Home » ठळक बातम्या, विदर्भ » विदर्भात सरासरी ६२ टक्के मतदान

विदर्भात सरासरी ६२ टक्के मतदान

=गडकरी, पटेल, वासनिक, मोघे, देवतळे, अहिर यांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद=
नागपूर, (१० एप्रिल) – विदर्भातील लोकसभेच्या १० जागांसाठी आज उत्साही वातावरणात सरासरी ६२ टक्के मतदान झाले. गडचिरोलीतील नक्षली हल्ल्याची किरकोळ घटना वगळता विदर्भात सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. कुठेही अनुचित घटना घडली नाही. बुलढाणा मतदारसंघात ५८.६६ टक्के, अकोला ६५ टक्के, अमरावती ६५ टक्के, वर्धा ६१ टक्के, रामटेक ६२ टक्के, नागपूर ५९ टक्के, भंडारा ६५ टक्के, गडचिरोली-चिमूर ६५ टक्के, चंद्रपूर ६३ टक्के आणि यवतमाळ-वाशीममध्ये ६० टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आजच्या मतदानाने भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, अ. भा. कॉंग्रेस महासमितीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, कॉंग्रेसचे विलास मुत्तेमवार, भाजपाचे हंसराज अहिर, संजय धोत्रे, शिवसेनेचे आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रतापराव जाधव, कृपाल तुमाने, भारिप-बमसंचे प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन पक्ष गवई गटाचे राजेंद्र गवई, भाजपाचे नाना पटोले, रामदास तडस, अशोक नेते, कॉंग्रेसचे सागर मेघे, नामदेव उसेंडी यांच्यासह अनेक प्रमुख उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनध्ये बंद झाले.
विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, भंडारा-गोंदिया, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि यवतमाळ-वाशीम या १० लोकसभा मतदारसंघात आज राज्यातील पहिल्या टप्प्यात मतदान झाले. या दहा मतदारसंघात २०१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. गडचिरोलीचा अपवाद वगळता सर्वच ठिकाणी सायंकाळी ६ वाजेपयर्र्त मतदान चालले. नक्षलवादी कारवायांच्या भीतीमुळे गडचिरोलीतील मतदानाची प्रक्रिया दुपारी ३ वाजताच पूर्ण करण्यात आली.
आज सकाळी मतदानाला प्रारंभ झाला तेव्हा मतदारांमध्ये फारसा उत्साह नव्हता. वर्धा मतदारसंघात पहिल्या चार तासात म्हणजे सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त १५ टक्के मतदान झाले. रामटेकमध्ये सकाळी ११ वाजेपयर्र्त १३.६३ टक्के मतदान झाले होते. नागपूरमध्ये ही टक्केवारी १६.१२ टक्के होती. भंडारा-गोंदियामध्ये पहिल्या चार तासात २२ टक्के मतदारांनी आपला मताधिकार बजावला होता. त्याखालोखाल गडचिरोलीत २१.७३ टक्के मतदारांनी मतदान केले. चंद्रपूर येथे १६.५४ टक्के मतदान झाले. दुपारी उन्हामुळे मतदानाची गती थोडी मंदावली. मात्र, दुपारी चारनंतर मतदानाला चांगलाच वेग आला. अनेकठिकाणी तर सायंकाळी ६ पर्यंत रांगेत असलेल्यांचे मतदान पूर्ण करताना निवडणूक कर्मचार्‍यांना रात्रीचे आठ वाजले. पहिल्यांदाच मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडणार्‍या तरुण-तरुणींमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत होता.
अनेक मतदान केंद्रांवर आपले नाव न दिसल्यामुळे मोठ्या उत्साहाने मतदानाला आलेल्यांना निराश होऊन परतावे लागले. काही जणांनी अनेक बुथमध्ये जाऊन मतदार यादीत आपले नाव शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. नवीन मतदार म्हणून अर्ज भरलेल्यांची नावे मतदार यादीत न आल्यामुळे ते चांगलेच नाराज झाले होते. मागील निवडणुकीत मतदान केलेल्यांची नावे यावेळी मतदार यादीतून गायब झाली होती. यामुळे अनेकांनी निवडणूक आयोगाच्या ढिसाळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. अमरावतीत तर महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना आपल्या कार्यकर्त्यांनिशी घेराव घालून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
नक्षलग्रस्त भागातही मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात आज घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची सरासरी टक्केवारी ६८ एवढी नोंदविण्यात आली. नक्षलग्रस्त व अतिदुर्गम भागातही मतदानासाठी प्रचंड उत्साह दिसून आला. या मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार अशोक नेते, कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यासह एकूण ११ उमेदवारांचे भाग्य आज मशीनबंद झाले आहे.
पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे व जिल्हा प्रशासनाच्या उत्तम कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्रात सर्वत्र शांततापूर्वक वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. अतिदुर्गम भागातील मतदारांना मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी यावेळी प्रशासनाकडून सहकार्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याशिवाय मतदान केंद्रांवर बंदोबस्तासाठी लावण्यात आलेल्या बाहेर जिल्ह्यातील कर्मचार्‍यांनाही मतदानाचा आपला हक्क बजाविता यावा यासाठी यावेळी पोलिस विभागाने वेगळी यंत्रणा राबवून त्यांचेही मतदान करवून घेतले हे विशेष.
एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा येथील जंगल परिसरात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाल्याने गर्देवाडा येथील मतदान केंद्र आज दुपारी २ वाजता बंद करण्यात आले. या घटनेव्यतिरिक्त जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. भामरागड तालुक्यातील धोडराज व गोलगुडा या दोन्ही मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी दिसून आली. अतिदुर्गम भागातील या केंद्रांवर नक्षल्यांचे सावट असतानाही नक्षल्यांची भीती झुगारून नागरिक मतदान केंद्रांवर पोहोचले. दुपारी १ वाजेपर्यंत गोलगुडा येथे ६४ टक्के, तर धोडराज मतदान केंद्रावर ५३ टक्के मतदान झाले होते. याशिवाय पल्ली या मतदान केंद्रावर दुपारी १ वाजेपर्यंत ६२ टक्के, तर ताडगाव मतदान केंद्रावर ५९.८४ टक्के मतदान झाले होते. दुपारी अडीचनंतर ताडगाव मतदान केंद्रावर ७५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते. जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांनी आपल्या सहकार्‍यांसह मतदान केंद्रावर पोहचून मतदानाचा हक्क बजाविला.
अमरावतीत ६५ टक्के मतदान
अमरावती लोकसभा मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५४.८२ टक्के, तर ६ वाजेपर्यंत सुमारे ६५ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आजच्या मतदानाने शिवसेना-भाजपा महायुतीचे खा. आनंदराव अडसूळ, राकॉंच्या नवनीत राणा, बसपाचे गुणवंत देवपारे, रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांच्यासह १९ उमेदवारांचे भाग्य आज ईव्हीएम मध्ये बंद झाले.
आज सकाळी सर्वत्र मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून लागला. मात्र ऊन वाढल्यावर शहरी भागात मतदान काहीसे मंदावले. ग्रामीण भागात दुपारीही उत्साह दिसत होता. सायंकाळी पुन्हा मतदान केंद्रांकडे लोकांच्या रांगा वाढू लागल्या.
वर्धा लोकसभा मतदारसंघात मतदान शांततेत
वर्धा लोकसभा मतदारसंघात २१ उमेदवारांसाठी आज १ हजार ९३३ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले. सेलू तालुक्यातील चार गावांचा, तर समुद्रपूर तालुक्यातील एका गावाचा या निवडणुकीवर बहिष्कार होता. भाजपा व कॉंग्रेस या तुल्यबळ पक्षातील उमेदवारांमध्ये सरळ लढत असल्याने मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४१ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ६ वाजता लोकसभा मतदारसंघात जवळपास ६४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
वर्धा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी-शिवसेना महायुतीचे उमेदवार रामदास तडस आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सागर मेघे यांच्यात काट्याची टक्कर होती. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी वर्ध्यातून महाराष्ट्रातील प्रचाराला शुभारंभ केला होता. मतदानाच्या शेेवटच्या टप्प्यापर्यंत अनेक दिग्गजांनी लोकसभा मतदारसंघात हजेरी लावली.
वर्धा लोकसभा मतदारसंघात वर्धा जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, देवळी-पुलगाव, आर्वी, तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, धामणगाव हे दोन असे सहा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात १५ लाख ६२ हजार ७१२ मतदार असून यात ८ लाख १६ हजार १९१ पुरुष, तर ७ लाख ४६ हजार ५०७ स्त्री मतदार आहेत. लोकसभा मतदारसंघातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ११५ पोलिस अधिकार्‍यांसह १ हजार ६४१ पोलिस तैनात करण्यात आले होते. तसेच ४१ अतिजलद चमूही ठेवण्यात आली होती. लोकसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४१ टक्के, ११ वाजेपर्यंत १७.२६ टक्के, तर दुपारी ३ वाजेपर्यंत ४०.७७ टक्के मतदान झाले होते. ५ वाजेपर्यंत ५८.०८ तर ६ वाजता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ६४ टक्के मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
सेलू तालुक्यातील आलगाव, चिंचोली, शिवणगाव, पहेलानपूर या चार गावांत, तर समुद्रपूर तालुक्यातील झुणका येथील नागरिकांनी आपल्या विविध समस्यांच्या मुद्यावर निवडणुकीवर बहिष्कार टाकला. प्रशासनाने मतदारांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, एकाही गावात त्याचा फायदा झाला नाही. दरम्यान, कोणत्याही राजकीय पक्षाचे पदाधिकारी व उमेदवाराने बहिष्कार टाकलेल्या गावांमध्ये भेट दिली नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष होता.

Short URL: https://vrittabharati.in/?p=12614

Posted by on Apr 11 2014. Filed under ठळक बातम्या, विदर्भ. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, विदर्भ (2428 of 2455 articles)


पुणे, (१० एप्रिल) - माहिती तंत्रज्ञानाचे युग सुुरू झाल्यापासून भारतात आणि जगातही प्रत्येक महिना हा त्याच्या वापराबाबत नवा विक्रम करणारा ...

×