Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » सईद यांच्या निर्णयाने भाजपा संतप्त

सईद यांच्या निर्णयाने भाजपा संतप्त

=फुटीरवादी कट्टरपंथी नेता मसरतच्या सुटकेवरून वाद, अशा घटना मान्य नाहीत=
Mufti Mohammad Sayeedजम्मू, [८ मार्च] – २०१० मधील शंभराहून अधिक लोकांचे बळी घेणार्‍या ‘दगडफेक’ आंदोलनाचे नेतृत्व करणारा हुर्रियत कॉन्फरन्सचा नेता मसरत आलम याची मुक्तता करण्याच्या मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निर्णयावर भाजपाने आज रविवारी सडकून टीका केली. सरकारने हा निर्णय एकतर्फी घेतला आणि सरकारमध्ये भाजपा घटक असतानाही या पक्षाला साधी विचारणाही करण्यात आली नाही, असा संताप व्यक्त करीत अशा घटना कदापि मान्य केल्या जाणार नाहीत, असा इशारा भाजपाने दिला.
मुख्यमंत्री सईद यांच्या या निर्णयावर भाजपाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. भाजपाचे सर्वच २५ आमदार बैठकीला उपस्थित होते. या मुद्यावर भाजपा आपली भूमिका लवकरच निश्‍चित करणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जुगलकिशोर शर्मा यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली. ते म्हणाले की, सईद यांच्या या निर्णयाविषयी भाजपाला माहिती नव्हती. त्यांनी जर भाजपाचा सल्ला घेतला असता, तर आम्ही स्पष्टपणे विरोधच केला असता. सईद यांनी स्वत:च निर्णय घेतला आणि त्याच दिवशी आलमची मुक्तताही करण्यात आली. याबाबतची माहितीदेखील आम्हाला देण्यात आली नाही. आलमची मुक्तता करण्याचा निर्णय अतिशय घातक आहे.
सरकार चालविण्यासाठी तयार झालेल्या किमान समान कार्यक्रमातही राजकीय कैद्यांच्या मुक्ततेचा उल्लेख नाही. पण, पीडीपीने स्वत:च याबाबत निर्णय घेतला. समाजासाठी घातक ठरणार्‍या लोकांची मुक्तता करायलाच नको. कारण, हे लोक नेहमीच भारतविरोधी कारवाया करीत असतात. या मंडळींना जर आपण असेच मोकळे सोडत राहिलो, तर समाज आणि देशाची सुरक्षा धोक्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे सरकार एकट्या पीडीपीचे नाही. त्यात भाजपाही सहभागी आहे आणि ही सत्ता आम्हाला आमच्या संख्याबळाच्या आधारावर मिळाली आहे. त्यामुळे पीडीपीने युतीधर्माचे पालन करावे. सईद यांच्या निर्णयामुळे भाजपाला प्रचंड वेदना झाल्या आहेत. किमान समान कार्यक्रमाच्या बाहेर जाऊन घेण्यात आलेला कोणताही निर्णय आम्ही मान्य करणार नाही. हुर्रियत नेत्याच्या सुटकेबाबत तीव्र निषेध नोंदविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, कॉंगे्रससह विविध राजकीय पक्षांनी सईद यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. तर, जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पाटीने राज्यात दोन दिवसांचा बंद पुकारला आहे.
आमचे प्राधान्य शांततेला : पीडीपी
दरम्यान, भाजपाच्या टीकेला महत्त्व न देता, राज्यात शांतता प्रस्थापित करण्यालाच आमचे प्राधान्य असल्याचे पीडीपीने म्हटले आहे. राज्याला हिंसाचारातून मुक्त करायचे आहे आणि त्यासाठी सर्वच घटकांना एकत्र आणायचे आहे. कुठलेही गंभीर आरोप नसलेल्या राजकीय कैद्यांनाही यात सहभागी करायचे आहे. त्यांना कारागृहात ठेवून चर्चा कशी होणार, अशी भूमिकाही पीडीपीचे प्रवक्ते आणि राज्याचे शिक्षण मंत्री नईम अख्तर यांनी मांडली.
पुन्हा अटक करा : भाजपा
दरम्यान, आलम हा एक खतरनाक अतिरेकी असल्याने त्याला मोकळे न सोडता पुन्हा अटक करा, अशी मागणी भाजपाने केली आहे. त्याला मुक्त करून सईद यांनी मोठी चूक केली आहे. आमचा त्यास विरोध आहे. भारतापासून काश्मीरला वेगळे करण्याची मोहीम हाती घेणारा राजकीय नेता ठरूच शकत नाही. त्यामुळे त्याला राजकीय कैदी संबोधून मुक्त करणे ही अतिशय हास्यास्पद बाब असल्याचे भाजपाचे आमदार रवींद्र रैना यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21208

Posted by on Mar 9 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1949 of 2452 articles)


=महिला दिनी पंतप्रधानांचा निर्धार, मोबाईल हेल्पलाईन स्थापन करणार= नवी दिल्ली, [८ मार्च] - महिलांवर होणारे अत्याचार निंदनीयच आहेत. महिलांच्या आयुष्यात ...

×