Home » क्रीडा, ठळक बातम्या » महेंद्रसिंह धोनीचा कसोटीला राम राम

महेंद्रसिंह धोनीचा कसोटीला राम राम

  • क्रीडा जगतात आश्‍चर्य
  • सिडनी कसोटीसाठी कोहली कर्णधार

ms dhoniमेलबर्न, [३० डिसेंबर] – टीम इंडियाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंह धोनीने मंगळवारी अचानक कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. या निर्णयाने त्याच्या तमाम चाहत्यांसह देशातील क्रीडा जगताला आश्‍चर्याचा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातील संघाच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्याने हा कठोर निर्णय घेतल्याचे सूत्राचे म्हणणे आहे. बीसीसीआयने धोनीच्या या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीने क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. येथे खेळल्या गेलेल्या तिसर्‍या अनिर्णीत कसोटीनंतर त्याने हा निर्णय जाहीर केला, हे विशेष! चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सिडनी येथील अंतिम कसोटीत भारताचे नेतृत्व आता विराट कोहली करणार आहे.
भारतीय क्रिकेट संघाची विदेशातील खेळपट्टीवर सातत्याने होत असलेली निराशाजनक कामगिरी आणि ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर असलेल्या भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधील वादावादी या पार्श्‍वभूमीवरच धोनीने हा निर्णय घेतला तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे.
२००५ साली श्रीलंकेविरुद्ध धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आजतागायत त्याने ९० कसोटी सामने खेळले असून २००८ पासून ६० कसोटीमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. त्याने ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ धावा केल्या आहेत. यात ६ शतके आणि ३३ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीमध्ये त्याने एकमेव द्विशतक ठोकले असून २२४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यष्टिरक्षणाची जबाबदारी सांभाळताना त्याने यष्टिमागे २५६ झेल घेतले असून ३८ फलंदाजांना यष्टिचीतही केले आहे.
‘धोनीच्या नेतृत्वात भारताने कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. भारताच्या सर्वश्रेष्ठ कसोटी कर्णधारांपैकी एक असलेल्या धोनीने टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तडकाफडकी निवृत्ती घेतली आहे. कसोटी क्रिकेटमधील त्याचे योगदान आणि भारताला मिळवून दिलेल्या गौरवाबद्दल आम्ही त्याचे आभारी आहोत. कसोटी क्रिकेटमधून त्याने स्वीकारलेल्या निवृत्तीचा आम्ही आदर करतो,’ असे बीसीसीआयने म्हटले आहे. निवृत्तीचा हा निर्णय धोनीचा स्वत:चा असून त्याच्यावर या निवृत्तीसाठी कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात आला नाही, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
मेलबर्न येथे खेळली गेलेली तिसरी कसोटी अनिर्णीत अवस्थेत सुटल्यामुळे यजमान ऑस्ट्रेलियाने दुसर्‍यांदा बॉर्डर-गावस्कर चषकावर आपले नाव कोरले आहे. त्यामुळे मानसिक दबावाखाली आलेल्या धोनीने हा तडकाफडकी निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. निवृत्ती पत्करण्याआधी धोनीने संघाच्या कामगिरीवरही ताशेरे ओढले आहेत. ‘ऑस्ट्रेलिया दौरा नेहमीच एक आव्हान असते. अशा आव्हानात्मक परिस्थितीत संघाने स्वत:ला आणखी संकटात टाकण्याची मानसिकता तयार केली आहे. तिसरी कसोटी अनिर्णीत सुटण्यासाठी मी नैतिकरीत्या जबाबदार आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सर्व कसोटी सामन्यांमध्ये आम्ही उत्तम भागीदारी केली. मात्र, अचानक काही विकेटस्‌ही गमावल्यात. त्यामुळे आमच्यावर मानसिक दबाव वाढला,’ अशी कबुलीही धोनीने दिली आहे.
मेलबर्न कसोटी आज अनिर्णीत ठरल्यानंतर भारताने कसोटी मालिका गमावली आहे. चार सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-० ने आघाडीवर आहे. धोनीच्या निवृत्तीमुळे चौथ्या कसोटीसाठी आता संघनेतृत्व कोहलीकडे आले आहे. वनडे आणि टी-२० मध्ये धोनीची कामगिरी उत्तम राहिली आहे. २००७ साली भारताने धोनीच्या कर्णधारपदाखाली पहिलाच टी-२० विश्‍वचषक पटकावला होता. तब्बल २८ वर्षांनंतर २०११ साली मर्यादित षटकांचा विश्‍वचषकही त्याच्याच नेतृत्वात भारताने जिंकला होता.
दरम्यान, कसोटी क्रिकेटमध्ये विदेशातील निराशाजनक कामगिरीमुळे समीक्षकांच्या टीकेचा त्याला सामना करावा लागला. संघाला २०११ साली इंग्लंड आणि २०११-१२ मध्ये ऑस्ट्रेलियात क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता. याशिवाय संघाने दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धही मालिका गमावली होती. याच वर्षीच्या इंग्लंड दौर्‍यात संघाला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे तो प्रचंड दबावात होता. त्यातच ऑस्ट्रेलियातील मालिका गमावल्याने त्याने हा कठोर निर्णय घेतला असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. असे असूनही या यष्टिरक्षक फलंदाजाने सर्वश्रेष्ठ भारतीय कर्णधारांच्या पंक्तीत स्वत:चे एक वेगळे स्थान निर्माण केले, हे महत्त्वाचे! त्याच्या नेतृत्वाखाली भारताने एकदिवसीय आणि कसोटी अशा दोन्ही प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केले होता. आयपीएलच्या सहाव्या सत्रात गाजलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणासाठी गठित करण्यात आलेल्या मुदगल समितीच्या अहवालात त्याचे नाव असल्याचीही चर्चा होती.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19421

Posted by on Dec 31 2014. Filed under क्रीडा, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in क्रीडा, ठळक बातम्या (2295 of 2455 articles)


=भाजपा गुरुवारी राज्यपालांना प्रस्ताव सादर करणार= जम्मू, [३० डिसेंबर] - जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे निर्माण झालेल्या ...

×