Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » राज्यसभा कमजोर करण्याचा सरकारचा प्रयत्न: गुलाम नबी

राज्यसभा कमजोर करण्याचा सरकारचा प्रयत्न: गुलाम नबी

Ghulam-Nabi-Azadनवी दिल्ली, [१७ मार्च] – बहुमत नसल्यामुळे राज्यसभेला कमजोर करण्याचा, त्याचे महत्त्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी गुरुवारी एका पत्रपरिषदेत केला.
२४ अकबर रोड या कॉंग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत आझाद म्हणाले की, हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक आहे. राज्यसभेत आपले बहुमत नाही, त्यामुळे आधार विधेयक तेथे पारित होऊ शकणार नाही, याची खात्री असल्यामुळेच सरकारने आधार विधेयकाला वित्त विधेयकाचे स्वरू दिले. वित्त विधेयक राज्यसभेत पारित होण्याची गरज नसते. या निमित्ताने कोणतेही विधेयक राज्यसभेत आणण्याची निकोप परंपरा सरकारने मोडीत काढली, असा आरोप आझाद यांनी केला.
यावेळी आम्ही सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतल्यामुळेच राज्यसभेत विक्रमी कामकाज झाले, अनेक महत्त्वपूर्ण विधेयके पारित झाली, आमच्या सहकार्याशिवाय हे सरकारला शक्य झाले नसते, याकडे आझाद यांनी यांनी लक्ष वेधले.
राज्यसभेचे महत्त्व कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी आणि राज्यसभेचे महत्त्व दर्शवण्यासाठी आम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव, तसेच आधार विधेयकात दुरुस्ती सुचवली, असे आझाद यांनी स्पष्ट केले.
जीएसटी विधेयकावर यावेळी लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत चर्चाही झाली नाही, सरकारच या विधेयकाबाबत गंभीर नसल्यामुळे या मुद्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असे एका प्रश्‍नावर आझाद म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात स्वामीनाथन् समितीच्या अहवालानुसार पिकांच्या उत्पादन खर्चात ५० टक्के नफा मिळवून त्याचा किमान हमीभाव निश्‍चित करण्याचे आश्‍वासन भाजपाने दिले होतेे, मात्र सत्तेवर आल्यावर सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून, असे करणे शक्य नसल्याचे सांगत सरकारने शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचा आरोपही आझाद यांनी केला.
असाच प्रकार काळ्या पैशांच्या बाबतीतही सरकारने केला. काळा पैसा देशात आणण्याची, तसेच परदेशात काळा पैसा असणार्‍यांची नावे जाहीर करण्याची घोषणा भाजपाने केली होती, मात्र सत्तेवर आल्यावर भाजपा सरकारने या मुद्यावरूनही घूमजाव केले, याकडे आझाद यांनी लक्ष वेधले.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी परदेश दौर्‍यावरून परतल्यानंतर त्याबाबतची माहिती संसदेला देत असत. पण, नरेंद्र मोदी यांनी आपल्या एकाही परदेश दौर्‍याची माहिती संसदेला दिली नाही, असा आरोप आझाद यांनी केला.
राज्यसभेत अधिवेशनकाळात कोणकोणते मुद्दे उपस्थित केले याची माहिती गुलाम नबी आझाद, तर लोकसभेतील माहिती माजी केंद्रीय मंत्री एम. वीरप्पा मोईली यांनी यावेळी दिली. यावेळी कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सूरजेवाला उपस्थित होतेे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27397

Posted by on Mar 18 2016. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (631 of 2453 articles)


नवी दिल्ली, [१७ मार्च] - कॉंग्रेसशासित राज्यांसह सर्वच राज्यांना वस्तू व सेवाकर कायदा अर्थात जीएसटी हवा आहे, असा दावा केंद्रीय ...

×