Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » मोदी सरकारचे काम योग्य दिशेने : होसबळे

मोदी सरकारचे काम योग्य दिशेने : होसबळे

=सरकारच्या कामकाजाची समीक्षा झाली नाही=
dattatreya-hosbaleनवी दिल्ली, [४ सप्टेंबर] – मोदी सरकारचे काम योग्य दिशेने सुरू असून समाधानकारक आहे. त्यामुळे सरकारच्या कामकाजावर संघाच्या नाराजीचा प्रश्‍नच उद्‌भवत नसल्याचे रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी आज शुक्रवारी सांगितले.
संघ आणि भाजपाच्या समन्वय समितीच्या येथील मध्यप्रदेश सरकारच्या मध्यांंचल या अतिथीगृहात सुरू असलेल्या त्रिदिवसीय बैठकीच्या समारोपाच्या दिवशी आयोजित पत्रपरिषदेत होसबळे बोलत होते. संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यावेळी उपस्थित होते. सव्वा वर्षाच्या कार्यकाळात सर्वांचेच समाधान करणे शक्य नाही, मात्र आतापर्यंत जेवढे काम झाले, ते समाधानकारक आहे. सरकारची उपलब्धी मोठी आहे. सरकारची जिद्द आणि चिकाटीही लक्षणीय आहे. आणखी बरेच काम सरकारला करायचे आहे आणि ते सरकार करेल, असा आमचा विश्‍वास आहे, असे होसबळे म्हणाले.
या बैठकीत सरकारच्या कामकाजाची समीक्षा झाली नाही, असे स्पष्ट करत होसबळे म्हणाले की, फक्त राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्यांवर या बैठकीत व्यापक विचारमंथन करण्यात आले. ही फक्त चिंतन बैठक होती, त्यामुळे कोणताही निर्णय या बैठकीत घेण्यात आला नाही. कारण या बैठकीला निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. संघात निर्णय घेण्याचा अधिकार फक्त प्रतिनिधी सभेला, तसेच अ. भा. कार्यकारी मंडळाला आहेत.
बैठकीला उपस्थित असलेल्या मंत्र्यांनी आपल्या खात्याच्या कामकाजाची माहिती दिली. अशी माहिती देण्यात काहीच गैर नाही, यामुळे गोपनीयतेच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन झाले नाही, असे स्पष्ट करत होसबळे म्हणाले की, मंत्री वेगवेगळ्या व्यासपीठांवर आपल्या खात्याच्या कामकाजाची माहिती देत असतात. संघाचे स्वयंसेवकही या देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे त्यांनाही मंत्र्यांनी आपल्या खात्याचे काम कसे सुरू आहे, हे सांगण्यात चुकीचे असे काहीच नाही.
भाजपावर संघाचा रिमोट कंट्रोल असल्याची टीका कॉंग्रेस करत आहे, याकडे लक्ष वेधले असता होसबळे म्हणाले की, ज्यांनी आपल्या सरकारवर रिमोट कंट्रोल चालवला त्यांना अशी टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही.
संघाने सरकारला कोणताही अजेंडा दिला नाही, लोकांच्या अजेंड्यावर सरकारने काम करावे, एवढीच संघाची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. वन रँक वन पेन्शन संदर्भात सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेईल, संबंधितांशी यासंदर्भात चर्चा सुरू आहे, असे आम्हाला भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितले आहे, असे एका प्रश्‍नावर होसबळे यांनी स्पष्ट केले.
संघ समाजजीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात समाजातील ताकदीच्या आधारे काम करतो. सरकारच्या मदतीवर आणि अनुदानावर काम करत नाही, असे स्पष्ट करत होसबळे म्हणाले की, कोणत्याही लोकशाही व्यवस्थेत लोकनिर्वाचित सरकारला अनन्यसाधारण महत्त्व असते. ते कोणी नाकारू शकत नाही, संघही नाकारू शकत आही. त्यातही आपल्या विचारधारेशी जवळचे असलेले वा त्या विचारधारेने प्रेरित असलेले सरकार काम करत असेल तर त्या सरकारशी वेगवेगळ्या मुद्यांवर विचारांचे आदानप्रदान करण्यात काहीच गैर नाही.
दहशतवाद आणि नक्षलवादाच्या मुद्यावर बैठकीत चर्चा झाली. यासंदर्भात शासनाने योग्य भूमिका घ्यावी, आणखी प्रयत्न व्हावे, अशी भावना बैठकीत व्यक्त झाल्याचे होसबळे यांनी सांगितले. देशाच्या आर्थिक विकासाचे युगानुकूल मॉडेल तयार करण्याची आवश्यकता बैठकीत व्यक्त करण्यात आली. कारण पाश्‍चिमात्य देशातील आर्थिक विकासाचे सर्व मॉडेल अपयशी सिद्ध झाले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचेही रक्षण होईल आणि देशाचा विकास होईल, असे मॉडेल आम्हाला तयार करावे लागणार आहे, याकडे होसबळे यांनी लक्ष वेधले.
कमाई, पढाई आणि दवाई यामुळे खेड्यातून शहराकडे जाणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातच लोकांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल, त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळेल आणि त्यांना चांगल्या प्रकारची आरोग्यसेवा मिळेल, अशी व्यवस्था विकसित झाली तर खेड्यातून शहरात येणार्‍यांची संख्या कमी होईल, असे होसबळे म्हणाले. यादृष्टीने नानाजी देशमुख यांनी उल्लेखनीय काम केले होते, याकडे होसबळे यांनी लक्ष वेधले.
शिक्षणाचे भारतीयीकरण झाले पाहिजे. आधुनिक शिक्षणासोबतच मूल्याधारित शिक्षणही मिळाले पाहिजे, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली, याकडे लक्ष वेधत होसबळे म्हणाले की, शिक्षण महागडे होऊ नये, त्याचे व्यापारीकरण होऊ नये. त्याचप्रमाणे कुणीही शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी आमची भूमिका आहे.
देशातील गरिबाला रोटी, कपडा आणि मकान या मूलभूत गरजांसोबतच स्वाभिमानाने जगता येईल, असे वातावरण तयार करण्याची आवश्यकता आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
धार्मिक आधारावरील जनगणनेच्या आकडेवारीबाबत संघाच्या रांची येथे होणार्‍या बैठकीत चर्चा होणार असल्याचे होसबळे यांनी सांगितले.
देशातील मंदिर आणि धार्मिक संस्थांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे, अशी संघाची भूमिका आहे, कारण अनेकवेळा परदेशातील नागरिक भारतात येतात, मंदिरांना, धार्मिक स्थळांना भेटी देतात. याठिकाणच्या वातावरणात सुधारणा झाली, तर अशा ठिकाणांना भेटी देण्याचे प्रमाण वाढू शकते, असे ते म्हणाले.
राममंदिराच्या मुद्यावर ठाम
राममंदिराच्या मुद्यावर संघ वचनबद्ध असल्याचे एका प्रश्‍नाच्या उत्तरात होसबळे यांनी स्पष्ट केले. रामजन्मभूमीवर मंदिर झाले पाहिजे, ही संघाची भूमिका आहे. मात्र, राममंदिराच्या मुद्यावर संघ कोणताही कार्यक्रम देत नाही, असा कार्यक्रम देण्याचा अधिकार साधू-संत आणि धर्मसंसदेला आहे, असे होसबळे म्हणाले. भाजपाच्या जाहीरनाम्यातही या मुद्याचा समावेश होता. मात्र, हा विषय सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. ते लक्षात घेऊन सरकारने आवश्यक पावले उचलली पाहिजे, असे होसबळे म्हणाले.
शेजारी देशांशी मैत्रीपूर्ण संबंध असावे
शेजारी देशांशी सौहार्दाचे आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याची आवश्यकता प्रतिपादित करत होसबळे म्हणाले की, भारत हा सार्क संघटनेचा सदस्य आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश पूर्वी भारताचेच अंग होते. आपल्यापासून तुटूनच ते वेगळे झाले आहे. काही कारणाने दोन देशांतील संबंधात तणाव निर्माण झाला, जसे अनेकवेळा भावाभावातील संबंधात तणाव निर्माण होत असतात. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करत दोन देशांतील संबंध चांगले करण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. शेजारी देशांसोबतचे आपले सांस्कृतिक संबंध आणखी चांगले कसे होतील, याचा विचार झाला पाहिजे. त्यामुळे इतिहास आणि भूगोल लक्षात घेऊन शेजारी देशांसोबतचे संबंध सुरळीत करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे होसबळे म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शुक्रवारी समन्वय समितीच्या बैठकीच्या समारोपाच्या दिवशी अखेरच्या सत्रात सहभागी झाले. होसबळे यांची पत्रपरिषद संपत असताना पंतप्रधान मोदी यांचा ताफा मध्यांचल भवनात आला. पंतप्रधान या बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले होते. बैठकीच्या पहिल्या दोन दिवसांत ते आले नाहीत, त्यामुळे ते बैठकीसाठी कधी येतात, याकडे माध्यमांचे लक्ष लागले होते. शुक्रवारी शेवटच्या दिवशी मोदी या बैठकीत सहभागी झाले. जवळपास दोनतासपर्यंत पंतप्रधान मोदी मध्यांचल भवनात उपस्थित होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23705

Posted by on Sep 6 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1504 of 2453 articles)


कुंभमेळ्यातील पहिले शाही स्नान पहिला मान निर्वाणी आखाड्याला दुसरे शाही स्नान १३ सप्टेंबरला नाशिक, [२९ ऑगस्ट] - राखीपौर्णिमेच्या पावन ...

×