसाठी आवश्यक असणार्‍या सर्व वस्तू जीएसटीतील करांच्या कक्षेबाहेर असल्याचा निर्वाळाही मोदी यांनी यावेळी दिला. खाण्याच्या गोष्टी आणि जीवनावश्यक औषधांनाही जीएसटीतून बाहेर ठेवण्यात आले आहे. जीएसटीमुळे देशात रोजगाराच्या संधीतही वाढ होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.
जीएसटीमुळे देशाचा संतुलित विकास होईल, आतापर्यंत देशाच्या पश्‍चिमी भागाचा विकास झाला, मात्र पूर्वी भाग विकासापासून वंचित राहिला, याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की, जीएसटीमुळे विकासाची समान संधी देशातील सर्व राज्यांना उपलब्ध होणार आहे. मागास राज्यांच्या उत्पन्नातही जीएसटीमुळे वाढ होणार आहे, उत्पन्नात वाढ झाल्यामुळे या राज्यांना कल्याणकारी तसेच विकासाच्या कामावर आधीपेक्षा जास्त पैसा खर्च करण्याची संधी मिळणार असल्याचे मोदी यांनी स्पष्ट केले.
मॅन, मशीन, मटेरियल, मनी आणि मिनिट यांचा सदुपयोग जीएसटीमुळे होणार आहे, त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळण्यासाठी वेगळ्या उपाययोजनांची गरज पडणार नाही, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, आतापर्यंतच्या करप्रणालीने देशाच्या विकासाला चालना देण्याऐवजी विकासाची प्रक्रिया ठप्प केली होती. चुंगी कराच्या वसुलीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या. यामुळे आतापर्यंत १ लाख ४० हजार कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे एका संस्थेने आपल्या अहवलात म्हटले आहे. आज आठ ऑगस्टला करांच्या दहशतवादापासून (टॅक्स टेररिझम) सुटका होण्याच्या दृष्टीने आपण पाऊल टाकले असल्याचे मोदी म्हणाले.
लोकसभा, राज्यसभा, २९ राज्य आणि ९० राजकीय पक्षांनी व्यापक विचारमंथनातून जीएसटीला मान्यता दिली, हा कोणा एका पक्षाचा वा सरकारचा विजय नाही, तर सर्व राजकीय पक्षांचा विजय आहे, देशातील लोकशाहीच्या उच्च तत्त्वांचा विजय आहे. राष्ट्रनीती राजकारणाच्या वर असते, याचा अनुभव यातून आपल्याला आला आहे, असे ते म्हणाले.
सरकारने देशात पहिल्यांदाच कायदा बनवून महागाईचा दर ४ टक्क्यावर स्थिर करायला रिझर्व्ह बँकेला सांगितले आहे, यात दोन टक्के इकडेतिकडे होऊ शकते, असे स्पष्ट करत मोदी म्हणाले की, जीएसटीमुळे केंद्र आणि राज्य यांच्यात परस्पर विश्‍वासाचे वातावरण निर्माण होईल. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवस्थेतही पारदर्शिता येईल. देशात एकूण किती कर गोळा होतो, याची माहिती केंद्राबरोबरच सर्व राज्यानांही मिळणार आहे.
जीएसटी हा असा एक मोती आहे, जो देशाच्या एकतेच्या माळेला आम्ही विणला आहे, या माळेमुळे देशाला ताकद मिळणार आहे. जीएसटीबद्दल मुख्यमंत्री असतांना माझ्याही मनात संशयाचे वातावरण होते. त्यामुळे या भूमिकेचाच मला जीएसटीत राज्यांच्या हितांचा विचार करतांना फायदा झाला. उत्पादक राज्यांना भरपाई देण्याची तरतूद करता आली, असे मोदी म्हणाले.
जन्मदाते व पालनकर्ते
कॉंग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खडगे यांनी जीएसटीचे जन्मदाते आम्ही असल्याचे म्हटले होते, याचा संदर्भ देत मोदी म्हणाले की, जन्मदाते तुम्ही असले तर त्याचे पालनपोषण आम्ही केले आहे. कृष्णाला जन्म कोणी दिला आणि त्याचे पालनपोषण कोणी केले, हे सगळ्यानाच माहीत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29180

Posted by on Aug 9 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (130 of 2453 articles)


नवी दिल्ली, [८ ऑगस्ट] - राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संसदेने पारित केलेल्या दोन कायद्यांवर आपली मोहोर उमटवली असून, यामुळे यानंतर ...

×